प्रयोगशीलता आणि सामाजिक योगदानाद्वारे राष्ट्राचा विकास कसा होऊ शकतो, याचे इस्रायल हे उत्तम उदाहरण आहे. आगामी काळ हा अस्थिरतेचा, गुंतागुंतीचा आणि सतत बदलांचा असणार आहे, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे उद्योजकतेचे धडे देत या बदलांसाठी तयार करण्यास या देशाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याविषयी..
उण्यापुऱ्या २५ दिवसांच्या निवासात एखाद्या राष्ट्राविषयी, तिथल्या समाजाविषयी विधान करणं तसं धाडसाचंच. मात्र, गेल्या २५ दिवसांत आलेले अनुभव आणि तिथल्या वावरातून तिथल्या समाजाचं जे चित्र नजरेसमोर उभं राहतं, ते मांडण्याचा हा प्रयत्न.
एक लहानसा देश.. ज्याच्या सीमा रणधुमाळीने नेहमी अस्वस्थ असतात. हा देश इतका इवलासा आहे, की त्याच्या दक्षिणेकडून उत्तरेच्या टोकाकडे गाडीने सहा ते आठ तासांत पोहोचता येते आणि पूर्वेकडून पश्चिमेच्या टोकाकडे दीड तासात पोहोचता येतं. जिथे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम हे तीन महत्त्वाचे धर्म नांदतात. एकाच धर्माचे सनातनी आणि उदारमतवादी विचारप्रवाहही वावरतात. लोकसंख्या आपल्या तुलनेत खूपच कमी. स्वातंत्र्यही आपल्यानंतर प्राप्त झालेलं. पण असं काय वाहतं या राष्ट्राच्या धमनीत- ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर अवघ्या १२ वर्षांत हा देश विकसित राष्ट्राच्या पंक्तीत मानानं जाऊन बसला आहे आणि जगाच्या अर्थकारणाच्या नाडय़ा ज्याच्या मुठीत आहेत!
हा देश आहे इस्रायल. जितका समजून घ्यावा, तितकं प्रेमात पडावा असा हा देश. पहाटे तीन वाजता इस्रायलच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर नेशर शेअर टॅक्सी केली आणि जेरुसलेमच्या दिशेने कूच केलं. रस्त्यावर माणसे आणि वाहनांची वर्दळ अजिबात नव्हती. पण तरीही सुनसान रस्त्यांवरच्या प्रत्येक लाल सिग्नलला थांबणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरने या देशाच्या शिस्तीचा परिचय करून दिला.
खरं तर थंडीची ही निरोप घेण्याची वेळ. मात्र, निरोप घेता घेता ही थंडी आम्हाला चांगलाच झटका देत होती. सात डिग्रीपर्यंत तापमान उतरलं होतं. आठवडाभरात थंडी बरीच कमी झाली. उन्हाळा सुरू होत असल्याची वर्दी देणारा दिवस उजाडला आणि साऱ्या देशाने आपले घडय़ाळ एक तास पुढे नेले. उन्हाळ्यात लवकर उजाडत असल्याने सर्वानी आपले काम एक तास लवकर सुरू करावे, यासाठीचा त्यांचा हा यत्न होता.
२५ दिवसांत बहुतांश देश पाहिला. त्यात पर्यटनस्थळं होती, शाळा-विद्यापीठं होती, सार्वजनिक स्थळं, बागा, बाजारपेठा होत्या. या स्थळांच्या प्रत्येक भेटीत स्वच्छता, सुरक्षितता, इस्रायली नागरिकांचा कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजासाठी, देशासाठी योगदान देण्याच्या त्यांच्या वृत्तीचा प्रत्यय आला.
जग हे अर्थकारण आणि सत्ता यांवर चालते, हे लक्षात घेत इस्रायलने आपल्या घडणीत बळकट अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक तो मजबूत पाया रचण्यावर विशेष मेहनत घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे इनोव्हेशन आणि उद्योजकतेचा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेला समावेश. तिथली शिक्षणपद्धतीच मुळी या दोन गोष्टींवर आधारलेली आहे. प्रयोगशीलतेतूनच विकास साधला जातो, यावर या देशाचा आणि तिथल्या नागरिकांचा ठाम विश्वास आहे. पेनड्राइव्ह आणि जीपीएस प्रणाली यांसारखे कितीतरी अद्ययावत तंत्रज्ञान इस्रायलने जगाला दिले आहे. तंत्रज्ञानाचा समावेश आपल्या रोजच्या जगण्यात कसा करता येईल, याचे नवनवीन प्रयोग या देशात होताना दिसतात. आणि म्हणूनच कुठलीही नसíगक साधनसंपत्ती नसतानाही शेतीत क्रांतिकारी बदल घडवून विकसित देशांमध्ये इस्रायलने स्थान पटकावले आहे. शेती तंत्रज्ञानासोबतच अद्ययावत संरक्षण सामग्रीची निर्मिती, रोबोटिक्स, औषधनिर्मिती, हिऱ्याला पलू पाडणे या व्यवसायांमध्येही इस्रायल अव्वल आहे. ज्यू धर्मीयांबरोबरच ख्रिश्चन व मुस्लीम धर्मीयांसाठीही इस्रायल हे पवित्र स्थान आहे. याकरता दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक इस्रायलला भेट देतात. हे लक्षात घेत पर्यटनातही इस्रायलने आघाडी घेतली आहे.
इस्रायल हे लोकशाही जोपासणारे ज्यु राष्ट्र आहे. गेली कित्येक दशके अत्यंत क्लेश सहन केलेल्या ज्यू लोकांसाठी निर्माण केले गेलेले हे सुरक्षित राष्ट्र आहे. इस्रायलने ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवले. ज्युडाइझम हा केवळ धर्म नव्हे, तर ती जीवनपद्धती आहे. इस्रायलमध्ये ८१ लाख ३२ हजार नागरिक आहेत. त्यातील ७५.२ टक्के ज्यू व २०.६ टक्के अरब आहेत. अरबांमध्ये मुस्लीम आण ख्रिश्चनांचा समावेश आहे. आणि ४.२ टक्के अन्यधर्मीय आहेत.
अलियाह म्हणजेच परतण्याचा कायदा इस्रायलमध्ये आहे. जगभरात विखुरलेल्या आणि इस्रायलमध्ये परतलेल्या प्रत्येक ज्यू व्यक्तीला या देशाचे नागरिकत्व मिळू शकते. इस्रायलमध्ये जन्मलेल्या व्यक्तीसारखेच त्यांनाही या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते आणि त्या अनुषंगाने मिळणारे सारे अधिकारही त्यांना आहेत. अलियाह याचा अर्थ ‘किमग अप.’ निरनिराळ्या देशांमधून इस्रायलला येणाऱ्या ज्यू लोकांच्या उन्नतीची जबाबदारी सरकार स्वीकारते. मात्र, त्यांनी हिब्रू भाषा शिकणे अत्यावश्यक मानले जाते. देशातील महत्त्वाचे सारे व्यवहार हिब्रू भाषेतून होतात. त्यासोबत अरेबिक आणि इंग्लिशचा वापरही इस्रायलमध्ये होतो.
इस्रायलमध्ये १८ वष्रे पूर्ण झाल्यानंतर पुरुषांना तीन वष्रे आणि मुलींना दोन वष्रे सन्यप्रशिक्षण सक्तीचे आहे. मात्र, अरब लोकांसाठी ते सक्तीचे नाही. एक तर लढावे लागले तर आपल्याच धर्मीयांविरुद्ध त्यांना लढावे लागू नये, या मानवतावादी दृष्टिकोनातून तसेच सुरक्षेच्या मुद्दय़ातून त्यांना सन्यप्रशिक्षण दिले जात नाही. सन्यप्रशिक्षणात महिनाभराचे लढण्याचे ‘बेसिक’ प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच्या काळात वेगवेगळ्या विषयांवर अथवा प्रकल्पांमध्ये काम करता येते. सन्यप्रशिक्षणामुळे उच्च शिक्षण घेण्याचे मुलांचे वय वाढले आहे. वयाच्या २४-२५ व्या वर्षी मुलांचं उच्च शिक्षण सुरू होतं.
इस्रायलमध्ये झोपडपट्टी नाही. दारिद्रय नाही. लहान मुलं भीक मागताना दिसत नाहीत. इतकंच काय, तिथल्या वास्तव्यात रस्त्यावर ग्रुप करून टवाळक्या करताना, वेळ दवडतानाही कुणी नजरेस पडलं नाही. आपल्यासारखे तिथे मॉल कुत्र्याच्या छत्रीसारखे जागोजागी उगवलेले नाहीत आणि शॉिपग, अद्ययावत फॅशनचे वेड नि मौजमस्ती हा त्यांचा स्वभावही नाही. शबाथच्या दिवशी (शनिवार- त्यांचा पवित्र दिवस. ज्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.) सारे कुटुंब एकत्र येते आणि एकमेकांसोबत ते मजेत दिवस व्यतीत करतात. ही त्यांची सुट्टीची व मजेची कल्पना आहे.
इस्रायलची लोकशाही आपल्याशी नातं सांगणारी. त्यांची संसद १२० सदस्यांची आहे. वेगवेगळ्या पक्षांपैकी दोन पक्ष हे मुख्य पक्ष असतात. निवडणुका दर चार वर्षांनी होतात. राष्ट्रपतींच्या हातात नाममात्र सत्ता असते. खरी सत्ता ही पंतप्रधानांच्या हातात असते. इस्रायल हा ब्रिटनसारखाच देश आहे- ज्याची राज्यघटना पूर्णत: लिहिलेली नाही.
इस्रायलमधील विविध प्रकारच्या शाळा पाहिल्यावर त्यात एक गोष्ट सामायिक जाणवली, ती म्हणजे तिथल्या शिक्षणपद्धतीत मुलांना विचार करायला प्रवृत्त केलं जातं. प्रश्न विचारायला प्रोत्साहन दिलं जातं. या देशातील सीमावर्ती भागांत जिथे युद्धजन्य स्थिती बऱ्याच वेळा उद्भवते, तेव्हा तिथली मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ई-लìनग, व्हिडीओ प्रोग्राम, व्हिडीओ चॅटिंगद्वारे त्यांचा अभ्यास करून घेतला जातो.
इस्रायल शिक्षणाच्या बाबतीत विशेष संवेदनशील आहे. यासंदर्भात बोलताना डॉ. शहाफ गल म्हणाले, ‘‘पुढील काळ हा अस्थिरतेचा, व्यामिश्रतेचा आणि सतत बदलांचा असणार आहे, हे लक्षात घेऊन शिक्षणाचा खूप पुढचा विचार करणे अत्यावश्यक आहे. ज्यायोगे विद्यार्थी आगामी काळात होणाऱ्या सततच्या बदलांना तयार होतील.’’ इनोव्हेशन शालेय पातळीवर रुजवताना आघाडीच्या व्यावसायिकांचे योगदान शाळांना मिळते. नागरिकांची ही स्वयंसेवी वृत्ती नव्या पिढीच्या विकासासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. उदा. आइन करेम रिजनल इनोव्हेटिव्ह स्कूलच्या प्रयोगशाळेत आम्हाला एक शिक्षक भेटले. जे गेली २५ वष्रे नामांकित औषधनिर्मिती कंपनीमध्ये संचालकपदावर होते. समाजासाठी काम करावे म्हणून ते शाळेत रुजू झाले. अशा प्रकारे शालेय पातळीवरच शिक्षण-प्रशिक्षण, इनोव्हेशन, सामाजिक सक्रियता आणि उद्योजकता हे सारे साधले जाते.
इथे शालेय शिक्षणात उद्योजकतेवर भर दिला जातो. त्यामागचे कारण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळते की, गेल्या पाच वर्षांत इस्रायलमधील ७० टक्के लघुउद्योगांना टाळे लागले. २८ हजार व्यापार बंद झाले. देशातील ५० टक्के तरुण व्यापार करण्यास उत्सुक नाहीत. म्हणूनच उद्योजकतेचे धडे शाळेपासून द्यायला सुरुवात केली आहे. शालेय पातळीपासूनच मुलांच्या भोवतालचं वातावरण उद्योजकतेला पोषक आणि प्रेरक ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. पद्धतशीर अभ्यासातून उद्योजक घडायला सहाय्य मिळतं आणि संवादकौशल्य, मार्केटिंग याबाबत मुलांचे ज्ञान वाढते, यावर तिथल्या शिक्षणतज्ज्ञांचा आणि धोरणकर्त्यांचा विश्वास आहे.
जग बदलण्यासाठी उद्योजकता हे खूप महत्त्वाचे साधन आहे आणि ते विद्यार्थ्यांना शिकवणे अत्यावश्यक आहे. त्यांच्यात उद्योजकता रुजावी, वाढावी यासाठी शाळा-शाळांतून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. भोवतालचं जग किती वेगाने बदलतंय, बहुआयामी होतंय, अशावेळी शाळा हा विद्यार्थ्यांचा कणा व्हावा, यादृष्टीने शाळेत विशेष प्रयत्न केले जातात.
इस्रायलमध्ये ज्या नागरिकांना व्यापार सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी टी३४स्र्.१ॠ ही साइट आहे. ही साइट बहुपयोगी आहे. त्यात मीटिंग्ज घेतल्या जातात. मीटिंग्जच्या तारखांची माहिती सदस्यांना दिली जाते आणि त्यात मोठय़ा उद्योजकांची भाषणे आयोजित केली जातात. व्याख्याने ठेवली जातात. ती मोफत असतात. व्यवसाय करताना येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली जाते. उपाय सुचवले जातात. माझा व्यवसाय वाढण्यापेक्षा देशात उद्योजकतेचे वातावरण कसे तयार होईल, हे लक्षात घेत प्रत्येकजण त्यात जमेल तसे योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रयोगशीलतेचा विकास कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी किती आवश्यक ठरतो, हे सांगताना डॉ. शुलामित फिशर म्हणाल्या, ‘‘वर्गात शिकवणारा शिक्षक हा खूप मोठा बदल घडवू शकतो. मात्र, सरकारी धोरणांतील त्रुटींचा पाढा वाचण्यापेक्षा आपल्या पातळीवर शक्य तितके प्रयत्न केल्याने बरेच काही साध्य होते, हे लक्षात घ्यायला हवे. आणि म्हणूनच भोवतालचे वातावरण पूरक नसले तरी आपण आपल्या कृतीद्वारे सांगू इच्छितो- अजूनही बरेच काही बदलणार आहे.. बदलणे शक्य आहे.’’
या राष्ट्राकडून जितके शिकावे, तितके कमीच. आमच्या एका प्रशिक्षकाने एका संशोधनाचा निष्कर्ष सांगितला- जो जगभरातील प्रत्येकाला पटेल. त्या वाक्यानेच या लेखाची सांगता करावीशी वाटते. ते वाक्य होते- ‘जेवढा तुमचा पगार जास्त, तितकी तुमची काम करण्याची प्रेरणा कमी असते. जेवढा तुम्हाला जास्त पगार असतो, तितकी तुमची कामाशी बांधीलकी कमी असते.’ प्रत्येकाला आपले वेतन कमीच भासते. अशावेळी  काम करण्याची प्रेरणा आणि कामाशी- त्यायोगे राष्ट्राशी बांधीलकी आपण जपतो का, हे आपल्याला पडताळून पाहता येईल का?