अलार्म वाजला आणि पाच मिनिटांतच शिव उठला. आणि उठताक्षणी त्याला आठवलं की, बापरे! आज मी एकटाच आहे. आई-बाबा तर रात्री एक वाजताच आजीकडे गेलेत, म्हणजे त्यांना आजीकडे जावं लागलं. रात्री आजोबांना अचानक बरं नाहीसं झालं आणि बाबांना फोन आला म्हणून ते लागलीच गेले होते. शिवने झटकन पांघरूण दूर फेकलं आणि अंथरुणाबाहेर पडला. शिव आता सातवीत होता. आत्तापर्यंत कधीही असा एकटा राहिला नव्हता. कारण आई-बाबा कुठेही जाणार असले तर पर्यायी व्यवस्था करून जात होते. पण आज परिस्थितीच तशी निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला एकटय़ालाच तयारी करून साडेआठ वाजता शाळेत पोहचावं लागणार होतं. उठायलाच पाच मिनिटं लेट. कसं आटपणार माझं वेळेत या विचारानं शिव धसकलाच. पटापट बेसिनपाशी पोहोचला, ब्रश करायला. घाईघाईत पेस्ट जोरात पिळली त्याने. त्याबरोबर खूप सारी पेस्ट ब्रशवर ओघळलीच. बापरे! आधीच उशीर त्यात हे काय, आई आता ओरडणारच. मनात विचारांचा कल्लोळ आणि घशाशी आवंढा. टयूबमध्ये पेस्ट पुन्हा ढकलण्याचा निष्फळ प्रयत्न, त्यात थरथरता हात, घाबरलेलं मन, काही कळेनासंच झालं. कसंबसं ते निस्तरत शंकेखोर मनानेच सांडलवंड करत त्याने दूध तापवून घेतलं. कप पडता पडता वाचला. बिस्किटांचा डबा काढताना घोळ होता होता वाचला. पटकन आंघोळ करून तयार व्हावं म्हणून पाणी काढलं आणि पटापट कपडे बाथरूममध्ये ठेवायला गेला तर टॉवेलच पाण्यात पडला. आंघोळ करताना डोळ्याला साबण लावला नि साबण हातातून निसटला तो शोधताना त्रेधाच उडाली शिवची. त्यातच घडय़ाळ पटापट पुढे सरकत होतं. आईच्या रोजच्या धावपळीची आठवण येऊन कढ दाटत होते. काय करावं काही कळत नव्हतं.
तो कसाबसा तयार होऊन सायकलपर्यंत पोहोचला तेव्हा आठ वाजून दहा मिनिटं झाली होती. तेवढय़ात लक्षात आलं चावी वरच राहिली सायकलची, काहीच सुचेना, हातपाय थरथरत होते. तसाच जिने चढून पुन्हा घरापर्यंत पोहोचला. काही केल्या लॅच उघडेना, उघडल्यावर नेहमीप्रमाणे चावी जाग्यावर नव्हतीच, पण शोधल्यावर लगेच सापडली, आता जरा हायसं वाटलं. तसाच घाईघाईत लॅच बंद करून खाली पोहोचला तर सव्वाआठ होऊन गेलेले. परत मन हबकलं, आता उशीर म्हणजे ओरडा, वेगळी रांग, उलट तपासणी अबबबब!! गडबडीत दप्तर कॅरियरला लावताना दहादा घसरलं. काय करावं सुचेनासं झालं होतं, उशीर होत होता म्हणून तसंच कसंबसं दप्तर कॅरियरमध्ये घुसवलं नि सायकलवर टांग टाकली. जेमतेम गेटबाहेर पोहोचतोय न पोहोचतोय तोच धाडकन आवाज आला म्हणून मागे वळून पाहतो तो काय, सारे दप्तर रस्त्यावर अस्ताव्यस्त कोसळलेलं आणि आतलं सारं सामान-वह्य़ा, पुस्तकं, पेनं, कंपासपेटीतलं साहित्य इतस्तत: पसरून जणू वाकुल्या दाखवत होतं. ते गोळा करायला म्हणून घाईघाईत सायकल सोडली, स्टँड लावायचाच राहिला त्यामुळे सायकलने विरुद्ध दिशेला उडी मारली. विखुरलेलं दप्तर, पडलेली सायकल, खरचटलेला पाय, विस्कटलेले केस, कसातरी अंगात ढकललेला युनिफॉर्म, लाल नाक, भरून आलेले डोळे, घशाशी आलेला हुंदका आणि पुढे आलेला खालचा ओठ. शिवचा हा अवतार समोरून येणाऱ्या मानेकाकांनी पाहिला. मानेकाका म्हणजे शिवच्या वर्गातल्या मानसी मानेचे वडील. त्यांनी स्वत:ची गाडी बाजूला घेतली आणि शिवला सगळ्या वस्तू गोळा करायला मदत केली.
दप्तर व्यवस्थित भरलं. त्याची आस्थेने विचारपूस करून सगळं जाणून घेतलं. केस, युनिफॉर्म ठीकठाक करायला मदत केली. काकांच्या मदतीमुळे शिवही थोडा स्थिर झाला होता. ‘‘काका, आता जाईन मी शाळेत व्यवस्थित.’’
‘‘अरे, घराची चावी बघ बरं खिशात आहे का ते.’’
‘‘आहे, आहे,’’ खिसा पाहत खात्री करत शिव म्हणाला.
‘‘हे बघ शिव, तुला एक सांगू का, तुझी सायकल परत तुमच्या बिल्डिंगपाशी लावू आणि मी तुला माझ्या गाडीवरून सोडतो शाळेत, चल. म्हणजे जरा लवकर पोहोचशील बरं शाळेत. ’’ काकाच सायकल बिल्डिंगपाशी लावून आले आणि काकांच्या पाठीमागे गाडीवर बसून शिव शाळेत निघाला. जाता जाता काका म्हणत होते, ‘‘अरे, तुझं काय चुकलं माहीत आहे का? उशीर झाला असा नकारात्मक विचार करूनच तू गडबडलास तेच जर का तू ही पाच मिनिटं कशी भरून काढता येतील असा विचार केला असतास ना तर जमलं असतं बघ वेळेत आवरणं. एखादं बिनमहत्त्वाचं किंवा कमी महत्त्वाचं काम दुपारसाठी ठेवलं असतंस तर काही वेळ वाचवता आला असता की नाही.’’
शिवला हे पटत होतं. अख्खी दुधाची पातेली तापवण्यापेक्षा कपभर दूध तापवलं असतं तर वेळ नक्कीच वाचला असता. आई भरते म्हणून प्यायचं पाणी भरायची गडबड आत्ता करायला नको होती. कालचा युनिफॉर्मही चालला असता आजचा दिवस एवढा काही मळला नव्हता हो. आणि साबण शोधण्याआधी डोळे धुवायला हवे होते.
‘‘हे बघ शिव बेटा, अशा गडबडीच्या वेळीच मन शांत ठेवण्याची गरज असते. डोक्यात विचारांचा गोंधळ होऊ न देण्याची गरज असते. जसा मोठा होशील तसंतसं समजेल. हा विचारांचा गुंता गडबडगुंडा करून टाकतो बरंका सगळा.’’
‘‘काका, आत्ताच थोडं थोडं समजलंय,’’ शिव कबुली देत म्हणाला.
 ‘‘अरे, मोठा होतोयसच शिव तू हळूहळू,’’ गाडी स्टँडला लावून शिवच्या पाठीवर प्रेमाने थोपटत काका म्हणाले.
शिवला वारकेबाईंच्या  स्वाधीन करत मानेकाकांनी सारी परिस्थिती सांगितली. त्यावर हसून त्या म्हणाल्या ‘‘हीच गंमत आहे ना शिवची, सगळया वेळी असाच गोंधळून जातो मग ती परीक्षा असो, हस्तकला असो किंवा कम्प्युटर, वर्गात फळ्यावर गणित सोडवतानाही असंच.’’ बाई हसत हसत म्हणाल्या.
‘‘आता गोंधळणार नाही बरं मी बाई, आधीच गोंधळवणारे विचार केले की गोंधळ वाढतो हे कळलंय मला.’’ शिव लगेच हसत म्हणाला आणि त्याने काकांकडे पाहत डोळे मिचकावले.
काकाही हसत हसत पाठ वळवून घरी जाण्यासाठी वळले आणि शिव वारकेबाईंच्यासोबत वर्गाकडे निघाला. पण आज शिवचे खांदे जरा ताठ दिसत होते.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Budh Margi 2024
९ दिवसांनी ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? हनुमान जयंतीनंतर बुधदेव मार्गी होताच उघडू शकतात उत्पन्नाचे नवे स्त्रोत
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
nagpur drug smuggling, drug smuggling uganda via doha marathi news
युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक