निष्णात शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट लिखित ‘अचूक निदान : वैद्यकीय उपचारांसाठीची महत्त्वाची गरज’ हे मनोविकास प्रकाशनाचे पुस्तक
१३ ऑगस्ट रोजी प्रकाशित होत आहे, त्या निमित्ताने..
डॉ. रवी बापट यांना सारा महाराष्ट्र सामाजिक जाणीव असलेला निष्णात शल्यचिकित्सक म्हणून ओळखतो. त्यांचे आगामी ‘अचूक निदान : वैद्यकीय उपचारांसाठीची महत्त्वाची गरज’ हे पुस्तक डॉक्टर व सामान्य लोकांसाठी खूपच मार्गदर्शक ठरणारे आहे. खाजगी व्यवसाय न करता आयुष्यभर गोरगरिबांची के.ई.एम. रुग्णालयात राहून सेवा करणारा हा सर्जन, डॉक्टर म्हणून तर निष्णात आहेच, पण याखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक लोभस पलू आहेत. सच्चेपणा आणि तत्त्वांशी समझोता न करणे ही त्यांची लक्षणीय गुणवैशिष्टय़े!
बापटसरांनी गेली ५० वर्षांहून अधिक काळ मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात काम केले आहे. निवृत्तीनंतरही त्यांचे हे समाजऋण फेडण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे. साहजिकच या काळात त्यांचा समाजाच्या सर्व थरातील रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी संबंध आला. विविध पक्षातील कार्यकत्रे, नेते, कलावंत तसेच खेळाडू आदी सगळ्यांशीही त्यांचा त्यांच्या अष्टपलुत्वामुळे संबंध आला. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी आरोग्यशिक्षणासाठी ‘लोकसत्ता’मध्ये ‘स्वास्थ्यवेध’हे  सदर लिहिले. त्या सदराचे ‘स्वास्थ्यवेध’ नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले. याखेरीज त्यांची ‘वॉर्ड नंबर पाच के.ई.एम.’ तसेच ‘पोस्टमॉर्टेम’ ही पुस्तकेही प्रकाशित झाली.  ही पुस्तके खूपच लोकप्रिय ठरली व इंग्रजीमध्ये त्यांची भाषांतरेही प्रसिद्ध झाली.
केदार नायगावकरांनी शब्दांकन केलेल्या या पुस्तकात डॉक्टरांनी वैद्यक व्यवस्थेच्या एका गंभीर दुखण्यावर विस्तृत विवेचन केले आहे. केवळ दुखण्याचे निदानच नव्हे, तर त्यावर उपाय सुचवण्याचे काम त्यांनी या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे एक वैशिष्टय़ म्हणजे या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला प्रबोधनकारांच्या पठडीत तावूनसुलाखून निघालेल्या पंढरीनाथ सावंतांचा प्रस्तावनावजा लेख! या पुस्तकात विविध रुग्णांच्या अनुभवांच्या आधारे बापटसरांनी रोगोपचाराच्या यशस्वीतेमधील अचूक निदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. इराणी चाचाचा हत्तीरोग प्रत्यक्षात अशुद्ध रक्तवाहिन्यांचा (नीला) व्हॅरीकोज व्हेन्स हा आजार असतो.  डॉक्टरांच्या अचूक निदानामुळे ३० वष्रे पायावरची सूज सहन करणारा इराणी चाचा बरा होतो.  घसरणारे मूत्रिपड (Floatiag kindney) असणारी मुलगी, वयोमानानुसार पायातील रक्तपुरवठा कमी झाल्याने पायाला मुंग्या येणारा-पाय जड पडणारा ७० वर्षांचा त्यांचा मित्र, अमिबियासिसमुळे पाठदुखीने हैराण झालेला खेळाडू शिवराम, प्रतिजैविकांच्या अतिरेकी वापरामुळे खंगलेल्या अंजली वहिनी, औषधांच्या दुष्परिणामामुळे झालेल्या स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोममुळे दगावलेला तरुण मुलगा, स्वादुिपड दाहाऐवजी  चुकीने हृदयविकारावर लक्ष केंद्रित करण्यात आलेला रुग्ण, चरबीच्या कर्करोगाचा रुग्ण अशा अनेक रुग्णांचे अनुभव सांगून डॉक्टर अचूक निदानाचे महत्त्व अधोरेखित करतात.
या पुस्तकात भावी डॉक्टरांना बापटसरांनी मौल्यवान मार्गदर्शन केले आहे. यासाठी ‘करू नका घाईने निदान’, ‘निदानाचा घोळ’, ‘औषध मित्र की शत्रू’, ‘शस्त्रक्रिया- सदसद्विवेकबुद्धी आणि तारतम्य’,‘वैद्यकीय व्यवसाय विश्वासाकडून व्यापारीकरणाकडे’, न्यायवैद्यकशास्त्र आणि शवचिकित्सा तसेच ‘फॅमिली डॉक्टर अनुभवाचे बोल’हे लेख विशेष महत्त्वाचे आहेत. योग्य निदान न झाल्यास रुग्णांवर आयुष्यभरासाठी व्यंग वा वेदना यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे घाईगडबडीत कृती करू नये असा अनुभवाचा सल्ला ते देतात. ‘हातातल्या सुरीचा वापर तशीच गरज असेल तेव्हाच करायचा, विशेषत: तेव्हा एखाद्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची स्त्री किंवा पुरुष म्हणून अस्मिता किंवा तिचे स्त्रीत्व आणि त्याचे पुरुषत्व पणाला लागण्याची वेळ येते, तेव्हा उर्वरित आयुष्य सन्मानाने कसे जगता येईल हा विचार कायम लक्षात ठेवला पाहिजे,’ हे बापटसरांचे वाक्य प्रत्येकच नवोदित सर्जनला अंतर्मुख करायला लावणारे आहे. ‘फॅमिली डॉक्टर अनुभवाचे बोल’ हा लेख तर विशेष वाचनीय आहे. बापटसरांनी सर्जन असूनही त्यांचे बरेच स्नेही त्यांना ‘फॅमिली डॉक्टर’ म्हणूनच ओळखतात असा कौतुकाचा उल्लेख केला आहे. स्पेश्ॉलिटी व सुपरस्पेश्ॉलिटीच्या मागे धावण्याच्या या जमान्यात बापटसरांसारख्या धन्वंतऱ्यालादेखील ‘फॅमिली डॉक्टर’ हे बिरुद सन्मानाचे वाटावे यावरूनच या लयाला गेलेल्या व्यवस्थेचे महत्त्व लक्षात येते. फक्त लक्षणे किंवा तपासण्यांचे निष्कर्ष यावरून रोगनिदान करण्यातले धोके ते या पुस्तकात वारंवार निदर्शनास आणून देतात व रुग्णाचे एक माणूस म्हणून परीक्षण करणे, त्याच्याकडून रोगाचा पूर्वेतिहास जाणून घेणे किती महत्त्वाचे असते, हे ते प्रभावीपणे सांगतात.
‘वैद्यकीय व्यवसाय- विश्वासाकडून व्यापारीकरणाकडे’ या लेखात बापटसरांनी
वैद्यकतज्ज्ञ रुग्णाला भरमसाट तपासण्या का करायला लावतात याविषयी ऊहापोह केला आहे.  अर्थातच यासाठी त्यांनी काही रुग्णांबाबत आलेल्या अनुभवांचे दाखलेही दिले आहेत.  यात रुग्णाचे दोन प्रकारे नुकसान होते. एक म्हणजे रोगनिदान न झाल्याने रोगावर उपचार होत नाहीत व तो बरा होत नाही. दुसरे म्हणजे आíथक नुकसान होते. डॉक्टर असे का करत असावेत याविषयी त्यांनी डॉक्टरांचे अज्ञान, जाणूनबुजून केलेली लुबाडणूक, तपासण्या केल्या नाहीत तर रुग्णदोष देईल हा विचार किंवा कायद्याची भीती आदी मुद्दे उपस्थित केले आहेत. एक वैद्यकीय अध्यापक म्हणून मला असे ठामपणे म्हणावेसे वाटते, की गेल्या काही दशकांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तपासणी, रुग्णांचा पूर्वेतिहास जाणून घेणे या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करून एको, स्कॅन, एमआरआय, रक्त तपासण्या अशा महागडय़ा तपासण्यांवर जास्त भर देण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. एमबीबीएसपर्यंत फक्त पुस्तकी माहिती / ज्ञान गोळा करणे; पण रुग्ण पाहणे, त्याला तपासणे याबाबत अक्षम्य दुर्लक्ष ही सध्याच्या वैद्यकीय शिक्षणाची व्यवच्छेदक लक्षणे बनली आहेत.
एमबीबीएस म्हणजे फक्त पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश घेण्याच्या परीक्षेतील पासपोर्ट अशी अवस्था झाल्याने रुग्णांचा पूर्वेतिहास घेणे, शारीरिक तपासण्या करून संभाव्य निदानांची प्राधान्य यादी बनवणे व मग निदानाची खातरजमा करण्यासाठी मोजक्याच, पण सुयोग्य अशा रोगनिदान तपासण्या करणे हे रोगनिदान चक्र पार कोलमडून गेले आहे. यात भर वैद्यकीय उपकरण कंपन्यांच्या नफेखोरीची पडते. यातूनच रक्त वा इतर तपासण्यांतून येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे रुग्णाचा रोग ठरवणे व त्यावर उपचार करणे हा शॉर्टकट तयार होतो. याची परिणती वैद्यकीय व्यावसायिकांवरचा समाजाचा विश्वास उडण्यात होते.  एका अर्थाने या समस्येचे अचूक निदान बापटसरांनी या पुस्तकात केले आहे.
हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांसाठी वाचनीय आहेच, पण खरे तर ते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व नव्याने वैद्यक व्यवसाय सुरू करणाऱ्या डॉक्टरांसाठी जास्त उपयुक्त आहे. बापटसरांनी दिलेला मौल्यवान सल्ला या डॉक्टरांच्या पिढीने आत्मसात केला, तर आणि तरच वैद्यक व्यवस्थेला भविष्यात समाजाचा विश्वास प्राप्त होईल यात शंका नाही.
 डॉ. जगन्नाथ दीक्षित

‘अचूक निदान : वैद्यकीय उपचारांसाठीची महत्त्वाची गरज’ – डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशन, पृष्ठे- १६८, किंमत- १९० रुपये