अनेक पुस्तके वाचल्यानंतर असमाधानी असणारा वाचक तपशिलाशिवाय ‘आणखी’ काहीतरी हवे, असे मनोमन म्हणत असतो. तर तपशिलालाच तत्त्व समजण्याची चूक आणि तत्त्व ठसवण्याच्या नादात कलाकृतीची कलात्मक गुणवत्ता शिथिल होण्याचा धोका याबाबत गुणी लेखक जागरूक असतोच. तपशिलालाच वाङ्मयकृतीचे सामथ्र्य समजणाऱ्या (आणि मानणाऱ्या) लोकप्रिय लेखकांची संख्या कमी नाही. मात्र तपशिलाला काबूत ठेवून विशिष्ट तात्त्विक पातळीवर लेखन नेणे किंवा तत्त्वाची, तात्त्विक विचारांची डूब देणे सर्वानाच जमते असेही नाही.
अ नेकदा एखादे पुस्तक वाचल्यानंतर असा प्रश्न पडतो, की आपण इतका वेळ वाचले ते काय वाचले? नंतर प्रश्न पडतो की का वाचले? पुस्तक चांगले की खराब, आवडले की नाही, असेही प्रश्न निर्माण होतात मनात. मग वाटते की खराब असेल तर इतका वेळ घालवला वाचण्यात, तेव्हा कसे लक्षात नाही आले? आणि आता थोडी चीड, थोडी निराशा आणि काहीतरी कमी पडले या विचाराने हुरहूर अशी मनाची अवस्था होते. थोडा शांतपणे विचार केला की लक्षात येते की पुस्तकातील, अर्थातच ललितलेखनातील – म्हणजे कथा-कादंबरी-कविता इत्यादी – तपशील इतका शैलीदारपणे लेखकाने मांडला होता की आपण त्यात गढून गेलो (की बुडून गेलो?). बरेचदा तपशील इतका विविधरंगी, विविधढंगी आणि विस्तृत असतो, की मनाच्या चिमटीत तो धरून ठेवताना वाचकाची तारांबळ उडते.
हरिभाऊ आपटे, वाचकाला दूरवरच्या प्रदेशात फिरवून आणायचे आणि तिथेच तो रमला की काय असे वाटत असतानाच त्याला सांगायचे की अरे, आपण नायकाला मघा शत्रुप्रदेशात सोडून आलो होतो, त्याचे काय झाले हे पाहून येऊ या. वाचकाचे बोट धरून, रमलेल्या प्रदेशातून ओढून आणणे सोपे काम नाही. पण शैलीकुशल लेखक सरावाने हे काम यशस्वी करून दाखवतो. लहान मुलाला एका दिवसात जत्रा दाखवायची असेल तर आरशांच्या गमतीदार दुकानातून ओढून त्याला आकाश पाळण्याकडे घेऊन येणे जरुरीचे असते.
अनेक पुस्तके वाचल्यानंतर असमाधानी असणारा वाचक तपशिलाशिवाय ‘आणखी’ काहीतरी हवे, असे मनोमन म्हणत असतो. लेखकाला काय म्हणायचे आहे, काय सुचवायचे आहे, याचा तो शोध घेतो. लेखक गुणवान असेल तर तपशील वाचता वाचताच वाचक हळूहळू जाणतो, की आपल्याला लेखक कोणत्या मुक्कामावर घेऊन जाणार आहे. त्याला न पटणाऱ्या तत्त्वाकडे लेखक घेऊन जात असेल तर तो गालातल्या गालात हसतो, पण लेखकीय कौशल्याला दिलदारपणे सलाम करून तपशिलातून वाट काढत तो लेखकासोबत पोचतो. हे झाले सुजाण वाचक आणि गुणवान लेखकाच्या शालीन संबंधांसंबंधी! पण लेखक फक्त धनवान असेल तपशिलाच्या बाबतीत, तर वाचक त्याच्या अफाट तपशीलदर्शनाने दिपूनही जातो, पण त्याने ‘काही’ सांगितले नाही ही रुखरुख कुठेतरी त्याच्या मनात राहते. हेन्री हॉरियर या चोराने (?) लिहिलेले ‘पॅपिलॉन’ हे तुरुंग आणि सुटका यासंबंधांचे स्वानुभव सांगणारे पुस्तक! (आत्मचरित्र, आत्मकथन, आत्मानुभव यामधील फरक विद्वान चर्चकांसाठी सोडण्याचे काम शिताफीने करण्याचा प्रयत्न मी केला आहे!) वाचक थक्कच होतो ‘पॅपिलॉन’ (म्हणजे फुलपाखरू?) वाचताना. (तुरुंगाधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडू नये म्हणून स्वत:जवळील नोटांची गुंडाळी भरलेले ‘चार्जर’ तो शरीरात कुठे आणि कसे लपवून ठेवतो हे कळून घेण्यासाठी तरी सर्व वाचकांनी हे पुस्तक वाचावेच. जमले तर स्टीव मॅक्विनने ‘पॅपिलॉन’ची भूमिका साकार केलेला याच नावाचा सुंदर सिनेमाही पाहावा.) हे पुस्तक जगभर प्रचंड खपले. पण खिळवून ठेवणारे कथानक असूनही वाचकाला त्याचा लढा ‘स्वातंत्र्या’साठी, ‘मुक्ती’साठी केलेला वाटत नाही. ‘सुटके’साठी केलेलाच वाटतो.
या जाड पुस्तकांनंतर एक लहान पुस्तक वाचले की कळते, लेखक महान असेल तर तपशिलाकडून तत्त्वाकडे तो वाचकाला किती सहजपणे घेऊन जातो. अर्थात वाचकाला तसे वाटते. निर्मितिप्रक्रियेची अवस्था लेखकाने कशी भोगली असेल, हे अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे जगप्रसिद्ध ‘ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’ हे पुस्तक वाचल्यानंतर कळून येते. (अनेक प्रकाशकांनी आधी हे लेखन ‘साभार परत’ केले होते असेही वाचनात आले.) तो समुद्र, ती नाव, तो म्हातारा आणि माणूस नष्ट होईल, पण पराभूत होणार नाही, हे मनावर ठसणारे, बुलंद आणि बलदंड तत्त्व! (आपण मात्र आपल्या खास मराठी लेखकीय शब्दाळू आणि लडिवाळ मोहाने पुस्तकाच्या शीर्षकाचा अनुवाद ‘एका कोळियाने..’ असा केला आणि एका जातीच्या माणसाची कथा या पुस्तकात आहे की काय असा गैरसमज होईल याची तरतूद करून ठेवली!) असो!
बटबटीत शब्दांत अनेक लेखक आपल्या लेखनाचे सूत्र किंवा लेखनामागील तत्त्व निवेदनाच्या ओघात किंवा पात्राच्या तोंडून सांगत असतात. जणू काही जे सांगायचे आहे, ते लेखनातून सुचवण्यात आपण कमी पडू की काय, अशी धास्ती त्यांना वाटत असावी किंवा वाचकाच्या सक्षम रसिकतेवर त्यांचा विश्वास नसावा. जिवंत तपशिलातून सूचित होणारे निर्गुण-निराकार तत्त्व वाचकाला गवसणे म्हणजे अत्युच्च आनंदाची प्राप्ती! ‘रणांगण’, ‘पाचोळा’, ‘रारंगढांग’, ‘गोतावळा’, ‘चौंडकं’, ‘धग’, ‘नागीण’, ‘काजळमाया’, ‘बिढार’ अशी पुस्तके म्हणजे नव्या लेखकांसाठी आणि वाचकांच्या पिढय़ांसाठी आदर्श अशीच आहेत. सुदैवाने अशी आणखी अनेक पुस्तके आहेत आणि नव्या लेखकांचा आवाका अधिक विस्तृत होत आहे.
तपशिलालाच वाङ्मयकृतीचे सामथ्र्य समजणाऱ्या (आणि मानणाऱ्या) लोकप्रिय लेखकांची संख्या कमी नाही. मात्र तपशिलाला काबूत ठेवून विशिष्ट तात्त्विक पातळीवर लेखन नेणे किंवा तत्त्वाची, तात्त्विक विचारांची डूब देणे सर्वानाच जमते असेही नाही. निसर्ग, पाने, फुले, माती, हिरवळ यांच्यात जगणाऱ्यांना जे जमले नाही ते दुर्गाबाईंना ‘ऋतुचक्र’मध्ये कसे साध्य झाले? किती किती बारीकसारीक सौंदर्यपूर्ण तपशील आणि ऋतुचक्राचा मानवी जीवनचक्राशी असलेला जैवसंबंध सूचित करणारी शैली.. मग्न होऊन वाचावे असेच पुस्तक ते!
तत्त्व, विचार काय मांडायचा आहे, हे अगदी ठरवून प्रभावी लेखन करण्याचा पराक्रम मोठा लेखक करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जॉर्ज ऑर्वेलची ‘नाइन्टीन एटी फोर!’ ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ हे मध्यवर्ती सूत्र कादंबरीभर खेळवत ठेवून त्याने जो तपशील साकारला आहे तो भीती, चीड, करुणा असे भाव जागृत करणारा आहे.
हिंदीतील यशपाल यांची फाळणीशी संबंधित ‘झूठा सच’ ही कादंबरी तपशिलाने वाचकाच्या मनाला विकल करते आणि मानवी वर्तन आणि राजकारण यावर कडवट भाष्य करते. श्रीलाल शुक्ल यांची ‘राग दरबारी’ ही जाडजूड कादंबरी तर सर्व भारतीय भाषांमध्ये वेगळेपणामुळे उठून दिसते. संपूर्ण कादंबरीभर व्यंग्य, विनोद आणि उपरोध खेळवत ठेवून, हिंदी पट्टय़ातील ग्रामीण जीवन, त्या प्रदेशातील बोलीचा वापर करून, विनोदातून विषण्णतेकडे नेताना या लेखकाने काय मेहनत घेतली असेल हे जाणवते आणि ऊर दडपून जातो. पुन्हा ती इतकी वेगळी आहे की, तिचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करणाऱ्याने हात टेकावे आणि काम सोडून द्यावे.
तपशिलालाच तत्त्व समजण्याची चूक आणि तत्त्व ठसवण्याच्या नादात कलाकृतीची कलात्मक गुणवत्ता शिथिल होण्याचा धोका याबाबत गुणी लेखक जागरूक असतोच. शेवटी आपण ललितलेखन किंवा वाङ्मयप्रकारात लेखन करत आहोत, हे भान ठेवले तर समाजसुधारणेसाठी निबंधलेखन असे रूप या लेखनाला येणार नाही.
बाहेरच्या देशात लेखकांसाठी वर्ग, शाळा, शिक्षण असते, तसे मराठी लेखकांसाठीही सुरू करायला काय हरकत आहे?