lp47उन्हाळ्याची चाहूल लागली की पुढचे दोन तीन महिने हैराण करणाऱ्या उकाडय़ाच्या आठवणीनेच अंगावर काटा येतो. त्यावरचा उपाय म्हणजे एसी. तेव्हा या उन्हाळ्यासाठी तुम्हाला एसी खरेदी करायचा असेल तर त्यासाठीच्या टिप्स-

उन्हाळी खरेदीला आता सुरुवात झाली आहे. येऊ घातलेल्या गुढीपाडव्यानिमित्त बाजार चांगलाच फुललेला दिसतो आहेत. उन्हाळी खरेदीमध्ये फ्रिज, कूलर, एअरकंडिशनर्स या घरगुती उपकरणांची खरेदी होते. म्हणूनच आपण सर्वोत्तम एसीची निवड कशी करावी, एसी खरेदी करताना कोणत्या बाबींचा विचार करावा याची चर्चा करू या. एसी निवडताना पुढील बाबींचा विचार करावा-
१. गरज- एसी खरेदी करण्यासाठी दुकानात जाण्यापूर्वी आपल्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, त्यानुसार एसीची निवड करणे आपल्याला सोपे होते. गरज म्हणजेच आपल्याला उपलब्ध असलेली जागा कोणत्या व किती आकाराच्या रूमसाठी आपल्याला एसी आवश्यक आहे, त्यानुसार एसीचा प्रकार आपल्याला ठरविता येतो. त्या प्रकारांबाबतीची माहिती पुढे दिलेली आहे. आपल्या एसी बसविण्याच्या रूमच्या आकारमानानुसार एसीच्या क्षमतेची निवड करता येऊ शकते. तसेच आपण कोणत्या परिसरात राहतो त्यानुसार एसी कोणता निवडावा हे ठरविता येते. म्हणजे नागपूरसारख्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असणाऱ्या विभागापेक्षा पुणे, लोणावळा भागाजवळ राहणाऱ्या लोकांची एसीची गरज बदलू शकते. कारण एसी हे उपकरण तापमान नियंत्रण आणि हवेतील आर्द्रता यानुसार वापरले जाते त्यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी जेथे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस असते तेथे आपल्याला त्या तापमानावर उत्तम रीतीने चालू शकणारा एसी घेणे महत्त्वाचे असते. जर आपण आद्र्रता अधिक असणाऱ्या ठिकाणी राहात असाल तर एनर्जी एफिशिअंट एसी खरेदी करावा. योग्य त्या क्षमतेचा आणि प्रकारच्या एसीची निवड करणे ही एसी खरेदीतील सर्वात विशेष बाब आहे.
२. सुविधा- जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसतशा विविध कंपन्या नवनवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपले मॉडेल्स बाजारात आणताना आपल्याला दिसतील. या नवीन एसीबरोबर येणारे सर्वच नवीन फीचर्स आपल्याला माहीत असावेच असे नाही, परंतु काही नेहमी उपयुक्त ठरणाऱ्या टबरे कूलिंग, इनबिल्ट स्टॅबिलायझर, स्लीप टाइमर यांसारख्या काही फीचर्सबद्दल आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला माहीत नसलेले अनेक फीचर्स एसीमध्ये समाविष्ट केलेले असतात. आपल्याला उपयुक्त ठरतील असेच फीचर्स आपल्या एसीमध्ये असावेत, अनावश्यक फीचर्स असलेला एसी घेणे शक्यतो टाळावा. सध्या वीज पुरवठा खंडित झाल्यावर ऑटो रिस्टार्ट, डिुमिडीफाइंग कन्डिशन, सिलेक्टेबल कूलिंग स्टेप, टेम्परेचर सेन्सर, पॅसिव्ह डस्ट फिल्टर, डीओड्रायझिंग फिल्टर यांसारख्या विशेष सुविधा आपल्याला आपल्या एसीसाठी निवडता येतील. आपल्या एसीपासून होणारा आवाज हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. स्प्लिट एसी फारसा आवाज करीत नाहीत, परंतु विंडो एसी निवडताना त्यापासून होणाऱ्या आवाजाचा नक्की विचार करावा. नाहीतर त्याचा आवाज डोकेदुखी होऊ शकते.
सध्या अनेक कंपन्या असा दावा करतात की त्यांच्या एसीमध्ये असलेले फिल्टर्स हे हवेतील विषाणू मारतात, परंतु हे विषाणू कमी तापमानामुळे मारले जातात त्यामुळे त्यांच्या एसीच्या फिल्टरमुळे विषाणू मारले जातात हा दावा फोल आहे. अशा नाहक प्रलोभनांच्या आहारी पडून एसीची निवड करू नये.
३. बजेट- ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. सध्या बाजारात ९ ते १० हजारांपासून ते ६० ते ७० हजार रुपयांपर्यंतचे एसी उपलब्ध आहेत. बजेटनुसार आपल्याला उपयुक्त अशा एसीच्या प्रकाराची निवड करता येते. उन्हाळ्यात अगर गुढीपाडव्याच्या निमित्याने अनेक ऑफर्स आपल्यासमोर उपलब्ध असतात त्यांचा सुयोग्य वापर करून कमीतकमी बजेटमध्ये चांगला एसी खरेदी करता येऊ शकतो.
कोल्डड्रिंक्सने घसा थंड होऊ शकतो, परंतु तो तेवढय़ापुरताच. रात्री शांत, थंड झोप हवी असेल तर एसी हवाच. तेव्हा या कडाक्याच्या उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ‘टेकफंडा’च्या मदतीने आपल्यासाठी योग्य एसीची निवड जरूर करा.

कॉम्प्रेसर आणि एअर फ्लो
आपल्या घरासाठी एअरकंडिशनर्स खरेदी करण्यापूर्वी आपल्याला त्याबद्द्ल तांत्रिक माहिती असणे अतिशय गरजेचे आहे. ही तांत्रिक माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात.
एसीची क्षमता बीटीयू अगर टन:- एसीची क्षमता माहीत असणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या घराच्या आकारानुसारच एसीची क्षमता असावी. उत्तम कूलिंगसाठी एसीची क्षमता जास्त अथवा कमी असू नये. यामुळे एसीमध्ये असणाऱ्या थर्मोस्टॅट, ह्युमिडिटी कंट्रोल यांसारख्या बाबी उत्तम रीतीने कार्यरत राहू शकतात. मुख्यत्वे एसीची क्षमता ही बीटीयू (ब्रिटिश थर्मल युनिट)मध्ये मोजली जाते. भारतात ही क्षमता टनामध्ये मोजली जाते. किती आकाराच्या घरासाठी किती टन एसी असावा याबद्दल माहिती देणारे टेबल पुढे दिलेले आहे. १२ हजार बीटीयू म्हणजे एक टन.
कॉम्प्रेसर – एसीमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा कॉम्प्रेसर. हा कॉम्प्रेसर फ्रिजमधील कॉम्प्रेसरप्रमाणेच हवा थंड करण्याचे काम करतो. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, रोटरी आणि स्क्रोल असे तीन प्रकारचे कॉम्प्रेसर एसीमध्ये असतात. त्यातील रोटरी व्हेन कॉम्प्रेसर हे खात्रीशीर व किफायतशीर असतात.
एअर फ्लो आणि मॉइश्चर रिमूव्हल- एसीचा एअर फ्लो रेटनुसार आपली रूम थंड होण्यासाठीच्या लागणाऱ्या कालावधीत परक पडतो. एअर फ्लो जितका चांगला, तेवढय़ा वेगाने आपली खोली थंड होते. परंतु जास्त एअर फ्लो रेट म्हणजे मॉइश्चर (आद्र्रता) रिमूव्हल क्षमता कमी आणि एसीमध्ये मॉइश्चर रिमूव्हल रेट अधिक असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे अधिक मॉइश्चर रिमूव्हिंग रेट असणारा एसी खरेदी करणे कधीही उत्तम.
याखेरीज विविध प्रकारच्या एसीमध्ये असणाऱ्या बारीकसारीक बाबींची माहिती आपण दुकानदारांकडून करून घ्यावी.

एअरकंडिशनर्सचे अनेक प्रकार सध्या बाजारात आहेत त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे
विंडो अगर वॉल एसी- या प्रकारचे एसी हे खिडकी अगर भिंतीवर बसविले जातात. हे मुख्यत: एकाच खोलीला थंड करण्यासाठी वापरले जातात. यातील सर्व कंपोनंट्स म्हणजेच कॉम्प्रेसर, कंडेन्सर, कूलिंगकॉइल, इव्होपरेटर या साऱ्या बाबी एकाच चौकोनी खोक्यात बसविलेल्या असतात. या प्रकारचे एसी हे मुख्यत: आठ ते ३० हजारांपर्यंत उपलब्ध असतात. या प्रकारचे एसी हे फारच कमी उर्जा घेतात.
पोर्टेबल एसी- साधारणत: जुन्या प्रकारच्या एअर कूलर्सप्रमाणे यांची रचना असते. या प्रकारच्या एसीला खाली चाके असतात ज्यामुळे हे एसी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येतात. मुख्य म्हणजे हे एसी इन्स्टॉल करण्यासाठी कोणत्याच एक्सपर्टची गरज भासत नाही. फक्त प्लग इन करायचे आणि थंड हवेचा आनंद हवा तेथे उपभोगायचा. या प्रकारच्या एसीला फ्लोअर स्टँडिंग एसी असेही म्हणतात. या प्रकारचे एसी हे १५ ते ६५ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.
स्प्लिट एसी – सर्वात नावाजलेला एसीचा प्रकार म्हणजे स्प्लिट एसी. यामध्ये एसीचे काही भाग हे विविध प्रकारात विभागले जातात अशा एसींना स्प्लिट एसी असे म्हणतात. यामध्ये कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर हे एसीचे भाग घराबाहेर असतात, एक किंवा दोन एअर होल घरात कोठेही बसविता येतात. या प्रकारचे एसी हे जास्तीतजास्त जागेला थंड करण्यासाठी वापरले जातात. विंडो प्रकारच्या एसीपेक्षा हे वापरण्यास हँडी असतात. यातून आवाजही होत नाही त्यामुळे सध्या हेच सर्वोत्तम प्रकारचे एसी आहेत. यांची किंमत मुख्यत: १२ हजार ते दोन लाखांपर्यंत असू शकते.
डक्टेड एसी- या प्रकारचे एसी हे काहीसे स्प्लिट एसीप्रमाणेच असतात. परंतु यामध्ये एकापेक्षा अधिक होल्स एकाच कॉम्प्रेसरला जोडता येतात. आपल्या मोठय़ा घरात विविध ठिकाणी आपल्याला एसी लावायचे असतील तर त्यासाठी या प्रकारचे एसी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्रकारचे एसी हे फारच कमी इलेक्ट्रिक एनर्जी घेतात. या प्रकारचे एसी हे ३० हजारांपासून पुढे उपलब्ध आहेत.
आपल्या आवश्यकतेनुसार योग्य त्या प्रकारचा एसी निवडा..
प्रशांत जोशी