‘कला अकादमी, गोवा’द्वारा प्रस्तुत ३४ वा सूरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सव नुकताच पणजी येथे संपन्न झाला. हा महोत्सव मी संपूर्ण ऐकला. या महोत्सवाच्या वेगळेपणाबद्दल आणि त्यातील कलाप्रस्तुतीने जे कलामूल्यविषयक प्रश्न उपस्थित झाले, ते कलाकार, रसिक आणि आयोजकांच्या विचारमंथनासाठी उपस्थित करावेत असे तीव्रतेने वाटल्याने हा प्रपंच..
या महोत्सवात प्रथमच गायन-वादनाला जोडून ज्या दोन उपक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला, त्याबद्दल आयोजक निश्चितच प्रशंसेस पात्र ठरतात. पहिला उपक्रम म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताला ज्याचे ऐतिहासिक योगदान आहे अशा एका दिवंगत कलाकाराच्या कलामूल्यांचा नव्या पिढीला परिचय करून देणे आणि त्यासाठी अ१ूँ्र५ं’ टं३ी१्रं’ वर आधारित असा विश्लेषणात्मक आणि आस्वादक समीक्षा सामावून घेणारा दृक्श्राव्य कार्यक्रम सादर करण्यासाठी तज्ज्ञ कलाकाराला  पाचारण करणे. दुसरा उपक्रम म्हणजे संगीतातील शाश्वत मूल्ये आणि नवनिर्माण या विषयांवर आधारित गायक व संगीततज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन करणे. अशी चर्चा कलाकारांसोबत रसिकांसाठीही उद्बोधक ठरते.. त्यांना कला प्रक्रिया कळते. कलेतील बरे-वाईट काय, ते समजते आणि त्यांची एकूण आस्वादक्षमता वाढते.
पहिल्या उपक्रमांतर्गत गायक व संगीतज्ञ सत्यशील देशपांडे यांनी ‘उस्ताद अमीर खाँ यांचा सौंदर्यशोध’ हा शोधप्रबंध सादर केला. पावणेतीन तासांच्या या भरगच्च कार्यक्रमात त्यांनी अमीर खाँसाहेबांच्या गायकीतील आलापी, सरगम आणि तानक्रिया यांतील सृजनात्मक प्रक्रिया समजावून सांगितली. यासाठी त्यांनी  ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली, त्या बुजुर्ग कलाकारांची ध्वनिमुद्रणेही आपला विषय सुस्पष्ट करण्यासाठी ऐकवली. अमीर खाँच्या सरगममधील गूढता आणि अनाकलनीयतेचा उलगडा त्यांनी वडील शाहमीर खाँ यांच्याकडून मिळालेल्या मेरखंड पद्धतीचे विवेचन करून केला व सरगम करून समेवर येण्यासाठी अमीर खाँनी राबविलेल्या भेंडीबाजार घराण्यातील अमान अली खाँसाहेबांचे सौंदर्यतत्त्वही विशद करून सांगितले. खाँसाहेबांनी आपला स्वतंत्र तानविचार जोपासण्यासाठी ज्या रजबअलींची तालीम घेतली त्यांचे व त्यांचे शिष्यवर गणपतराव देवासकर यांचेही ध्वनिमुद्रण यानिमित्ताने ऐकता आले.
सत्यशीलजींची प्रस्तुती त्यांच्या गायनाने, ओघवत्या शैलीमुळे, नर्मविनोदाने अत्यंत रोचक अशी झाली. नुसत्या श्रवणानंदाखेरीज कलासाधकांना अमीर खाँच्या गाण्यातली सौंदर्यतत्त्वे आपल्या गायकीत समजून व सामावून घेण्यासाठी उपयुक्त असेच हे श्रवणसत्र होते.
सूरश्री केसरबाईंचे गुरू उस्ताद अल्लादिया खाँच्या गायकीपासूनच प्रेरणा घेऊन विरोधी सौंदर्यमूल्यांची आपली स्वतंत्र गायकी बनविणारे रजबअली हे अमीर खाँसाहेबांचे उस्ताद होते. ज्या अमीर खाँनी रजबअलींच्या गायकीतील सौंदर्यतत्त्वे वृद्धिंगत केली, व्यामिश्र केली, कलेला आवश्यक असलेली गूढरम्यता त्यात आणली, गायनात मूड अथवा भावस्थितीसारख्या जयपूर घराण्यात त्याज्य असलेल्या व्यक्तिगत संवेदनांना आपल्या गाण्यात वाव दिला, त्या अमीर खाँच्या सौंदर्यशोधाचा विचार सूरश्री केसरबाई केरकर महोत्सवात व्हावा याबद्दल आयोजकांच्या कलेची व्याप्ती दाखविणाऱ्या औदार्यपूर्ण दृष्टिकोनाचे आवर्जून कौतुक केले पाहिजे.
दुसऱ्या दिवशी (७ नोव्हेंबर रोजी) ‘ख्यालसंगीतातील परंपरा आणि नवता’ या विषयावर पं. सुरेश तळवलकर, पं. सत्यशील देशपांडे व पं. विकास कशाळकर यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ख्यालाचा उगम, त्यातील वेगवेगळ्या घराण्यांचा सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन, त्यातील उत्क्रांती व उत्कर्ष, नवे प्रवाह आणणाऱ्या पं. कुमार गंधर्व, पं. किशोरी आमोणकर यांच्यासारख्यांच्या कलेची चिकित्सा, ख्यालाचे भवितव्य, नवतेतही चिरस्थायी राहतात ती ख्यालविस्तारातील शाश्वत मूल्ये अशा अनेक मूलगामी विषयांवर तज्ज्ञांच्या मार्मिक निरीक्षणांचा लाभ श्रोत्यांना झाला. ही निरीक्षणे संगीतसाधकांच्या आत्मशोधाला खतपाणी घालणारी होती यात शंकाच नाही.
या दोन्ही उपक्रमांना रसिकांखेरीज असलेली २०० हून अधिक संगीतशिक्षक, कलाकारांची उपस्थितीही थक्क करणारी आणि इतर आयोजकांनी प्रेरणा घ्यावी अशीच होती.
महोत्सवात गायन-वादनातील पहिली प्रस्तुती होती अश्विनी भिडे व संजीव अभ्यंकर प्रस्तुत ‘जसरंगी जुगलबंदी’! षड्जात एक राग व त्याच स्केलच्या मध्यमातून दुसरा राग या कल्पनेतून सादर केलेली एकत्र प्रस्तुती म्हणजे जसरंगी जुगलबंदी. प्रथम प्रस्तुतीत पुरिया धनाश्री आणि शुद्ध धैवताचा ललत, तर दुसऱ्या प्रस्तुतीत कलावती आणि अभोगी हे अनुक्रमे संजीव अभ्यंकर आणि अश्विनी भिडे यांनी एकत्र गायलेले, पण जोडराग न ठरणारे गायन त्यांच्या कौशल्याला, सुरेलपणाला, एकमेकांना समजावून घेण्याच्या (कलाकारांत अभावानेच आढळणाऱ्या) गुणाला मनापासून दाद द्यावी असेच होते. चांगल्या कलाकारांद्वारे एका वेळी एकाच रागाचा उत्कर्ष (बहुधा त्याच त्याच पद्धतीने व तोही त्याच त्याच कलाकाराचा!) ऐकण्याची सवय असलेले आणि घराणेदार गायकांपेक्षाही खतरनाक असणारे घराणेदार श्रोते या जसरंगीला हवा तो न्याय देत नाहीत. या मनोवृत्तीच्या श्रोत्यांना मी एवढेच म्हणतो, की संजीव आणि अश्विनी हे केवळ ‘जसरंगी’च ऐकवत नाहीत, तर त्यांचे अभिजात संगीताचा आनंद देणारे एकल कार्यक्रमही भरपूर होतच आहेत. तुम्हाला गरज नसेल, पण त्यांना कधीतरी रुचिपालट करू द्या की!
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गायन-वादनातील पहिला मानकरी विक्रांत नाईक हा तरुण कलाकार होता. पं. गजाननबुवा जोशीप्रणीत व पं. उल्हास कशाळकरद्वारा उत्कर्षित ग्वाल्हेर घराण्यातील कलामूल्याने प्रभावित असलेले त्याचे गाणे आशेच्या कोवळ्या किरणांनी आल्हादित करून गेले.
जयतीर्थ मेवुंडी या तितकासा युवाही नसलेला आणि बुवाही नसलेला आणि तरीही प्रथितयश गायकाचा ‘आसावरी तोडी’ सुखदाश्चर्याचा आनंद देऊन गेला. भीमसेनजींच्या अंधानुकरणाच्या पगडय़ातून स्वाभाविकरीत्या बाहेर पडून हा कलाकार आपल्या आत्मशोधाच्या मार्गावरचा पांथस्थ होत आहे, याच्या अनेक खुणा त्याच्या गाण्यात आढळल्या. मात्र, नंतरच्या मुलतानीत आणि विशेषत: भजनात आढळून आलेला द्रुतगतीचा आणि त्यातील अतिद्रुत तानांचा मुबलक पुरवठा रसहानी करणारा होता. मोक्षाची एवढी घाई, त्यासाठी उपयोगात आणलेला प्रस्तुतीचा ‘क्रॅश कोर्स’ आध्यात्मिक शांतीचे विडंबन वाटले. ‘साहब मिलें सबूरी में’ हे संतवचन आठवले.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रातले पं. उल्हास कशाळकरांचे गाणे मनापासून आनंद देऊन गेले. केसरबाई केरकर महोत्सवात काय व कसे गायला हवे, याचे औचित्य त्यांच्या गाण्यात आणि त्यांच्या आवर्तन भरण्याच्या क्रियेतून दिसले. त्यांचे  गुरू पं. गजाननबुवा जोशी यांनी आपल्या ग्वाल्हेर घराण्याच्या उपजाऊ मातीत रुजवलेले केसरबाईंच्या गायकीचे संस्कार कशाळकरांच्या गाण्यातून पल्लवित होताना आढळले. खासकरून ‘बसंती केदार’मधल्या अत्तर-सुगंधात या स्मृतींचा आणि त्यांच्या स्वतंत्र अभ्यासपूर्ण विचारांचा परिमळही होता. टाळीवाक्य नसणारं व तरीही असर करून जाणारं संयत आणि आवर्तन भरण्याच्या क्रियेला शास्त्रकाटय़ाची कसोटी लावून भावनेचा उत्तम परिपोष करणारे त्यांचे गायन सर्वागपरिपूर्ण होते आणि समारोहातील अत्युत्कृष्ट प्रस्तुती होती.
कार्यक्रमातील आणखी एक उल्लेखनीय प्रस्तुती म्हणजे निशा पारसनीस यांनी ऐकवलेले ‘गुजरी तोडी’ आणि ‘ललत पंचम’ हे राग. त्यांच्या रागविस्तारामध्ये त्यांचा स्वत:चा सौंदर्यविचार त्यांनी तर्कशुद्ध नेमकेपणाने मांडला. कुसर नसलेली कला किती सौष्ठवपूर्ण असू शकते याचे प्रत्यंतर त्यांच्या गायनात आले. त्यांच्या निर्गुण भजनात कबीराला अभिप्रेत असलेला एकांत व्यक्त झाला.
पं. राजन मिश्रा व पं. साजन मिश्रा यांनी अत्यंत ठाय विलंबित लयीमध्ये प्रस्तुत केलेल्या ‘भीमपलास’ रागामध्ये प्रदर्शन झाले ते त्यांच्या माध्यमावरच्या, तसेच अष्टांगावरच्या व सर्जनक्रियेवरील प्रभुत्वाचे! ही सर्व सामग्री एका कलात्मक आनंदाच्या निर्मितीसाठी वापरावयाची असते, ही जाणीव त्यांच्या भीमपलासमध्ये आढळली नाही. ही त्रुटी त्यांनी नंतर प्रस्तुत केलेल्या राग ‘श्री’मधील मध्यलयीने बऱ्याच अंशी भरून काढली.
नीलाद्री कुमारांचे सतारवादन वाद्यातील नादमयता, ध्वनिसमृद्धता याचा त्यांनी केलेला विचार तसेच वाद्यातील जवळजवळ पाच सप्तकांपर्यंत त्यांनी वाढवलेला पल्ला आदी तंत्राधिष्ठित गोष्टींमुळे लक्षात राहिले. अतिद्रुतगतीतील ‘झाला’वादनातील त्यांचे प्रभुत्व थक्क करणारे होते. त्यांच्या वादनात रागाशयाची खोली व्यक्त करणारे मृदु तरंग नव्हते, तर स्तिमित करणारे टणत्कार होते आणि जोडीला उथळ रागप्रवाहाचा खळखळाट!
महोत्सवातील कर्नाटकी आणि हिंदुस्थानी वाद्यसंगीताच्या जुगलबंदीचे प्रयोजन कळले नाही. हिंदुस्थानी संगीतातील खाली-भरीचा म्हणजेच तालाच्या आवर्तनाचा पहिला व दुसरा असे दोन भाग असण्याचा व त्यामुळे मुखडा घेऊन समेवर येण्याच्या प्रथेचा आणि कर्नाटकी शैलीतील खाली-भरी नसलेल्या व समेपासूनच कृतीचा वा बंदिशीचा मुखडा पकडण्याच्या प्रथेचा समन्वय या प्रस्तुतीत साधला गेला असे वाटले नाही. परंतु या प्रस्तुतीतील सर्वच वादकांचे आपापल्या वाद्यांवरचे व गतिमानतेवरचे प्रभुत्व मात्र वाखाणण्यासारखे होते.
समग्र महोत्सव ऐकल्यावर असे निश्चित वाटले, की सूरश्री केसरबाई केरकरांनी कंठसंगीताला आपल्या ख्यालगायनाने कलेच्या अत्युच्च स्तरावर नेऊन ठेवले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या महोत्सवात कुसरकाम, कसरतकाम असलेले, गतिमानतेलाच परमानंद समजणारे वाद्यसंगीत कंठसंगीताच्या जोडीने प्रस्तुत केलेच पाहिजे होते का? अन्यथा, वाद्यसंगीताचा वेगळा महोत्सव आयोजित करून वाद्यसंगीतातील कलामूल्यांचा वादकांच्यात एक सकारात्मक चुरस निर्माण करून तौलनिक अभ्यास साधता येईल किंवा कसे?                                                                                           
  -एक रसिक