अपार कष्ट आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर बाबा आमटे यांचं मानवमुक्तीचं स्वप्न साकारणाऱ्या ध्येयवेडय़ांची गोष्ट सांगणारं ‘आनंदवन : प्रयोगवन’ हे डॉ. विकास आमटे यांचं पुस्तक समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश..
आनंदवनात खऱ्या अर्थाने उद्योगधंद्याला सुरुवात झाली ती १९६० साली. त्याचं झालं असं, की भारताचे स्वित्र्झलडमधील राजदूत एम. के. वेल्लोदी आणि त्यांच्या पत्नी आनंदवनाशी निगडित होत्या. त्यांना lr17सिस्टर लीलांमुळे आनंदवनाच्या कामाची माहिती होती. १९५७-५८ चा सुमार असेल. एकदा स्वित्र्झलडच्या राजधानीत- बर्नमध्ये फेरफटका मारत असताना या दोघांना ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’ या संस्थेची पाटी दिसली. संस्थेत जाऊन चौकशी केल्यावर त्यांना कळलं की, ही संस्था जगभरातल्या चांगल्या कामांना निधी पुरवते आणि त्यांना भारतातल्या संस्थांनाही मदत करण्याची इच्छा आहे. वेल्लोदी दाम्पत्याने त्यांना उत्साहाने आनंदवनाबद्दल माहिती दिली आणि या संस्थेने चक्क आनंदवनाला ३० हजार स्विस फ्रँक्सची मदत देण्याचं नक्की केलं. आनंदवनाला परदेशातून मिळालेली ही पहिली आíथक मदत.
कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी उद्योगधंदे सुरू करण्याकरता ही रक्कम वापरायची हे पक्कं होतं. आपण जे उत्पादन सुरू करू ते उपयोगी हवं आणि सहजगत्या विकलं जाणारंही हवं, यावर बाबा ठाम होते. आनंदवनाच्या आसपासच्या गावांमध्ये विकता येतील अशा कोणत्या वस्तू असू शकतात, याचा विचार त्यांच्या डोक्यात सतत सुरू असे. टिन कॅन हा असाच एक उद्योग होता. टिनच्या पत्र्यापासून चाळण्या, गाळणी, डबे, दिवे, चिमण्या अशा जीवनावश्यक वस्तू तयार केल्या तर त्यांना ग्रामीण बाजारपेठ नक्की उपलब्ध होईल, याची बाबांना खात्री होती. त्या काळी सगळ्याच गावांमध्ये उंदरांचा सुळसुळाट असे. हे उंदीर टिनच्या डब्यांखेरीज कशालाही दाद देत नसत. त्यामुळे सगळीकडे टिनच्याच वस्तू वापरल्या जात. ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’च्या अधिकाऱ्यांनाही ही योजना पसंत पडली आणि हा उद्योग उभा करण्यावर शिक्कामोर्तब झालं. या उद्योगासाठी आवश्यक ती मशिनरी आणली गेली. त्यानंतर ‘टिन कॅन प्रोजेक्ट’चं औपचारिक उद्घाटन करण्यासाठी स्वित्र्झलडचे भारतातले राजदूत जॅक्स अल्बर्ट कुटा आनंदवनात आले होते.
तीस हजार रुपयांची यंत्रसामुग्री आणि सहा हजार रुपयांचा कच्चा माल एवढय़ावर हा उद्योग सुरू झाला. लवकरच आनंदवनात तयार झालेले डबे, चाळण्या वगरे वस्तू आसपासच्या आठवडी बाजारांमध्ये लोकप्रिय होऊ लागल्या. पहिल्या वर्षांतच या कारखान्याने तब्बल पाऊण लाखाचा माल विकला, याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. पण बाबांना मात्र या यशाची खात्री होती. तसं त्यांचं नियजोनच होतं. केवळ कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी निरुपयोगी वस्तू तयार करण्याला त्यांचा पूर्ण विरोध होता. परिसरातल्या मागणीचा अभ्यास करून त्यांनी या धंद्याचा पाया रोवला. आवश्यक तेवढं भांडवल, आवश्यक तितकीच यंत्रसामुग्री आणि तुलनेने जास्त श्रम हे त्यांचं सुरुवातीच्या काळातलं गणित होतं. केवळ आनंदवनासाठीच नव्हे, तर भारतासारख्या श्रमबहुल देशातला रोजगाराचा प्रश्न याच पद्धतीने सोडवता येऊ शकतो, असं ते म्हणत.
टिन कॅनचा हा उद्योग आनंदवनातल्या मेटल फॅब्रिकेशनच्या उद्योगाचा पाया ठरला. कालांतराने प्लास्टिक वस्तूंचा सुळसुळाट झाल्यामुळे टिनच्या वस्तूंची मागणी घटली. पण तोपर्यंत फॅब्रिकेशनमध्ये अनेक वस्तूंचं उत्पादन सुरू झालं होतं. या कामाची सुरुवात केली गिरीधर राऊतने. गिरीधर १९५८ साली आनंदवनात आला. त्याच्या वडिलांनाही कुष्ठरोग झाला होता. त्याच्याही अंगावर चट्टे दिसू लागल्यावर त्याने शाळा सोडली आणि तो आनंदवनात दाखल झाला. त्याचं गाव वध्र्याजवळचं िहगणघाट. बाबांच्या कामाबद्दल त्या गावात माहिती होती. इथे आल्यावर सुरुवातीला त्याने शेतीतली, दवाखान्यातली कामं केली. १९६०मध्ये टिन कॅन प्रकल्प आल्यावर त्याची जबाबदारी बाबांनी गिरीधरच्या खांद्यावर टाकली. खरं तर तो आधी वर्कशॉपमध्ये काम शिकलेला नव्हता. पण कामं उभी करायची तर आहे त्या कार्यकर्त्यांमधले होनहार तरुण उचलायचे ही बाबांची पद्धत. त्यानुसार त्यांनी गिरीधरला वर्कशॉपमध्ये काम करायला सांगितलं आणि त्यानेही ते काम समर्थपणे पेललं. पुढे वाढवलं. बाबा त्याचा उल्लेख अभिमानाने ‘आमचा इंजिनीअर’ असा करायचे.
टिन कॅननंतर लगेचच बाबांनी िपट्रिंग प्रेसला सुरुवात केली. मला आठवतं, त्या वेळी बाबांनी त्या काळाच्या मानाने बरंच जास्त, म्हणजे ५० हजार रुपयांचं भांडवल टाकून िपट्रिंग प्रेससाठी लागणारी मशीन्स विकत घेतली होती. त्या वेळी वरोऱ्याच्या आसपास िपट्रिंग प्रेस फारसे नव्हते. त्यामुळे याही उद्योगाचा उपयोग आसपासच्या गावांमधून कामं मिळायला होऊ शकतो, असा बाबांचा होरा होता. मुख्य म्हणजे या उद्योगात उत्पादन आणि विक्रीचा फारसा प्रश्न नव्हता. लोकांची छपाईची कामं करून देणं, हे इथलं मुख्य काम होतं. शिवाय संस्थेचा पसारा वाढत असल्याने संस्थेसाठीची छपाईची कामं इथेच होऊ शकणार होती. दिवाकर मोहनी हे िपट्रिंग प्रेसमधले पहिले कार्यकत्रे. त्यांनी पहिल्याच बॅचमध्ये जवळपास २२ कुष्ठरुग्णांना िपट्रिंग प्रेसचं प्रशिक्षण दिलं. गंगारेड्डी तोट्टावार हा आमचा कुष्ठरोगमुक्त कार्यकर्ता हा या फळीतलाच. पुढे त्यानेच िपट्रिंग प्रेसची जबाबदारी अंगावर घेतली आणि त्यानंतर २००८ मध्ये निवृत्त होईपर्यंत तोच ती समर्थपणे सांभाळत होता. सुरुवातीला साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित असलेलं ‘आंतर भारती’ हे मासिक आमच्या छापखान्यातच छापलं जायचं. प्रा. रमेश गुप्ता हे त्या मासिकाचे संपादक होते. पुढे रमेश गुप्तांच्या मदतीनेच बाबांनी त्यांचे विचार आणि वाक्यं शब्दबद्ध केली. बाबा इंग्रजीत सांगायचे आणि गुप्ता त्याचं मराठीत भाषांतर करायचे, असं ते काम चालायचं.
पुढे वरोरा आणि आसपासच्या गावांमध्येही िपट्रिंग प्रेसची बातमी पोहोचली. आणि मग बाहेरूनही छपाईसाठी कामं येऊ लागली. त्यानंतर आम्ही सरकारी कार्यालयं, सरकारी शाळा-कॉलेजांसाठीही छपाई करू लागलो. सरकारने पुरवलेला कागद वापरून त्यांना स्वस्तातल्या वह्या तयार करून देण्याचं कामही आमच्या प्रेसने बरीच र्वष केलं. त्या वह्यांना प्रचंड मागणी असायची. कारण आमच्याकडे दर्जाशी तडजोड करणं कुणाला माहितीच नव्हतं. इतर ठिकाणांपेक्षा आमची छपाई चांगली असायची; आणि मुख्य म्हणजे ताई-बाबांच्या काटकसरी शिस्तीत सगळे तयार झाले असल्यामुळे आमच्याकडे सरकारने पुरवलेल्या कागदामध्ये त्यांनी सांगितलेल्यापेक्षा जास्तच वह्या बसायच्या!
आनंदवन ही जगाशी नातं तुटलेली वसाहत असता कामा नये, असा बाबांचा आग्रह होता. या उद्योगधंद्यांमुळे तोही हेतू साध्य झाला. मुख्य म्हणजे केवळ दर्जामुळे आमच्या विविध वस्तूंना मागणी वाढत होती, हे फारच सुखद होतं. नंतरच्या काळात पुण्या-मुंबईतल्या ग्राहकांनी आनंदवनाला मदत म्हणून आमची उत्पादनं उचलून धरली. तिथेही दर्जाची खात्री हा महत्त्वाचा मुद्दा होताच. पण आनंदवनातल्या कुष्ठरुग्णांनी केवळ दर्जाच्या जोरावर आसपासच्या गावांमध्ये अनेक प्रकारच्या बाजारपेठा काबीज केल्या अन् आपली क्षमता सिद्ध केली. आनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत नाही तर ते रोगमुक्तांनी चालवलेलं उत्पादन केंद्र आहे, याची बाहेरच्या जगाला जाणीव होऊ लागली.
दुसरं असं की कुष्ठरुग्णांनी आपण इतर कोणत्याही धडधाकट माणसांपेक्षा कमी नाही हे या उद्योगांमधून सिद्ध केलं. टिन कॅन म्हटलं तर टिन कॅन, िपट्रिंग प्रेस म्हटलं तर िपट्रिंग प्रेस, विटा पाडायच्या ठरलं तर विटांचं काम सगळं काही कुष्ठरुग्णांनी शिकून घेतलं. त्या काळात, म्हणजे १९५८ च्या सुमारास आम्ही मधुमक्षिकापालनही करून बघितलं. पुढे प्रकाशने या व्यवसायाची जबाबदारी सांभाळली. संधी मिळाली तर आम्ही वाट्टेल ते करून दाखवू शकतो, हा संदेशच त्यांनी बाहेरच्या जगाला दिला. तो फक्त कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनापुरताच होता का? मला तसं वाटत नाही. बाबा तर म्हणायचेच, ‘जर हे कुष्ठरुग्ण एखादं काम करू शकत असतील तर कोणीही करू शकतं.’ भारतातल्या बेरोजगारीच्या प्रश्नाला कुष्ठरुग्णांनी दिलेलं हे चोख उत्तर होतं. समाजातील इतर गरजूंना आनंदवनातल्या या मॉडेलचा उपयोग व्हावा, अशी बाबांची मनोमन इच्छा होती.
तो योग लवकरच आला, काउंट आर्थर तार्नोवस्की यांच्या रूपाने. तार्नोवस्की हा मूळचा पोलंडचा, पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला. लहानपणी पोलिओ झाल्यामुळे तो दोन्ही पायांनी अपंग होता. त्याला फिरावं लागायचं ते व्हीलचेअरचा आधार घेऊनच. पण त्याची पर्वा न करता हा माणूस ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकातर्फे आशियातल्या अपंगांच्या कामाची पाहणी करत फिरत होता. या परिसरातून जात असताना दूध-भाज्या कुठे विकत मिळतील हे शोधता शोधता तो आनंदवनात येऊन पोहोचला. मला आठवतं, तेव्हा टोळधाड आली म्हणून बाबा शेताकडे गेले होते. मीच त्याला सामोरा गेलो. ही संस्था आहे कळल्यावर त्याने इथे मुक्काम करायचं ठरवलं. ते साल होतं १९६४.
बाबांनी त्याला आनंदवन फिरून दाखवलं. कुष्ठरुग्णांची वसाहत म्हणजे एक रोगट, अंधारं आणि लाचार प्रकरण असणार असं काहीतरी त्याच्या डोळ्यांसमोर होतं. पण त्याला समोर दिसत होतं कुष्ठरुग्णांनी उभारलेलं एक नांदतं, हसतंखेळतं गाव. शेती, भाजीपाला, डेअरी, उद्योगधंदे हे सगळं कुष्ठरुग्णांनी घडवलं आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. शिवाय हे कुष्ठरुग्ण बाबांच्या मदतीने आत्मविश्वासाने त्याच्याशी बोलत होते. त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. हे सगळं बघून तो केवळ थक्क झाला. बाबांना म्हणाला, ‘‘अपंगांसाठी कोण काय काम करतंय बघत मी आशियात सगळीकडे फिरलो, पण असं काम मला कुठेच आढळलं नाही. तुमचं मॉडेल वेगळं आहे. काम करून आत्मसन्मानाने जगण्याची संधी तुम्ही कुष्ठरुग्णांना दिली आहे. तुम्ही माझ्यासारख्या अपंगांसाठीही काहीतरी केलं पाहिजे.’’
बाबांनाही अपंगांचे प्रश्न जाणवत होतेच. केवळ अपंगत्वामुळे माणूसपणाला पारखी झालेली अनेक माणसं त्यांनीही पाहिली होती. पण बाबा किती गोष्टी करू शकतील याला मर्यादा होत्या. बाबांनी ही बाब आर्थरजवळ बोलून दाखवली, पण आर्थरने आग्रह धरला. त्याच्या पुस्तकाच्या रॉयल्टीतून मिळणारे पसे त्याने बाबांना देण्याची तयारी दाखवली. मग दोघांमध्ये भरपूर चर्चा झाली आणि अपंगांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणारं एक निवासी केंद्र आनंदवनात सुरू करायचं असं ठरलं. ‘कुष्ठरुग्ण असोत किंवा अपंग, समाजाने आपला पूर्वग्रह बाजूला ठेवून त्यांना संधी दिली पाहिजे; दान नव्हे,’ असं बाबांचं म्हणणं होतं. त्यामुळे या नव्या केंद्राचं नाव ‘संधिनिकेतन’ ठेवायचं ठरलं. कुष्ठरुग्णांसाठी बाबा जे करत होते त्याचंच हे एक एक्स्टेंशन होतं, असं म्हणता येईल. त्यासाठी संस्थेच्या घटनेमध्ये बदल केला गेला. हा विस्तार व्हायला निमित्त ठरला आर्थर तार्नोवस्की.
पुढे १९६७ मध्ये आशियातल्या भटकंतीवरचं ‘अनबीटन ट्रक’ हे ऑर्थरचं पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यात आनंदवनावर दोन प्रकरणं होती. कबूल केल्याप्रमाणे ऑर्थरने त्याला मिळालेल्या रॉयल्टीचे दीड लाख रुपये बाबांच्या स्वाधीन केले आणि त्यातून ‘संधिनिकेतन’ची इमारत उभी राहिली. पुढे आनंदवनातले उद्योग संधिनिकेतनशी जोडले गेले आणि तिथे ग्रामीण भागातल्या अपंगांना प्रशिक्षण मिळण्याची सोय तयार झाली.
अर्थात, इमारत उभी राहिली आणि लगोलग अपंगांचा ओढा तिकडे वळला, असं झालं नाही. या केंद्राबद्दल त्यांना माहिती कुठून होणार, हा प्रश्न होताच. मग हरी बढे आणि सदाशिव ताजने या दोघा कार्यकर्त्यांना मी बहुविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा सव्‍‌र्हे करायला पाठवलं. हरी कुष्ठरुग्ण होता, तर सदाशिव अपंग. सदाशिवला लहानपणी पोलिओ झालेला. त्यामुळे अपंगांशी हे दोघं थेट जोडले जाऊ शकत होते. या दोघांची जोडी वरोरा तालुक्यातल्या ३३ गावांमध्ये फिरली. गावात किती कुष्ठरुग्ण आहेत, किती अपंग आहेत, कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे, हे लोक काम काय करतात, असा भरभक्कम सव्‍‌र्हे या दोघांनी केला. त्यांनी बलगाडीतून हा भाग अक्षरश: िपजून काढला. ते सकाळी सकाळी जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडायचे, ते एकदम रात्रीच आनंदवनात परत यायचे. या सव्‍‌र्हेमुळे अपंगांची माहिती तर गोळा झालीच, शिवाय ‘संधिनिकेतन’ची कल्पनाही या गावांमध्ये पसरली.
पण तरीही पहिल्या दोन वर्षांचा काळ परीक्षा बघणारा होता. इमारत बांधून तयार होती, पण अजून काम धडपणे सुरू झालं नव्हतं. त्यामुळे कधीकधी ही इमारत आम्ही धान्याचा साठा करायलाही वापरायचो. त्यावर आर्थर वैतागायचा. आर्थर मनाने चांगला माणूस, पण आपलं स्वप्न कधी एकदा पूर्ण होतं, हे बघण्यासाठी तो उतावीळ झाला होता. तो आम्हाला म्हणायचा, ‘मी दिलेले पसे तुम्ही वाया घालवताय.’
पण हळूहळू हरी आणि सदाशिवच्या सव्‍‌र्हेचा उपयोग होऊ लागला. एखाद् दुसरा अपंग माणूस पत्ता शोधत शोधत आमच्याकडे येऊ लागला. त्याने सांगितल्यावर आसपासच्या गावातली आणखी चार मंडळी इकडे वाट वाकडी करू लागली. संधिनिकेतनला हळूहळू आकार येत गेला. आता आमच्यासमोर आव्हान होतं ते अपंगांना प्रशिक्षण देण्यासाठी इतरही उद्योग सुरू करण्याचं. मुख्य म्हणजे ज्याची समाजात गरज असेल अशा प्रशिक्षणांवर भर देणं आवश्यक होतं. जसजसे आनंदवनात नवे उद्योग सुरू झाले, तसतसे त्यांचे प्रशिक्षणही इथे मिळू लागले. बाबांच्या स्वप्नाप्रमाणे कुष्ठरुग्णच इथले ट्रेनर बनले. या कुष्ठरुग्णांनी नव्या पिढीमध्ये ‘श्रम ही है श्रीराम हमारा’चा मंत्र रुजवला. कालांतराने या प्रशिक्षण केंद्राला सरकारी मान्यता आणि अनुदानही मिळालं.
सध्या आम्हाला या केंद्रात ८५ प्रशिक्षणार्थीसाठी अनुदान मिळतं, पण अगदी सुरुवातीपासूनच आम्ही त्या संख्येवर समाधान मानलं नाही. इथे कायमच शंभरच्या आसपास प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असतात. त्यातल्या जास्तीच्या मुलांचा खर्च अर्थातच आम्ही करतो. शिवाय फक्त व्यवसाय प्रशिक्षण देऊन थांबत नाही, तर त्यातल्या ज्यांना ज्यांना शिक्षण पूर्ण करण्यात रस असेल त्यांना दहावी, बारावीच्या परीक्षेला बसवणं हेही आमचे कार्यकत्रे स्वत:चं कामच मानतात.
‘संधिनिकेतन’चा पाया तयार करण्याचं काम आमच्या सदाशिव ताजनेनं केलं. तोच ‘संधिनिकेतन’चा पहिला प्रशिक्षणार्थी बनला व पुढे १९९५ मध्ये तो या केंद्राचा अधीक्षकही झाला.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क