विद्येमुळे मती आली।
मतीमुळे गती आली।
गतीमुळे सत्ता आली।
सत्तेमुळे वित्त आले।
वित्तामुळे सारेच आले।
इतके सारे एका राजविद्येने केले।।
(‘राजकारणाचे अखंड’, भाग पहिला, समता प्रकाशन, येवला.)
महात्मा जोतीबा फुले हे आमुचे कुलदैवत.
शाहू महाराज आणि  डॉ. आंबेडकर यांचे टाक तर आमुच्या देव्हाऱ्यात.
सक्काळ सक्काळी उठावे, दोन्ही हात डोळ्यांसमोर नमाज पढतो तसे धरावेत आणि
भुजाग्रे वसती जोतीबा
भुजमध्ये शाहू छत्रपती
भुजमूले तू भीमराया
प्रभाते भुजादर्शनम्
हा समतेचा जयमंत्र म्हणावा. हे आमुचे गेल्या दो दशकांचे व्रत. अगदी असिधारा. आज आमुच्या या यित्कचित महाआयुष्याचा ऐसा एक क्षण जात नाही की आमुच्या मुखी या समतेच्या, समाजवादाच्या, लोकशाहीच्या त्रिमूर्तीचे परमपावन नाम येत नाही. मंडली, सांगितले तर अचंब्यास पावाल, परंतु अगदी ‘बोलावा जोतीबा, पाहावा जोतीबा’ असे काहीच्या बाहीसे आमुचे जाहले आहे.
परवाची गोष्ट.
मतदारसंघाचा आढावा घेऊनी आलो. यावेळी कोठे जोर लावावा, कोणास बळ द्यावे, कोणाच्या नाडय़ा आवळाव्यात, मतदानाच्या आदल्या रात्री कोठे खोकी वा पेटय़ा धाडावीत ऐशी बीज गणिते करूनी दमलो होतो. म्हणूनी कार्यालयातून उठोन बंगल्यात आलो. आत हाक मारिली. आणि काय म्हणालो, माहिताय?
‘या फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आम्हांस एक कप अद्रक मारके चाय मिळेल का?’
बोला आता!
यास म्हणतात समतावादी निष्ठा!
आपुल्या दोन्ही भुजांमध्ये या निष्ठेचे बळ असले ना मग आपणास कशाचेही, अगदी कळीकाळाचेही भय नाही! तसेही पाहू जाल तर हा कळी-काळ आम्ही रोज सकाळी सुस्नात जाहल्यावर डाव्या मनगटी बांधतो! (सांगून ठेवतो, तिकिटात घोळ कराल तर हा हा म्हणता तो काढून फेकून देवू!.. शिवबंधन खमिसाच्या चोरखिशात तयारच ठेवलेय!)
आणि अखेर ही तिकिटे, या उमेदवाऱ्या तरी कशासाठी हव्या असतात?
आमुचे जुनेपुराणे मित्र नारायणराव राणे म्हणाले ते धादांत सत्य आहे-राजकारण हा काही आपुला वेवसाय नाही. आपुले धंदे वेगळेच!
तेव्हा मनात आणले तर या हवेलीत बसून उर्वरित अवघे आयुष्य ‘जोतीबा जोतीबा’ म्हणत आरामात काढू.. गळ्याभोवती मफलर गुंडाळून! ज्योक नाही हा! तशी समग्र व्यवस्था आपण केलेली आहे.
आता तुम्हांस बाहेरून दिसणार नाही आमुचे खेडय़ामधले घर कौलारू! आणि का दाखवावे? जोतीबांचा विचार काय सांगतो, तर संपत्तीचे प्रदर्शन करू नये. म्हणूनी या घराभोवती भक्कम तटबंदी केली आहे आपण. किंतु आत सगळी जो जे वांच्छिल तो ते लाहो ऐशी चोख व्यवस्था आहे. होम थिएटर आणि देवघर, तरणतलाव आणि तुळशी वृंदावन.. जिकडे तिकडे तंतोतंत इटालियन मार्बल! (आता आमुच्या राष्ट्रवादास इटली काही एवढी मानवत नाही. परंतु अखेरीस समतावादी विचार म्हटला, की मनाचा इतुका पुरोगामीपणा दाखवावाच लागतो!)
आता तुम्ही म्हणाल, की राजास जी महाली सौख्ये कधी न मिळाली, ती सर्व या गरीबखान्यात प्राप्त होत आहेत, तर मग हे राजकारणाचे कुटाणे कशास बरे करायचे या वयात?
तर करावे लागतात भावांनो, करावे लागतात!
एवढी वष्रे जी राजविद्या कमावली, ती अशी वृथा कुजवून तर टाकता येत नाही ना!
या राजविद्य्ोच्या योगे आज आमुचा गरीबखाना उभा राहिला.
उद्या प-पावण्यांची, इष्टमित्रमंडळींची घरे उभी राहतील.
परवा सगळ्या महाराष्ट्रात अशी सदने उभी राहतील..
सारे कसे सुजलाम् सुफलाम् होईल.. घराघरांत एसीचा मलयज शितलाम् असेल..
शिवाय त्या प्रत्येक सदनासमोर एक हौद असेल..
तो राज्यातील गोरगरिबांना खुला केला जाईल..
अशाने सगळीकडे समता येईल!
समतेच्या या समाजवादी स्वप्नात मंडळी (आणि समस्त मंडलवाली मंडली!), तुमचे स्वागत असो!!

(‘लोकसत्ता’मध्ये परवा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा नवा पत्ता सचित्र प्रसिद्ध झाला. त्यावर आमच्या पत्त्यावर आलेला हा स्वगतपर खुलासा. तो कुठून आला याचा शोध घेत आहोत. लागताच कळवू. जय समता!)