कला, साहित्य, संगीत, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील अभिनव कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या ‘चतुरंग’ संस्थेला नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली. आजपावेतो तब्बल १३५० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी ‘चतुरंग’ चाळिशीत पुन्हा नवनवे संकल्प साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. चतुरंगचे विद्याधर निमकर यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून संस्थेच्या चतुरस्र कार्याचा घेतलेला हा मागोवा..
माधुरी दीक्षित लोकप्रियता, अभिनयकर्तृत्व आणि यशाच्या शिखरावर असताना तिची प्रकट मुलाखत रूपारेल महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याची संधी मला ‘चतुरंग’ परिवारामुळेच सर्वप्रथम मिळाली. साल होतं १९९८. निमित्त होतं- चतुरंग रंगसंमेलनात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचा सोहळा.
दिग्दर्शक एन. चंद्रांनी माधुरीला सुचवलं, ‘तू फक्त एकदा ‘चतुरंग’चे विद्याधर निमकर आणि अन्य एखाद्या पदाधिकाऱ्याला भेटीची वेळ दे. मग त्यांना ‘हो’ म्हणायचं की ‘नाही’, मी तुझ्यावरच सोडतो.’ एन. चंद्रांना खात्री होती, की कुणाही कर्तृत्ववान व्यक्तीशी नेमका, नम्र संवाद, वागण्या-बोलण्यातला पारदर्शीपणा आणि ‘चतुरंग’नं जोडलेला अवघ्या महाराष्ट्रभरचा साहित्यिक, सांगीतिक, नाटक, चित्रपट, चित्रकला अशा विविध क्षेत्रांतला परिवार याचा अंदाज घेऊन माधुरी, तिचे आई-बाबा या मराठी विश्वातल्या सर्वात लोकप्रिय सांस्कृतिक व्यासपीठावर यायला नक्कीच होकार देतील. आणि तसंच झालं. या कार्यक्रमाचं मानधनही तिनं घेतलं नाही. निमकरांनी आग्रह केला की, किमान आमच्याकडे जेवून तरी जा. तिची आई म्हणाली की, ‘नको. कार्यकर्त्यांची दाटीवाटी होते सहय़ांसाठी. फोटोंसाठी झुंबड उडते. त्रास होईल. नको.’ निमकरांनी शब्द दिला- ‘आम्ही स्वतंत्र व्यवस्था करू. आम्हा दोन-तीन जणांपलीकडे कुणीही असणार नाही.’ आईंनी मान्य केलं. माधुरी आवर्जून आली. रीमानं तिची ओळख करून दिली. मी प्रकट मुलाखत घेतली. ती घेण्यापूर्वी माधुरी आवर्जून व्यासपीठावरून खाली उतरली. बाबासाहेब पुरंदरे, सुलोचनादीदी आणि बाबुजींना तिनं नमस्कार केला. आणि गप्पा सुरू झाल्या. नंतर जेवायलाही ती थांबली. ‘चतुरंग’च्या कल्पक संयोजकांनी तिच्या आवडीची पुरणपोळी नि मोदक तिला खिलवले. दुसऱ्या दिवशी निमकरांना दीक्षितांकडून उत्तम आयोजनाबद्दल आणि फोटो-सहय़ा-कार्यकर्त्यांच्या झुंबडीला फाटा दिल्याबद्दल मनमोकळी दादही मिळाली.
मी इथं फक्त ‘चतुरंग’शी माझा संबंध ‘माधुरी गप्पांमुळे’ आला म्हणून तिच्या कार्यक्रमाचं उदाहरण दिलं. पण अभिनव संकल्पना, शिस्तबद्ध कार्यकर्ते, बरेचसे कार्यक्रम विनामूल्य, कार्यक्रमांच्या दर्जातून निर्माण केलेला हुकमी हजाराच्या घरातला रसिक प्रेक्षकवर्ग यामुळे ‘चतुरंग’नं गेल्या ४० वर्षांत ‘माधुरी’सारख्या नामवंत चौदाशे महनीय व्यक्तींना आपल्या व्यासपीठावर सादर करण्याची कमाल केलीय.
या संस्थेचा विशेष म्हणजे मुख्य मार्गदर्शक विद्याधर निमकर कुठेही फोकसमध्ये नसतात. एकही कार्यकर्ता कुणाही वलयांकितांबरोबर चुकूनही फोटोसाठी धडपडत नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाती प्रत्येक कार्यक्रमाच्या तयारीच्या तपशिलाच्या चक्क ६१ सूचना कागदावर दिलेल्या असतात. निरपेक्ष कार्यकर्त्यांची जत्रा जमवल्यामुळे ऐनवेळी उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्याची क्षमता ‘चतुरंग’कडे आहे.
मला किरण सातार्डेकर भेटले. हे मूळचे डोंबिवलीचे. सध्या पुण्यात राहतात. आठवडय़ातले पाच दिवस हैदराबादला क्लिनिकल रीसर्चमध्ये नोकरी करतात. ते डोंबिवलीत असताना ‘चतुरंग’च्या जत्रेत आले. पहिल्याच दिवशी त्यांच्यावर नाशिकला तातडीनं जाऊन फिल्म रीळ पोहोचवून येण्याची जबाबदारी टाकली गेली. किरण सांगतात, ‘नव्या कार्यकर्त्यांवर नमनाच्याच दिवशी टाकलेला हा विश्वास आमची उमेद वाढवतो.’ तर चिपळूणचे अजित आगवेकर म्हणाले, ‘आमच्या संस्थेत पदाधिकारी, पद नाही. जो कार्य करतो तो कार्यकर्ता. साप्ताहिक बैठकीत सर्वानुमते मोकळी चर्चा होऊन निर्णय होतात आणि जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. स्पष्ट मत, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं.’
विशेष म्हणजे पुणे, गिरगाव, डोंबिवली, चिपळूण, गोवा सर्वच ठिकाणचे शेकडो कार्यकर्ते आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय सांभाळून ‘चतुरंग’च्या या जबाबदाऱ्या कुठल्याही मानधनाच्या अपेक्षेशिवाय निभावत असतात.
फक्त विद्याधर निमकरांनी स्टेट बँकेतली नोकरी सोडून देऊन पूर्णवेळ ‘चतुरंग’ उपक्रमांसाठी वाहून घेतले आहे. त्यांच्या मते, त्याला कारणीभूत प्राचार्य कौंडिण्य सर. कौंडिण्य सरांनी एकदा निमकरांना विचारलं की, ‘चतुरंग’मध्ये पूर्णवेळ कितीजण काम करतात? निमकरांनी उत्तर दिलं, ‘कुणीच नाही. सगळेजण संध्याकाळ ‘चतुरंग’ला देतात.’ त्यावर कौंडिण्य म्हणाले, ‘पूर्णवेळ संस्थेसाठी काम करणारे चार-दोन मिळाले तर आतापेक्षा कितीतरी पट कामाची वृद्धी करू शकाल.’ निमकरांना ते पटलं आणि त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. अगदी अलीकडेच नोकरीची चार र्वष शिल्लक असताना मेघना काळेही नोकरी सोडून पूर्णवेळ चतुरंगचं काम करताहेत.
फक्त साहित्यिक-कलावंतांशी गप्पा, गाणं यापुरतेच ‘चतुरंग’चे उपक्रम मर्यादित नाहीत. संस्थेने अनेक उपक्रमांद्वारे सामाजिक भान जपलेले आहे. जिथून मुळात आलो, त्या कोकणातल्या कोपऱ्यातल्या खेडय़ातल्या मुलांना मार्गदर्शन करणारे शैक्षणिक उपक्रमही ‘चतुरंग’तर्फे निवासी वर्गाच्या माध्यमातून राबवले जातात. विद्याधर निमकरांनी सांगितलं की, २८ वर्षांपूर्वी मुंबईतले तज्ज्ञ शिक्षक कोकणात नेऊन दहावीच्या हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी निवासी अभ्यासवर्ग सुरू केले. अभ्यासासोबत त्यांची जीवनशैलीही बदलण्याचा प्रयत्न केला. प्रबोधिनी आणि पाचगणी होस्टेलला प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या पालकांइतके सजग पालक कोकणात निर्माण झाले. कोकणातल्या ‘चतुरंग’च्या निवासी अभ्यासवर्गात आपल्या पाल्याला पाठवण्याविषयी पालकांची सतर्कता वाढली आणि त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
‘चतुरंग’चे कित्येक र्वष सुरू असलेले उपक्रम किती, कुठले आणि त्यांना कसा प्रतिसाद असतो?
सुमारे ९३० उपक्रमांद्वारे १४०० हून अधिक कार्यक्रम आजवर झालेले आहेत. १९७४ च्या अक्षय्य तृतीयेला (२४ एप्रिल) ‘चतुरंग’ची स्थापना झाली. सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय उपक्रम करणं, कोकणच्या खेडय़ांत शैक्षणिक विकासाचं काम करणं आणि सांस्कृतिक तोंडवळ्याचं सामाजिक काम करणं, हा मूळ उद्देश होता. अभिनेते गणेश सोळंकी मास्तर हे आमचे मूळ मार्गदर्शक. ‘मळलेल्या वाटेनं न जाता स्वत:ची नवीन पायवाट तयार करा. कार्यक्रमाचा तोंडवळा वेगळा असू द्या,’ हे त्यांनी सांगितलं. ते आम्हा ‘चतुरंगी’ तरुणांना सुधीर दामलेंच्या ‘नाटय़दर्पण रजनी’च्या उत्सवात पडद्यामागे काम करण्यासाठी घेऊन गेले. ती ‘रजनी’ म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळाच होती. आम्ही कार्यकर्ते उत्तरदायित्व, जबाबदारी, आयोजन हे शिकत गेलो; ज्याचा आम्हाला वैयक्तिक आयुष्यातही उपयोग झाला. साधं पेपरला स्टेपल कसं करावं, पेपरची घडी कशी घालावी, प्रेझेंटेशन नेटकं कसं असावं, हे आम्ही उद्योजक विनोद दोशींकडून शिकलो. पाकीट-पत्र उघडताक्षणी ‘अ‍ॅड्रेस टू हूम’ हे दिसायलाच हवं, इतक्या बारीकसारीक बाबी मोठय़ा माणसांनी शिकवल्या. आम्ही आरंभी खिशातले पैसे खर्चून कार्यक्रम आयोजनाचा उत्साह दाखवायचो. प्रफुल्ला डहाणूकरांनी प्रायोजकत्व कसं मिळवायचं, ते शिकवलं आणि पहिलंच प्रायोजकत्व शरदिनी डहाणूकरांकडून मिळवून दिलं. प्रफुल्लाताईंची आज फार आठवण येते. राजाभाऊ पुरुषोत्तम निमकर या आमच्या भावंडानं ‘चतुरंग’ हे नाव सहज सुचवलं आणि डहाणूकरांनी दिलेल्या दृष्टीनं आज आम्हाला प्रायोजकत्व देण्यासाठी स्पर्धा लागल्याचं भाग्य आम्ही अनुभवतो.
‘चतुरंग’ची बलस्थानं कोणती?
समाजातील मान्यवर कलावंत-साहित्यिकांची साथ, कार्यकर्त्यांचा उत्साही चमू आणि भरभरून प्रतिसाद देणारे रसिक ही आमची बलस्थानं आहेत. कलावंत ‘द्याल ते मानधन’ स्वीकारतात. यातून त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास दिसून येतो. चार पिढय़ांतले कलावंत संस्थेशी जोडले गेले आहेत. रोणू मुजुमदार, उपेंद्र भट कोकणातल्या कोपऱ्यातल्या ‘वहाळ’ गावात मानधन अट न घालता मैफल करतात तेव्हा आमचा उत्साह वाढतो.
एवढी कलावंतांची दाद तसेच कार्यकर्त्यांचा प्रतिसाद असूनही ऐनवेळी गोंधळ उडत नाही का?
कितीही शिस्तबद्ध नियोजन केलं तरी ऐन क्षणीच्या अडचणी असतातच. पण देवाच्या कृपेनं अद्याप कधीही गोंधळ झालेला नाही. कार्यक्रम रद्द झाला नाही. ऐन क्षणी पर्यायी मंडळींनी साथ दिली. नसीरुद्दीन शाहची मुलाखत होती. त्याचवेळी त्याच्या मुलाला अपघात झाला. ऐनवेळी नसीरऐवजी मंगेश पाडगावकरांनी व्यासपीठ बोलकं केलं. दाजी पणशीकरांऐवजी एकदा दाजी भाटवडेकर आले. तर रत्नाकर मतकरींच्या ऐन क्षणीच्या दुखण्यात गप्पा करण्यासाठी विद्याधर गोखले आले.
ठळक उपक्रम सांगत होतात..
पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या संकल्पनेतून साकारलेली गीतकार- संगीतकार- गायक अशी त्रिवेणी स्पर्धा. या त्रिवेणीची कॅसेटही आम्ही प्रकाशित केलीय. खेरीज रात्रसंध्या, रंगसंध्याचे ६० कार्यक्रम, एकांकिका (स्पर्धेतल्या) संग्रह, मानपत्रांचा (मान्यवरांच्या सत्कारातील) संग्रह, सुनीताबाई देशपांडेंनी सेन्सॉर केलेल्या ‘पुलं’च्या अप्रकाशित कोटय़ा अशी आमची दहा प्रकाशनंही आहेत. कर्नाळा ते कोकण अशा २३ वर्षांसहली आयोजित केल्या. या वर्षांसहलींना स्नेहल भाटकर ते अश्विनी, सुकन्या अशा तीन पिढय़ांतील गायक-अभिनेत्यांनी हजेरी लावलेली आहे. आजवर २७ र्वष सवाई एकांकिका स्पर्धा आयोजित करतो. सवाई म्हणजे राज्यातल्या कुठल्याही स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांची स्पर्धा. चार हजार रसिकांच्या स्वेच्छानिधीतून उभारलेला आणि आपापल्या क्षेत्रात आयुष्य झोकून नि:स्वार्थीपणे कार्य करणाऱ्या श्रेष्ठ व्यक्तीला मानपत्र आणि एक लक्ष रुपयांचा धनादेश देणारा जीवनगौरव पुरस्कार २३ वेळा दिलाय.
२३ पैकी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेली ठळक नावं..?
भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, ब. मो. पुरंदरे, बाबूजी, लता मंगेशकर, पांडुरंगशास्त्री आठवले, श्री. पु. भागवत, जयंत नारळीकर, साधना आमटे, सत्यदेव दुबे.. आदी. आणि ही निवडसुद्धा समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या दरवर्षी बदलत्या निवड समितीतर्फे केली जाते.
२१ र्वष रंगसंमेलन करत आहात. त्यात केलेले ठळक कार्यक्रम?
तीन सैन्यदल प्रमुखांशी संवाद, रेणू दांडेकर, निर्मला पुरंदरेंचं स्त्रीशक्तीकथन, गुलजार, आशा भोसले, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर अशांच्या मुलाखती, झाकीर हुसेन यांचे तबलावादन, हेमामालिनी यांचा नृत्याविष्कार, मन्ना डे ते माणिक वर्मा ते हृदयनाथ मंगेशकर यांच्या गायन मैफिली अशा अनेक कार्यक्रमांचा उल्लेख करता येईल. साहित्य, नाटय़, संगीत क्षेत्रातले सारे एकत्र जमून या संमेलनात रंग भरतात. डॉ. गिरीश ओक रंगसंमेलन तारीख पक्की झाली की त्या दिवशी शूटिंग वा नाटक घेत नाहीत. शांतादुर्गेचा पुजारी कुमार सरज्योतिषी ‘चतुरंग’च्या रंगसंमेलनासाठी घरच्या लग्नाची तारीखही बदलतो. राष्ट्रीय कामगिरी केलेल्या व्यक्तीबाबत समाजात आदरभाव जागता राहावा म्हणून गेली सात र्वष आम्ही ‘अभिमान-मूर्ती सन्मान’ देऊन गौरव करतो. आजवर कोकण रेल्वेचे ई. श्रीधरन, शेषन, कस्तुरीरंगन, रघुनाथ माशेलकर, नारायण मूर्ती यांना यात सन्मानित केलंय. संगीत क्षेत्रातील बुजुर्ग व्यक्तीला ७५ हजार रुपयांचा सन्मानवृत्ती देऊन त्यांचा बहुमान करतो आणि नवोदित कलावंताला प्रोत्साहन म्हणून २५,००० रुपयांची शिष्यवृत्तीही देतो.
समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर प्रस्थापितांची त्यांच्या चाहत्यांशी भेट घडवणं, गप्पा घडवणं याकरिता दरमहा विनामूल्य ३० र्वष ‘संवाद’ कार्यक्रम करतो. आधी ‘एक कलाकार- एक संध्याकाळ’ त्याचं नाव होतं, मग ‘एक सायंकाळ- एक रांगोळी’ असं नामकरण झालं. मग ‘निमित्तसंध्या’ आणि आता ‘मुक्तसंध्या’ नावाने गप्पाष्टकांचा कार्यक्रम चालूच आहे.
सुधीर फडके, श्री. पु. भागवत, चारुदत्त सरपोतदार, रवींद्र पिंगे अशांचे वाढदिवस सोहळेही साजरे केलेत. याखेरीज ‘सवाईतील गतरम्यता’ (नॉस्टॅल्जिया) नावाखाली निशिकांत कामतची ‘मंजुळा’, योगेश सोमणची ‘गप्पा’, किरण यज्ञोपवितची ‘मनोमीलन’, मृण्मयी देशपांडेची ‘पोपटी चौकट’, अद्वैत दादरकरची ‘हाफ पँट’ या स्पर्धात गाजलेल्या एकांकिकाही गतवर्षी सादर केल्या गेल्या.
कोकणातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले ‘चतुरंग’चे उपक्रम कोणते?
‘चतुरंग’ कोकण अभ्यासवर्गानी १९८६ पासून प्रत्यक्षात आकार घेतला आणि सुरुवातीला शृंगारतळी, मार्गताम्हाणे, गुहागर, ओमळी, आबलोली, पालशेत, दाभोळ, वहाळ, देवघर अशी चतुरंग अभ्यासवर्ग केंद्रे सुरू होऊन दीड-दोन हजार विद्यार्थ्यांना या विनामूल्य मार्गदर्शनाचा लाभ होऊ लागला. पुढे गोडबोले सरांच्या प्रेरणेने निवडक हुशार मुलांसाठी निवासी अभ्यासवर्ग आकाराला आले. मधल्या टप्प्यावर नापास विद्यार्थ्यांचं काय, अशी झणझणीत विचारणा कुसुमाग्रजांनी केली आणि खास नापास विद्यार्थ्यांसाठी ‘निर्धार वर्ग’ सुरू केले. कोकणातल्या सर्वोत्तम विद्यार्थ्यांला गोडबोले पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. एमएच-सीईटी मार्गदर्शन वर्गही आम्ही घेतो. कोकणातल्या अभ्यासवर्गात मार्गदर्शनासाठी १३५ शिक्षक-शिक्षिका सहभागी होतात. अलीकडेच कोकणात नवा आयाम उपलब्ध करून देणारे बँकिंग परीक्षा मार्गदर्शन वर्ग गतवर्षीच सुरू केले आहेत. याशिवाय होलिकोत्सव, रामलीला उत्सव, दूधवाटप योजना, सामाजिक वनीकरण, गरजू मुलांना कपडे वाटप असेही उपक्रम ‘चतुरंग’ करत असते. ‘दिवाळी पहाट’ सुरू करण्यात (१९८६) ‘चतुरंग’चा आद्य वाटा. पहिल्या वर्षी पहाटे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे बाळ कोल्हटकरांचं नाटक केलं होतं.
निमकर मूळ नाटकप्रेमी. बाळ कोल्हटकरांचे सहकारी. निमकरांनी कोकण-मुंबई-पुणे करत आतापर्यंत ‘चतुरंग’च्या माध्यमातून ४० वर्षांत १७० ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहेत. चाळिशीनिमित्त परवा अक्षय्य तृतीयेला शिवाजी पार्कच्या गणेश उद्यानात सारे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील काही मान्यवर मंडळी जमली आणि डामडौल, गाजावाजा न करता पुन्हा नवनवे संकल्प साकारण्यासाठी ‘चतुरंग’ सज्ज झाली आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!