मी निघालो होतो गुलबग्र्याला. एका चर्चासत्राच्या निमित्ताने. मार्ग होता कन्नडच्या ओट्रमच्या घाटातून. हा घाट खूपच सुंदर; पण तेवढाच बेभरवशाचा. कारने जाऊ म्हटले तर वेळ अवघ्या १५ मिनिटांपेक्षा अधिक लागू नये. पण घाट जर हट्टी राणीसारखा रुसला- म्हणजे वाहनांनी त्रस्त झाला, तर मग काही तासच काय; चक्क दिवस आणि रात्रीची फेरी झाल्यावरसुद्धा मार्ग मिळणार नाही, अशी स्थिती. निघताना तरी सुदैवाने मार्ग अनुकूल होता. मार्गशीर्षांतील ऋतूत घाटातला प्रवास हा एक अनुभव आहे. तो अनुभवावा लागतो. त्याच्या नजरेत नजर टाकून त्याला डोळाभर बघावे लागते, तेव्हा कुठे कालिदासाच्या भाषेत ‘अहो नेत्रं लब्ध्वा निर्वाणम्’ अशी स्थिती जागते. नेत्राच्या मोक्षाची स्थिती सांगू शकणारा महाकवी कालिदास. त्याची प्रतिभाही धन्य! यापूर्वी हा घाट अनेकदा उरी-शिरी भेटलाय. ऋतूंच्या वेगवेगळय़ा विभ्रमांत त्याच्या अंतरंगीच्या नाना कळा निकट न्याहाळता आल्यात.
या खेपेला मात्र गुलबग्र्याहून परतताना औरंगाबाद गाठले आणि खबर मिळाली की, घाट बंदिस्त झालाय. वाट नाहीये. आता काय करावे? एक मार्ग होता- जळगावमार्गे पुढे चालत राहणे. पण हा मार्ग दीर्घ आहे. एक वाट थेट गौताळ्याच्या अभयारण्यातून जात असल्याचे वर्तमान कळले आणि मनाने मुसंडी मारली. चलू या की अभयारण्यातून! तिथली अनेक वर्णने  ऐकून माहीत होतं- तिथे वन्यप्राणी आहेत.. जंगल आहे.. दाट असे सागाचे रान आहे.
मी आणि माझा चालक आम्ही दोघेच होतो. मी त्याला विचारले. त्यालाही ही वाट नवीन होती. माझ्या उत्साहाने त्याला मंत्रभारित केले. नाही तरी शौर्य आणि भिरुता हे संसर्गजन्य भाव आहेत. एक शूर व्हायचे म्हणतो, तसा सारा परिसर शौर्यसंपन्न होतो. एकाची छाती भयाने थरथरते आणि मग इतरांचाही नूर पालटतो. चालक तयार झाला. आमची कार निघाली. काही काळ काही वाडय़ा-वस्त्यांनी सोबत केली. वाटेत कष्टकरी महिलांची एक रांग मुंग्यांच्या रांगेसारखी निघालेली दिसली. डोंगराच्या उतारावरून संथ, पण ठाम लयीत उतरणारी ती रांग मला श्रमसाधनेची एक समंत्रक वाटचाल वाटत राहिली. दिवसभर राब-राब राबून घराकडे परतणारी ही पावलं आता सायंकालीन व्यवस्था बघणार होती. आपल्या घरासाठी सरपणाचा भारा त्यांच्या माथ्यावर होता. गुरांसाठी चारा होता. घरधन्यासाठी लगबगीने चालणारी ती पावलं मी बघत राहिलो आणि त्या श्रमसाधक पावलांसमोर माथा कृतज्ञ भावनेने झुकला. मनात एक तार झंकारली. काय असेल अब्द-अब्द यांच्या मनाच्या तळाशी? एखाद्या महासागराच्या तळाशी जे काही आंतरिक धन विसावलेले असते, तसे काहीतरी असेल का यांच्या मनाच्या तळाशी? जळाच्या विश्रब्ध उदरात सामावलेल्या नाना रत्नमंजूषा असतील काय? निळावंतीच्या काठावर सजणाऱ्या आणि मानव्याला ललामभूत ठरणाऱ्या वैभवसंपन्न अशा सुखवैभवाच्या नोंदी तिथे कशा आढळणार? मी विचार करीत राहिलो. आपल्या महान देशाला वारशात मिळालेले जीवनधन म्हणजे आपली श्रमपरायणता. ही पावलं थकूनभागून घरी परतत आहेत. मी मनाने त्यांचा पाठलाग करीत राहिलो. त्या पाठलागाचा एक कोलाज मनाच्या पटलावर चितारला जात होता. मी नकळत  त्यांच्यासमवेत गाडीतून उतरून पायी वाटचाल करीत राहिलो. मला एका अज्ञात प्रेरणेने प्रोत्साहित केले होते. सायंकाळी हे दृश्य बघणे आणखीनच जिवावर करवत चालविणारे होते. हेच दृश्य जर मी सकाळी बघितले असते तर कदाचित माझी प्रतिक्रिया वेगळी झाली असती. माझं मन कदाचित वेगळा आलेख काढतं झालं असतं. मला मग आणखीनच काळजीत पडल्यासारखे झालं. या महिलांचा दादला कुठे असेल? त्यांच्या ओठावर कुठली ओवी असेल? या स्त्रियांनी केलेल्या श्रमांचे नेमके काय होईल? त्या मग मला एकदम मानवाच्या भावजीवनाच्या यात्रेकरू वाटू लागल्या. पौर्णिमेने मानवावर केलेल्या गारुडाचे नाना भावसंदर्भ माझ्या मनाच्या गगनात कोंदटून आले.
सायंकाळ हळूहळू उतरत होती. मोठय़ा डौलात. एका आगळ्यावेगळ्या दिमाखात. एखाद्या परीराणीसारखी. गगनमंडलातून धरित्रीवर उतरणारी ती सायंकाळ मला युगानुयुगांचे पाथेय आपल्या स्कंधावरील मंगलघटात सामावून घेत उतरताना दिसत होती. तिची रेशमी पारदर्शक वस्त्रे नयनाभिराम होती. तिच्या कमनीय हालचाली सृष्टीजगताला आश्चर्यात बुडवणाऱ्या होत्या. तिच्या मंथरगतीला गीताचे आर्त स्वरसंधान होतं. ते सारं भव्य-दिव्य आणि उदात्त होतं. मी त्या संध्याकाळला मनोमन नमन केले. या सांध्यकाळात काहीसं धूसरपण होतं. काहीशी अस्पष्टता होती. प्रेयसीच्या भाषेत जशी अधुरी अस्पष्टता असते, अगदी तशीच. ही अस्पष्टता खरं तर अभिव्यक्तीचे मोठे गुज अंतरंगी मिरवणारी असते. संतसाहित्यात या सायंकालीन समयाची सय नोंदवलेली आहे. मी त्या सायंकाळचा हात आपल्या खांद्यावर तोलून बघत होतो. माझ्या देहाच्या रंध्रारंध्रातून एक वीणा झंकारू लागली. या वीणावादनाला लौकिक आणि अलौकिकाचे भान उरले नाही. सायंकाळच्या सोबत परतणारी ही पावलं माझ्या मनाला पावन अभिषेक जळाने समंत्रक करीत राहिली. मधेच ओढाळ गाईचे हंबरणे आणि धावण्याची स्पर्धा सुरू होती. वाटेवरून चालताना गाईच्या हंबरण्याला त्यांच्या गळ्यातील घंटानादाने विलक्षण असे संवादघन अर्पिले होते. गाय आणि माय या दोघांच्या अंतरीचे हृद्गत त्या नादब्रह्मात प्रकटले होते.
घाट म्हटला की चढउतार आले आणि वळणेही आली. तुलनेनं या वाटेवर ते कमी आढळले. आम्ही सुसाट वेगाने निघालो होतो. रस्त्यांवरचे फलक असे सूचित करीत होते, की या वाटा वन्य पशूंच्या वाटचालीतल्या आहेत. कायेवर आणि मनावर एक थरार गोंदवला जात होता. मी विचार करीत राहिलो. वनातली वन्य मंडळी खरंच का भयकारी आहेत? मला हिंदीचे कवी सच्चिदानंदन हिरानंद वात्स्यायन ‘अज्ञेय’ यांच्या एका कवितेतल्या ओळी आठवल्या. कवी म्हणतो- ‘साँप तुम शहर में तो कभी नहीं रहे, फिर यह डँसना कहाँ से सिखा? जहर कहाँ से पाया?’ याचा साधा अर्थ असा की, विष आणि दंशविद्येसाठी माणसाचे शहरी होणे गरजेचे आहे.. त्यासाठी अरण्यसेवन करण्याची गरजच काय?
अरण्याने आपल्या संस्कृतीला एक बोध दिला. उपनिषदे आपल्या आरण्यकांची हाक ऐकून मार्गक्रमण करीत राहिलीत. उपनिषदांचा गाभा गीतेतून प्रकटला. तमाम उपनिषदे म्हणजे जणू काही गाई. या गाईंची धार गोपालकृष्णाने सुयोग्य अशा पार्थासाठी काढली. गीता प्रकटली ती उपनिषदांचा कृपाप्रसाद म्हणूनच. उपनिषदे म्हणजे जवळ जाऊन समजून घेण्याची विद्या सांगणारी शास्त्रसंहिता होय. अरण्याने संस्कृतीला वैभवसंपन्न केले. मी अशा एका अरण्यातून निघालो होतो. मार्गात अस्वल आणि वाघांची चित्रे होती. प्रत्यक्ष त्यांचे दर्शन होणे, हा तर भाग्ययोगच ठरावा. तसे या काळात अनेकदा ही हिंस्र श्वापदे अरण्याची वाट सोडून व मोडून शहराकडे वळतात. अरण्यातले जळ आटून गेले आहे. अरण्यातले अरण्यत्व संपायला आम्हीच कारणीभूत आहोत. पशूंनी काय करावे? कुठे जावे? स्थलांतरणाची ही आदिम प्रवृत्ती पशू आजही जोपासताहेत. माणूस एकटा होता. पुढे मग त्याचे कुटुंब झाले. कबिल्याच्या कुटुंब बनण्याची ही प्रक्रिया मानवी उत्थानाचे एक महाकाव्य आहे. शेतीचा शोध लागला. तो कर्तबगार अशा महिलेने लावला. या शोधाच्या सोबतच माणसाची पावलं स्थिरावली. ‘पेरले ते उगवते’ हा शेतीचा संदेश कुटुंबव्यवस्थेचा कणा ठरला. स्त्रीला कुटुंबातल्या पुरुषाची नेमकी भूमिका रेखांकित करता आली. एका दिव्य भावनेने मानवी जीवन फलद्रूप झाले. स्त्री आणि पुरुष यांच्या नातेसंबंधातला नेमका तोल सांभाळला गेला. भूमिका कळली. जबाबदारी ठरली. एक मानव्य फुलण्याला आरंभ झाला. अरण्ये वसतीस्थानं बनली. जंगले शेतीयोग्य भूमी बनली. त्यातून येणाऱ्या उद्याच्या विकासाची वाट विकसित झाली. जगभर शेतीचे शास्त्र हे संस्कृतीची कूस ठरले. बाकी शास्त्रे बनलीत ‘लॉजी.’ मूळचा ग्रीक शब्द आहे ‘लोगोस.’ सायकॉलॉजी, झुलॉजी, बायोलॉजी.. पण अ‍ॅग्रि‘कल्चर.’ एकच शास्त्र संस्कृतीचा आधार बनले. मी विचार करत राहिलो. आता झरझर उतरणाऱ्या महिलांच्या सावल्या अंधूक, धुसर, अस्पष्ट बनल्यात. अंदाज घेऊन कळाव्यात अशा उदबत्तीच्या सुगंधी आवतणासारख्या त्या डोंगर उतरत होत्या. त्यांच्या मागे उनाड धावणारे वासरू होते. सारं काही एका मंगलाच्या अवतरणाची कथावार्ता सांगणारे. रात्र अजून धरणीवर उतरायची होती. चतुर्दशीचा चांद गगनात डोकावत होता. पौर्णिमेपेक्षा आपण चतुर्दशीला मानाचे स्थान देतो. साहित्य आणि संस्कृतीने चतुर्दशीचा चंद्र पुजलाय. चंद्राचा प्रकाश विकीर्ण होत होता. खरं म्हणजे अंधाराची जेवढी भीती वाटत नाही, त्याहून अधिक भीती उजेडाची असते. आपण एखाद्या लख्ख उजेडाला सामोरे जाताना किती कासावीस होतो, हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा विषय आहे. हे अनुभवणे आपल्याला स्वत:ला अनेक अर्थानी पारखून घेणे आहे. अंधार आणि उजेड यांची जी धावपळ जारी आहे, ती खरं तर सत्य आणि असत्याच्या पाठलागासारखी आहे. जिंकते नेहमीच सत्य; पण असे पदोपदी वाटत राहते की, विजयोत्सव का असत्याचा साजरा करावा लागेल? सत्याच्या तुलनेने असत्याचा पोशाख अधिक जरतारी असतो. अधिक झगमगता असतो. सत्य एकुटवाणे असते. असत्याची फौज मात्र गाजावाजा करत निघालेली असते. अंधार आणि उजेडाच्या या लपंडावाचा अन्वय मनाशी लावत होतो. अचानक एक गर्जना कानी आली. मन थरारले. गर्जना खरं तर अनोळखी होती. पण तिला होता अरण्याचा रक्तलालस स्पर्श! माझा चालक क्षणभर स्थिरावला. क्षणभरच त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या नजरेतल्या विद्धतेने मला स्पर्श केला.
अभयारण्यातील वाट मनाला शहारा आणणारी होत चालली होती. तरी बरे, एखाद् दुसरे वाहन अधूनमधून दिसत होते. एखादी बसदेखील वाटेवरून मार्गक्रमण करत होती. मुख्य घाटात वाहनांनी गिल्ला केल्यामुळे काही धाडसी लोक या अनाघ्रात वाटेवरून जात होते. काही ठिकाणी पॉइंट केलेले आढळले. एखादी साहसी जोडी मोटारसायकलीवरून धाव घेताना दिसत होती. खांद्यावर कॅमेरे अडकवून गळामिठी घालत चालणारी युगुल-पावले अंधाराला उभा छेद देत चालली होती. त्यांच्या ओठांवर रुंजी घालणारे गीत हे काळाच्या असीम कालचक्रावर उत्कीर्ण केलेले भावमधुर प्रणयगीत होते. त्यांच्या नयनांतून स्रवणाऱ्या मदनोत्सवाच्या झळाळीची चित्रं मनावर नाना विभ्रमांची रांगोळी काढणारी होती. त्यांना कसलेच भय वाटत नव्हते. दिशा मुक्त होत्या. एकीकडे अरण्यातल्या निर्जन वातावरणाची साथ होती, तर दुसरीकडे आपल्याच नादात तल्लीन अशा त्या चंद्र-रोहिणीसारख्या साहसी युवांना आरक्तवर्णी संबंधांची ओढ होती. खरं तर हेच अरण्यनिधान असते. हेच अरण्यसंवेदन असते. मी या यात्रेच्या निमित्ताने या संबंधांमागची विलक्षण तगमग अनुभवत राहिलो. गौताळ्याच्या अभयारण्याची वाट अनेक हातांनी हाकारत राहिली. मनाच्या तळाशी एक अब्द-अब्द साठत होते. मला आता खात्री पटत चालली होती, की तुमच्या, माझ्या, आपल्या संस्कृतीची नाळ ही अनेकार्थानी अरण्याशी बांधलेलीच नव्हे, तर सामीलकी सांगणारी आहे.