‘पुनरुत्थानयुगाचे अग्रदूत न्यायमूर्ती म. गो. तथा माधवराव रानडे यांचे चरित्र’ हे ह. अ. भावे यांनी लिहिलेले पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. भावे हे एक चोखंदळ प्रकाशक होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांना सुप्रसिद्ध विदुषी दुर्गा भागवत यांचा स्नेह लाभला. आपल्या ‘वरदा प्रकाशना’तर्फे त्यांनी दुर्गाबाईंची काही पुस्तके प्रकाशित केली. त्याचबरोबर काही मौलिक आणि दुर्मीळ ग्रंथांचे पुन:प्रकाशनही केले. आयुष्यभर त्यांनी स्वत:चा व्यासंगही जोपासला. त्यांना अनेक विषयांत रुची आणि गती होती. एकोणिसावे शतक, त्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन घडामोडी यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता. त्या शतकात जीवनातील विविध क्षेत्रांवर आपल्या असामान्य कर्तृत्वाने निर्विवादपणे ठसा कोणी उमटवला असेल तर तो न्यायमूर्ती रानडे यांनी होय. यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्या दृष्टीने रानडे यांच्या चरित्राची मांडणी करावी असे त्यांना मनोमन वाटले आणि त्यांच्या या दिशेने केलेल्या प्रयत्नाचे दृश्यरूप म्हणजे प्रस्तुतचा चरित्रगं्रथ होय.
न्या. रानडे यांच्या हयातीतच त्यांच्या एका आप्ताने एक छोटेखानी चरित्र लिहिले होते. त्यानंतर १९१० साली ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे रमाबाई रानडे यांनी लिहिलेले सहवासचित्र, १९२४ साली न. र. फाटक यांनी लिहिलेले ‘न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे’ हे चरित्र आणि अलीकडच्या काळात डॉ. अरुण टिकेकर यांनी लिहिलेली इंग्रजी/ मराठीतील चरित्रे माधवरावांसंबंधी माहिती पुरवणारी आहेत. याखेरीज रमाबाईंसंबंधी उपलब्ध लेखन माधवरावांना केंद्रस्थानी ठेवून झाल्याचे आढळते. त्यामुळे तेही उपयुक्त ठरणारे आहे. तथापि, ह. अ. भावे यांना न्या. रानडे यांचे जीवनचरित्र लिहायला प्रेरक ठरलेले लेखन म्हणजे १९०१ साली त्यांच्या मृत्यूनंतर लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मध्ये लिहिलेला मृत्युलेख होय. कारण वैचारिकदृष्टय़ा लोकमान्य आणि रानडे यांच्यात भिन्नता असली तरी एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेले श्रेष्ठ प्रकारचे गुण हेरण्याची प्रज्ञा आणि त्यांचे यथार्थतेने विश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्यात होती. लोकमान्यांनी माधवरावांच्या ठिकाणचे गुण सांगताना ‘सर्वज्ञ: सहा माधव:’ या शब्दसमुच्चयाचा वापर केला आणि एकोणिसाव्या शतकातील सामाजिक स्थितीला ‘थंड गोळ्या’ची उपमा देऊन त्यात प्राणवायू भरण्याचे काम माधवरावांनी केले, अशा अर्थाचे विधान करून एकूणच काळाच्या पटावर माधवरावांच्या कर्तृत्वाची नोंद करून ठेवली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘दोन शब्दांत दोन संस्कृती’ हा लेख लिहिला असून त्यात पाश्चात्त्य आणि पौर्वात्य संस्कृतींतील फरक स्पष्ट केला आहे. आपल्या संस्कृतीला त्यांनी ‘स्थितिशील’ आणि ‘आध्यात्मप्रवण’ म्हटले आहे. तेव्हा ‘थंड गोळ्या’सारखी म्हणजे स्थितिशील असलेल्या संस्कृतीला वेगवेगळ्या सामाजिक संस्था स्थापून विचारप्रवण आणि कृतिनिष्ठ बनविण्याचे कार्य रानडे यांनी केले. हे स्पष्ट करण्याची जबाबदारी भावे यांनी हेतुत: स्वत:वर ओढवून घेतली. विसाव्या शतकापूर्वीच महाराष्ट्रात विविध आघाडय़ांवर पुनरुत्थान होऊ लागले आणि त्यामागे रानडे यांनी केलेले असाधारण कार्य प्रेरक व प्रोत्साहक ठरल्याचे भान भावे यांना आले. म्हणून चरित्राची मांडणी करताना ‘पुनरुत्थानयुगाचे अग्रदूत’ या संकल्पनेला महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे आणि त्याचे तर्कशुद्ध चित्रण करण्याकरिता त्यांनी आपला त्या शतकाचा अभ्यास पुरेपूर उपयोगात आणला आहे.
या चरित्राचे स्वरूप अटळपणे दुहेरी वा दुपेडी झाले आहे. एका बाजूने माधवरावांच्या गुणवैशिष्टय़ांची सूक्ष्मतेने नोंद आणि दुसरीकडे त्यांच्या पूर्व आणि समकालीन घडामोडींचे सम्यक् चित्रण असे अपरिहार्यपणे झालेले आहे. जवळजवळ ४४८ पृष्ठांच्या या चरित्रात माधवरावांचे उणेपुरे ६० वर्षांचे आयुष्य ४० प्रकरणांत लिहिले आहे. याच बरोबर ३ परिशिष्टे, कालपट आणि सूचीही दिली आहे.  चरित्रलेखनाविषयी भावे यांनी लिहिले आहे- ‘१८५७ नंतरच्या या पुनरुत्थानाच्या युगात प्रत्येक ठिकाणी मला माधवराव रानडे यांचे अस्तित्व जाणवू लागले. मग माधवरावांचा काळ डोळ्यांसमोर उभे करणारे माधवराव रानडे यांचे न. र. फाटक लिखित चरित्र मिळाले. ते वाचल्यावर या पुनरुत्थान युगाचे खरे अग्रदूत माधवराव रानडेच आहेत हे मला मनोमन पटले.’ याचा अर्थ असा की ह. अ. भावे यांना न. र. फाटककृत रानडे चरित्राने निश्चित दिशा दिली.
‘आधुनिक काळात न्यायमूर्ती माधवराव रानडे यांच्या चरित्राचे महत्त्व’ (माधवरावांची ‘निधनानंतर’ ओळख) या आणखी एका प्रस्तावनेत माधवरावांच्या कार्यासंबंधी योगी अरविंद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आकलन स्पष्ट करण्यात आलेले आहे.
‘पुनरुत्थानयुगाची पहाट’ या पहिल्या प्रकरणात ‘..पुनरुत्थानयुग म्हणजे आधुनिक विज्ञानयुगाची सुरुवात आहे. १४५३ साली युरोपात रिसरेक्शनचे म्हणजे पुनरुत्थानाचे युग सुरू झाले, असे इतिहासकार म्हणतात. युरोपमधील पुनरुत्थानाच्या या युगाचे अग्रदूत डांटे, बोक्याशिओ, बेकन, शेक्सपीअर, गटे, रुसो हे असे लेखकच होते. त्यामुळेच युरोपात विज्ञानाचे नवयुग सुरू झाले व नवविचारांचे वारे वाहू लागले..’ हे स्पष्ट करून १८१८ साली पेशवाईचा झालेला अस्त, १८५७चे बंड आणि दरम्यानच्या काळात राजकीय स्थित्यंतरामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या शाळा, छपाई, वृत्तपत्रांची सुरुवात, ‘यमुनापर्यटन’ ही कादंबरी आणि विष्णुदास भावे यांचे ‘सीतास्वयंवर’ हे नाटक यांची नोंद करीत कायदा सुव्यवस्थेचा अभाव, अराजक, लुटालुटीचे भय, राष्ट्र भावना नसणे याबरोबर सतीची चाल आणि सतिबंदीचा कायदा यांचे उल्लेख करीत माधवरावांच्या जन्मापूर्वीच्या महाराष्ट्र जीवनातले एकसाचलेपण भावे यांनी मांडले आहे.
१८ जानेवारी १८४२ रोजी निफाडला माधवरावांचा जन्म झाला. त्यांचे बालपण मात्र कोल्हापुरात गेले. त्यांना विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी ते अबोल आणि काहीसे संथ होते. त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६ नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी ‘मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष’ या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत. १८६२ साली ते मॅट्रिक झाले. पुढे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. १८६४ साली ते एम्. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर गॅ्रण्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली.
ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, ग्रंथकार संमेलन इत्यादींच्या स्थापनेत माधवरावांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. त्या काळातील प्रत्येक सुधारणेच्या संबंधातील कृतीमध्ये माधवराव मोलाची भूमिका बजावत. सनातनी वर्गाकडून त्यामुळे सुधारकांना सतत विरोध होई,  माधवरावांनाही तो विरोध सहन करावा लागत असे. विष्णुबुवा ब्रह्मचारी, करसनदास मुलजी, भाऊ दाजी, रावसाहेब मंडलिक, विष्णुशास्त्री पंडित, सार्वजनिक काका आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने आणि सहकार्याने माधवरावांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न, संमतीवयाचा कायदा यांसारख्या अनेक समाजसुधारणांकरिता अथक प्रयत्न केले. परंतु स्वामी दयानंद सरस्वती, वासुदेव बळवंत फडके, पंचहौद मिशन, रखमाबाई खटला या व्यक्ती वा घटनांच्या संदर्भात त्यांना टीका सहन करावी लागली.
प्रारंभीच्या काळात अलेक्झांडर गॅ्रण्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा विश्वास त्यांनी अनुभवला. पण पुढे क्रांतिकारकांचे, पेंढाऱ्यांचे बंड, दुष्काळ आणि तत्कालीन सरकारविरोधी घटनांनी सरकारचा रोष माधवरावांवर राहिला. त्याचा परिणाम म्हणून त्यांची बदली १८७९ साली धुळे येथे झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या टपालावर नजर ठेवण्यात येऊ लागली. म्हणून गणेशशास्त्री लेले या मित्राने त्यांना नोकरीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. परंतु १९०० च्या डिसेंबर महिन्यात त्यांची प्रकृती ढासळली आणि १९०१ सालच्या जानेवारी महिन्याच्या १४ तारखेला त्यांचा मृत्यू झाला.  
१८५१ साली वयाच्या ११-१२ व्या वर्षी माधवरावांचा विवाह वाईतील दांडेकरांच्या मुलीशी झाला. तिचे नाव रमा होते. परंतु १८७३ साली ती आजारी पडली आणि पुढे तिचा मृत्यूही झाला. मात्र माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब दुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला. माधवरावांची त्या काळात ‘बोलके सुधारक’ म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली. विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दु:खी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले.
भावे यांनी माधवरावांच्या सार्वजनिक कामावर लक्ष केंद्रित केलेले असल्याने माधवरावांचे न्यायदान, त्यांनी अर्थशास्त्र, इतिहास आणि इतर वेगवेगळ्या विषयांवर वेळोवेळी केलेले ग्रंथलेखन यांच्यासंबंधी विस्ताराने लिहिले आहे. माधवरावांची राजकीय मते आणि त्यासंबंधित लेखनाचा परिचयही करून दिला आहे. एकोणिसाव्या शतकातील सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि वाङ्मयीन घटना प्रवृत्तीसंबंधी त्यांनी मन:पूर्वकतेने लेखन केले आहे. बेहरामजी मलबारी, फिरोजशहा मेहता या अन्य भाषिक नेत्यांबरोबरच महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्याशी त्यांचा जो संबंध आला आणि प्रसंगी या लोकोत्तर व्यक्तींशी त्यांचा जो मतभेद झाला त्याचेही चित्रण आणि विश्लेषण भावे यांनी केले आहे.
भावे यांचा या विषयाचा विस्तृत अभ्यास वाचकाला थक्क करतो. आपल्याला माहिती असलेली बारीकसारीक माहितीचे कण भरभरून वाचकांना देण्यावर त्यांचा कटाक्ष राहिला आहे. आणि एकूण महाराष्ट्रीय जीवनातील एका कालखंडाच्या छेदकावर न्यायमूर्ती रानडे यांचे विचार आणि कर्तृत्व अधोरेखित करण्यातील त्यांची धडपड कौतुकास्पद म्हणावी अशी आहे. मात्र हे सारे करीत असताना त्यांनी अभ्यासलेल्या संदर्भसाधनांची सूची शेवटी जोडली असती तर ती जिज्ञासूंना उपयुक्त ठरली असती. खेरीज भावे यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी म्हणून की काय चरित्रात असंख्य मुद्रणदोष राहून गेले आहेत.
सारांश, हे चरित्र माधवराव रानडे यांच्या सार्वजनिक जीवनाचा सांगोपांग आलेख काढणारे म्हणून मोलाचे ठरणारे आहे.
‘पुनरुत्थानयुगाचे अग्रदूत न्यायमूर्ती म.गो. तथा माधवराव रानडे यांचे चरित्र’ – ह. अ. भावे, वरदा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ४४८, मूल्य – ६०० रुपये.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
amravati, politics, sanjay khodke, navneet rana, ncp, bjp, lok sabha election 2024
अमरावतीत राजकीय वैरत्‍वाचा दुसरा अंक
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार