त्याचं नाव तसं कुणालाच माहीत नाही.
खरं तर ‘तो’चं नाव कधीच कुणाला माहीत नसतं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तल्या ‘तो’चं नाव तरी कुणाला ठाऊक आहे? तसंच त्याचं!
पण तो सगळीकडं असतो. सर्व काळांत असतो. परवाच भेटला होता- इथं सीसीडीमध्ये. एकटाच कॉफी पीत होता. आणि हातात गेल्या रविवारचा ‘लोकरंग’.
‘काय वाचन चाललंय वाटतं?’ आम्ही शेजारची खुर्ची ओढत विचारलं.
‘अरे आईए आईए.. तशरिफ रखिये..’ ‘तो’ने आमचं दिलखुलास स्वागत केलं. वेटरला क्यापुचिनो की आणखी कसल्यातरी कॉफीची ऑर्डर दिली. आम्हाला तो आवडतो, त्याचं हे एकमेव कारण! तो ऑर्डरही देतो आणि नंतर बिलही. पत्रकाराला याहून आणखी काय हवं असतं?
‘काय मग?’ समोरच्या प्लेटमधली साखरेची पुडी तोंडात सोडत आम्ही ‘तो’स पुसले, ‘अगदी मन लावून वाचन चाललं होतं. एवढं काय वाचताय?’ वाटलं- तो म्हणेल, ‘ध’चा ‘मा’ वाचतोय. मग तो आमुची विनोदी शैली किती छान आहे, आमुची भाषा किती मस्त आहे, समाजातील विसंगतींवर आम्ही कसं नेमकं बोट ठेवतो, असं काही वास्तववादी बोलेल! तशी आम्हांस सर्वच मराठी लेखक व पत्रकारांप्रमाणे स्तुती आवडत नाही! पण आपण तरी कुणाकुणाचं म्हणून तोंड धरणार?
‘ही किरण नगरकरांची मुलाखत वाचत होतो..’ तो म्हणाला. आम्ही गुपचूप कॉफीचा कप तोंडास लावला!
‘छान बोललेत नगरकर. बरेच चांगले मुद्दे मांडलेत..’ ‘तो’च पुढं म्हणाला आणि हसला. ‘तो’चं ते हसणं पाहिलं आणि आमच्या मनी त्या नगरकरांविषयी अपार सहानुभूतीच दाटून आली! वाटलं, आता किरण नगरकरांचं काही खरं नाही!
आमुच्या मनातले विचार ‘तो’ने नक्कीच ताडले असावेत. तो म्हणाला, ‘काय करणार अप्पाजी? पोटापाण्यासाठी करावं लागतं हे सगळं!’
***
या गोष्टीला आता चार दिवस झाले. आणि कालच ब्रेकिंग न्यूज झळकली.. ‘किरण नगरकर यांच्याविरोधात बहुजन साहित्यिक संघटनेचा निषेध मोर्चा! बहुजन साहित्यिकांचा केला अवमान!’
वाहिनीचा वृत्तनिवेदक सांगत होता- ‘याबाबत संघटनेचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊ या संघटनेचे अध्यक्ष आमदार जितेंद्र पाटील यांच्याकडून. सर, काय सांगाल तुम्ही?’
आमच्या मनी अनेक प्रश्न दाटून आले. कोण हे आमदार पाटील? त्यांचा आणि साहित्याचा काय संबंध?
आम्ही चित्रवाणीसंचाचा आवाज मोठा केला. पाटील बोलत होते- ‘नगरकरांनी पहिल्यांदा सगळ्या साहित्यिकांची माफी मागिटली पाहिजे. आज बहुजन साहित्यिक साहित्याची शेवा करताना वेगळेवेगळे उद्योग, धंदे, व्यवसाय करीत असतो. काही जन राजकारणात आहेत. काही सर्वशिक्षा अभियानाच्या कंत्राटात आहेत. तसंच काही बांधकाम कंत्राटदार म्हनून काम करीत आहेत. पण लेखक फक्त आर्धाच पूल बांधू शकतो, असं म्हणून नगरकरांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे सगळे आरोप बिनबुडाचे आणि निखालस खोटे आहेत. हे सगळं ते प्रसिद्धीसाठी करीत आहेत.’
‘पण सर, नगरकरांनी ते वाक्य वेगळ्या संदर्भात उच्चारलं होतं..’
‘संदर्भ कोणतेही असोत, आर्थ तोच व्हतो ना? लेखक काय पूल बांधतात काय? पूल हा शब्द आलाच कुठून तिथं? हे कंत्राटदारांच्या, पीडब्लूडीच्या बदनामीचं कारस्थान आहे. वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रातल्या लोकांवर चिखलफेक करण्याचं सत्र सध्या सुरू आहे.. आम्ही ते चालू देनार नाही!’
‘अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे पाटील यांनी.. पाटील, आणखी कोणावर चिखलफेक झालीय?’
‘रवींद्रनाथ टागोरांवर.. एवढा मोठा शिक्षणसम्राट! पण त्यांच्यावर त्या कार्नाडनं टीका केली, की ते दुय्यम दर्जाचे नाटककार आहेत. आता टागोरांनी शाळा चालवायच्या, ग्रांटिबट मिळवायची, की चांगली नाटकं लिहित बसायचं? यापुढं अशी टीका सहन केली जाणार नाही. आमची संघटना टागोरांच्या संपूर्णपणे मागं आहे. लौकरच आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत.’
‘कुणाशी..? कार्नाडांशी?’
‘टागोरांशी!’
***
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठीच धामधूम उडाली. विदर्भ-मराठवाडय़ात नगरकरांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले. पुण्या-मुंबईतून त्यांच्याविरोधात वाचकपत्रं लिहिली गेली. नाशिकमध्ये उद्योजकांच्या संघटनेनं एक दिवसांचा बंद पुकारला. रामदास आठवले यांनी या आंदोलनाला पािठबा दिला. राज्यघटनेनं लोकांना उद्योग करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्यात अडथळे आणून नगरकरांनी घटनेचाच अवमान केला आहे, असं ते म्हणाले. आराराबांनी यासंदर्भात कायद्याने काय होईल ते करा, असे आदेश गृहखात्याला दिले. याविषयी आपण पुढच्या वर्षी बोलू, असं राज ठाकरे म्हणाले.
राज्यातल्या शिक्षक संघटनाही या आंदोलनात उतरल्या. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या नगरकरांच्या कादंबरीनं शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर घातक परिणाम होत आहे. सदरहू, असा चुकीचा पाढा शिकवणाऱ्या या कादंबरीवर बंदी घालावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली. शिवसेनेने हे पुस्तक विकणाऱ्या दुकानांना सामनातून इशारा दिला. महाराष्ट्र अगदी पेटला!
***
‘तो’ला आम्ही विचारलं, ‘काय साधलंत यातून?’
तो म्हणाला, ‘आमचं जाऊ द्या. आम्हाला काय पसेच मिळाले! पण आमदार पाटलांनी जे काही साधायचं ते बरोबर साधून घेतलं!’
‘पण आम्ही हे बाहेर कुठं चुकून बोललो तर, की हा वाद तुम्हीच पेटवला होता. तुम्ही तुमच्या ‘क्लायंट’ना वादविषय काढून देता.. वाद पेटते ठेवता.. त्यासाठी मुद्दे पुरवता.. पत्रकं काढता.. वेगवेगळ्या नावाने वाचकपत्रं लिहिता.. केवळ निषेधासाठी संघटना काढून देता..’
‘खुशाल बोला. आणि तुम्हाला काय वाटतं, लोकांना हे माहीत नाही? पण लोकांचीच ती गरज आहे. त्यांना टाइमपास हवा असतो. राजकारण्यांची ती गरज आहे. त्यांना अस्मितांना धार लावायची असते. प्रसिद्धी माध्यमांची ती गरज आहे. त्यांना प्रेक्षक हवे असतात. आमच्यासारखे लोक ती भागवतात, एवढंच. नाही तर मला सांगा- विद्यार्थ्यांसमोर बंद सभागृहातील गंभीर व्याख्यानात कार्नाड टागोरांबद्दल जे बोलले, ते संदर्भ सोडून बाहेर आलं असतं का? त्यावरून पश्चिम बंगाल पेटला असता का?’
‘तो’चा सवाल बिनतोड होता.
***
आता तुम्ही विचाराल, की हा ‘तो’ म्हणजे कोण? तो कुठे भेटेल? तर ते सांगता येणार नाही. पण कोणत्याही वादामागे नीट पाहाल, तर तुम्हाला तो नक्कीच दिसेल, एवढं मात्र नक्की!