‘लेकुरे उदंड जाहली’, ‘वाऱ्यावरची वरात’ आदी नाटकांनी मराठी रंगभूमी गाजविणारे ज्येष्ठ रंगकर्मी  श्रीकांत मोघे यांचे ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मकथन मैत्रेय प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील काही अंश..
मी नट आहे म्हणजे नेमका काय आहे? हा मला पडलेला आणखी एक प्रश्न. मी नट आहे म्हणजे मी नाटक्या lok04आहे का?, मी ढोंगी आहे का?, मी लोकांची फसवणूक करणारा आहे का? मी लोकांची मन:शांती पळवून नेणारा आहे का?.. पहा हे प्रश्न संपतच नाहीत. तसे ते सरळमार्गानं संपणारही नाहीत. त्यासाठी आपल्याला श्रीकांत मोघे नट आहे म्हणजे कोण आहे ते शोधावंच लागेल. याचा शोध घेताना मला नेहमी कावळी आणि कोकिळा यांची गोष्ट आठवते. कोकिळा आपली अंडी कावळीच्या घरटय़ात घालते म्हणे. एक दिवस कावळीच्या जन्मलेल्या पिलांपकी काही पिलं कोकिळस्वरात बोलू लागतात. तेव्हा कुठं ती कोकिळेची पिलं आहेत हे दृगोचर होतं. हे दृगोचर होतं तेव्हापासून पिलं कोकिळेची असतात. म्हणजे त्याआधीच्या क्षणापर्यंत ती पिलं कावळीची असतात. एक अनामिक साक्षात्कार झाल्याप्रमाणे त्या पिलांची बाह्य ओळख – रंगारूपामुळे समान असली तरी आंतरिक ओळख एका क्षणात बदलते. नट आणि सर्वसामान्य माणूस यांच्या ओळखीमध्ये यापेक्षा वेगळं काहीच नसतं. जो नट असतो तो मूलत सर्वसामान्य माणूसच असतो. मात्र एका क्षणी तो त्या माणसापेक्षा वेगळा दिसू लागतो आणि आपण श्रीकांत मोघे नावाच्या एका माणसाला नट म्हणू लागता.
म्हणजेच नटाचं नटत्व केव्हा दिसतं याचा विचार करताना असं लक्षात येतं, की हे नटत्व कोकिळेच्या पिलांसारखं अचानक जगाला आणि गंमत म्हणजे त्याला स्वतलाही दिसतं. मला हे नटत्व माझ्यात आहे हे दिसलं मी शालेय वयाचा असताना. ‘गोटय़ा’ हे पात्र अजरामर करणारे ना. धों. ताम्हनकर यांनी त्यांची दोन नाटकं माझ्या शाळेसाठी लिहिली होती. ‘पारितोषिक’ व ‘विद्यामंदिरात’ या त्या दोन नाटकांतून मी काम केलं होतं. विद्यार्थीदशेतलं ते काम म्हणजे माझ्यात नट आहे याचा मला झालेला साक्षात्कार होता, वगरे असं काही मी मानभावीपणे बोलणार, लिहिणार नाही. परंतु लोकांना आपण जसे आहोत त्यापेक्षा वेगळ्या भूमिकेत आवडतो आहोत हे मात्र तेव्हाही माझ्या लक्षात आलं होतं. यामुळेच माझी आजही अशी श्रद्धा आहे की, गोटय़ा हे पात्र माझ्या व माझ्यासारख्याच इतर काही व्रात्य व उचापती पोरांच्या स्वभावावरूनच ताम्हनकरांना सुचलं असणार. किंबहुना मी व ती सर्वजण यांचं मिश्रण म्हणजे गोटय़ाचं पात्र आहे याबद्दल  lr15मला खात्रीच आहे. पुढे महाविद्यालयीन काळात मी ‘अमलदार’ नाटकात सर्जेराव साकारला. तेव्हा नट होणं म्हणजे काय याचा जरासा अंदाज मला यायला लागला. मग असं वाटायला लागलं की रंगमंचावर वावरणं हे अधिक सोपं जातंय आपल्याला. रंगमंचावर आपण अधिक मोकळेढाकळे असतो याची स्पष्ट जाणीव मला होऊ लागली. गंमत म्हणजे भोवतीच्या मध्यमवर्गीय समाजात नटाच्या जातीला अजिबात किंमत नव्हती, भाव नव्हता. अशा त्या काळात मी नट होतो आहे ही जाणीव मला सुखावून गेली होती तेव्हा. स्वतच्या पायांवर समर्थपणे उभं राहून आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द माझ्यात होती, तशी धमक होती, म्हणजेच स्वबळावर माझा विश्वास होता. पण त्याच वेळी नट म्हणून विकसित व्हायचं असेल तर ते केवळ स्वबळावर होता येणार नाही, हेही मला कळून चुकलं होतं.
म्हणजे नेमकं काय झालं होतं? याचा विचार करताना मला हे सांगावंसं वाटतं की, स्वतला नट म्हणवून घेण्यास पात्र ठरलेली व्यक्ती वास्तवात मात्र अत्यंत परावलंबी असते, असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण कुणीतरी लिहिलेले शब्द तो नट असतो त्यालाच यदृछया अगदी अचानकपणे भेटतात, भिडतात, भ्रमिष्ट करतात. अशा भेटलेल्या शब्दांत प्राण फुंकून ते सजीव करणं इतकंच काय ते नटाच्या हातात उरतं. मग जो नट होऊ इच्छित आहे त्याला – उदाहरणार्थ, श्रीकांत मोघे, डॉ. काशीनाथ घाणेकर, दत्तारामबापू.. अशांना मग त्यांची वैयक्तिक सुखदुखं पडशीत बांधून वर खुंटीला टांगून ठेवावीच लागतात. वैयक्तिक सुखदुखांना लांब ठेवल्यावर मग ते लेखकानं लिहिलेले आणि याला भावलेले शब्द ज्या व्यक्तिरेखेच्या तोंडी आहेत त्या व्यक्तिरेखेची सुखदुखं, भावभावना समजून घ्यायचा प्रयत्न या नट होऊ इच्छिणार्याला करावा लागतो. इथं मग आप-परभाव, असला तरी तो ठेवून चालत नाही. लेखकानं लिहिलेला आणि नटासाठी असलेला परभाव त्याला स्वतचा – आपभाव म्हणून जवळ करावाच लागतो.
हे असं अगदी सुरुवातीला मला जमेल का?, असंच कोणाही नव्या नटाला जसं वाटेल तसंच मलाही वाटलं होतं. मग एकदा मी दत्तारामबापूंना (मास्टर दत्ताराम) विचारलं होतं, की तुम्ही रंगमंचावर गेलात की एकदम कसे बदलता? तुम्ही तुमचे नसताच भूमिका सादर करताना. म्हणजे पन्नाशीतला माणूस तरुण भीष्म म्हणून रंगमंचावर आला तर तो खरंच 18-19 वर्षांचा तरुण कसा बरं दिसू शकतो? बरं हाच भीष्म त्याच्या उत्तरायुष्यातला रंगवताना तो खरंच 80-90 वर्षांचा म्हातारा कसा बरं वाटायला लागतो?- तर बरं का, कोणत्याही सच्च्या नटाला हे असं परिवर्तन करावंच लागतं. सर्वसामान्य माणसांसारखाच तोही माणूसच असतो. पण नटाच्या बाबतीत मात्र हे परिवर्तन आंतरिक असतं. ‘ते तुम्ही कसं साधता?’ असं दत्तारामबापूंना विचारल्यावर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. माझ्यापुरतं सांगायचं तर त्यांनी दिलेल्या उत्तराचा आशय असा –
बापू त्यांची सगळी नक्कल किंवा संवाद स्वतच्या हाताने लिहून काढत असत. असं स्वत लिहून काढल्यामुळे लिहिता-लिहिता तुम्ही त्या शब्दांत गुंतत जाता अशी त्यांची धारणा होती. लिहिताना हे शब्द तुम्हाला दिसायला लागतात, भावायला लागतात. भक्ती मार्गात असं म्हणतात की, सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्जता या टप्प्यानं परब्रह्माशी तादात्म्य पावता येतं. अभिनयाच्यादेखील याच पायर्या आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
एखादी व्यक्तिरेखा माझ्याकडे आली आणि त्यासाठी नटत्व अंगी भिनवायचा प्रसंग आला, की माझा हा नेहमीचा अनुभव आहे, तो असा की, प्रथम लेखकानं मला लिहून दिलेले, समोर आलेले आणि मला मनोमन भावलेले तेच शब्द माझ्या साधे चिमटीतही येत नाहीयेत. ते एखाद्या व्रात्य मुलासारखे अवतीभवती हुंदडत राहत आहेत. पण यांत काहीतरी विलक्षण ताकद आहे याचा अंदाज ते आपल्याला सतत देत आहेत. असं मला जाणवत राहातं. उदाहरणार्थ,
काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या,
प्राशन करता रंग जगाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या,
आमुच्या भाळी कटकट लिहिली, सदैव वटवट करण्याची..
असे शब्द भेटल्यावर मला त्यांना माझ्या आंतरिक ताकदीची जोड कायम द्यावीशी वाटली. अशी जोड ज्याला द्यावीशी वाटते तोच जो जन्मानं नट आहे केवळ तोच पुढे जाऊन नटपदी विराजमान होतो. म्हणूनच दत्तारामबापू म्हणत, ‘मी नक्कल लिहून काढतानाच त्या शब्दांमध्ये गुंतत जातो. त्या शब्दांमधून मला जे जाणवत राहतं ते मग मी माझ्या जीवाला सांगतो. वर हेही सांगतो की, बाबा रे हे शब्द, त्यांतला आशय हे सारं काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचंय तुला आता. कसं? ते तुझं तूच ठरव. माझा जीव मग ते सादर करण्यासाठी नेमकं बरंच काय काय माझ्याही नकळत करत राहतो. तो हे कसं करतो ते मलाही माहीत नसतं!’
तर, हा एक सुंदर योगच आहे. ‘वार्यावरची वरात’ मधला माझा ‘चाचाचा’ नाच पाहून विजय तेंडुलकर एकदा मला जे म्हणाले होते, ते त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘श्रीकांत, तुझा स्टेजवरचा हा ‘गे एॅबन्डन्स’ पाहून, तुझं सुटणं पाहून मी खुळावतो.’ तर हे सगळं खरंच कसं होतं हे मलाही कळत नाही. लेखकाचे शब्द आधी तुमच्या चिमटीत येत नाहीत. काही वेळाने ते येतात, हाती लागतात, स्थिर होतात आणि तुम्हाला आपलेसे करायला लागतात. नंतर तुमचा त्यांच्यावर आणि त्यांचा तुमच्यावर अमल चढतो. शेवटी तुमचं आणि त्या शब्दांचं अद्वैत होतं. मग त्या शब्दांचं त्या-त्या वेळेपुरतं जगणं तेच तुमचंही जगणं होऊन जातं. असं होणं म्हणजेच तुमच्यात नटत्व येणं, तुम्ही नट होणं आणि जगानं तुम्हाला अभिनेता म्हणणं होय. इथं भक्तिमार्गातली सायुज्यता साधते, मुक्ती साधते.
पण हे सारं इथंच संपत नाही. असं नटत्व अंगी भिनवताना ते मी कायम एक नट म्हणून त्या-त्या प्रयोगापुरतं किंवा त्या त्या भूमिकेपुरतंच अंगात भिनवत आलो आहे. खरं म्हणजे ती भूमिका करून संपली की पुन्हा मी फक्त श्रीकांत मोघे म्हणून वावरतो? अगदी खरं सांगायचं तर कानांमागचा रंग थोडा राहिलेला असतोच. तरीही हे कसं साध्य होतं? असं लोक मला विचारतात. त्याचं उत्तर एकच की, त्या नटाला मनापासून हे वाटणं गरजेचं आहे की मला परकाया प्रवेश करायचाय. असा परकाया प्रवेश करायचा म्हणजे त्या व्यक्तिरेखेची मानसिकता आणि माझी मानसिकता ही तंतोतंत जुळली नाही तरी ती साधारणपणे एकच होईल असं करायचं. ते करावंच लागतं.
नटत्व अंगात भिनल्यावर मग प्रश्न निर्माण होतो तो वास्तवाचा. वास्तव हे दोन्ही अंगांनी समोर येतं – एक म्हणजे भूमिकेच्या आणि दुसरं म्हणजे नटाच्या. उदाहरणार्थ, जेव्हा मी अलेक्झांडर सादर केला तेव्हा प्रत्यक्षात अलेक्झांडर सहा-सव्वासहा फूट उंच होता असं मी वाचलं होतं आणि मी तर जेमतेम 5 फूट 7 इंचच उंच होतो. आता असा वास्तविक फरक नटासाठी कायमच उभा ठाकतो. मग नटानं काय करायचं? नटानं अशा वेळी त्या व्यक्तिरेखेच्या मानसिकतेच्या अधिकाधिक जवळ जायचा प्रयत्न करायचा आणि त्या व्यक्तिरेखेची आणि आपली मानसिकता यात समीपता कशी निर्माण होईल, ते पाहण्याचा प्रयत्न करायचा. हे फार महत्त्वाचं ठरतं. असं झालं की मग ती व्यक्तिरेखा आणि तो नट हे सरूप होऊन जातात. मग लेखकानं उभी केलेली व्यक्तिरेखा नटाच्या आत्म्याची ऊर्जा घेऊन सगुण-साकार होत शेवटी या रंगभूमीवरील विश्वात चिरस्थापित होण्यासाठी सायुज्ज होते- मुक्त होते. भूमिकेचं जगणं म्हणतात ते हे.