आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत पंढरपूरचा फोटो येतो तेव्हा सर्वाची तोंडे कॅमेऱ्याकडे असतात. मागून पुजारी, बडवे यांनी आपली तोंडे चौकटीत यावीत अशी खुपसलेली असतात. तू तर दिसतच नाहीस. आजकाल एका वारकरी जोडप्याला तुझ्या पूजेचा मान ‘दिला’ जातो. अशी शिफारस तुझ्याकडे चालते का रे? विठूराया, रागावू नकोस, पण एक सांग- तुझ्या दर्शनासाठी ‘ऑनलाइन बुकिंग’ हा प्रकार तुला समजतो का रे? एरवी वर्षभर जेव्हा भाविक तासन् तास रांगेत उभे असतात तेव्हा मोठ्ठे उद्योगपती आले तर त्यांना खुश्कीच्या मार्गाने नेऊन तातडीने तुझे दर्शन घडवले जाते- ही गोष्ट तुला माहीत आहे का? जर माहीत असेल, तर मग तू काहीच का करत नाहीस?
आषाढी एकादशीला चार दिवस होऊन गेले आहेत. पंढरपुरातून माणसे ओसरून गेली आहेत. चंद्रभागेने काठाजवळ झालेली घाण वाहून नेली आहे. बाजार ओस पडल्यामुळे दुकानदार उदास झाले आहेत. थोडे शांत आणि निवांत वाटते आहे. आता कार्तिकी एकादशीपर्यंत सवयीचा जीवनक्रम सुरू राहील. (म्हणून की काय) विठूरायाचा चेहरा अधिकच प्रसन्न दिसतो आहे. सावळ्या वर्णामुळे हे सूक्ष्म आणि सौम्य बदल चटकन् दिसून येत नाहीत. तीन-चार दिवसांपूर्वी तर मूर्तीच्या चेहऱ्यावर त्रासिक छटा प्रकट झालीय की काय, असेही वाटत होते.
मुख्यमंत्र्यांना ते दौऱ्यावर आल्यानंतर सर्किट हाऊसवर इतके लोक हातामध्ये निवेदने देतात, की त्रासिकपणा चेहऱ्यावर दिसू न देण्याचा संयमित अभिनय त्यांना करावा लागतो. इथे तर लाखो लोकांच्या मागण्या असतातच; पण ते लाखो लोक ज्या महाराष्ट्रामध्ये राहतात, त्या ‘महाराष्ट्राचे कल्याण कर, दुष्काळ दूर कर, पाऊस पाड (किंवा थांबव),’ असे मुख्यमंत्रीच विठोबाला म्हणताना दिसतात तेव्हा विठूरायाच मुख्यमंत्री आहे की काय, असा प्रश्न पडतो. त्यावेळी विठोबाच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव प्रकट होतात. खरं सांग विठोबा, का हसलास? मुख्यमंत्र्यांच्या हृदयातली त्यांनी न उच्चारलेली मागणी तुला ऐकू आली का? ‘माझी मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षांची टर्म पूर्ण होऊ दे..’ ही एकच मागणी प्रत्येक मुख्यमंत्री तुझ्याकडे मनोमन करतो म्हणून तुला हसू आलंय का? मुख्यमंत्री नसतील तर उपमुख्यमंत्री, नाही तर मंत्री असे कोणीतरी पूजा करतात. सोबत त्यांच्या अर्धागिनी असतात. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत फोटो येतो तेव्हा सर्वाची तोंडे कॅमेऱ्याकडे असतात. मागून पुजारी, बडवे यांनी आपली तोंडे चौकटीत यावीत अशी खुपसलेली असतात. तू तर दिसतच नाहीस. आजकाल एका वारकरी जोडप्याला तुझ्या पूजेचा मान ‘दिला’ जातो. अशी शिफारस तुझ्याकडे चालते का रे? विठूराया, रागावू नकोस, पण एक सांग- तुझ्या दर्शनासाठी ‘ऑनलाइन बुकिंग’ हा प्रकार तुला समजतो का रे? एरवी वर्षभर जेव्हा भाविक तासन् तास रांगेत उभे असतात, तेव्हा मोठ्ठे उद्योगपती आले तर त्यांना खुश्कीच्या मार्गाने नेऊन तातडीने तुझे दर्शन घडवले जाते- ही गोष्ट तुला माहीत आहे का? जर माहीत असेल, तर मग तू काहीच का करत नाहीस? पुंडलिकाने ‘विटेवर उभा राहा’ म्हटले, पण ‘विटेहून उतर आता’ असे म्हटले नाही; असा युक्तिवाद तू करणार नाहीस अशी अपेक्षा आहे.
खरी गंमत अशी आहे विठ्ठलराव, की तुमचं व्यक्तिमत्त्वच मला कळत नाही. अगदी ‘कानडा विठ्ठलू’ आहात तुम्ही. खरोखरीच गूढ! म्हणजे एवढे मोठे मिनिस्टर वगैरे किंवा माझ्यासारखे पोस्टगॅ्रज्युएट काय म्हणतात ते तुम्ही ऐकत नाही. आणि तो नामदेव शिंपी जरा कुठे पंढरपुरातून बाहेर जायला निघाला, तर लागलीच त्याचा चेहरा कुरवाळून घळाघळा रडता. त्या तुकाराम वाण्याने तुम्हाला किती शिव्या दिल्या होत्या. आणि त्या अडाणी जनाबाईने ‘अरे विठय़ा विठय़ा’ असे म्हटले तरी तुम्ही तिच्याबरोबर गोवऱ्या गोळा करायला न् जाते ओढायला गेलात. तुकोबांची एक गोष्ट आपल्याला नाही पटली. ते काय म्हणतात की, ‘विठूराया, मी पापी आहे. कारण काय, तर मी काहीतरी तुला मागतो आणि तुला अडचणीत व संकटात टाकतो. प्रेम करणाऱ्याने काही मागू नये, एवढीही मला अक्कल नाही. विठो, मला क्षमा कर.’
आता आमची अशी अवस्था झालीय, की दिल्या-घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, हे आम्ही मान्यच केले आहे. भलेही भगवंताने आणि ज्ञानेश्वरांनी सांगितले असेल, की पत्र, पुष्प, फल, तोय- म्हणजे पान, फूल, फळ, पाणी असे काहीही भक्तिभावाने दिले तरी तुला आवडते, प्रिय होते. पण अशा फुकट उपलब्ध होणाऱ्या वस्तू अर्पण केल्यामुळे तुझं समाधान होईल असे आमच्या व्यवहारी मनाला पटत नाही. म्हणून आम्ही दानपेटीत पैसे, सोनेनाणे टाकतो. (तरीही तू आमचे ऐकत नाहीस. अलीकडे वाचनात आले की, तुझ्याकडील सोन्यापैकी काही कोटींच्या सोन्याचा पदाधिकाऱ्यांनी अपहार केलाय. विठूमाऊली, तू आता मात्र काहीतरी कर. संपत्तीच्या बाबतीत तरी पंढरपूरने शिर्डी किंवा तिरुपतीशी स्पर्धा करू नये, ही आमची इच्छा पूर्ण कर. तुला तुझ्या शबरी आणि सुदामा या दरिद्री भक्तांची शपथ!)
विठूराया, तू एक मोठ्ठे काम केले आहेस, हे तुला माहीत आहे काय? माझ्या हे लक्षात येऊ लागले आहे की, तू ‘देव’ असल्यामुळेच आमची ‘कामे’ करीत नाहीस. हे कसे, तर दुसऱ्या एका माऊलीने- ज्ञानराज माऊलीने ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात खुद्द भगवंतांच्या मुखाने सांगितले आहे की, मी (म्हणजे देव) कसा आहे- ‘उदासीनाचिया परी। करी ना करवी’- मी काही करीतही नाही आणि करवून घेतही नाही. त्यांनी दिव्याचा दृष्टान्त दिला आहे. घरात दिवा असतो. त्याच्या प्रकाशात माणसे काम करतात. कशीही. बरी-वाईट. पण दिवा त्यात सहभागीही नसतो; हस्तक्षेपही करीत नाही.
तो जैसा कां साक्षिभूतु। गृहव्यापार प्रवृत्तिरहितु
तैसा भूतकर्मि अनासक्तु। मी भूतीं असें
                                        (९।१२८)
– तर मी काय सांगत होतो, की काही लोक तुझी भक्ती करतात. काही प्रेम करतात. इतके, की इरावती कर्वे यांनी ‘विठोबा, माय फ्रेंड’ असे म्हणून तुझ्याशी एक वेगळाच अनुबंध जोडला. विठो, तुझ्यामुळे संतांना जी काव्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली, तशीच अर्वाचीन कवींची कविताही एक वेगळे परिमाण प्राप्त करती झाली. (तू कृपया आजच्या मराठी कवींविषयी पेपर, मासिके किंवा बातम्या वाचून गैरसमज करून घेऊ नकोस. हे लक्षात घे, की आजकाल आम्ही ज्या भरमसाठ कविता लिहितो, त्यापैकी काही कविता आम्हालासुद्धा कळतात. तर असो.)
तुझ्या लाडक्या लेकरांनी- म्हणजे संतांनी लिहिलेल्या अभंगांचा आणि भक्तीचा वारसा वेगवेगळ्या रूपांत अलीकडच्या कवितांमध्ये दिसून येतो.
मधुकर केचे नावाचे मोठे कवी होते. त्यांच्या प्रतिभेचा विलक्षण आविष्कार पाहा-
अवघे ब्रह्माण्ड। व्हावे वाटे स्तन
न्यारीच तहान। लागे मज।।
होतील हे ओठ। नभाहून थोर।
प्याया पान्हापूर। अनंताचा।।
म्हणुनीच किंवा। कणांच्या कुशीत
चुटूचुटू पीत। राहीन वो।।
विठूराया, आध्यात्मिक अनुभव किंवा अद्वैताची जाणीव किंवा ‘सांडिली त्रिपुटी’ असे काहीतरी म्हणू या; पण या ओळी पाहाव्यात अशाच-
एका नव्या जाणिवेत
माझे मृदुंगले मन
देह सतारीची तार
आणि पायच पैंजण

नव्या चाहुलीत रंगे
नव्या जाणिवेचा नाच
अनाहूत झंकारांनी
निनादला रंगमंच.
‘दिंडी गेली पुढे’, ‘पुनवेचा थेंब’, ‘आसवांचा ठेवा’ या कवितासंग्रहांचे जनक केचे पुढे अभंग लिहायचे थांबले. याबाबत त्यांना छेडले असता ते शांतपणे म्हणाले, ‘नारायणा, माणसाचा विवेक भंगला ना, की त्याला अभंग लिहिता येत नाही.’ मी हबकलोच. देहाच्या कार्यकलापात अडकलेल्या कवीने अपराधी भावनेने दिलेला हा कबुलीजबाब-कवितेच्या निर्मितीप्रक्रियेशी निगडित असलेल्या मूल्यभावनेसंबंधी एक वेगळेच सत्य सांगून जातो.
माणसाच्या स्खलनशील प्रवृत्तीने विठूकडे जाण्याची अभंगाची वाटच जणू बंद केली. केचे संत नव्हतेच; पण संतांची नाममुद्रा असलेला रचनाप्रकार आता आपल्या मलीन हातांनी विटाळू नये, ही जाण ठेवणारे प्रामाणिक गृहस्थ नक्कीच होते. हा परखड आत्मपरीक्षणाचा आणि शालीन आत्मस्वीकृतीचा वारसा तुकोबांकडूनच आला असणार.
पण विठो, नीती आणि सत्य यांचे अधिष्ठान असलेला भागवतधर्म आणि ‘बोले तैसा चाले। त्यांची वंदावी पाऊले’ असा आचारविचारांचे एकरूपत्व असलेला वारकरी विशुद्ध स्वरूपात सापडणे कठीण होत चालले आहे. वाणीची शुद्धता आणि आचरणातील निर्मळता कमी होत चालली आहे. ‘मृदु सबाह्य़ नवनीत’ असे सज्जन संख्येने कमी होत चालले आहेत. ‘नाठाळाचे काठी, देऊ माथा’ या चरणाचा केवळ वाच्यार्थ लक्षात घेणाऱ्यांचा उग्रपणा, आक्रमकता हिंसक कृतीकडे वळेल की काय, अशी भीती वाटत आहे.
कुंभमेळा नाशिकात भरतो. कुसुमाग्रज नाशिकचे. वर्षांनुवष्रे ते जे पाहत होते, आणि त्यातून जी चीड त्यांच्या मनात साठत गेली, तिचा संयमी उद्रेक त्यांच्या ‘पर्वणी’ या कवितेतून (अभंगातून?) व्यक्त झाला आहे. त्या कवितेतील काही ओळी अशा-
व्यर्थ गेला तुका। व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार। वांझ झाले।।
क्रमांकात होता। गफलत काही
जुंपते लढाई। गोसाव्यांची।।
साधू नाहतात। साधू जेवतात
साधू विष्ठतात। रस्त्यावरी।।
यांच्या लंगोटीला। झालर मोत्यांची
चिलीम सोन्याची। त्यांच्या पाशी।।
अशी झाली सारी। कौतुकाची मात
गांजाची आयात। टनावारी।।
तुका म्हणे ऐसे। मावेचे मइंद
त्यापाशी गोविंद। नाही नाही।।
विठू, विठोबा, माऊली, पांडुरंगा.. अशा हजार नावांनी हाका मारल्या तरी मला माहीत आहे; तू कटीवरील कर काढणार नाहीस. विटेवरून उतरणार नाहीस. कारण माझ्या वाणीत सत्वाचे बळ नाही. तरीही मी अध्र्याहून अध्र्या हळकुंडाने पिवळा झालेला अर्धवट जीव या जाणिवेने धास्तावलो आहे की नाशिकहून पंढरपूर फार लांब नाही!