कादंबरी हा एखाद्या भूमीचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास असू शकतो. जरी तो वस्तुनिष्ठ स्वरूपात नसला तरी कादंबरीतील वास्तव हे त्या-त्या काळाचे आणि भूमीचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करीत असते. म्हणूनच या वाङ्मय प्रकाराची लोकप्रियता वाढत चालली आहे. आणखी एका कारणाने कादंबरी lok01परिणामकारक ठरते. ते म्हणजे तिची लवचीकता. सर्व काही पोटात घेऊन स्वत:ला वाढवत नेण्याच्या अंगभूत प्रवृत्तीमुळे कादंबरी कायमच चर्चेत राहिली आहे. या पाश्र्वभूमीवर सांस्कृतिक इतिहासाची चिकित्सा करणारी आणि मोठा आशय कवेत घेऊनही वाचनीय राहिलेली शिवराज गोर्ले यांची ‘सर्व‘स्व’’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी १९९५ नंतर ज्या आर्थिक घडामोडी झाल्या, त्यातून जे सामाजिक आणि सांस्कृतिक विश्व ढवळून निघाले, त्या सगळ्या बदलांकडे अत्यंत गंभीरपणे आणि डोळसपणे पाहताना दिसते.
राजन चौधरी, अपर्णा, डॉली आणि विश्वासराव या चार पात्रांना केंद्रस्थानी ठेवून सभोवतालचा अन्वयार्थ लावताना ही कादंबरी मूलत: भारतीय परंपरेतील ‘समूहभावा’लाच आव्हान देते. समूह आणि समाज या नावाने जो देशभर सांस्कृतिक गोंधळ घातला आहे, त्याची चिकित्सा करताना गोर्ले आपल्या आतील ‘स्व’ला केंद्रस्थानी ठेवतात. ‘स्व’ म्हणजे अस्मिता. ‘स्व’ आपला जगण्याचा आणि अस्तित्वाचा मूलभूत अधिकार आहे आणि तोच भारतीय परंपरेचा खरा ‘स्वार्थ’ किंवा ‘स्व’अर्थ आहे, अशी भूमिका घेऊन जगू पाहणारे वरील चौघे जण आपल्या ‘आतल्या आवाजा’ला प्राधान्य देतात.
 राजन चौधरी आपल्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठय़ा असलेल्या अपर्णाच्या प्रेमात पडतो. विवाह न करता ते दोघे जण आनंदाने राहतात. डॉली ही मार्केटिंग क्षेत्रात काम करणारी अविवाहित तरुणी आहे. अनेक उलटसुलट चर्चा होऊनही ती ठामपणे व्यवसायात उभी राहते. दर वेळी ती स्वत:च्या आवाजाला महत्त्व देते. राजन जिथं आपला आवाज अडवला जातो तिथली नोकरी सोडून देतो. अशा राजनच्या ‘स्व’ला महत्त्व देण्याच्या वृत्तीला विश्वासराव पाठबळ देतात. लहान मुलांसाठी टॉनिक निर्माण करणारा मोठा प्रोजेक्ट अडचणीत येऊ शकतो हे माहीत असूनही राजनवर विश्वास ठेवून विश्वासराव मालाचे उत्पादन आणि विक्री काही काळ थांबवतात. असे हे विश्वासराव अपर्णाबद्दलचे आपले प्रेमभावही लपवून ठेवत नाहीत. पुढे राजन चौधरीवर धर्मव्यवस्था धोक्यात आणीत असल्याचा आरोप ठेवून केस दाखल केली जाते; परंतु तो त्यातून सहीसलामत सुटतो आणि कादंबरी संपते.
कादंबरीचा खरा भाग आणि गाभा हा बदलत्या अर्थकारणाच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या सुविधांचा शोध घेणं हा आहे. पाश्चिमात्य प्रवृत्ती भोगाची आणि भारतीय प्रवृत्ती त्यागाची अशी अनेक वेळा आपल्याकडे मांडणी करून विज्ञान-तंत्रज्ञानातून विकसित झालेल्या साधनसुविधांना चंगळवाद समजून नकार दिला जातो. तो देताना इथल्या धर्मव्यवस्थेला आधाराला घेतले जाते. कादंबरीकार या धर्मव्यवस्थेचीच चिकित्सा करतात. हिंदुत्ववादी संघटनेचे विचार घेऊन चाललेल्या शाळेचे प्राचार्यपद सोडून अपर्णा करंदीकर ‘मनसोक्त’ नावाचे मासिक सुरू करते. या मासिकात पहिलाच लेख हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद यांची परखड चिकित्सा करणारा छापला जातो. त्यानिमित्ताने हिंदू हा धर्म नाही, तो संप्रदाय आहे, या धर्माचे मूलभूत तत्त्वज्ञान नाही आणि मूलत: भारतीय परंपरा ‘स्व’ अस्मिता महत्त्वाची मानीत असताना राष्ट्र, धर्म, त्याग, देशसेवा या गोष्टी कशा चुकीच्या प्रमेयावर उभ्या आहेत, याची चर्चा ही कादंबरी घडवून आणते. धर्मच नव्हे तर अध्यात्म, श्रद्धा, हिंदुत्व, धर्म म्हणजे काय, या सगळ्यांची चिकित्सा करणारे हे मासिक चालवून अपर्णा एक धमाल उडवून देते.
ही कादंबरी केवळ हिंदुत्वाची चिकित्सा करीत नाही, तर ती पुढे जाऊन समाजवादाचा पायाच किती कच्चा होता याचाही ऊहापोह करते. मार्क्सवादामुळे कसे नुकसान झाले आणि एकांगी विचार माणसाला कसा पंगू बनवतो याची चिकित्सा ही कादंबरी करते. त्याचबरोबर विवेकानंदांची दुसरी बाजू वाचकांसमोर मांडू पाहते. पुढे जाऊन गांधीवादाचीही चिकित्सा करते. आजपर्यंत भारतात आणि महाराष्ट्रात ज्या वादांनी धुमाकूळ घातला, जनजीवन ढवळून काढले, त्या सर्व वादांना ती ‘स्व’ अस्मितेच्या संदर्भात तपासून पाहू लागते. ‘स्व’हित, स्वार्थ (ज्याला राजन आणि त्याची टीम ‘सुजाण स्वार्थ’ असे संबोधतात.), त्या स्वार्थी ‘स्वत्वा’ला महत्त्व देताना समूह, समाज यापेक्षा व्यक्ती कशी महत्त्वाची आहे याची मांडणी कादंबरीकार करतात.
 ‘मनसोक्त’ या मासिकाच्या निमित्ताने जेव्हा या सगळ्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितांची चर्चा केली जाते, तेव्हा हिंदुत्ववादी लोक खवळून उठतात आणि चित्राव नावाचे गृहस्थ राजन चौधरींच्या विरोधात याचिका दाखल करतात. राजन चौधरी धर्म बुडवायला निघालेत, इथल्या महापुरुषांच्या अस्मिताविरोधात आवाज उठवून शांततेचा भंग करीत आहेत, तेव्हा त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून जी याचिका दाखल केली जाते त्या याचिकेवर आपले म्हणणे मांडताना राजन चौधरी कोर्टात जे निवेदन सादर करतो ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ‘स्व’ अस्मितेची मांडणी करताना राजन म्हणतो, ‘‘समूह हा धर्म, अर्थ, कामाचं साधन होऊ शकतो; पण मोक्षाची यात्रा ज्याने त्यानेच करायची. हीच इथली परंपरा आहे. पिंड आणि ब्रह्मांड यांची एकता हाच वेदान्त तत्त्वज्ञानाचा पाया आहे.’’ किंवा ‘‘समतेचे ढोल बडवणाऱ्या समूहवाद्यांनी चंगळवाद आणि उपभोगवाद या नावानं ‘समृद्धी’ची अवहेलनाच केली आहे; पण समृद्धी असेल तरच स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होतो. समृद्धी असेल तरच अहिंसा आणि न्याय.. उदार न्यायही शक्य होतो.’’ (पृष्ठ ४७९)
अशी मांडणी करणारी ही कादंबरी स्वधर्म हाच माझा धर्म, माणूस ही माझी संस्कृती, विवेक हा माझा ‘वाद’ आणि स्वातंत्र्य हेच ‘मी’चे मूल्य मानतो. म्हणून ही कादंबरी महत्त्वाची आहे. आर्थिक उदारीकरणानंतर जी समृद्धी येऊ लागली त्याचे समर्थन करीत सर्व वाद तपासून पाहण्याचे काम ही कादंबरी करते. यातील सर्वच गोष्टी मान्य होणाऱ्या नसल्या तरी त्यानिमित्ताने कादंबरीकारांनी काही तत्त्वे चर्चेला ठेवली आहेत, हे या कादंबरीचे यश आहे. या कादंबरीत ग्रामीण, दलित, आदिवासी, दारिद्रय़ वगैरेंच्या चर्चा नसल्या तरी तिला जे म्हणायचे आहे ते ती नेमकेपणाने म्हणते आहे. विस्तृत पृष्ठसंख्या असूनही हा नेमकेपणा कुठेही सुटत नाही, हे तिचे बलस्थान आहे.
‘सर्व‘स्व’’- शिवराज गोर्ले, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,
पृष्ठे -५००, मूल्य – ४०० रुपये.    

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये