‘‘डॉक्टरकाका, आज मी तुमच्याकडे पेशंट म्हणून आली आहे.’’ – ज्योती.
‘‘ज्योती.. अगं, आली आहे नाही, तर आले आहे असं म्हण.’ – डॉक्टर.
‘‘डॉक्टरकाका.. अहो, आम्हा मुलींची ही बोलण्याची फॅशनच आहे आजकालची. पाणी पिले, घरी आली. lr09तुमच्या वेळेची फॅशन वेगळीच होती. डब्बा!’’
‘‘डब्बा? म्हणजे?’’
‘‘जुन्या चालीरीतीचा माणूस- म्हणजे पुरुष. माझा उदय डब्बा नाही.’’
‘‘तुझा उदय? म्हणजे तळपदे वकिलांचा मुलगा?’’
‘‘हो. पण डॉक्टरकाका, मी त्याच कामाकरता आली होती.’’
ज्योती म्हणजे उत्साहाचा खळाळणारा झराच. आमच्या फ्लॅटच्या वरच्याच फ्लॅटमध्ये ती राहते. बी. ए.च्या शेवटच्या वर्षांला आहे. आई-वडील दोघंही प्राध्यापक. एवढीशी असल्यापासून ती आमच्याकडेच जास्त असायची. दोन-अडीच वर्षांची असताना तिनं विचारलं होतं, ‘‘डॉक्तलकाका, हा सूल्य कुथे जातो?’’ ..तिला घेऊन आम्ही लॉंग ड्राइव्हला निघालो असताना मावळत्या सूर्याला पाहून तिनं विचारलं. मानसशास्त्रात सांगिल्याप्रमाणे मी सत्य सांगायचं म्हणून तिला पृथ्वीचं परिभ्रमण, सूर्य स्वत:बरोबरचे ग्रह, चंद्र, धूमकेतू, लघुग्रह वगैरे सगळ्या लटांबरासह फिरत असतो, असं सांगत होतो. तर ही मागच्या सीटवर बसलेल्या तिच्या काकूंकडे वळून पाहत, डोक्याला तर्जनी लावून ती गोल गोल फिरवत म्हणाली, ‘‘डॉक्तलकाकाला, काहीच माहीत नाही. अले, सूल्य आपल्याकलून अमेलिकेत जातो. नंतल अमेलिकेतून आपल्याकले येतो. मी बॉल तुज्याकले फेकते, मग तू माज्याकले फेकतो, तसं सूल्याचा चेंदू आपन अमेलिकेत फेकतो, मग अमेलिका आपल्याकले फेकतो. कसा काय ले तू डाक्तल झ्यालाश?’’
बालमानसशास्त्राची सगळी पुस्तकं पॅसिफिक महासागरात बुडवावी असं वाटलं होतं तेव्हा.
‘‘डॉक्टरकाका, तुमचं लक्ष कुठे आहे?’’ ज्योतीच्या त्या प्रश्नानं मी भानावर आलो.
‘‘डॉक्टरकाका, तुमचं संशोधन मला माहीत आहे. डिटेल्स मला माहीत नाहीत; पण तुम्ही काय करता, ते मला माहीत आहे.’’
‘‘अस्सं! सांग बरं मी काय करतो? ’’
‘‘अहो काका, त्या हेडसेटच्या वायरींची दोन टोकं कानाच्या जवळ लावता.’’
‘‘वायर्सच्या त्या टोकांना इलेक्ट्रोड्स म्हणतात.’’
‘‘आम्ही त्यांना वायरीच म्हणतो.’’
‘‘बाटली.’’
‘‘बाटली? म्हणजे?’’
‘‘अशा मुलींना आम्ही ‘बाटली’ म्हणतो.’’
‘‘अस्सं होय! बरं, मग ती टोकं भिंतीवर असलेल्या प्लगला जोडता.’’
‘‘बरं झालं तू असा प्रयोग कुणावर केला नाहीस. आणि कधी करूही नकोस. हेडसेटची ती टोकं अत्यंत कमी दाबाच्या बॅटरीला आणि नंतर ती लॅपटॉपलाही जोडतो.’’
‘‘लॅपटॉपला?’’
‘‘हो. ईईजीमध्ये इलेक्ट्रिक करंट तुमच्या मनातील पूर्ण विचारांशी जोडला जातो. मानवी मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स असतात. त्यांना जोडल्यास १ लाख ७० हजार कि. मी. लांबीपर्यंतची साखळी तयार होऊ शकते. विचार करताना मेंदूत त्यासंबंधी अत्यंत कमी क्षमतेचे इलेक्ट्रिक सिग्नल्स तयार होतात. हे इलेक्ट्रिकल इम्पल्स न्यूरॉन्सच्या केमिकल रिअ‍ॅक्शनने तयार होतात. ते मोजता येतात. म्हणून मेंदूत निर्माण झालेल्या इलेक्ट्रिक सिग्नल्सचा अर्थ लॅपटॉपवर लावला जातो. स्मृती विभागात लहान लहान, मध्यम आकाराची मोठी सर्किट्स असतात.’’
‘‘मेंदूत सर्किट्स?’’
‘‘हो. विजेच्या तारांची नाही, मज्जातंतूंची सर्किट्स असतात. परीक्षेकरिता केलेला अभ्यास लहान लहान सर्किट्समध्ये असतो. म्हणून परीक्षा होताच तुम्ही तो विसरता.’’
‘‘अय्या ! खरं र र र च?’’
‘‘काही महत्त्वाचे प्रसंग मोठय़ा सर्किट्समध्ये आपोआप जातात.’’
‘‘डॉक्टरकाका, मोठय़ा सर्किट्समधले प्रसंग तुम्ही घालवू शकता ना? मला उदयच्या स्मृती सगळ्या घालवायच्या आहेत.’’ डबडबलेले डोळे रुमालानं पुसत ज्योती म्हणाली.
‘‘का गं? काय झालं? डोळे का भरून आले तुझे? मी आजच तळपदे वकिलांकडे जातो अन् उदयला जाब विचारतो.’’
‘‘डॉक्टरकाका, काही उपयोग नाही. आमचा ब्रेकअप् झालाय.’’
‘‘पण कारण काय?’’
‘‘काका, अलीकडे आमची खूप भांडणं होताहेत. वेगवेगळ्या कारणांनी. शेवटी एकमेकांना बाय केलं. मला सारख्या सारख्या त्याच्या आठवणी छळतात.’’
‘‘म्हणजे तुझं त्याच्यावर अजून प्रेम आहे.’’
‘‘हुडुत्! ‘तुझं थोबाड परत मला दाखवू नकोस,’ असं मी त्याला म्हटलंय. तोही तसंच म्हणाला.’’
‘‘तू एक आठवडय़ानंतर माझ्याकडे ये. मग विचार करतो- तुला त्याच्या आठवणींच्या गुंत्यातून सोडवण्याचा.’’

दुसऱ्याच दिवशी रविवार असल्यानं डॉक्टर तळेकर वकिलांकडे गेले. हवापाण्याच्या गप्पा झाल्यानंतर डॉक्टरांनी मुद्दय़ाला हात घातला.
‘‘काय म्हणतोय तुमचा उदय? कुठे आहे तो?’’
‘‘अगं ए सुरेखा, डॉक्टरसाहेब आलेत. कॉफी टाक त्यांच्यासाठी. तर डॉक्टरसाहेब, त्याला कंपनीनं फिनलंडला पाठवलंय. तिकडेच सेटल व्हायचं म्हणतोय. आम्ही लग्न करून कुठंही जा म्हणत होतो. पण म्हणे की, लग्नच करणार नाही.’’
‘‘अरे, पण मग गेली दोन र्वष त्यानं त्या पोरीला का नादी लावलं?’’ कॉफीचा कप तोंडाला लावत डॉक्टर म्हणाले.
‘‘तो म्हणे, त्यांचे विचार जुळत नाहीत. याला म्हणे ‘डिंक’ हवा. मी म्हटलं, अरे, दोन तिथं चार किलो डिंक घे. अन् बाळंतपणात डिंकाचे लाडू आमच्या सुनेला देऊ की भरपूर खायला.’’ कॉफी पीत वकील म्हणाले.
‘‘तसं नाही वकीलसाहेब. डिंक म्हणजे डबल इन्कम- नो किडस्.’’ कप टीपॉयवर ठेवत डॉक्टर म्हणाले.
‘‘असं होय! पण मला तो ‘डब्बा’ असं म्हणून हसत हसत गेला.’’
‘‘नो किडस्? म्हणून पटेना होय! बरं, वकीलसाहेब निघतो मी.’’
ीीी
‘‘डॉक्टरकाका, एक आठवडय़ानंतर बोलावलं होतंत मला तुम्ही. मी दोन आठवडय़ांनंतर आलीय. माझा निर्णय पक्का आहे. मला उदयच्या आठवणींच्या गुंत्यातून सुटायचं आहे.’’ – ज्योती.
‘‘कबूल. तू निर्णय विचारपूर्वकच घेतला आहेस.’’
नंतर डॉक्टरकाकांनी तिला खुर्चीत बसवलं. तिच्या डोक्याला हेडसेटच्या तारा जोडल्या. त्या तारांची टोकं लॅपटॉपला जोडली. लॅपटॉपवर ओव्हल आकाराची लहान- मोठी मज्जातंतूंची सर्किट्स दिसू लागली. काही सर्किट्सचा गुंता डॉक्टरकाकांनी सोडवून ते मज्जातंतू सरळ केले. काळजीपूर्वक हे काम करावं लागलं. दोन तासांनी डॉक्टरकाकांनी ज्योतीच्या डोक्याभोवतीच्या हेडसेटच्या तारा काढल्या.
‘‘ज्योती, आता आपण मस्तपैकी कॉफी घेऊ या. काय?’’ असं म्हणून त्यांनी बेल वाजवली.
‘‘हो. चालेल ना. पण माझं डोकं गरगरतंय जरा.’’
‘‘अशीच स्वस्थ बसून राहा. पंधरा मिनिटांत तुला बरं वाटेल.’’
त्याचवेळी अटेंडंट सांगायला आत आला- ‘‘तळेकर वकील भेटायला आलेत. पेशंट म्हणून नाही, मित्र म्हणून.’’
‘‘पाठव त्यांना आत.’’
‘‘डॉक्टर, आमचं करट म्हणतंय की तो डिंकाचा आग्रह सोडून देतो. ज्योतीला म्हणावं तू पाहिजे तितक्या वेळा डिंकाचे लाडू खा.’’
‘‘म्हणजे?’’ डॉक्टरांच्या प्रश्नात जानच नव्हती.
‘‘म्हणजे काय? अहो, उदय ज्योतीच्या अटींवर लग्नाला तयार आहे. तिला तो मुळीच विसरू शकत नाही म्हणे.’’
‘‘डॉक्टरकाका, कोण हा उदय?’’ – इति ज्योती.
डॉक्टरकाका – sharadpuranik4@gmail.com