संगीतकार तसेच अनेक गाजलेल्या जाहिरातींच्या जिंगल्सचे निर्मिक अशोक पत्की यांची जिंगल्सच्या दुनियेतली स्वैर भटकंती कथन करणारे पाक्षिक सदर..
त्या काळी जिंगल्स बनवणाऱ्या चार-पाचच एजन्सीज् असायच्या. लिन्टास, फार प्रॉडक्शन्स, आर.टी.व्ही.सी., मुद्रा, वगैरे. आज अनेक कंपन्या आहेत. या क्षेत्रामध्ये भरपूर पैसा आहे. रेडिओ-टीव्ही चॅनलवालेसुद्धा सेकंदाला लाख- लाख मागतात. जाहिरातींत मॉडेल म्हणून जे काम करतात त्यांनाही गडगंज पैसा मिळतो. म्हणून कधीतरी वाचनात येतं : सचिन-अमिताभपेक्षाही धोनीकडे जाहिरातींचं जास्त काम आहे आणि तो सर्वात श्रीमंत माणूस आहे!
नुसतं जिंगल तयार केलं म्हणून झालं नाही; ती रेडिओ-टीव्हीवर वाजवणारी मंडळी वेगळी असतात. प्राइम टाइमचे पैसे वेगळे, इतर वेळी वाजवायचे, दाखवायचे पैसे निराळे! रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोस्टर लावायची वेगळी माणसे. रोडवर मोक्याच्या जागी होर्डिग्ज लावणारी माणसे वेगळी. थोडक्यात, अमाप पैसा आहे या क्षेत्रात!
गेली २५ र्वष मी रोज चार जिंगल्स करतोय म्हटलं तरी २०-२५ हजारांवर जिंगल्स केली आहेत. या क्षेत्रात आधी केवळ संगीतकार असे. तो जिंगलला चाल लावायचा, वादकांना बोलवायचा, गायकाला बोलवायचा. पण आता संगीतकार म्हणजे जो सिंथेसायझर वाजवतो, प्रोग्रामिंग करतो तोच संगीतकार! घरच्या घरी सेटअप करून, घरीच प्रोग्रामिंग करून फक्त त्याचा ट्रॅक तो घेऊन येतो. तेही पेनड्राइव्हवर! काही दुरुस्ती असली तर परत घरी जातो आणि दुरुस्त करून घेऊन येतो. म्हणजे आमच्या वेळी चार तासांत जे काम व्हायचं ते आज दोन-दोन दिवस चालतं.
एक किस्सा आठवतो. आपल्याकडे एखाद्या गायकाचं गाणं हिट् झालं, की सगळेजण त्याच्या मागे लागतात. एक काळ असा होता, की एखादं तरी जिंगल गायला मिळावं म्हणून कुणाल गांजावाला रेकॉर्डिग थिएटरवर येऊन याला भेट, त्याला भेट असं करायचा. हळूहळू त्याला कामं मिळू लागली. माझ्यासाठीही तो भरपूर गायलाय. पण आता त्याचं ‘भीगे होठ तेरे’ हिट् झाल्यावर तो लाखाच्या गोष्टी करू लागला आहे. इथे ‘रिलेशन’ वगैरे प्रकारच नसतो. असो.
असाच आणखी एक किस्सा : वनराज भाटियांचं जिंगल होतं. त्यासाठी रफीच्या आवाजात गाणाऱ्या शब्बीरकुमारला त्यांनी बोलावलं होतं. वनराज पियानोवर बसून गाणं शिकवतो. दहा बोटांनी दहा सूर दाबून आपल्या बसक्या आवाजात तो गातो. कोणाला काही कळत नाही. त्याच्याबरोबर २५ र्वष काम केल्यामुळे कविता, सुषमा, मी व विनय मांडकेला मात्र कळतं, की त्याला काय टय़ून अपेक्षित आहे! शब्बीरला दोन-तीनदा शिकवलं त्याने; पण त्याला काहीच कळलं नाही. वनराज भाटिया  रागावले. मी शब्बीरला म्हटलं, ‘मी सांगेन तुला. याला पियानोवरून उठू दे.’ तेवढय़ात चहा आला. तो पिऊन झाल्यावर शब्बीर वनराजला म्हणाला, ‘‘मी जरा वॉशरूमला जाऊन येतो.’’ तोपर्यंत आमची म्युझिकची रिहर्सल चालली होती. पण अर्धा तास झाला तरी शब्बीरचा पत्ता नाही. मग शोधाशोध सुरू झाली. खाली हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेला असेल म्हणून एकजण खालीही जाऊन आला. पण कुठेच त्याचा पत्ता नाही. दीड तासाने त्याला फोन केला तेव्हा कळलं- तो घरी पोहोचला होता. म्हणाला, ‘‘नहीं भैया, मुझे तो नहीं जमनेवाला ये!’’ दहा सेकंदांचं, २० सेकंदांचं जिंगल म्हणजे अनेकांना सोपी गोष्ट वाटते. काही नवीन गायकांच्या आई-वडिलांचे फोन येतात- ‘‘अहो, माझी मुलगी/ मुलगी गातो/ गाते. सिनेमातलं गाणं नाही, तर किमान जिंगल तरी गाऊन घ्या त्याच्या/तिच्याकडून. १०- २० सेकंदांचं तर असतं ते. त्यात काय एवढं गाण्यासारखं असतं?’’ मला हे ऐकून हसू येतं आणि त्यांची कींवही!
‘‘सिनेमा संगीत/ नाटक/ सीरियल टायटल/ जिंगल्स या सगळय़ांत म्युझिक कम्पोझिशन करताना काय फरक असतो?’’ असा प्रश्न अनेकजण मला विचारतात. कम्पोझिशन करताना दोन गोष्टींचं भान ठेवावं लागतं. एक म्हणजे प्रत्येक कामाची कालमर्यादा ठरलेली असते. ती सांभाळावी लागते. दुसरी गोष्ट- नाटकासाठी संगीत करताय की सीरियलचं टायटल? की जिंगल? हेही त्याआधी लक्षात घ्यावं लागतं.
सिनेमाचं गाणं हे चार-पाच मिनिटांचं असलं तरी चालतं. मधलं म्युझिक कसं आणि कुठे येणार, हे चित्रपट दिग्दर्शक आम्हाला सांगतो. उदा. गाणं घरी सुरू होतं- चार भिंतीआड. पहिल्या म्युझिकला नायक एकदम गार्डनमध्ये जातो. दुसऱ्या अंतऱ्यात तो ट्रेनमधून माथेरानला चाललेला असतो, तर तसं म्युझिक आणि तशी स्वररचना याचं भान ठेवावं लागतं. कारण तुमच्या गाण्याबरोबर व्हिज्युअल्सही असतात. ते खूप काही सांगून जातात. नाटकातलं गाणं हे आत्ताच्या जमान्यातलं, लाइट मूडचं असावं लागतं. त्याचा कालावधी दोन-अडीच मिनिटंच असावा लागतो. नाहीतर नाटक थांबल्यासारखं वाटतं. पूर्वीच्या काळी जेव्हा गायक नट गात असत तेव्हा त्यांना ऐकण्यासाठी प्रेक्षक येत. त्याकाळी पहाटेपर्यंत नाटकं चालायची. रसिकांना नाटकाबरोबर संगीताचीही मेजवानी मिळायची. तो काळच वेगळा होता. आता तीन अंकांची दोन अंकी नाटकं झाली आहेत. सगळं कसं झटपट!! आठ-दहा दिवसांत नाटकं बसतात. पाठांतर व्हायच्या आत नाटकाचे प्रयोग लागलेले असतात. हल्ली सीरियल्स- इव्हेंटस्मुळे कलाकार तालमीला उपलब्ध नसतात. मग कोणीतरी ‘प्रॉक्सी’ उभा करून आम्हाला तालीम दाखवली जाते. प्रशांत दामले, सुनील बर्वे, वंदना गुप्ते, अमृता सुभाष यांसारखे कलाकार असले की एखाद् दुसरं गाणं असावं असं निर्माता-दिग्दर्शकाचं म्हणणं असतं. अन्यथा नुसतंच पाश्र्वसंगीत असतं. तेही मोहन वाघ, सुधीर भट, विनय आपटेंसारखी निर्माते मंडळी असली की प्रत्येक नाटकाला नवीन पाश्र्वसंगीत हवे असा त्यांचा आग्रह असे. परंतु काही निर्माते ‘स्टॉक म्युझिक’ वापरूनच वेळ मारून नेतात.
सीरियलचं टायटल साँग पूर्वी दीड मिनिटांचं असे. आता त्याचा कालावधी एक मिनिट एवढाच झालेला आहे. तेही फक्त एक महिना लावतात. अगदीच हिट् सीरियल असेल तर त्याचं टायटल साँग कायम वाजवतात. उदा. ‘उंच माझा झोका’, ‘माझिया प्रियाला’, ‘होणार सून मी’, इ.
जिंगल करताना मात्र खूप विचार करावा लागतो. एक तर याचं काही होमवर्क नसतं. तुम्हाला एक फोन येतो- ‘उद्या जिंगल करायचं आहे. अमुक अमुक स्टुडिओमध्ये उद्या सकाळी १० वाजता भेटू या. गायक अमुक हवा. बाकी म्युझिशियन्सनाही सांगा.’ स्टुडिओत गेल्यावर एजन्सीकडून एक माणूस आलेला असतो. तो तुम्हाला स्क्रिप्ट देतो. त्याच्यावर लिहिलेलं असतं- हे हे जिंगल, त्याचा कालावधी, नायकाचं नाव, निवेदकाचं नाव. (याला आम्ही ‘व्हॉइस ओव्हर’ म्हणतो.) साधारण तासाभराने क्लायंट-एजन्सीवाले येतात. त्याआधी जिंगल कम्पोझ व्हावं लागतं. त्यांना ते ऐकल्यावर त्यांच्या काही सूचना असल्या तर ते त्या सांगतात. त्या अंतर्भूत करून त्यांना जिंगल ऐकवलं जातं. प्रॉडक्टचं नाव पुन: पुन्हा ‘हॅमर’ व्हावं असं त्यांचं म्हणणं असतं. प्रॉडक्टचं नाव उंच स्वरात असलं की ते पटकन् लक्ष वेधतं. मी संगीतकार असताना जिंगलमध्येसुद्धा मेलडी असायची. त्यामुळे प्रत्येकाला ते गुणगुणावंसं वाटायचं.
१० किंवा २० सेकंदांच्या जिंगल्स अधिक प्रमाणात तयार होतात. ३० सेकंद, ४० सेकंद व एक मिनिटाची अशाही काही जिंगल्स असतात. पार्टी जेवढी मजबूत; तेवढी त्यांची पब्लिसिटी जास्त. जिंगल दिवसातून कितीदा वाजावी, कोणत्या वेळी वाजवावी, याचे व्यवहार लाखो रुपयांत होतात.
साधारण दीड-दोन तासाने गायक, निवेदक येतात. गाणं रेकॉर्ड होतं. चार-पाच तासांत मिक्सिंगसकट सगळं काम झालेलं असतं. पूर्वीच्या काळी क्वार्टर टेप वापरत असत. मग ऊं३ आली. आता सीडी किंवा पेनड्राइव्हवर जिंगल घेऊन जातात.
पूर्वी जेव्हा आम्ही टेप वापरायचो तेव्हाची एक गंमत सांगावीशी वाटते. एखाद्या सफेद बॉक्समधून क्लायंटला जिंगल पाठवलं तर तो म्हणायचा, ‘याच्यात व्हॉइस जरा दबलेला आहे,’ किंवा ‘अमुक एक इफेक्ट नीट ऐकू येत नाही,’ वगैरे.. तर ‘प्लीज मिक्स करून पाठवून द्या.’ खरं तर ते मिक्सिंग आमच्याकडून परिपूर्ण झालेलं असे. पण त्याच्या समाधानासाठी आम्ही फक्त बाहेरचा बॉक्स बदलून तेच जिंगल पाठवायचो. मग त्याचा फोन यायचा- ‘हा. आता कसं परफेक्ट झालंय सगळं!’
दादरमध्ये तेव्हा साडय़ांची फार दुकानं नव्हती. खूप फॅशनही नव्हती आणि त्यांत वैविध्यही नव्हतं. पाचवारी, नऊवारी अशी मराठमोळी लुगडी मिळण्याची दोन-चार दुकानंच होती. त्याच दरम्यान ‘लाजरी’ हे अद्ययावत एअरकंडिशण्ड दुकान दादरमध्ये आलं. त्याचं जिंगल करण्याचा योग आला. ते जिंगल इतकं हिट् झालं, की दुकान धो-धो चालायला लागलं. तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं. मी व बायको त्या दुकानात खरेदीला गेलो होतो. साडय़ा बघताना एका माणसाने मला पाहिलं आणि मालकाला जाऊन सांगितलं. मालक माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘थँक्यू अशोकजी! आज हे जे काही आहे ते तुमच्यामुळे! तुमच्या जिंगलने जादू केली बघा. धंदा जोरात चाललाय.. तुमच्या आशीर्वादाने.’ मी म्हटलं, ‘तुम्ही मला कसं ओळखलं?’ तर म्हणाले, ‘आमचा हा माणूस ‘लाजरी’चं जिंगल करताना आला होता. त्यानं तुम्हाला ओळखलं.’ म्हणाले, ‘आज तुमची बायको घेईल ती साडी आमच्यातर्फे प्रेझेंट.’ ‘लाजरी’चं जिंगल गायला मी अनुराधा पौडवालला विचारलं. ती म्हणाली, ‘मी कधी जिंगल गायलेले नाही. आणि जिंगल गायचं म्हणजे..?’ मी म्हटलं, ‘गाण्यासारखं गाणंच असतं ते. आणि माझं जिंगल म्हणजे मेलडी असणारच. फक्त २०-३० सेकंदांत संपवावं लागतं.’ ती म्हणाली, ‘ओके! येते.’ इतकं मस्त झालं ते जिंगल- की त्यानंतर दादरमध्ये ‘लाजरी’सारखीच ‘मंजिरी,’ ‘गोजिरी’ अशी अनेक साडय़ांची दुकानं निघाली. आणि त्या सर्वाच्या जिंगल्सचा संगीतकारही मीच होतो, हे सांगायला मला अभिमान वाटतो.
(उत्तरार्ध)