अलीकडे म्युच्युअल फंडांच्या ‘डायरेक्ट’ प्लॅनसंदर्भात माध्यमांमधून बरेच काही बोलले आणि लिहिले जाते. अनेक बातम्या ‘डायरेक्ट’ प्लॅनमुळे गुंतवणूकदारांनी किती कोटी रुपये वाचवले आणि हे ‘डायरेक्ट’ प्लॅन कसे फायदेशीर आहेत याची माहिती देणाऱ्या असतात. आता म्युच्युअल फंडांच्या ‘डायरेक्ट’ प्लॅनबद्दल जास्त बोलण्याअगोदर हे ‘डायरेक्ट’ प्लॅन काय आहेत, हे समजून घेऊ.
म्युच्युअल फंडांच्या योजना गुंतवणूकदारांचे पैसे योजनेच्या उद्दिष्टाबरहुकूम गुंतवतात हे सर्वाना माहीत आहेच. हे काम करण्यासाठी काही पैसे गुंतवणूकदाराकडून योजनेच्या एक्स्पेन्स रेशोच्या (खर्चाच्या) रूपात वसूल केले जातात. शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या ‘इक्विटी फंड योजना’ साधारणत: गुंतवलेल्या पैशाच्या २.५ टक्के ते ३ टक्के पैसे योजना चालवायचा खर्च म्हणून दरवर्षी वसूल करतात. याच पैशातून योजनेचे सर्व खर्च भागवले जातात. त्यातच योजना विकणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिले जाणारे कमिशनदेखील आले. साधारणत: हे कमिशन पहिल्या वर्षी ०.५ टक्के ते १ टक्के असते व नंतर वर्षांकाठी ०.५ टक्क्य़ाच्या आसपास असते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर विक्रेत्याला ५०० ते १००० रुपये उत्पन्न मिळते आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही तुमचे पैसे योजनेत तसेच ठेवले तर साधारणत: ५०० रुपये मिळतात. तुम्ही जर विक्रेत्याला बाजूला सारून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेत तर विक्रेत्याला दिले जाणारे कमिशन म्युच्युअल फंडाला द्यावे लागणार नाही. इथेच म्युच्युअल फंडांच्या ‘डायरेक्ट’ योजनांचा जन्म होतो.
‘डायरेक्ट’ योजना म्हणजे अशा योजना ज्यात विक्रेत्याला कमिशन मिळत नाही. म्युच्युअल फंडांच्या प्रत्येक योजनेच्या दोन उपयोजना आहेत : रेग्युलर व डायरेक्ट.
रेग्युलर योजनेत विक्रेत्याला कमिशन असते, तर डायरेक्ट योजनेत विक्रेत्याला कमिशन नसते. त्यामुळे डायरेक्ट योजनेत एक्स्पेन्स रेशो (खर्च) रेग्युलर योजनेपेक्षा कमी असतो. दोन्ही योजनांचा फंड मॅनेजर, पोर्टफोलिओ व इतर खर्च समान असल्याने डायरेक्ट योजनेत मिळणारे उत्पन्न जास्त असते. उदाहरणार्थ, एक्सिस इक्विटी फंडाच्या रेग्युलर प्लॅनने गेल्या एका वर्षांत ३५.४७% उत्पन्न दिले, तर डायरेक्ट प्लॅनने ३६.८८% उत्पन्न दिले. दोन्ही आकडे ‘ग्रोथ’ पर्यायाचे आहेत.
दीर्घ मुदतीत तुम्ही लक्षावधी रुपये म्युच्युअल फंडांत गुंतवणार असाल तर या दोन प्लॅनमध्ये जमा झालेल्या रकमेत काही हजार रुपयांचा फरक असेल. आता हे सगळे वाचल्यावर सगळेच गुंतवणूकदार म्हणतील आम्ही ‘डायरेक्ट’ प्लॅनमध्येच पैसे गुंतवणार. पण या नाण्याची दुसरी बाजूदेखील समजून घ्या.
‘डायरेक्ट’ प्लॅन म्हणजे तुमचा म्युच्युअल फंड एजंट जे काही करतो ते सगळे तुम्हीच करायचे. कोणत्या योजनेत पैसे गुंतवायचे हे तुम्हीच ठरवायचे. त्याचा गृहपाठ तुम्हीच करणे अपेक्षित आहे. एकदा योजना ठरली की म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवरून फॉर्मची प्रिंटआऊ ट घ्यायची, फॉर्म भरायचा, चेक जोडायचा आणि रजिस्ट्रारच्या (कार्वी किंवा कॅम्सच्या) कार्यालयात किंवा म्युच्युअल फंडाच्या कार्यालयात नेऊन द्यायचा. ऑनलाइन म्युच्युअल फंड खरेदी-विक्री (म्युच्युअल फंडाच्या साइटवर) करणे शक्य आहे. त्याकरिता एकदाच ‘आय-पिन’ मागवणे वगैरे सव्यापसव्य तुम्हीच करायचे. आयसीआयसीआय डायरेक्ट, फंड्स इंडिया वगैरे वेबसाइट तुमच्यासाठी नाहीत, कारण तेही फंड विक्रेतेच आहेत. म्हणजे पाच वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या योजनेत तुम्ही पैसे गुंतवलेत तर त्या पाच फंडांच्या वेबसाइटवर जाणे, पासवर्ड – पिन वापरून व्यवहार करणे ही तुमची जबाबदारी असते. फंड स्टेटमेंट वेळेवर आले नाही तर डुप्लिकेट मागवणे, फंड हाऊ सने एखादी चूक केल्यास ती निस्तरणे ही कामे गुंतवणूकदारांनी करायची असतात. यानंतर पोर्टफोलिओवर व प्रत्येक योजनेच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे व योग्य निर्णय स्वत:चे स्वत: घेणे अभिप्रेत आहे. हे सगळे फारसे कठीण आहे असेही नाही. अलीकडे पोर्टफोलिओ ट्रॅकिंगची सेवा देणाऱ्या वेबसाइट आहेत. अर्थात या वेबसाइट सगळी आकडेवारी एकत्र करून देतात. त्या आकडेवारीचे काय करायचे ते सांगत नाहीत. म्युच्युअल फंडांचे ज्ञान घेऊन या आकडेवारीचा योग्य उपयोग करता आला तर डायरेक्ट प्लॅन तुमच्यासाठी आहे.
पण किती जणांजवळ तेवढी शिस्त व तेवढा वेळ आहे, हा प्रश्नदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. दर महिन्याला  पाच हजार रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीने डायरेक्ट प्लॅनमध्ये पैसे गुंतवणे हे वेळ, शक्ती, आर्थिक खर्च, मन:स्ताप या कसोटय़ांवर कदाचित श्रेयस्कर वाटणार नाही. पण पाच कोटी गुंतवणाऱ्या व्यक्तीने मात्र ‘डायरेक्ट’ प्लॅनचा जरूर विचार करावा. ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर ‘डायरेक्ट’ प्लॅनचा अवलंब करावा. काही व्यक्ती एक मध्यम मार्गदेखील वापरताना दिसतात. ही मंडळी गुंतवणूक सल्लागाराला एक ठरावीक फी केवळ सल्ला घेण्यासाठी देतात. सर्व व्यवहार स्वत: डायरेक्ट प्लानमध्ये करतात. काही मंडळी पर्सनल एफएन.कॉम किंवा तत्सम रिसर्च सेवा खरेदी करतात व स्वत: व्यवहार करतात. आपल्याला काय जमते व आपल्या गरजा काय आहेत याचे योग्य आकलन असेल, तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ  शकाल.    
तुमचा गुंतवणूक सल्लागार जर तुम्हाला चांगला सल्ला व चांगली सेवा देत असेल तर त्याला तुमच्या पोर्टफोलिओच्या ०.५ टक्के पैसे कमिशनच्या मार्गाने कमवू द्या. त्यातही काही वावगे नाही. दुसरा काय करतो किंवा वर्तमानपत्रात काय लिहिले जाते, यापेक्षा माझ्या गरजा काय आहेत, यावरच मी कोणत्या मार्गाने जायचे हे ठरवले पाहिजे.