डॉ. मारी डी हेनेझेल यांनी लिहिलेल्या ‘इंटिमेट डेथ’ या इंग्रजी पुस्तकाचा हा वीणा गवाणकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. एका वेगळ्या विषयावरचे हे अनुभवकथन आहे. हेनेझेल या प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आहेत. फ्रान्समध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात  व्याधिग्रस्त रुग्णांना मानसिक बळ देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. ‘आयुष्यातील अंतिम क्षणाकडे कसे पाहाल?’ या विषयावर त्यांची व्याख्याने लोकांना व रुग्णांना वेगळा असा आधार देणारी ठरली आहेत. पॅरिसमधील नामांकित अशा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मृत्यूसमयी (उपमाशामक विभागात- Palliative care unit) त्यांनी दीर्घकाळ काम केले. या पुस्तकाचे मूळ शीर्षक ‘इंटिमेट डेथ- हाऊ दि डाियग टीच् अस् हाऊ टू लिव्ह’ असे आहे. या हॉस्पिटलमधील मरणांतीच्या रुग्णांसमवेत व्यतीत केलेल्या अनुभवांबद्दलचे हे पुस्तक आहे.
मृत्यूविषयक सार्वत्रिक अशी भीती आणि रहस्यमयता मानवी जीवनात पाहायला मिळते. सामूहिक लोकसमजुतीने मरणाविषयीचे विविध आडाखे मनुष्य बांधत आला आहे. मरणाविषयीची सार्वत्रिक अशी भीती मानवी जीवनात वसत आलेली आहे. एका मानसोपचारतज्ज्ञाने रुग्णांच्या अंतिमकाळात व्यतीत केलेल्या अनुभवांवरचे हे लेखन आहे. या रुग्णांच्या सहवासातील अनुभवांनी मरणाकडे पाहण्याची नवी दृष्टी हेनेझेल यांच्यामध्ये आली, ती त्यांनी या पुस्तकाद्वारे सांगितली आहे. कर्करोग, एड्स तसेच इतर व्याधिग्रस्ततेने, आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या सहवासातील या आठवणी आहेत. या रुग्णांना त्या आधार देतात. भावनिकरीत्या त्यांच्याशी समरस होऊन त्यांना समजून घेतात. या प्रकारच्या वागणुकीमुळे व सेवाभावामुळे रुग्ण कृतार्थतेने मरणाला सामोरे जातो. त्याच्या या कहाण्या आहेत. रुग्णांमध्ये आत्मविश्वास आणि बळ पेरण्याचे काम त्या करतात. मन हेलावून सोडणाऱ्या रुग्णाच्या मरणक्षणांचे आणि आप्तांची व्याकूळ अनुभवरूपे या पुस्तकात भेटतात.
या लेखनाला एक वेगळे महत्त्व आहे. एक तर एका वेगळ्या अनुभवविश्वाबद्दलचे हे कथन आहे. मरणक्षेत्र हे मानवी जीवनात निषिद्ध क्षेत्र मानले आहे. त्यासंबंधीच्या अनेक गरसमजुती समाजजीवनात आहेत. मानवतावादी दृष्टीने झालेले हे लेखन आहे. रुग्णांना समजून घेणे आणि त्यांचा अखेरचा मरणानुभव अधिक समाधान देणारा व्हावा यासाठीची धडपड आहे. रुग्णांची मन:पूर्वक केलेली शुश्रूषा आहे. रुग्णांमध्ये व समाजामध्ये आत्मविश्वास पेरण्याचा प्रयत्न आहे. विज्ञाननिष्ठ जाणीव आणि निकोप असे सामाजिक समुपदेशन आहे.     
समाजाला रुग्णांनी उभारी देणारे विचार या पुस्तकात जागोजागी आहेत. उदा. ‘मृत्यू म्हणजे दूर क्षितिजाकडे निघालेली नौका आहे. ती दिसेनाशी होण्याचा एक क्षण असतो.’, ‘मृत्यूपेक्षा प्रेम अधिक व शक्तिमान आहे. तुम्हाला जगायचं असेल तर मृत्यूचा धोका पत्कारावा लागतो.‘, ‘ज्यानं कधी निघावं असं कळत नाही अशा पाहुण्यांपकी मी आहे.’ ही वाक्ये मरणाविषयीची नवी जाणीव निर्माण करतात.
डॉ. हेनेझेल यांनी ज्या पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये दीर्घकाळ अशा रुग्णांसमवेत काम केले त्या दवाखान्यातील वातावरण, परिचारिका, डॉक्टर, रुग्णांचे कुटुंबीय व रुग्णांच्या मानसिक अवस्थांचे फार बारकाईने चित्रण केले आहे. मरणोन्मुख व्यक्तीच्या सहवासातील या प्रत्यक्षदर्शी आठवणी आहेत. पेट्रिक, पॅट्रिशिआ, मारिया अशा रुग्णव्यक्तींच्या कथा या लेखनात आहेत. परिचारिकांचा सेवाभाव आहे. त्यांच्या जीवनाकडे सहानुभूतीने व सहनानुभवाने व मानवतावादी दृष्टीने पाहिले आहे.
प्रथमपुरुषी निवेदनातून प्रकटलेले प्रत्यक्षगत असे हे कथन आहे. ते प्रभावी असे आहे. त्याचा मराठी अनुवादही प्रवाही व सहजी झालेला आहे. खास अशी मराठी गद्यलय या लेखनास आहे. ती वाचनीय आहे. एकूणच एका वेगळ्या अनुभवांचे हे कथन आहे. माणूसपणाच्या शोधात असणाऱ्या रुग्णाच्या अंतिम मृत्यूची ही शोधयात्रा आहे. मरणातला निषिद्धपणा काढून टाकून एक नसíगक रीत म्हणून या घटनेकडे पाहण्याची दृष्टी आहे. या अनुवादप्रक्रियेचे निमित्तही गवाणकर यांनी आरंभीच्या भागात दिले आहे. या ग्रंथाकडे त्यांचे लक्ष कसे वेधले गेले आणि व्यक्तिगत आयुष्यातील वडिलांच्या मृत्यूने या ग्रंथाकडे आणि जीवनाकडे कसे पाहायला शिकविले ती निर्मितीकक्षा समजून घेणे एक वेगळा अनुभव ठरतो.
मरणाकडे कोणत्याही पूर्वरचित अनुभवाद्वारे न पाहता मानवी आयुष्यातील एक नसíगक क्षण म्हणून त्याकडे पाहिले गेले आहे. मरणाभानाविषयीचा निकोप दृष्टिकोन सांगणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकामुळे ‘मरणात खरोखर जग जगते’ या म्हणीचा चांगल्या अर्थी प्रत्यय येतो. आणि मरणाबाबतची उत्सूकताही काही प्रमाणात कमी होते.
‘आयुष्याचा सांगाती..आम्ही मरायला कसं शिकतो?’ – मारी डी हेनेझेल, अनुवाद- वीणा गवाणकर, इंड्स सोर्स बुक्स, मुंबई, पृष्ठे – १६२, मूल्य – २०० रुपये.