भारतीय ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘धूम’ चित्रपटाला मिळालेल्या लौकिकानंतर आपल्या अ‍ॅक्शन सिनेमांच्या फॅक्टरीमध्ये बदलांची त्सुनामीच येऊन धडकली. बिशूम-ढिशूम या आवाजासह अल्लड-अजाण प्रेक्षकांना काय घडतेय, याचे मार्गदर्शन करणारी हाणामारी चित्रपटांतून कधीच हद्दपार झाली होती. या जुनाट अतिरिक्त इफेक्ट्सची जागा हॉलीवूडसारख्या वाटाव्यात अशा नेत्रदीपक स्पेशल इफेक्ट्स चमत्कारांनी घेतली. त्यामुळे १० जणांना लोळवणारा सिंगल-फसली नायक प्रबळ खलपुरुषांची अधिक मानहानी करत पिटाई करण्यास पात्र झाला. ‘धूम’पासून गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या अ‍ॅक्शन असलेल्या कुठल्याही चित्रपटांतील हाणामारी आठवून पहा. त्यात गुरुत्वाकर्षण नियम खोटे ठरवण्याची स्पर्धाच लागलेली पाहायला मिळेल. नायकाने खलनायकाला किक् देताक्षणीच स्टॉप होणारे दृश्य, किक बसण्याचा काळ हवी तितकी स्लो मोशन अ‍ॅक्शन आणि पुन्हा इतर गोष्टींसोबत गुरुत्वाकर्षणविरोधी कृत्यही घडवत, घरंगळत लांब फेकला जाणारा खलनायक, असे दीर्घकाळ आलटून-पालटून चालणारे युद्धनाटय़ आपल्या अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये सर्वसामान्य व्हायला लागले आहे. हे हाणामारीचे प्रकार आपल्याकडे दाखल करण्यामध्ये दक्षिणी चित्रसृष्टीने मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. हॉलीवूडची महागडी स्टंटबाजी आणि लूक बेसन या फ्रेंच दिग्दर्शकाची अ‍ॅक्शन फॅक्टरी यांच्यामधून व्हाया दक्षिणी सिनेमा रिसायकल कल्पनेचा मसाला आपल्या चित्रपटांची अ‍ॅक्शन रेसिपी खुलवण्यास उपयोगी पडत आहे. ‘फ्रेंच न्यू व्हेव्ह’च्या अधिपत्याखाली हॉलीवूडसह जगभरच्या चित्रपटांमध्ये एकेकाळी जीर्णोद्धाराची कलात्मक लाट आली होती. लूक बेसनने त्याच तोडीची किमया गेल्या दोन दशकांमध्ये मनोरंजक, वेगवेगळ्या चित्रपटांची मालिका बनवून केली. कुठल्याही देशामधील अ‍ॅक्शनपटांवर आज हॉलीवूडहून अधिक फ्रेंच कनेक्शनचा प्रभाव असल्याचे दिसत आहे.
‘टॅक्सी’(१९९८) या चित्रपट मालिकेद्वारे लूक बेसनच्या चित्रपटांना लोकप्रियतेची भरती आली. त्या भरतीलाही लहान ठरवणारी प्रसिद्धी जेसन स्टेथम अभिनित ‘ट्रान्सपोर्टर’ या मालिकेद्वारे मिळाली. ‘डिस्ट्रिक-१३’, ‘डॅनी द डॉग’ आणि पुढे ‘टेकन’पर्यंत अ‍ॅक्शन मनोरंजनाचा नवा साचा तयार करणाऱ्या चित्रपटांमध्ये लूक बेसनच्या अ‍ॅक्शन कल्पना प्रत्यक्ष सहभागी आहेत. ‘क्रॅन्क’, ‘मॅकॅनिक’पासून ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ मालिकांनी त्याच्या या चलती असलेल्या साच्यांना नव्या चित्रपटांसाठी वापरले, इतका बेसनच्या चित्रपटांचा आजच्या अ‍ॅक्शनवर प्रभाव आहे. ‘धूम’पासून ते आजतागायत आलेल्या आपल्या हाणामारी चित्रपटांतील कल्पनांची कैक उगमस्थाने त्याच्या चित्रपटांमध्ये सापडू शकतील.
त्याच्या चित्रपटांनी नवे काय दिले तर प्रेक्षकांच्या डोळ्यांना उसंत मिळू नये, इतक्या अ‍ॅक्शनची शैलीदार बरसात केली. ब्रूस लीच्या चित्रपटांमध्ये हा प्रकार पाहायला मिळत असे. तो त्याने अधिक सुकर आणि स्पष्ट केला. नेहमीच्याच सुष्ट-दुष्ट शक्तींच्या साधारण कथांना अ‍ॅक्शनची अफलातून फोडणी दिली. विशिष्ट कौशल्यात निपुण असे नायक तयार केले. ‘टॅक्सी’, ‘ट्रान्सपोर्टर’, ‘टेकन’ या ‘वन मॅन आर्मी’ चित्रमालिका आणि ‘डिस्ट्रिक-१३’, ‘यामाकासी’ यांसारख्या ‘ऑल मेन आर्मी’सारख्या चित्रपटांनी तो कुठेही अ‍ॅक्शनची पुनरावृत्ती करताना दिसत नाही. दर वेळी रहस्य, पाठलाग, हाणामारी, लक्षवेधी स्टंट, गाडय़ांची धूम यांच्यात नावीन्य पाहायला मिळते. सरधोपटपणाबाबत बॉलीवूडी मसाला-मेलोड्रामा चित्रपटांनाही मागे टाकेल अशी कथा केवळ नव्या अ‍ॅक्शनक्लृप्त्यांच्या आधारे लोकप्रिय करण्याची खोड या दिग्दर्शकाला आहे.
बॉलीवूडी मसाला-मेलोड्रामावरून आठवण होते, ती त्याच्या फॅक्टरीतील ‘यामाकासी’ (२००१) या चित्रपटाची. ‘यामाकासी’ लूक बेसननिर्मित सर्वात कमी लोकप्रिय चित्रपट आहे. त्याच्या मसाला-मेलोड्रामामुळे आणि आधीच्या ‘टॅक्सी’ मालिकेच्या अ‍ॅक्शन अतिरेकाने तो काहीसा बाजूला पडलेला दिसतो. त्याच्या इतर चित्रपट मालिकांमध्ये उपस्थित असणारी िहसा, ड्रग्जसारख्या वाईट बाजूचे दर्शन होत नसल्याने तो त्याच्या अ‍ॅक्शनपटांमधील सर्वात सोज्वळ चित्रपट आहे. यातील सात न-नायक ड्रग्ज व इतर गुन्ह्य़ांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठीच यामाकासी बनले आहेत. (१९८० साली फ्रान्समध्ये एक पंथ स्थापन करण्यात आला. सृदृढ आणि काटक शरीर तयार करून शारीरिक खेळांत निपुण असलेल्या या गटाने स्वत:चे नामकरण यामाकासी केले. हा चित्रपट त्या पंथावरच बेतला आहे.) गगनचुंबी इमारतींवर कुठल्याही मदतीशिवाय अंगभूत कौशल्याने काही सेकंदांत चढू शकणारा यामाकासींचा हा गट शहरातील पोलिसांसाठी तापदायक बनलेला असतो, कारण यामाकासींच्या या धाडसी कृत्यांचे अनुकरण लहान मुलांनी केल्यास त्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळेच उंच इमारतींच्या जंगलांमधून टारझनी उडय़ा मारण्याचा धाडसहट्ट पुरवताना यामाकासींना पोलिसांना चकवण्याचा शिरस्ताही नेमाने पाळावा लागतो.
चित्रपटाची सुरुवात यामाकासींच्या अशाच इमारतींवरच्या चढाई करण्यातून आणि पोलिसांना हातोहात बनवण्यातून होते, पण पुढे मात्र त्यांच्या या धाडसाला ग्रहण लागते. एक लहान मुलगा यामाकासींच्या अनुकरणात पडून जखमी होतो. त्याच्यावर शस्त्रक्रियेसाठी व अवयव प्रत्यार्पणासाठी प्रचंड पसा उभारावा लागणार असल्याने त्याचे गरीब कुटुंब यामाकासींना या सगळ्यासाठी जबाबदार धरतात. या घटनेने भरपूर हादरलेला यामाकासींचा गट मग आपल्या कौशल्याचा डॉक्टरांच्या घरी दरोडा टाकून पसा उभारण्याचा रॉॅबिनहुडी उपाय आखतो. शस्त्रक्रियेसाठी पसा उभारण्याच्या चार तासांच्या वेगवान क्लृप्त्या आणि कौशल्यांची पोलिसांना चुकवत होणारी आखणी, हा चित्रपटाचा प्राण आहे.
यातील सातही यामाकासी फ्रान्समधील विविध धर्माचे आणि वंशांचे असणे, प्रत्येकाचा खास असा- वैयक्तिक विशेष असणे, त्यांच्या चांगल्या कामासाठी लढाई यशस्वी करण्यात हा वैयक्तिक विशेष उपयोगाला येणे या सरधोपट गोष्टी ‘मॅग्निफिसण्ट सेव्हन’ ते ‘सेव्हन सामुराई’ या वेस्टर्नपटांच्या परंपरेशी नाते सांगणाऱ्या आहेत. यामासाकीमध्ये या दोन चित्रपटांचा उल्लेखही गमतीशीर आला आहे, पण इथल्या मनोरंजनासाठी वापरलेली आयुधे मात्र निराळी आहेत. यामाकासींचे सर्व धाडसहट्ट पुरवणाऱ्या अ‍ॅक्शनला येथे भरघोस वाव देण्यात आलेला आहे. इमारतींच्या छतावरील लांबलचक चालणारे पाठलाग आणि अशक्य उडय़ा क्षणोक्षणी तुफानी कृत्यांची बरसात करताना दाखवते. हाणामारी, क्रूर हिंसेपेक्षा येथे केवळ बचावासाठी केल्या जाणाऱ्या शारीरिक क्षमतेचा पुरेपूर वापर झालेला दिसतो. बाकी मुलाला वाचवण्यासाठी चित्रपटात होणारा मेलोड्रामा, त्या चढय़ा अ‍ॅक्शनवर उतारा म्हणून कामी येतो.
अ‍ॅक्शन चित्रप्रकार बाजारू म्हणून वाईट किंवा कमी महत्त्वाचा मानला जातो. त्याचा प्रेक्षकवर्ग संख्येने भला मोठा आणि चित्रप्रेमी नसतो, म्हणून त्याला नेहमी कमी उल्लेखले जाते. खिळवून ठेवण्याच्या, आवडण्याच्या आणि क्षणासाठी भान हरपवणाऱ्या निकषांना पूर्ण करणारी फ्रेंच कनेक्शनयुक्त आजची अ‍ॅक्शन चित्रपटांची आघाडी नवनव्या प्रयोगांतून समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज उसनेगिरीची सवय लागलेल्या आपल्या अ‍ॅक्शनपटांनाही कदाचित त्या समृद्धीतून आपली स्वत:ची वाट सापडू शकेल.