परमपूज्य स्वामी वरदानंद भारती ऊर्फ अनंत दामोदर आठवले, हे आयुर्वेद आणि अध्यात्म अशा दोन्ही क्षेत्रांतील अधिकारी व्यक्तिमत्त्व! पुण्यातील एका आयुर्वेद महाविद्यालयाचे ते काही काळ प्राचार्य होते. त्यांच्या अत्यंत रसाळ आणि सोप्या भाषेतील लेखनामध्ये, आपल्याला न सुटलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातात.
माणसाच्या सहा शत्रूंपैकी ‘मोह’ या शत्रूबद्दल ते म्हणतात की, मोह हा केवळ अध्यात्म मार्गातलाच अडथळा आहे असं नाही, तर तो आरोग्यप्राप्तीतलाही मोठा अडसर आहे. माणसाच्या अनारोग्याला व्हायरस, बॅक्टेरिया, किटाणू, जिवाणू हे जबाबदार नसून, त्याच्या जिभेचा मोहच जास्त कारण असतो. कारण माणूस जे आवडीने खातो ते पोटातल्या भुकेपायी नसून जिभेच्या मोहापायी असते. चव फक्त जिभेलाच कळते. पोटाला चवीचे काय सोयरसुतक? आइस्क्रीमची लालसा उत्पन्न झाली की, मनुष्य जिभेचा गुलाम बनून ते खातो, पण खाताना अधाशासारखे त्याचे गोळेच्या गोळे पटापट गिळले जातात आणि आइस्क्रीम संपूनही जाते पटकन! या प्रक्रियेत जिभेला किती आनंद मिळतो? एक मिनिट? तो कमी पडतो म्हणून आणखी एक आइस्क्रीम खाण्याचा मोह होतो. असे करता करता पोट भरते, पण जिभेची तृप्ती होत नाही. यावर उपाय म्हणजे आपल्या आवडत्या चवीचा पदार्थ जास्तीत जास्त वेळ जिभेवर राहील असं बघायचं. तोंडात ठेवून तो पदार्थ चावत/चोखत राहायचा, गिळायचा नाही. जिभेची हौसही भागते आणि पोटावरही अत्याचार होत नाही.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात एक वाक्य आहे- ‘मोह हे जीवनाच्या मडक्याला पडलेलं भोक आहे.’ पुलंनी ते नाटकात कितीही उपहासानं लिहिलं असलं, तरी ते मनुष्यजीवनाचं वास्तव आहे, हेच खरं.
वैद्यांनी रुग्णांना पथ्यापथ्य सांगितलं की सगळ्या रुग्णांची पहिली प्रतिक्रिया असते, ‘‘तुम्ही आमच्या आवडीचे सगळेच पदार्थ बंद केलेत.’’ सत्य हे असतं, की त्या आवडत्या पदार्थानीच रुग्णाच्या आरोग्याचा घास घेतलेला असतो. सगळं काही खाण्याची सवय असायला हवी आणि खाल्लेलं सगळं पचलं पाहिजे, ही आदर्श अवस्था खाऊन खाऊन प्राप्त होत नाही. त्यासाठी योग्य आणि नियमित व्यायाम/कष्ट करावे लागतात. ते न करता खाणं हे पाप आहे. (रोगाला आयुर्वेदशास्त्रात ‘पाप’ हे एक पर्यायी नाव आहे.)
सर्दी, खोकला, दमा अशा कफजन्य आजारांचा आणखी एक मोठा शत्रू म्हणजे दही! दही हा पदार्थ खरं तर फार चविष्ट आहे. तो एकटाही रुचकर लागतो आणि ज्या पदार्थात घालू त्या पदार्थाची चवही वाढवतो, पण पदार्थ जितका रुचकर तितका त्याचा मोह जास्त! दह्य़ातल्या कोशिंबिरी, दहीभात, दहीपोहे, दहीसाबुदाणा, भाकरीचा दहीकाला, दही खिचडी, दही साखर, दह्य़ातलं भरीत, दहीबुत्ती हे पदार्थ म्हणजे दहीप्रेमी लोकांसाठी अक्षरश: पक्वान्नं असतात. (ही यादी वाचूनही कित्येकांच्या जिव्हा रसवंती झाल्या असतील.) तसा हा पदार्थ गुणी आहे. दह्य़ामुळे शरीराला बल मिळतं, शरीर पुष्ट होतं हे खरं, पण दही खाण्याचे काही नियम आहेत. ते पाळायला हवेत.
१. उष्ण ऋतूंमध्ये दही खाऊ नये. म्हणजे शरद ऋतू (ऑक्टोबर हीट) आणि उन्हाळा हे दही खायला वज्र्य दिवस, कारण दही उष्ण आहे. (जिभेला दही थंड लागतं. त्यामुळे ते थंड असतं असा एक सर्वमान्य गैरसमज आहे.)
२. रात्री दही खाऊ नये. रात्री सूर्याच्या उष्णतेच्या अभावात आपल्या शरीरातील स्रोतसं बंद असतात. दह्य़ाचा स्वभाव या स्रोतसांमध्ये जाऊन अडथळा निर्माण करण्याचा आहे. रात्री दह्य़ाचं हे काम सोपं होतं. कारण स्रोतसं नैसर्गिकरीत्याच आकुंचित झालेली असतात.
३. दही तापवून खाऊ नये.
४. अधमुरे (अर्धवट लागलेले) दही कधीच खाऊ नये.
५. दिवसा दही खायचं असेल तरी मुगाचं कढण, गाईचं तूप, मध, खडीसाखर किंवा आवळा यापैकी एक तरी पदार्थ दह्य़ाबरोबर खावा. या पदार्थाशिवाय दही खाऊ नये. दह्य़ाचे अवगुण या पदार्थानी मारले जातात. आपल्याकडे दही-साखर खायची पद्धतही आहे, पण आपण सध्या वापरतो ती साखर उपयोगी नाही. त्यासाठी खडीसाखर हवी. हे नियम न पाळता दही खाल्लं तर ताप, त्वचाविकार, रक्ताचे आजार, कफाचे आजार, पित्ताचे आजार असे अनेक आजार होऊ शकतात.
कधी कधी हे नियम पाळले तरी दही बाधतं. जगातल्या सगळ्या जीवांमध्ये ‘ब्रह्म’ हे एकच तत्त्व असलं तरी काही जीवांशी आपलं जमतं- काहींशी नाही जमत. तसंच दही हे अन्न म्हणून ब्रह्मस्वरूप असलं तरी काही जणांचं त्याच्याशी ‘जमेल’ तर काहींचं ‘जमणार नाही’, हे स्वीकारायला हवं. थोडक्यात- सर्दी, खोकला, दमा अशा कफप्रधान आजारांचे शत्रू (आजाररूपी संकटात भर घालणारे, नसलेला आजार ओढवणारे अन्नपदार्थ) पुढीलप्रमाणे- दही, गार पदार्थ, गार पाणी, फळांचे रस, नारळपाणी, काकडी, टोमॅटो, कोल्ड्रिंक्स, मिल्कशेक, आंबवलेले पदार्थ, फळं- या सर्वाचं अतिरेकी सेवन नेहमीच त्रासदायक ठरतं.
रुग्ण म्हणतात, ‘‘आम्ही हे पदार्थ कधीतरी खातो, पंधरा दिवसांतून एकदा. मग काय हरकत आहे?’’ पंधरा दिवसांतून एकदा एक पदार्थ खाल्ला हे ठीक. पण असं करत पंधरा दिवस रोज वेगवेगळा शत्रू आपण जवळ केलेला असतो, त्याचं काय?
माझ्या एका रुग्णानं मला विचारलं, ‘‘मलाच का हे पदार्थ चालत नाहीत? माझ्या नवऱ्याला कसे चालतात?’’
कफप्रधान आजारांचे मित्र : (आजाररूपी संकटात बरं व्हायला मदत करणारे अन्नपदार्थ) – गरम पाणी, उकळलेलं/ आटवलेलं पाणी, सुंठ घालून उकळलेलं पाणी, सुंठ, मिरी, लवंग, दालचिनी, हळद, ज्वारीच्या किंवा साळीच्या लाह्य़ा, डाळवं, बाजरीची भाकरी, भाजणीचं थालीपीठ + ताजं लोणी, गरम आणि ताजे अन्नपदार्थ. या मित्रांना जितकं जवळ करू तितका आजार लवकर बरा होतो.
कफ कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे डाळींचे किंवा कडधान्यांचे कढण- उडीद सोडून कुठलेही कडधान्य किंवा डाळ (विशेषत: मूग किंवा कुळीथ किंवा दोन्ही एकत्र) घेऊन त्यात चौदा पट पाणी घालावे. बारीक गॅसवर हे शिजत ठेवावे. त्यातले दाणे शिजले (बोटाने दाबले जाऊ लागले) की ते गाळावे. तयार झालेल्या गरम पाण्यात तूप, जिरपूड आणि सैंधव घालून प्यावे. या कढणाने भूक आणि पचनशक्ती सुधारते. कफाचे पचन होते. गरम गरम सूप प्यायल्याने नाक, घसा, सायनसेस मोकळी होतात. मात्र यात टोमॅटो अजिबात घालू नये. आंबट चव हवी असल्यास पाव चमचा कोकम आगळ घालावे. ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी कुळीथ वापरू नयेत. केवळ मुगाचे किंवा मूग आणि चणे यांचे कढण करावे.
जुनाट सर्दीसाठी सर्वाना रुचेल अशी आणखी एक पाककृती म्हणजे ‘शिखिरिणी.’ साधारणपणे आज आपण करत असलेल्या श्रीखंडासारखी, पण त्यात काही वेगळे पदार्थ घालून केलेली ही शिखिरिणी भीमाने शोधून काढली. हिलाच ‘रसाला’ असेही म्हणतात. भीम स्वत: खवय्या होता आणि उत्तम आचारीही होता. (पूर्वीच्या संस्कृत ग्रंथांमध्ये पाककृती उत्तम प्रकारे सिद्ध व्हावी यासाठी आचारी ‘बुद्धिमान’ असावा असा उल्लेख वारंवार आणि सर्वत्र येतो. आज दुर्दैवानं आपल्याच देशात ‘स्वयंपाक’ हे निर्बुद्धपणाचं काम समजलं जातंय. सार्वत्रिक अनारोग्य हे त्याचंच फलित आहे.) भीमाच्या हातच्या ‘रसाले’चा आस्वाद स्वत: भगवान श्रीकृष्णांनी अनेक वेळा घेतला आहे.
म्हशीच्या दुधाचे दही लावावे. चांगले आंबट लागलेले दही (अधमुरे नाही आणि फसफसलेले नाही असे- वडी पडणारे दही) वस्त्रात घालून त्याची पुरचुंडी बांधून ते रात्रभर टांगून ठेवावे. हा चक्का अधिक घट्ट किंवा जलविरहित व्हावा यासाठी नव्या मातीच्या पात्रावर ही पुरचुंडी सकाळी पसरून ठेवावी. मग चक्क्याच्या १/४ साखर घालून, मिसळून हे मिश्रण वस्त्रातून गाळून घ्यावे. मग यात निम्मे आटवलेले दूध मिसळावे. त्यात वेलची, लवंग, कापूर व मिरपूड हे पदार्थ घालावे. याव्यतिरिक्त केशर, चारोळ्या, जायफळ असे पदार्थ मिसळावे. अशी ही औषधी रसाला किंवा औषधी श्रीखंड जुनाट सर्दी असलेल्या रुग्णांसाठी हितकर आहे. नित्य प्रवास करणाऱ्या लोकांनीही असे श्रीखंड खावे. यातील वेलची, लवंग, कापूर व मिरे यांची पूड अनिवार्य आहे. आपल्या नेहमीच्या श्रीखंडापेक्षा कापूर इ.चा स्वाद वेगळा लागतो. पण औषध म्हणून तो पदार्थ तसाच खाणे योग्य.
आजार – औषध हे सूत्र हिंदुस्थानात पूर्वी कधीच नव्हतं. प्राचीन काळी भारतात आलेले परदेशी पर्यटक, भारतीय पाकशास्त्र- त्यातले चविष्ट पदार्थ आणि त्यातूनच आरोग्य प्राप्त करण्याची भारतीयांची कला यावर आश्चर्यचकित होत असत.
आरोग्य क्षेत्रात सध्या येऊ घातलेल्या काही नियमांमुळे पाश्चात्त्यांप्रमाणे आपल्याकडेही आरोग्य सेवा दुर्मीळ आणि महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी आरोग्यासाठी आपला भर ‘आहारा’वरच असलेला बरा, नाही का?

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी