प्रफुल्ला डहाणूकर. चैतन्यपूर्ण, प्रसन्न, उत्साही, आनंदित असणारं एक रसिक व्यक्तिमत्त्व. जवळजवळ पन्नास वर्षे सातत्याने कलानिर्मिती करणाऱ्या, संगीत, साहित्य, नाटक, नृत्य आदी क्षेत्रांकडेही संवेदनक्षमतेने पाहणाऱ्या, आस्वाद घेणाऱ्या, त्याचबरोबर त्या क्षेत्रातील तरुण उभरत्या कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या, मदत करणाऱ्या चित्रकार म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय आधुनिक कलेच्या व चित्रकारांच्या जडणघडणीच्या त्या साक्षीदार होत्या. डहाणूकर या कला-सांस्कृतिक क्षेत्रातील घटनांचा एक चालताबोलता कोशच होता.. मात्र कलाकार म्हणून त्यांनी स्वत:ला स्वकोशात कधीच कोंडून ठेवले नाही. एकाच वेळी कलावंताच्या ठिकाणी असलेली अंतर्मुखता व त्याचबरोबर समाजाशी असलेले नाते आणि जबाबदारी या दोन्हींचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. अशा गुणी चित्रकर्तीचे निधन चित्रकला संगीतच नव्हे, इतर कलाक्षेत्रांतील रसिकांनाही निश्चितच हळहळ वाटणारी गोष्ट होती.
डहाणूकर यांचे कार्य पुढे चालावे या हेतूने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डहाणूकर यांचे पती दिलीप आणि त्यांचे इतर कुटुंबीय यांनी ‘प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशन’ हा पब्लिक चॅरिटी ट्रस्ट स्थापन केला आहे. या आर्ट फाऊंडेशन (पी.डी.ए.एफ.) करता निधी उभारण्यासाठी जहांगीर आर्ट गॅलरीत २२ जुलैपासून एक मोठे प्रदर्शन सुरू होत आहे. जहांगीरच्या ऑडिटोरियम आर्ट गॅलरीत डहाणूकर यांच्या सिंहावलोकनी प्रदर्शनाचे आयोजन केले असून, आजवर त्यांनी केलेल्या विविध टप्प्यांवरची कामे यात प्रदर्शित करण्यात येणार आहेत; तर दुसऱ्या दालनात भारतातील अनेक कलासंग्राहकांच्या संग्रहातील नामांकित चित्रकारांच्या कलाकृती व काही आमंत्रित कलाकारांच्या चित्रकृती पाहावयास मिळतील. जहांगीर कला दालनातर्फेच हे प्रदर्शन होत आहे.
डहाणूकर यांची चित्रसंपदा यानिमित्ताने पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहे. गेल्या ५० वर्षांत प्रत्येक टप्प्यावरील बदलत गेलेली त्यांची शैली, विषय अशा एकंदर चित्रप्रवासाचे दर्शनच यातून होईल. शिवाय वेळोवेळी बदलणारी मानसिकता, आसपासच्या चित्रकारांचे प्रभाव, शैक्षणिक काळातील संस्कार, ते पुसून खऱ्या अर्थाने निर्मितीच्या, अभिव्यक्तीच्या दालनात प्रवेश करताना येणाऱ्या असंख्य तांत्रिक, मानसिक अडचणी, काही विशिष्ट परिणाम साधणाऱ्या युक्त्यांची अनिवार्यता, त्यातून बाहेर येण्याची धडपड इ. चित्रकार घडण्याच्या व चित्रकाराला शेवटपर्यंत शोध असणाऱ्या ‘स्व’चा हा प्रवास. कुठे तरी स्वत:च्या मर्यादांचे भान जाणवते व ‘मी इतकंच म्हणू शकतो’ हे मानून तो स्थिरावतो. डहाणूकर यांच्याबद्दल असं म्हणता येईल की, त्यांचा प्रवास मूर्ताकडून अमूर्ताकडे झाला व त्या तेथे स्थिरावल्या. असं म्हणणं वावगं होणार नाही की त्यांना अमूर्त चित्रांत स्वत:चा सूर सापडला.
जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९५५ साली सुवर्णपदक पटकावून त्यांनी कला क्षेत्रात प्रवेश केला. लगेचच दुसऱ्या वर्षी १९५६ साली जहांगीरमध्ये त्यांचे पहिले प्रदर्शन झाले. त्यानंतर आजवर जवळजवळ ५० च्या वर प्रदर्शने निश्चितच झाली असतील, शिवाय समूह प्रदर्शनातील सहभाग वेगळा. १९५७ साली तिने पॅरिसला जाऊन ‘अ‍ॅटेलिए १७’ (अ३’्रीं१ 17) मध्ये मुद्राचित्र या विषयाचे विशेष शिक्षण घेतले. १९५८ झाली भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूट (आता आकाशगंगा ही इमारत त्या जागी आहे.) मध्ये त्यांना स्टुडिओ मिळाला. भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूट एका अर्थाने सांस्कृतिक केंद्रच होते. नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य, चित्रकला या क्षेत्रांतील अनेक कलाकारांचे स्टुडिओ तेथे होते. नाटकाच्या तालमी, संगीताचा रियाझ, नृत्यांचा सराव अशा अनेक गोष्टी तेथे होत. एम. एफ. हुसेन, माधव सातवळेकर, बाबूराव सडवेलकर यांचे स्टुडिओही तेथे होते. भारतातले प्रख्यात अमूर्त चित्रकार वासुदेव गायतोंडे हे डहाणूकरांच्या स्टुडिओत सकाळी काम करायचे. अतिशय मोकळे वातावरण, स्टुडिओचे दार नेहमी सर्वाना उघडे, या वातावरणात डहाणूकरांचे कलासक्त रसिक व्यक्तिमत्त्व फुलत गेले व त्यांची कला दिवसेंदिवस विकसित होत गेली.
भारतीय आधुनिक चित्रकलेच्या दृष्टीने ६०-७०चे दशक हे महत्त्वाचे ठरते. जे.जे.मधील ब्रिटिशप्रणीत अकादमिक शिक्षण धुडकावून लावून आधुनिक कलेतील नवनव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. एकीकडे इम्प्रेशनिस्ट, एक्स्प्रेशनिस्टचा प्रभाव काही कलाकारांवर होता, तर काही भारतीय चित्रकार भारतीय लघुचित्रे, लोककला शैली, भारतीय तांत्रिक शैली यातून भारतीय आधुनिक चित्रशैली साकारण्याचा प्रयत्न करत होते. याचबरोबर काही चित्रकार अमूर्त शैलीकडे वळले होते. डहाणूकरांच्या स्वतंत्र वृत्तीला आविष्काराच्या दृष्टीने व चित्रकार घडण्याच्या दृष्टीने हे पोषकच ठरले. पळशीकर, गायतोंडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभलेले होते. सुरुवातीच्या काळातील चित्रांवर हा प्रभाव दिसतोच. विशेषत: ‘राग-रागिणी’वर जी चित्रमालिका त्यांनी केली त्यावर. ‘राग-रागिणी’ हा विषय भारतीय लघुचित्रातूनही आला आहे. पण डहाणूकरांनी रागाच्या, मूडच्या अंगाने रंग, पोत व भारतीय लघुचित्रातील रेखांकित आकृतीतून हा आविष्कार केला आहे. एकंदरच डहाणूकरांची चित्रे पाहताना भावाभिव्यक्तीकडे, मूडकडे, वातावरणावर विशेष भर दिल्यासारखा वाटतो. म्हणूनच रेखांकनापेक्षा रंगावर, रंगलेपनावर त्यांचा भर अधिक दिसतो.
डहाणूकरांनी अनेक चित्रप्रकार हाताळले आहेत, ‘स्थिर चित्रे,’ ‘निसर्ग चित्रे,’ ‘मुद्राचित्रे,’ ‘भित्तीचित्रे (म्युरल्स) व जान्र- दैनंदिन जीवनातील घटना- प्रसंग. ‘मदर अ‍ॅन्ड चाइल्ड’ आणि ‘बॉम्बेवाला’ या दोन मालिकाही त्यांनी केल्या. आई आणि मूल हा सनातन विषय  डहाणूकरांनी अतिशय हळूवारपणे, स्त्रीसुलभ ममत्वाने हाताळलेला दिसतो. या मालिकेतील कृष्णधवल रंगातील, गोव्याच्या निसर्गाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या आईच्या मांडीवर हातात फुले घेऊन बसलेली छोटी प्रफुल्ला, हे चित्र लक्ष वेधून घेते. कृष्णधवल रंगामुळे भूतकालीन आठवणींचा जागर करणारे, जुन्या घरातील भिंतीवर लावलेल्या तसबिरी आठवाव्या ,असे एक वेगळेच भावनिक नात्याचे परिमाण याला लाभलेले आहे. ‘बॉम्बेवाला’ या मालिकेत चौपाटीवरील गंडेरी विकणारे, फुगेवाली, माकडाचे खेळ करणारा मदारी, चहावाला, कुल्फीवाला इ. खास मुंबईतील भटके- गावाकडून या शहरात पोट भरायला आलेले लोक दिसतात. डहाणूकरांनी हे सर्व विषय वास्तववादी अंगाने रंगविले असले तरी यातील मानवी आकृतींचे चित्रण अकॅडेमिक शिस्तीतून रंगविले नाही; सहज, नैसर्गिक, निरागसतेने, भावनेचा स्पर्श ठेवून व मुख्य पात्रांचे वैशिष्टय़ ठेवून रंगवले आहे. विशेषत: त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, बसण्याच्या तऱ्हा, त्यांनी परिधान केलेले कपडे व परिसर यावर लक्ष अधिक दिले आहे. मानवी आकृतीचे सुलभ-सरलीकृत रेखांकन, विक्रेत्याच्या चेहरेपट्टीची विशिष्ट ठेवण  विविधरंगी पोशाखांतील स्त्री, पुरुष, मुले यांच्या हालचाली-कृती व चौपाटीच्या वाळूचा खास रंगलेपनातून साधलेला पोत. यामुळे या चित्रात मुंबईतील चौपाटीचे दृश्य-वातावरण व मूड अतिशय सुंदर पकडला आहे. याशिवाय विविध स्त्रिया व त्यांच्या खांद्यावर, तर कधी हातावर बसलेले पक्षी (लेडी वुइथ बर्ड) हे विषयही त्यांनी हाताळले. रंगलेपनातील विविधताही विषय आणि आशयाच्या अंगाने झालेली दिसते. काही चित्रांत रंगलेपनाचा जोरकसपणा व मुक्तपणा दिसतो, तर काहींत अतिशय नाजूक रीतीने रंग हाताळलेले दिसतात. याशिवाय काही कामगार वर्गातील स्त्रिया, संगीत विषयाची विशेष ओढ असल्यामुळे काही गायक-गायिकांची व्यक्तिचित्रणे केलेली दिसतात. इथेही हुबेहूब, साधम्र्यापेक्षाही वाजवताना- गाताना होणारे-झालेले मुद्राभाव व मग्नता यावर भर दिला आहे.
एकंदरच डहाणूकरांचे चित्रविषय न्याहाळताना निसर्गचित्रे हा विषय त्यांना विशेष भावल्यासारखा वाटतो, निसर्गाविषयी त्यांची आत्मीयता-प्रेम या चित्रांतून प्रत्ययास येते. यातूनच पुढे त्यांना स्वत:च्या स्वतंत्र अमूर्त शैलीची वाट सापडली. बालपणी गोव्यातील रमणीय निसर्गाचे संस्कार व चित्रकाराला स्वभावत:च असलेली निसर्गाची उत्कट ओढ यामुळे कदाचित निसर्गचित्रण हा विषय त्यांना विशेष भावला असावा. त्यांच्या निसर्गचित्रणाची सुरुवात वास्तववादापासून झाली. पुढे त्यांच्या निसर्गचित्रणावर अभिव्यक्तिवादाचा (एक्स्प्रेशनिझम) प्रभाव जाणवतो. ७०-८०च्या दशकातील काही निसर्गचित्रे वास्तववादी आणि अमूर्त या दोन शैलींच्या सीमेवर दिसतात. सादृशरूपाचे अनुकरणात्मक चित्रण करण्यापेक्षा स्वत:ला भावलेला निसर्ग-निसर्गाचे रूप आविष्कृत करण्याची रुजवात याच काळात झाली. त्यांचे ‘रिव्हर’ हे १९७६ सालाचे तैलरंगातील सात बाय साडेसात फुटी चित्र याची साक्ष देते.
‘माइंडस्केप’ (१९९०) आणि ‘इटर्नल स्पेस’ (२०००) या मालिकेतील चित्रे पूर्णत: अमूर्त शैलीची आहेत. निसर्गातील दृश्य अनुभवांचे रंग, भाव, मूड मनात साठवून त्याचा उत्स्फूर्तपणे आविष्कार असे या चित्रांचे रूप आहे. प्रत्यक्ष निसर्ग आणि चित्रकाराला भावलेल्या निसर्गाचे रूप जेव्हा अभिव्यक्त होते त्यात चित्रकाराच्या मनोअवकाशात वसणाऱ्या अस्पष्ट भावभावनांचाही अनुभव व्यक्त असतो. निसर्ग हा एक आधार. जे दिसते त्याचे चित्रण करण्यापेक्षा जे अज्ञात आहे, जे भावते पण दिसू शकत नाही ते दृश्य करण्याचा प्रयत्न करणे हेच चित्रकार करत असतो. निसर्गातील अवकाश, रंग आणि मनातील भावभावनांचे तरंग यांचा मेळ असलेली ही ‘माइंडस्केप्स.’ तर इटर्नल स्पेस या मालिकेत शाश्वत अशा अवकाशांचा वेध घेण्याचा प्रयत्न दिसतो.
‘माइंडस्केप्स’ आणि ‘इटर्नल स्पेस’ या दोन्ही मालिकांतील चित्रांत दृश्य-रूपांचा-रचनांचा फारसा फरक ठळकपणे दिसत नाही. रंग, प्रकाश, पोत, अवकाश आणि प्रवाहितता (गतिशीलता) हे घटक या चित्रांत महत्त्वाचे आहेत. रंग हा घटक या सर्व चित्रांतील चित्रांतील ‘कणा’ आहे. रंगाच्या विविध आविष्कारांमुळेच ही चित्रे तुम्हाला वेगवेगळ्या मूडमध्ये घेऊन जातात. बऱ्याचशा त्यांच्या चित्रांतून एक प्रमुख रंग (ेल्लूँ१ें३्रू) आणि त्याच्या सूक्ष्म तरल छटा यांचाच उपयोग केलेला दिसतो. गडद-उजळ रंगछटांचे रोलरच्या साहाय्याने कमीजास्त दाबाचे समांतर आडवे असे पट्टे व साधारणपणे मधल्या काही भागांत गडद रंगाचे, फिक्या रंगाचे एकाच वेळी पोत दर्शविणारे व काही अनामिक आकृती व काही परिचित-अपरिचित वास्तव अनुभवाचे भास देणारे पुंजक्यासारखे लहान लहान आकार. असे साधारण त्यांच्या अमूर्त चित्रांचे रूप दिसते. काही चित्रांत एकापेक्षा अधिक रंगही वापरले गेले आहेत. रोलर, नाइफ, कुंचला आदी साधनांनी युक्तिपूर्वक रंगलेपन व कुशलतेने वापरलेल्या पोतांमुळे वैविध्य निर्माण झाले आहे.
ही सर्व चित्रे उत्स्फूर्तपणे केलेली आहेत. दृष्टी सुखावणारी रंगसंगती, निसर्गातील नानाविध मूड,सकाळ- संध्याकाळ- रात्र अशा दिवसाच्या विविध प्रहरांचा मूड-प्रकाश आणि रंगछटा, विस्तीर्ण अवकाश, उंच-सखल, सपाट-खडकाळ, कधी जमीन तर कधी पाणी, काहीत आकाश आणि जमीन (पृथ्वी) यांचे एकरूप होणे असे विविध दृश्य अनुभव देणारी ही चित्रे आहेत. चित्रांमधील  गडद, उजळ रंगछटांच्या पट्टय़ांमधील संवाद इतका सुरेख व तरलपणे साधला आहे की, आपली नजर न अडकता सहजपणे वरून खाली प्रवास करते. निसर्गातील व मानवी मनाच्याही अथांगतेतील अमूर्त भावनांना स्पर्श करू पाहणारी व स्वत:चा शोध घेणारी ही चित्रे आहेत.
अमूर्त चित्रे असली तरी काही ठिकाणी विशेषत: गडद पुंजक्याचा पोत आहे, काही परिचित दृश्य अनुभवांचा भास होतो. काहीत समुद्रावरून उडणारे पक्षी भासतात, तर काहीत हिऱ्यासारखे चमकणारे खडक, नुकतीच भरती येऊन गेलेला ओलसरपणा, तर काहीतून विस्तीर्ण अवकाशात पसरलेला गालिचा. ही चित्रे पाहताना प्रवासात खिडकीतून धावती-सरकती दृश्ये दिसतात तसा भास होतो. काही चित्रांतून नुकताच पूर येऊन गेल्यावर जशा वनस्पती दिसतात तसा भास होतो, तर काहीत हा पोत सरपटणाऱ्या श्वापदाच्या त्वचेवरील पोतासारखा दिसतो. रंगमंचावरील प्रकाशात एखादा बॅले डान्स सुरू आहे असाही काही चित्रे दृश्य-भास देतात. अर्थात हे परिणाम मुद्दामहून घडविले नाही. चित्र घडण्याच्या प्रक्रियेतून ते येत गेले, मात्र आशयांचा तोल सांभाळण्याकरिता हे परिणाम किती ठेवायचे हा कलाकाराचा निर्णय असतो, पण मनावर परिणाम करते ते त्यातील रंगावकाश. डहाणूकरांच्या चित्रसंपदेतील ही अमूर्त निसर्गचित्रे त्यांच्या इतर चित्रविषयांपेक्षा त्यांच्या आंतरिक विश्वाला मन:पूर्वक प्रतिसाद देणारी वाटतात.
याशिवाय डहाणूकरांनी अनेक मोठमोठी म्युरल्स विविध मटेरिअल्स वापरून केली आहेत. फायबर ग्लास, एपोक्सी रेझिन, सिरॅमिक टाइल्स, मोझाइक टाइल्स, लाकूड, काच इत्यादी. देखणे, सर्वसामान्यांना सौंदर्यपूर्ण वाटेल अशी सुबक व सुबद्ध रचना असे याचे सर्वसाधारण रूप. हे सर्व कमिशन्ड वर्क होते. अनेक तरुण कलाकारांचे साहाय्य त्यांनी घेतले होते. डिझाइन आणि संकल्पना त्यांची होती. शिवसागर इस्टेटच्या भिंतीवरील म्युरल त्यांनी बनविलेल्या म्युरल्समध्ये मुंबईतील सर्वात मोठे समजले जात होते.
सदा प्रफुल्लित, आनंदी असणाऱ्या, सकारात्मक वृत्ती घेऊन कलांचा मनापासून आस्वाद घेणाऱ्या, आपली प्रतिष्ठा, मोठेपणा बाजूला ठेवून प्रख्यात व्यक्तीपासून सामान्य कलाकाराकडे सहानुभूतीने संवाद साधणाऱ्या, प्रसंगी कठोरही होणाऱ्या, तरुण-उभरत्या चित्रकारांना तत्परतेने मदतीचा हात पुढे करणाऱ्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या व संवेदनशील अशा प्रफुल्ला डहाणूकरांची स्मृती नेहमीच कला क्षेत्रातील रसिकांना आठवणीत राहील यात शंका नाही.    ल्ल
‘प्रफुल्ला डहाणूकर फाऊंडेशन’साठी भरणाऱ्या मोठय़ा चित्रप्रदर्शनातून मुंबईत अन्य चित्रांसोबत या चित्रकर्तीचा प्रवासही पाहायला मिळेल. त्या प्रवासाचा हा आस्वाद..