(टीप : डायरीतील ही काही पानं.. ती कोणाची आहेत हे माहीत नाही. कोणी दिलीत ते सांगू शकत नाही. परंतु सोर्स पक्का आहे. पानं विश्वासार्ह आहेत.. भविष्यातील इतिहासकारांच्या कामी येतील म्हणून ती प्रसिद्ध करायलाच हवीत. – अ.ब.)
रविवार
हॅपी संडे! आज माझ्या अभ्यास रजेचा कितवा बरे दिवस? कॅल्सीवर मोजलं पाहिजे.  
हा दिवस (म्हणजे संडे) देशातील कामगार बंधुभगिनींसाठी खूप महत्त्वाचा. या दिवशी त्यांना पेड सुटी असते. lok01तेव्हा ते घरी बीफ बॅन असल्याने मासे किंवा मटण खातात. केवढा हा अन्याय! आजपासून मीपण कोणाच्याही घरी गेलो तरी मासेच खाईन. कामगार हा देशाचा प्राण आहे. त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. ते कामगाराला कामगार समजतात. आपण त्याला कामगार समजत नाही. देशाचा शिल्पकार समजतो. हा शिल्पकार रविवारी दुपारी मस्त जेवून ताणून देतो. मला त्यांची ही मानसिकता समजून घेतलीच पाहिजे. मीही आता ताणून देतो. जयिहद.
सोमवार
कालचा दिवस कामगारांची मानसिकता समजून घेण्यात गेला. रात्री टॅबवर कामगारांवरचे चित्रपट पाहिले. अनिल कपूरचा ‘लाडला’ मस्त होता. एक कामगार आपल्या मालकिणीशी लग्न करतो, ही सोश्यो-इकॉनॉमिक सिस्टिम अप्रतिम! याबाबत विचार व्हायला हवा. तसं पत्र मी आजच गुरुजींना पाठवलं. नंतर मग नेहमीप्रमाणे टॅबवर कार्टून्स पाहिली. लोकांना वाटतं मला छोटा भीम, पोकेमॉन आवडतात. परंतु हाच फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. मला फक्त डिस्नेचीच कार्टून्स आवडतात.
मंगळवार
बापूजींप्रमाणे देश समजून घ्यायचा म्हणून घर सोडलं तेव्हाच ठरवलं होतं, की बातमीतला ‘बा’सुद्धा ऐकायचा नाही. पण तो अर्णब इतका ओरडत असतो सतत की कुठून ना कुठून कानावर पडतंच ते. सध्या मोदी परदेशात आहेत असं ऐकलं. म्हणजे? दोन महिन्यांपूर्वी ते परदेशी गेले होते ते आलेच नाहीत की काय? की येऊन परत गेले? दीदीला फोन करून विचारावं असं वाटून गेलं. पण तो मोह आवरला. ते इथं असले काय नि नसले काय? आपल्याला काय फरक पडतो? आपल्याला तर त्यांनी कुठंच ठेवलं नाही!
दीदीची आणि मम्मीची फार आठवण येते. आणि माझी भाचरं. समर हॉलिडेमध्ये त्यांनी मामाच्या गावी जायचं तर त्यांचा मामाच गावाला गेलेला! कधी कधी वाटतं सोडून द्यावं हे सगळं! पण सोडलं तर मग दीदीलाच हे पाहावं लागेल आणि मग मुलांपासून त्यांची आई दूर जाईल. नको. नको. ते पाप मी करणार नाही. केवळ त्या मुलांसाठी म्हणून मलाच हा त्याग केला पाहिजे.
बुधवार
आज पुन्हा एका दलिताच्या घरी गेलो. तिथंच जेवण्याचा विचार होता. परंतु तो ‘आगे जाव’ म्हणाला. या देशात अजूनही फूड सिक्युरिटी नाही हेच खरं! काही तरी केलं पाहिजे. गुरुजींना पत्र लिहायला पाहिजे.
गुरुवार
आज सकाळी सकाळी एक फोन आला. म्हणाले, ‘या नंबरवर मिसकॉल द्या.’ दिला. तर म्हणाले, ‘तुम्ही भाजपचे सदस्य झालात! आता परत कोणतं तोंड घेऊन जाऊ?’ यातून मार्ग निघेपर्यंत रजा वाढवावी लागणार.
शुक्रवार
दिवसभर आरशासमोर भाषण देण्याची प्रॅक्टिस केली. रागाने बोललो, त्वेषाने बोललो, गांभीर्याने बोललो, तात्त्विक बोललो, कागद न फाडता बोललो.. पण ते पाहून माझं मलाच हसायला येत होतं! दीदी म्हणते तेच खरं. लोकांसमोर तोंड वाजवण्यापेक्षा रोड शोमध्ये हात हलवणं सोपं.
शनिवार
मम्मीचे निरोपामागून निरोप येताहेत. परत या.. परत या.. पण किती तरी कामं करायची राहिलीत. रोज व्यायाम करतोय. पण छाती अजून ५६ इंच झालेली नाही. बरेच दिवस नदीवर जाऊन बशीन म्हणतोय. एखाद्या गरीब भगिनीला अंगातील शर्ट काढून दिल्याशिवाय येथील दारिद्रय़ाची समस्या कशी कळणार?
झालंच तर अजून रेल्वेच्या थर्ड क्लासने विनातिकीट प्रवास करायचा राहिलाय. तिकिटाला पसे नाहीत असं नाही. परंतु एखाद्या स्टेशनवर भल्या पहाटे टीसीने रेल्वेतून फेकून दिल्यावर काय वाटतं तो अनुभव घ्यायचाय. छे. इतक्यात कसं परतायचं? चेहराही अजून नीट टॅन झाला नाहीये!
रविवार
आजही देशातील कामगार बंधूंची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु येथे भरदुपारीसुद्धा डास चावतात. उकडतंय पण खूप.. परत जावं काय? जावंच. तशी रजा काय तिथंही घेता येईलच!lok02