समाजात वावरताना लोक नेहमीच जुळणारे धागे शोधत असतात. घराणे, जन्मगाव, शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, आवडता खेळ, छंद आदी गोष्टींत साम्य पाहून सामाजिक नातीगोती विणली जातात. गेली lok01जवळपास ५० वर्षे इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले भारतीय आजही दुसऱ्याचे संपूर्ण नाव (आडनावाच्या उच्चाराकडे विशेष लक्ष देऊन!) आणि भारतातील मूळ गाव याचा उल्लेख आवर्जून करतात.
  समाजाची संरचना भारताप्रमाणे इतरही अनेक देशांत आढळते. इटली, फ्रान्स यांसारख्या देशात ‘बुर्ज्वा’ समाजाने तेथील राजेशाहीला हाकलून लावले आणि नव्या श्रीमंत आणि मान्यवर अशा मध्यमवर्गाचा विकास केला. कन्फ्युशियननंतर कम्युनिस्ट राजवटीत नव्या मध्यमवर्गाचा विकास चीनमध्ये झपाटय़ाने झाला. पण किंबहुना, भारताप्रमाणे जुनी आणि आजही बऱ्याच प्रमाणात आढळणारी समाजाची रचना म्हणजे इंग्लंडमधील वर्ग व्यवस्था! औद्योगिक प्रगतीच्या आधी इंग्लडची समाजरचना राजेशाही, अमीर-उमराव आणि इतर सामान्य लोक यांतच विशेष करून विभागली होती. एकाच धर्माचे आणि रंगाचे लोक केवळ भिन्न समाजरचनेत जन्माला आल्यामुळे वेगळे होते. अर्थातच गर्भश्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या व्यक्ती त्यांच्या पेहरावावरून आणि राहणीमानावरून सहजच ओळखता येत असत. योग्य घरात जन्म झाल्यामुळे उच्च शिक्षण आणि नोकरी सहजगत्या उपलब्ध होत असे. आजही इटन, सेंट अँण्ड्रय़ुज ही राजघराण्यातील आणि अतिश्रीमंत लोकांच्या शिक्षणाची केंद्रे आहेत.
नावात काय आहे, असा प्रश्न शेक्सपिअरला पडला असला, तरीही बरेचदा नावावरून एखाद्या व्यक्तीच्या घराण्याची कल्पना येऊ शकते. एडमंड, व्ॉलरी, डार्सी, अरनेस्ट ही काही अतिश्रीमंत लोकांची नावे आहेत. बरेचदा इतर श्रीमंत घराण्याशी आपले नाते आहे हे सांगण्यासाठी मूळ नावासोबत दुसरे नाव जोडले जाते.lr10 उदाहणार्थ, गाय सॅविल (Guy Savill). पूर्वी योग्य नाव असणे हे समाजात वर जाण्यासाठी फार महत्त्वाचे होते म्हणूनच ब्रिटनचा जगप्रसिद्ध योद्धा लॉर्ड नेल्सन, ज्याने ट्रफाल्गरचे युद्ध लढताना आपले बलिदान दिले, त्याने त्याचे मूळ नाव हॉरॅस (Horace) पासून हॉरॅशिओ (Horatio) असे बदलले. नेल्सनचा जन्म अमीर-उमरावांच्या घराण्यात झाला नव्हता, पण लष्कर आणि सरकारी उच्च पदांवर अ‍ॅरिस्टोक्रॅटिक घराण्याचा हक्क होता. त्यामुळे उच्च पदावर आणि उच्च समाजात वावरण्यासाठी बुद्धीबरोबरच ‘योग्य’ घराण्याशी संबंधित गोष्टीसुद्धा अंगीकारणे महत्त्वाचे होते.
थॉमस क्रॉमवेल, लॉर्ड रॉथचाइल्ड यांसारख्या अनेकांनी अत्युच्च समाजात जन्म न घेताही आयुष्यात बरीच कीर्ती आणि पैसा मिळवला. परंतु, या उच्च समाजाने त्यांना पूर्णपणे कधीच स्वीकारले नाही, किंबहुना आजही स्वमेहनतीने कीर्ती आणि धनसंपदा करणाऱ्या लोकांना उच्चभ्रू समाज फार आपुलकीने पाहात नाही. उदाहरणार्थ, जेव्हा प्रिन्स विलियमने केट मिडलटनशी लग्न करण्याचे जाहीर केले, तेव्हा तिच्या घराण्याचा खाणकामाशी संबंध होता याचीच जास्त चर्चा चालू होती.
जेव्हा कॅरॉल मिडलटन- केटची आई इंग्लडच्या राणीला प्रथम भेटायला गेली, तेव्हा तिने आपल्याला भेटून फार आनंद झाला- ‘Glad to meet you’ असे म्हटले. हे ‘राजनीतीला’ अनुसरून नव्हते, तिने ‘आपण कसे आहात?’ (How do you do) असे म्हणायला हवे होते, अशी टिप्पणी करण्यात आली आणि पैसा असला तरी ‘क्लास’ नाही अशी टीका करण्यात आली.
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या लकबीनुसार त्याचा क्लास ओळखता येतो. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्ग मोठय़ा प्रमाणात निर्माण झाला. त्याचे प्रत्यंतर मध्यमवर्गात झाले. या मध्यमवर्गाचे उच्च मध्यमवर्गीय, मध्यम-मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ-मध्यमवर्गीय असे वर्गीकरण झाले. पण उच्चभ्रू वर्गाने या मध्यमवर्गीय लोकांना फारसे आपलेसे केलेले नाही.
उच्चभ्रू लोक लॅवेटोरी (Lovatory) म्हणतात; तर वर्किंग (Working) क्लास लोक ‘टॉयलेट’ (Toilet) म्हणतात. ‘माय लेडी वाइफ’ अशी ओळख उच्चभ्रू लोक त्यांच्या पत्नीची करतात, तर इतर ‘मिसेस’ असे संबोधतात. सॅम हा माझा टेनिस पार्टनर विण्डो क्लिनिंगचे काम करतो. तो दुपारच्या जेवणालासुद्धा ‘डीनर’ असेच म्हणतो. बरेचदा मला तो काय बोलतो ते कळतच नाही. ऑक्सफर्ड-केंब्रिज या ठिकाणी बोलली जाणारी इंग्लिश भाषा आणि कामकरी वर्गात बोलली जाणारी भाषा यात बराच फरक आहे. कामकरी वर्गात जन्माला येऊन जगप्रसिद्धी मिळवणारा डेव्हिड बेकम हा अतुलनीय फुटबॉलपटू. त्याच्या पूर्वीच्या मुलाखती पाहा. त्याच्या बोलण्यावर इस्ट लंडनच्या कामकरी वर्गाची छाप प्रकर्षांने जाणवते. जसजशी त्याची प्रसिद्धी वाढली, त्याचा उच्चभ्रू समाजाशी संपर्क वाढला, तसतशी त्याने त्याची बोलीभाषा प्रगत केली आहे.
इंग्लंडच्या या समाजरचनेचा येथील राजकीय पटलावरही फार परिणाम झालेला आहे. इकडची कन्झर्र्वेटिव्ह (Conservative) पार्टी उच्चभ्रू लोकांची आहे. या पक्षातील बहुतांशी नेते ऑक्सफर्ड, केंब्रिज या प्रतिथयश महाविद्यालयांमध्ये शिकले आहेत. तर लेबर (Labour) पार्टी ही मुख्यत्वे मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करते. अर्थात याला काही अपवाद आहेत. आणि लॉर्ड सेन्सबरीसारखे उच्चभ्रू लेबर पार्टीचे समर्थक आहेत. किंबहुना सध्याचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन, ज्यांचे पूर्वज किंग विलियम पाचवे होते, ते मध्यमवर्गीय असल्याचा दावा करतात. अर्थातच हा आगामी निवडणुकांसाठीचा प्रचार आहे!
इंग्लडमधील ही ‘क्लासिकल’ समजरचना लंडनमध्ये फारशी अनुभवायला मिळत नाही. पण गेली जवळपास दोन वर्षे बाथमध्ये राहताना इंग्लंडच्या या समाजरचनेचा अनुभव फार जवळून आला. बाथ हे दक्षिण इंग्लंडमधील एक उच्चभ्रू शहर. कामाच्या ठिकाणीसुद्धा इंग्रजी लोक घराणे, शाळा, महाविद्यालय यावरून आपले सहकारी निवडताना दिसतात. इंग्लंडच्या समाजरचनेला एक भौगोलिक कंगोराही आहे. जसे लंडनच्या दक्षिणेला असलेले लोक उत्तर इंग्लंडपेक्षा स्वत:ला उच्च समजतात!  पूर्वी उत्तर इंग्लंडची अर्थव्यवस्था खाणकाम, कारखाने यांवर अवलंबून होती, तर दक्षिण इंग्लंड सरकारी कामे, लष्कर, शैक्षणिक संस्था यांचे उत्तरदायित्व सांभाळीत होते. म्हणूनच ऑक्सफर्ड, केंम्ब्रिज ही इंग्लंडच्या दक्षिण भागालगत आहेत!
सध्या इंग्लंडमध्ये, प्रामुख्याने लंडनमध्ये नवा वर्ग निर्माण झाला आहे तो म्हणजे, इमिग्रेशन क्लास! विविध देश, धर्म आणि वंश यांच्याशी आपले नाते सांगणारे लोक इंग्लंडला आपले घर मानून राहत आहेत. या स्थलांतरित लोकांचे स्वत:चे गट आहेत. काही व्यवसायांवर त्यांनी कब्जा मिळवला आहे. उदाहरणार्थ, लंडनमधील बरीच कॉर्नर शॉप्स (म्हणजे आपल्याकडील किराणामालाची दुकाने) जी पूर्वी भारतीयांच्या हाती होती. ती सध्या तर्कीश लोकांच्या हाती जात आहेत. बरीचशी भारतीय रेस्टॉरंट बांगलादेशी लोक चालवतात. मात्र, या परप्रांतीय लोकांच्या लोंढय़ाने इंग्लंडची मूळ समाजरचना फार बदलणार नाही. ब्रिटनच्या राजकुमाराने राजघराण्याशी संबंध नसलेल्या मुलींशी लग्न करणे हा केवळ एक अपवाद आहे. त्याच्या पुनरावृत्तीचा वेग जुन्या परंपरा जपणाऱ्या इंग्लंडमध्ये बेताचाच राहील!