आमचा अमेरिकेतील शेजारी त्र्यंबक धांदरफळे ऊर्फ टॉम डॅडफॉल्स मला स्थानिक विभागातल्या प्राथमिक शाळेत घेऊन गेला. निमित्त होतं शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं. अमेरिकन चिल्लीपिल्ली हा सोहळा कसा साजरा करतात हे पाहण्याची मला खूप उत्सुकता होती.
पहिला कार्यक्रम सुरू झाल्याक्षणी मी खुर्चीतून पडता पडता सावरलो. चिकनी चमेली? अमेरिकेतल्या शाळेत सुरुवात थेट हिंदी आयटेम डान्सने? मी स्वत:च्याच डोळ्यांनी पाहिलं म्हणून बरं, नाहीतर माझा कालत्रयी विश्वास बसला नसता. भुवया उंचावून मी त्र्यंबककडे सहेतुक पाहिलं. त्यानं खांदे उडवले. त्यानंतर शीला की जवानी, मुन्नी बदनाम, चोलीके पीछे, छैय्या छैय्या, बीडी जलायले आणि कजरारे या गाण्यांवर इयत्ता पहिली ते सहावीतल्या पोरापोरींची समूहनृत्यं संपन्न झाली. तशी मध्ये मध्ये तोंडी लावण्यापुरती मायकेल जॅक्सन, मॅडोना, लेडी गागा वगरे अमेरिकन पॉपकारांच्या धागडिधग्याची नक्कल झाली आणि एका मुलानं पियानो वाजवून दाखवला. तरीही एकूण दबदबा बॉलीवूडचाच होता हे निर्वविाद.
मध्यंतरात कोकसोबत केक चघळताना मी म्हटलं, ‘‘अंधेरीतल्या शाळेत आल्यासारखं वाटतंय.’’
टॉम म्हणाला, ‘‘बे एरियामधल्या या विभागात चाळीस टक्के लोक भारतीय आहेत.’’
‘‘मग किमान साठ टक्के कार्यक्रम तरी अमेरिकन असायला हवेत ना?’’
‘‘आणखी चाळीस टक्के रहिवासी चिनी वंशाचे आहेत. उरलेले वीस टक्के फॉरेनर.’’
‘‘आता आणखी कुठले फॉरेनर?’’
‘‘ब्लॅक आणि व्हाइट अमेरिकन नागरिक!’’
‘‘मग चिनी कार्यक्रम मध्यंतरानंतर होणार आहेत का?’’
‘‘चिनी कार्यक्रम नसतात. इथं दिसताहेत का चिनी माणसं?’’
मी नजर फिरवली. तुरळक अभारतीय मंडळी दिसली.
टॉमनं खुलासा केला, ‘‘शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यत्वेकरून भारतीय पालकच रस घेतात. बहुतेक चिनी पालक तिथं ढुंकूनही बघत नाहीत. पोटच्या पोरांसाठी चिन्यांचा केवळ एकच एक कार्यक्रम असतो. तो म्हणजे- अभ्यास.’’
माझं कुतूहल चाळवलं म्हणून टॉमनं माझी जवळपास राहणाऱ्या शिक्षिकांशी ओळख करून दिली.
एक शिक्षिका म्हणाली, ‘‘अभ्यास एके अभ्यास हा एक-कलमी कार्यक्रम राबवण्यात सिंहाचा वाटा असतो तो चिनी मातांचा. मुलांना स्वत:ची मतं, आवडीनिवडी, महत्त्वाकांक्षा असू शकतात, हे त्या मान्यच करत नाहीत. अमेरिकन मुलांना भरमसाट स्वातंत्र्य दिलं जातं. अमेरिकेतल्या चिनी मुलांना ते अजिबात नसतं. मुलांच्या शालेय जीवनातले सर्व निर्णय चिनी आया स्वत:च घेतात.’’
मी विचारलं, ‘‘उदाहरणार्थ?’’
‘‘आम्ही शाळेच्या कार्यक्रमात एखादं नाटुकलं बसवलं आणि वर्गातल्या चिनी मुलामुलींना त्यात भूमिका दिल्या तर त्यांच्या आया खवळतात. नाटकात काम करायला परस्पर होकार दिला म्हणून घरी मुलांना शिक्षा करतात. मग आमच्याकडे मिनतवाऱ्या करून त्या भूमिका रद्द करून घेतात.’’
‘‘कारण काय?’’    
‘‘वेळ फुकट जातो म्हणे. भारतीय आई-बाप मुलांच्या सर्वागीण विकासावर भर देतात, पण चिनी मुलांनी फक्त अभ्यास करायचा असतो. तोही फक्त स्टेमचाच.’’
‘‘स्टेम? हा कोणता नवीन विषय?’’
‘‘सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअिरग आणि मॅथेमॅटिक्स याचा शॉर्टफॉर्म. पोराचं अमेरिकन आयुष्य देदीप्यमान होईल ते फक्त या विषयांमध्ये अतुलनीय प्रावीण्य मिळवल्यामुळेच, अशी चिनी श्रद्धा असते. गणितात तर त्यांच्या मुलांनी दोन इयत्ता पुढे राहायचं असतं.’’  
टॉम म्हणाला, ‘‘प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात आपण अग्रस्थानीच असायला पाहिजे, ही चिनी मनोवृत्ती आहे. चीन जगातलं सर्वात मोठं धरण उभारतो. लांबलचक हाय-स्पीड रेल्वे लाइन बांधतो. ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदकं मिळवण्यासाठी जंग जंग पछाडतो. हीच जिद्द चिनी मातांच्या अंगात भिनलेली असते. आपल्या कोपऱ्यावरच्या बंगल्यात एक चिनी कुटुंब राहातं. आई-वडील काम्प्युटर इंजिनीअर आहेत. त्यांची मुलगी सोळा वर्षांची. मुलगा चौदा वर्षांचा. दोघंही रात्री दीड वाजेपर्यंत अभ्यास करतात. सकाळी सात वाजता उठतात. साडेआठ ते साडेतीन शाळा. त्यानंतर कोचिंग क्लास.’’
‘‘अमेरिकेत असतात?’’
‘‘इथं चिनी लोकांनीच सुरू केलेत. ..तर सात वाजेपर्यंत क्लास. त्यानंतर घरी प्रत्येक विषयाची उजळणी आणि चाचणी परीक्षा. आई मध्यरात्री पोरांच्या उत्तरपत्रिका मॉडेल उत्तरांशी तपासून बघते.’’
शिक्षिका म्हणाली, ‘‘मुलांनी सतत ‘ए’ ग्रेडच मिळवली पाहिजे हा चिनी मातांचा अट्टहास असतो. ‘ए मायनस’ ग्रेड मिळाली तर नापास झाल्यासारखं समजतात. मग परत ‘ए’ ग्रेड मिळेपर्यंत पोराला अधिक उजळणी करावी लागते. त्या पोरांची खरंच दया येते.’’
‘‘बिच्चारी!’’
‘‘म्हणूनच चिनी माता अमेरिकेत ‘टायगर मॉम’ या टोपण नावानं ओळखली जाते. ती अजिबात दयामाया दाखवत नाही. पोरांचे फाजील लाड करत नाही. टीव्ही, काम्प्युटर गेम्स आणि सेलफोनवर बंदी घालते. इतर मुलं एकमेकांच्या घरी वीकएंडला राहायला जातात. चिनी वाघीण अशा फालतू चाळ्यांना परवानगी देत नाही.’’    
‘‘कहरच आहे.’’
‘‘वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा तुझा प्रतिस्पर्धी आहे हे चिनी मुलामुलींच्या मनावर बिंबवलेलं असतं. ही मुलं एकमेकांसोबत अभ्यास जरूर करतात, पण त्यामागचा सुप्त हेतू दुसऱ्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त काय येतं, हे शोधण्याचा असतो. टायगर मॉमला जर एखादं नवीन उपयुक्त पुस्तक मिळालं तर ती ते कधीही इतर आयांना दाखवत नाही. ही आत्मकेंद्री वृत्ती मग मुलांमध्येही उतरते. ते उत्कृष्ट एकांडे शिलेदार बनतात, पण त्यांना टीमवर्क जमत नाही.’’
माझ्या नात्यातल्या एका कुलदीपकानं चिनी मुलीशी लग्न केलं आहे. मी मुद्दाम त्याला भेटायला गेलो. चिनी सूनबाई म्हणाली, ‘‘चिनी आया मुलांशी निदर्यपणे वागतात असं अमेरिकन लोकांना वाटतं, पण आपल्या मुलानं त्याच्या अंगभूत क्षमतेइतकं यश मिळवलंच पाहिजे, अशी आमची ठाम धारणा असते. त्याकरता लागणारी मेहेनत शाळकरी मुलं स्वत:हून कधीच घेणार नाहीत. स्वातंत्र्य दिलं तर ती उनाडक्याच करणार. त्यामुळे त्यांनी यशाचं शिखर गाठण्यासाठी त्यांच्या आईला कठोर व्हावंच लागतं. नाहीतर तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं नाही, असं आम्ही मानतो. आमच्या मते, मूल म्हणजे एक मातीचा नव्हे तर तांब्याचा गोळा असतो आणि त्याच्यावर वर्षांनुवष्रे घणाचे घाव घालत राहून मुलाच्या मातेनं एक लखलखीत पात्र घडवायचं असतं.’’
मी आ वासून ऐकतच राहिलो. सूनबाईनं षटकार ठोकला, ‘‘म्हणूनच विज्ञान आणि गणितातल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये वरच्या क्रमांकांवर चिनी मुलंमुली सर्वात अधिक संख्येत येतात. शास्त्रीय संशोधनातही चिनी तरुण जोरदार मुसंडी मारताहेत. अर्निबध स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या अमेरिकन पोरांचं आता काही खरं नाही.’’