धर्माचा इतिहास हा मनोरंजक आणि काहीसा चमत्कारिक विषय आहे. त्यातही मध्ययुगीन धर्म, त्यांच्या संकल्पना आणि उपासनापद्धती हा खूपच चित्तवेधक असा विषय आहे. वर्णाश्रम, पुनर्जन्म मानणारा वैदिक धर्म. त्यातील काही अतिरेकी गोष्टींमुळे जैन आणि बौद्ध धर्म निर्माण झाले. या धर्मामध्येही अनेक संप्रदाय निर्माण झाले. धर्मसंकल्पनाही बदलत गेल्या. त्यांच्या विचार-विकासाची, बदलत्या स्वरूपाची चर्चा या पुस्तकात केली आहे. मध्ययुगीन धर्म हे तंत्रमार्गी असल्याने त्याचाही चांगला आढावा घेतला आहे. योग आणि भक्तीचळवळ यांचाही परामर्श घेत लेखकाने आपला विषय चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती’ – डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ३६७, मूल्य – ४०० रुपये.

भीतीची दरी
सर आर्थर कॉनन डॉयल यांचा मानसपुत्र शेरलॉक होम्स याच्या थरारक कारनाम्याची ही एक कादंबरी. ती इंग्रजीत खूप गाजली. तिचा हा मराठी अनुवाद. शेरलॉकच्या कादंबऱ्या ज्यांना वाचायला आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. त्याविषयी वेगळे काही सांगायची गरज नाही. या पुस्तकाला अनुवादकाने छोटेसे टिपण जोडले आहे. त्याला ‘प्रस्तावना’ असे नाव दिले असले तरी तो ‘ऋणनिर्देश’ आहे. प्रस्तावना म्हणण्याजोगे त्यात काहीही नाही. शिवाय अनुवादकाचा ‘ऋणनिर्देश’ हाही अशा प्रकारच्या पुस्तकासाठी उचित नाही. याशिवाय इन्प्रिंटच्याच पानावर अनुवादकाची अर्पणपत्रिकाही दिली आहे. तिचीही गरज नव्हती. अनुवाद मात्र चांगला उतरला आहे.
‘द व्हॅली ऑफ फिअर’ – सर आर्थर कानन डॉयल, अनुवाद – प्रवीण जोशी, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पृष्ठे – १६९, मूल्य – १५० रुपये.

गतिमान प्रशासनाची रहस्ये
महाराष्ट्र राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागात मोठय़ा पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याची ही अनुभवगाथा आहे. प्रशासनात काम करणे म्हणजे महाकाय पर्वताला धडका देण्यासारखे असते, असा एक समज असतो. पण हे पुस्तक पाहिल्यानंतर प्रशासनातही किती चांगल्या प्रकारे आणि सकारात्मक काम करता येऊ शकते, याची साक्ष पटते. बेलसरे-खारकर यांनी एस.टी.महामंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणून केलेल्या कामापासून ते लोकराज्य या मासिकाच्या संपादकपदापर्यंत वेगवेगळ्या जागी राहून काम करताना आलेले अनुभव आणि त्यावर त्यांनी योजलेले उपाय यांची ही कहाणी आहे. सकारात्मक पद्धतीने, सहकाऱ्यांना विश्वासात व बरोबर घेत काम केले तर बरेच काही करता येते, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणाने दाखवून दिले. तेच अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिले आहेत.
‘डबल बेल’ – श्रद्धा बेलसरे-खारकर, अमेय प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १६०, मूल्य – १९९ रुपये.

लढा प्रशासनाशी
वीस-पंचवीस र्वष उस्ताद उस्मान खाँ, शाहिद परवेझ आणि किशोरी आमोणकर यांच्याकडे सतारवादनाचे रीतसर शिक्षण घेतलेल्या, पाचशेहून अधिक कार्यक्रम केलेल्या सतारवादक विदुर महाजन यांचे हे आगळेवेगळे पुस्तक आहे. २००८ सालापासून त्यांनी पूर्णवेळ सतारवादन करण्याचा निर्णय घेतला त्याआधीचा अनुभव म्हणजे हे पुस्तक. महाजन यांच्या तळेगाव दाभाडे इथे वडिलोपार्जित कारखाना होता. लग्नानंतर त्यांनी आणि पत्नीने त्याची जबाबदारी घेतली. तेव्हा प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाचखोरीचे अनुभव त्यांना येऊ लागले. प्रत्यक्ष पैशाची मागणी केली जाऊ लागली, पण कुठलेही गैरकाम करत नसल्याने महाजन यांनी त्याला नकार दिला. एवढेच नव्हे तर त्या अधिकाऱ्याविरोधात तत्कालीन आयुक्त अरुण भाटिया यांच्यापर्यंत जात पुराव्यानिशी तक्रारी केल्या. या प्रवासात त्यांना जे अनुभव आले त्याची ही संघर्षगाथा आहे. या पुस्तकाचे नाव मात्र शोधयात्राऐवजी लढता लढता असे असावयास हवे होते.
‘शोधयात्रा’ – विदुर महाजन, उन्मेष प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १६०, मूल्य – १६० रुपये.