अजूनही बरेच विवाह अ‍ॅरेंज्ड मॅरेज पद्धतीने जुळवले जातात. आमच्या शेजारची उपवर कन्या सध्या हेच दाखवणे-बघणे कार्यक्रम करतेय. गेल्या रविवारी तिनं एक मुलगा नाकारला. रात्री शेजारीण धुसफुसत आमच्या घरी आली आणि माझ्या बायकोला म्हणाली, ‘‘सोन्यासारखा मुलगा होता गं. शिक्षण, रंगरूप, नोकरी सगळं सगळं काही उत्तम. अगदी अभिषेक-ऐश्वर्यासारखा जोडा शोभला असता. त्यांना मुलगी पसंत पडली. पण ही अवलक्षणी कार्टी नाही म्हणाली.’’
बायकोनं विचारलं, ‘‘कारण काय?’’
शेजीबाई कपाळावर हात मारून उत्तरली, ‘‘हिला त्याचे बूट पसंत नाही पडले म्हणे.’’
बायको किंचाळली, ‘‘काय? लग्न मुलाशी करायचंय की त्याच्या बुटांशी?’’
‘‘आता तूच तिला समजावून सांग. मी हात टेकले.’’
सुकन्येला पाचारण केलं. तिनं कारणामागचं कारण सांगितलं, ‘‘त्याच्या बुटाचे तळवे खूप झिजलेले होते.’’
‘‘असेनात. त्याचा संबंध काय? हवं तर साखरपुडय़ाला अंगठीऐवजी नवीन बूट दे त्याला म्हणजे झालं.’’
सुकन्या ठामपणे उत्तरली, ‘‘जो माणूस बुटाचा तळवा फाटेपर्यंत नवीन बूट स्वत: विकत घेत नाही म्हणजे तो किती चिक्कू असणार याची कल्पना करा. कितीही पैसे कमावले तरी त्याच्या हातून किमान गरजेपेक्षा एकही अधिक पैसा सुटणार नाही. तो काडीचीही हौसमौज करणार नाही. बायकोसोबत शॉपिंग, व्हेकेशिनग, एंटरटेिनग करणं तर त्याला बापजन्मात शक्यच होणार नाही. मला नाही अशा कंजूष माणसाबरोबर जन्म काढायचा.’’
शेजारणीनं पुन्हा कपाळावर हात मारला. बायको अवाक् झाली. मी चाट पडलो. कालपरवापर्यंत घरभर धुडगूस घालणारी ही चिमणी इतक्या बारकाईनं निरीक्षण आणि विश्लेषण करण्याइतपत प्रगल्भ कधी झाली? सुकन्या पुढे म्हणाली, ‘‘आमच्या ऑफिसातही इंटरव्ह्य़ूला येणारी मुलं टकाटक टायबिय लावून कडक कपडय़ात येतात. पण त्यांनी कितीही मिजास मारली तरी आम्ही त्यांच्या बुटांवरून त्यांची लायकी ओळखतो.’’
‘‘अरे वा! खुनाला वाचा फुटते तशी बुटालाही वाचा फुटते म्हणायची! साहजिकच आहे. बुटाला सोल असतो तशी जीभही असते. तेव्हा बूट बोलत असणार हे नक्की. नाहीतर जिभेचं करणार काय?’’
‘‘तुमचा चहाटळपणा पुरे. काय गं पोरी, बुटावरून असा स्वर्ग गाठायचं कोणी शिकवलं तुला?’’
सुकन्येनं ठसक्यात उत्तर दिलं, ‘‘मावशी, आमच्या ऑफिसात एच. आर. मॅनेजमेंटचं अ‍ॅडव्हान्स्ड ट्रेिनग दिलं जातं. तिथं एका दृष्टिक्षेपात अनोळखी व्यक्तीचं मूल्यमापन कसं करायचं, ते आम्हाला शिकवलं होतं. फूटवेअरवरून जीवनशैली, चारित्र्य आणि स्वभाव ओळखण्याच्या कलेला सोलॉलॉजी म्हणतात.’’    
तर, तिच्या मते, म्हणजे सोल-ऑलॉजी क्षेत्रातल्या विद्वानांच्या मते सर्वसामान्य माणूस अंतर्वस्त्र आणि पादत्राण या दोन बाबतीत सहसा गाफील असतो. त्यापकी अंतर्वस्त्र बाहेर दिसू शकत नाहीत. पण पादत्राणांचं निरीक्षण आपण उघड उघड करू शकतो. मन लावून पाहिलं आणि तर्कशुद्ध विचार केला तर पादत्राणांची भाषा सहज समजू शकते आणि आपण बुटमालकाच्या स्वभावाविषयी काही प्राथमिक अंदाज बांधू शकतो. काही तज्ज्ञ जसे हस्ताक्षरावरून किंवा निव्वळ स्वाक्षरीवरून त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वासंबंधी आडाखे बांधू शकतात तसाच काहीसा हा प्रकार आहे.
युरोपमध्ये म्हणे फार पूर्वी कर्ज मागायला आलेल्या गृहस्थाच्या केवळ बुटांचंच नाही तर त्यावरच्या पायमोज्यांच्या अवस्थेचंही निरीक्षण केलं जायचं. पायमोज्यांचा रंग बुटांशी मॅच होतोय की पँटशी, की दोघांशीही नाही, तेसुद्धा तपासलं जायचं. त्याकाळी माणशी बुटाचा एकच जोड असायचा, पण चार-पाच निरनिराळ्या रंगाच्या पँट वापरात असायच्या. पायमोज्यांचा रंग पँटशी जुळत नसला तर हा भावी ऋणको कफल्लक किंवा गलथान असणार. म्हणजे त्याला कर्ज देण्यात धोका आहे, असा प्राथमिक निष्कर्ष काढला जायचा. त्यानंतर वाटाघाटी वगरे झाल्यानंतर हा निष्कर्ष कदाचित बदललाही जात असेल. पण फर्स्ट इम्प्रेशन म्हणतात, ते हे असं पादत्राणांवरून केलं जायचं.
प्रॅक्टिकल ट्रेिनग देण्यासाठी सुकन्या मला विमानतळावर घेऊन गेली. तेच स्थळ निवडण्याचं कारण म्हणजे तिथं ओळखीचं कोणी भेटण्याची शक्यता कमी असल्यामुळे लोक फारसा विचार न करता मनाच्या पहिल्या पसंतीची पादत्राणं बिनधास्तपणे चढवून येतात.    
अपेक्षेनुसार तिथं पादत्राणांचे असंख्य नमुने दिसले. पण चकचकीत पॉलिश केलेले बूट फारसे आढळले नाहीत. विमानाचं तिकीट काढणाऱ्या माणसाला बूटपॉलिशचा खर्च परवडत नाही, असं कसं होईल? तपकिरी रंगाच्या पँटखाली हिरवे विस्कळीत पायमोजे आणि काळे कळकट बूट दिसल्यावर सुकन्या म्हणाली, ‘‘हे निष्काळजी लोक. हातातलं काम कसंतरी उरकून टाकणारे. चलता है पंथातले. आपल्या टीममध्ये असला एक भिडू घुसला तर वाट लागते.’’
कोणत्याही बुटांवर सफेद रंगाचे खेळकर पायमोजे घातलेल्या लोकांकडे माझं लक्ष वेधून ती म्हणाली, ‘‘यांना मॅचिंगची भानगडच नको असते. ही माणसं किचकट समस्या सोप्या पद्धतीनं हातावेगळी करणाऱ्यांपकी. शॉर्टकटवाली. नाही जमलं तर समस्येलाच बगल देऊन पुढे सटकणारी. मार्केटिंग जॉबसाठी योग्य.’’
 त्यावर ताण करून काहीजणांनी स्पोर्ट शू चढवलेले दिसत होते. त्यांचे रंगसुद्धा भन्नाट होते. या वल्ली खुशालचेंडू. प्लेबॉय टाइप. घोटय़ापर्यंत वर चढलेले बूट घालणारे लोक आक्रमक प्रवृत्तीचे असतात. यांच्या ‘अरेला कारे’ म्हणणाऱ्या उर्मट बाईचंच यांच्याशी जमू शकतं. काहींच्या पायात सँडल्स तर काही इसम चक्क चपला घालून आलेले होते. हे आपल्याच मस्तीत जगणारे बेफिकीर फकीर. याउलट, काळ्या, निळ्या किंवा राखाडी पँटखाली काळे चकाचक
पॉलिश केलेले बूट, ब्राउन किंवा क्रीम कलरच्या पँटखाली चकचकीत ब्राउन शूज आणि पँटच्या रंगाला मॅच होणारे स्वच्छ पायमोजे, तेही न ओघळलेले, असं शूज-सॉक्स-पँट समन्वय व्यवस्थितपणे जमवलेले सद्गृहस्थ पाहिल्यावर ती म्हणाली, ‘‘हे परफेक्शनिस्ट असणार. हातात घेतलेलं काम नीटनेटकेपणाने आणि बिनचूक करत असणार.’’    
वा! मी सुकन्येच्या सोलॉलॉजीला भक्तिभावानं हात जोडले. तितक्यात मी माझ्या पायांकडे पाहिलं आणि चमकलो. अरे बापरे! तिचं लक्ष गेलेलं नसलं म्हणजे मिळवलं. पण ही आजकालची पोरं चलाख असतात. माझं ओशाळेपण तिनं झटक्यात टिपलं आणि माझ्या खांद्यावर थोपटून ती म्हणाली, ‘‘इट्स ओके, काका. तुमच्या बुटांकडे कशाला पाहायचं. मी तुम्हाला लहानपणापासूनच नीटपणे ओळखते ना?’’
तरीपण दुसऱ्या दिवशी मी निरनिराळ्या रंगांचे पायमोजे खरेदी केलेच. हो, आपल्या बँकांचा नेम नाही. माझे बूट बघून बॅलन्स न तपासताच माझा चेक परत करतील.
vardesd@gmail.com