गेल्या आठवडय़ात अमेरिकेच्या ऑरेगन प्रांतातील एका कम्युनिटी कॉलेजमध्ये एका युवकाने केलेल्या बेछुट गोळीबारात अनेक तरुण जीवांचा हकनाक बळी गेला. या वर्षांत अमेरिकेतील विद्य्ोच्या आवारात घडलेली ही ४५ वी घटना! एखाद्या माथेफिरुच्या या गैरकृत्यात बळी पडलेल्या मुलांच्या पालकांच्या वेदनेला जसा अंत नसतो, तसाच हत्या करणाऱ्या दोषी मुलाच्या पालकांनाही आयुष्यभर ती टोचणी वागवावी लागते.

आर यू ख्रिश्चन?’ या प्रश्नावर ज्यांनी माना डोलवल्या, उभे राहिले त्यांच्यावर ‘गुड, विदीन अ मिनिट यु विल सी गॉड’ असे म्हणत त्या तरुणाने गोळ्या झाडल्या. ऑरेगन राज्यामधील एका आडगावातील कम्युनिटी कॉलेजमधील अनेक तरुण जीव नाहक प्राणाला मुकले. या वर्षांत विद्य्ोच्या आवारात घडलेली ही ४५ वी घटना. दरवेळेसारखाच पुन्हा एकदा ‘गन कंट्रोल’ हा विषय चघळला जाईल ते पुढची घटना घडेपर्यंत.  प्रत्येक वेळेस कुणाच्या तरी माथेफिरूपणामुळे निष्पाप मुलांना, त्यांच्या शिक्षकांना प्राण गमवावा लागतो. धक्कादायक म्हणण्याच्या पलीकडे गेले आहे हे.

शाळांमधील गोळीबारांबद्दल चर्चा सुरू झाली की, हमखास ती पोचते १९९९ सालापर्यंत. २० एप्रिल १९९९ साली कॉलोरॅडो राज्यातील लिटिलटन कोलंबाईन हायस्कूलमध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुले मारली गेली, तर ३० हून अधिक जखमी झाली. या घटनेने देश हादरला, पण त्यानंतरही सातत्याने हे सत्र चालूच आहे.

१ ऑक्टोबर २०१५ रोजी घडलेला हा वर्षभरातला ४५ वा गोळीबार. प्रत्येक वेळेला मारेकऱ्याने हे का केले असावे याचा शोध, सोशल नेटवर्कवरचा मारेकऱ्याचा वावर, त्याने वेळोवेळी व्यक्त केलेली मते, फोटो यावरून बांधला जाणारा अंदाज यालाही अंत नाही. यात भर म्हणून आता कधी गोळीबार करणाऱ्या मुलांच्या पालकांना, त्यांचे आपल्या मुलांवर नियंत्रण नाही म्हणून, सरकारला, शाळा मुलांचे रक्षण करू शकली नाही म्हणून, काही ठिकाणी शाळेतील कर्मचाऱ्यांना, आणि बंदूक उत्पादक तसेच मुलांना हिंसक बनवण्याच्या आरोपाखाली चित्रपट आणि संगणकीय गेम्स बनवणाऱ्या कंपन्यांना काही पालकांनी कोर्टात खेचले आहे. दरवेळेला अशा घटनांची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न होत राहतो. निघालेल्या निष्कर्षांतून उपायाची अंमलबजावणी किती वेळा होते हा भाग वेगळा. राजकारणाचे रंग इतके गडद आहेत की त्यातून ‘गन कंट्रोल’सारखे सहजसाध्य असणारे उपाय किती जणांचे बळी गेल्यावर होणार ते राजकारणीच जाणोत. तोपर्यंत हे असे प्रसंग वारंवार सर्वाच्या वाटय़ाला किती दिवस येत राहणार

याचाच विचार मन कुरतडत राहणार. याच पाश्र्वभूमीवर गोळीबार करणाऱ्या काही तरुणांच्या आई-वडिलांच्या मनाचा प्रसारमाध्यमांनी घेतलेला वेध महत्त्वाचा ठरावा.

कोलंबाईन हायस्कूलमधील गोळीबार करणाऱ्या डिलनच्या आई-वडिलांनी त्या घटनेनंतर सुमारे १५ वर्षांनी ‘फार फ्रॉम द ट्री’ या पुस्तकासाठी मुलाखत दिली. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी संपर्क साधूनही इतके दिवस मौन बाळगलेल्या सुझनने अखेर आपले मन मोकळे केले. डिलनची आई सुझन सांगते की, जेव्हा कोलंबाईन शाळेत गोळीबार झाला तेव्हा  डिलनच्या मित्राचा, डिलनचा पत्ता लागत नाही हे सांगण्यासाठी फोन आला. त्या वेळेस आपला मुलगाच यात सहभागी असेल अशी पुसटशी शंकाही मनाला शिवली नाही. पण सुझन घरी येईपर्यंत पोलिसांनी घराला वेढा घातला होता. हताशपणे या साऱ्याला सामोरे जाताना इतक्या जणांच्या मृत्यूला आपला मुलगा कारणीभूत ठरला यावर विश्वास ठेवणे सुझनला कठीण जात होते. डिलनबद्दल सांगताना ती म्हणते, चारचौघांच्या मुलांसारखाच तोही वाढला. किंबहुना, त्याची ओळख हुशार मुलगा म्हणूनच होती. वडिलांबरोबर तासन्तास बुद्धिबळ खेळणे हा त्याचा आवडता छंद. पालक म्हणून आमच्यासमोर कधीच कोणतीही आव्हाने त्याने उभी केली नाहीत. व्हिडीओ गेम्स, स्वत:च्या खोलीत तासन्तास काढणे हे जी इतर मुले या वयात करतात तेच तोही करत होता. एकमेव प्रसंग होता तो, कधीतरी रात्री त्याने आणि एरिकने रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी उघडल्याचा. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. मात्र त्यावरून तो हे टोक गाठेल किंवा ही त्याच्यातील विक्षिप्तपणाची लक्षणे आहेत अशी शंकाही आली नाही.

डिलनच्या या कृत्यानंतर सुझनच्या मनात कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार डोकावून गेला. तिचे बाहेर जाणे बंद झाले, नोकरीवर पुन्हा रुजू होऊनही कामातले लक्ष उडाले. तिच्या वेळी-अवेळी रडण्याने आजूबाजूच्या लोकांची अवस्था अवघड होऊन जाई. ते जाणवत असूनही तिला जोरजोरात रडावेसे वाटे. आपल्या मुलाने असे करावे यावर विश्वास ठेवणे जितके कठीण जात होते तितकाच पालक म्हणून डिलन आणि एरिकचे आई-वडीलच गुन्हेगार आहेत, असा प्रसारमाध्यमांतून आळवला जाणारा सूरही सुझनचे काळीज भेदून टाकत होता. मुलाखतकर्त्यांला ती सांगते, ‘‘माझं मूल गमावल्याचा शोकही मी करू शकत नव्हते अशी अवस्था होती. काय चुकलं माझं? लाड केले जास्त की फार जास्त स्वातंत्र्य दिलं? नक्की काय चुकलं की त्याने असं वागावं? पालक म्हणून आमचं काय चुकलं या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही का? खूप विचार करते तेव्हा आता मनातल्या मनात मीच त्याची क्षमा मागते, कारण कदाचित त्याला माझ्या मदतीची गरज असेल हे ओळखण्यात मी अपयशी ठरले.’’ हे सांगून त्या गोळीबारात बळी पडलेल्या काही पालकांनी संपर्क साधला तो क्षण गहिवरून टाकणारा असल्याचे ती सांगते.

सँडी हुक प्राथमिक शाळेत गोळीबार केलेल्या घटनेतला गुन्हेगार होता अ‍ॅडम.  शाळेत येऊन गोळीबार करण्यापूर्वी स्वत:च्या आईला ठार मारणाऱ्या अ‍ॅडमबाबत पालक म्हणून त्याची आई कमी पडली हे मात्र ते अमान्य करतात. अ‍ॅडम वडिलांबरोबर राहत नसला तरी अ‍ॅडमच्या आईने त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न केला होता. मात्र आपल्याला उपचाराची गरज आहे हे मान्यच नसणाऱ्या अ‍ॅडमचा उपचारांना दिला जाणारा प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता. या साऱ्याचा वडील म्हणून झालेल्या परिणामाबद्दल ते म्हणतात, ‘‘रात्री खूपदा एकच स्वप्न पडतं. ज्यात दाराच्या पलीकडे कुणीतरी संतप्त नजरेने आपल्याकडे पाहतंय असं वाटतं. त्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर माझी गाळण उडते. विचार केल्यावर लक्षात येतं की दारात उभा असलेला तो चेहरा अ‍ॅडमचा असतो आणि अ‍ॅडमच्या हातून प्राण गमावलेल्या मुलांचं मी प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे माझी भीतीने गाळण उडते.’’

वरील दोन उदाहरणे सोडल्यास आतापर्यंत शाळेच्या आवारात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांतून गुन्हेगारांचे पालक फारसे बोलते झालेले दिसत नाहीत. जे झाले ती घरे आपल्यासारखीच मध्यमवर्गीय वातावरणाची वाटतात. ते सांगतात त्यापेक्षा खरंच काही पालक म्हणून ते वेगळं करू शकले असते असं वाटत नाही. मग ही मुले अशी का वागतात या प्रश्नाची उकल तशीच राहते. मुलांच्या कर्माचे ओझे वाहण्याखेरीज पालकांसाठी अशाने काही पर्यायच उरत नाही. मग नक्की प्रतिबंध तरी कसा करणार या गोष्टींना? बंदूक नियत्रंण? मानसिक विकृतीचा वेळीच शोध आणि त्यावर त्वरित योग्य उपचार? सळसळत्या तरुणाईला अयोग्य मार्गाकडे जाण्यापासून रोखणे? मुलांमध्ये होत असलेल्या सूक्ष्म फरकाचीही नोंद घेऊन त्यांना बोलते करणे? प्रश्नांच्या जंजाळातून खात्रीलायक नसले तरी हे काही मार्ग दिसतात. प्रश्न आहे तो त्या मार्गावर पाऊल टाकण्याचा. कधी होणार हे, कोण करणार आणि कसे?
mohanajoglekar@gmail.com