जगातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या विद्यापीठांनी, व्यवस्थापन शास्त्रवेत्त्यांनी डॉ. डेमिंगच्या शिकवणुकीला फारसे महत्त्व दिलेले नाही. हार्वर्ड- स्टॅनफोर्डसारख्या जगातील सर्वात मान्यताप्राप्त विद्यापीठांनी तर त्याच्या विचारसरणीचा तीव्र धिक्कार केलेला आहे. कदाचित डॉ. डेमिंगच्या विचारसरणीचे महत्त्व जाणवण्याकरता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
‘जगणे व्हावे गाणे’ या लेखमालेतील हा अखेरचा लेख. गेले संपूर्ण वर्ष आपण डॉ. डेमिंग या विचारवंताच्या विचारधनाचा काही प्रमाणात परिचय करून घेतला. दुसऱ्या महायुद्धात अणुस्फोटामुळे बेचिराख झालेल्या जपानच्या पुनíनर्माणाचा शिल्पकार ही डॉ. डेमिंग याची खरी ओळख. जपानी जनतेने हा जो अभूतपूर्व चमत्कार घडवला त्याचे वर्णन करताना डॉ. डेमिंग कायम एक उपमा वापरत असे. सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे असा हा बदल होता.
वास्तविक डेमिंगचा आग्रह एका नव्या व्यवस्थेचा होता. याविषयी बोलताना डॉ. डेमिंग म्हणतो- ‘‘माणसाची अंगभूत प्रेरणा हा ऊर्जेचा अक्षय स्रोत आहे. आणि या स्रोताला सर्व प्रकारच्या बंधनांतून मुक्त करणं हे माझ्या नव्या व्यवस्थेचे ध्येय असेल. मूल्यमापनात दुसऱ्यापेक्षा उच्च दर्जा प्राप्त करणं, प्रतिस्पध्र्यापेक्षा वरची श्रेणी मिळवणं, इतरांना पराभूत करून अव्वल क्रमांकासाठी झटणं, ही आहे आजची प्रचलित व्यवस्था! याऐवजी माणसा-माणसांत, समाजात, समुदायांत, अगदी राष्ट्रा-राष्ट्रांतही परस्पर सहकार्य व सौहार्दाची प्रतिष्ठापना व्हायला हवी. याचा परिणाम असेल नवोन्मेष, नवनवीन कल्पना, नवे विज्ञान, नवे तंत्रज्ञान, नव्या विस्तारित बाजारपेठा, नवनवीन उत्तमोत्तम सेवा आणि या सेवांचा चढा मोबदला आणि तोही प्रत्येकासाठी!
या व्यवस्थेत काम करण्यात असेल अत्युच्च आनंद आणि शिकण्यात परमोच्च मौज. ज्याला स्वत:चे काम करण्यात आनंद वाटतो अशा व्यक्तीबरोबर काम करण्यात परमसुख असते, याचा प्रत्यय या व्यवस्थेत येईल. या व्यवस्थेत प्रत्येक जण यशस्वी असेल. पराभूत कोणीच नसेल. प्रत्येक जण खूप काही कमावेल. गमावणार कोणीच काही नाही.’’
ही नवी व्यवस्था निर्माण करण्यात त्याला काही प्रमाणात यश आले ते फक्त जपानमध्ये. मात्र, त्याचबरोबर आपण हेही लक्षात घ्यायला हवे की, जगातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या विद्यापीठांनी, व्यवस्थापन शास्त्रवेत्त्यांनी डॉ. डेमिंगच्या शिकवणुकीला फारसे महत्त्व दिलेले नाही. हार्वर्ड- स्टॅनफोर्डसारख्या जगातील सर्वात मान्यताप्राप्त विद्यापीठांनी तर त्याच्या विचारसरणीचा तीव्र धिक्कार केलेला आहे. कदाचित डॉ. डेमिंगच्या विचारसरणीचे महत्त्व जाणवण्याकरता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
एका बाजूला हे चित्र आहे, तर दुसरीकडे अनेकांनी आपल्या आयुष्याला डेमिंगच्या परिसस्पर्शाने नवा अर्थ लाभल्याची कबुली दिली आहे. जेम्स मॅकिंगवेल हा अशांपैकीच एक. ‘गॅलरी फर्निचर’ या जगप्रसिद्ध फर्निचर उद्योगसमूहाचा हा मालक. आपल्याकडे अनेकांना याचे नाव ठाऊक नसेल. पण टेनिस-जगतातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘यू. एस. ओपन’ स्पर्धेचा हा अनेक वर्षे प्रायोजक होता. यावरून त्याच्या व्यावसायिक साम्राज्याची व्याप्ती किती असेल याची कल्पना आपण करू शकतो.
इ. स. २००० साली डॉ. डेमिंगची जन्मशताब्दी जगभरात अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली. जेम्सने यानिमित्ताने इंग्लंडमध्ये एका अतिशय हृद्य सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. डेमिंगविषयी बोलताना तो म्हणाला- ‘डॉ. डेमिंगला मी अखेरचे पाहिले तो क्षण, ती भेट आजही माझ्या स्मरणपटलावर कोरलेली आहे. १९९३ साली एका चर्चासत्रात भाग घेण्यासाठी मी गेलो होतो. माझा मुलगादेखील माझ्याबरोबर होता. चार दिवस सलग अखंडपणे डॉ. डेमिंग यांचे विचार प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकण्याची संधी मला मिळणार होती. त्यावेळी डॉ. डेमिंग यांचे वय ९३ वर्षांचे होते. वयोमानामुळे त्यांचे वजन कमालीचे घटले होते. जेमतेम ५० किलो असेल-नसेल. डॉ. डेमिंग यांना श्वसनाचा त्रास होत होता. एका ऑक्सिजनच्या सिलिंडरद्वारे त्यांना कृत्रिमरीत्या नळ्यांद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. अशा अवस्थेत डॉ. डेमिंग चार दिवस अखंड बोलणार होते. समोर बसलेली सर्व श्रोते मंडळी मनातून पुरती धास्तावली होती. डॉ. डेमिंग यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळणार याचा आनंद व उत्तेजना तर होतीच; पण दुसरीकडे डॉ. डेमिंगची ती जर्जर अवस्था पाहून चिंताही वाटत होती. मंगळवारी सकाळी डॉ. डेमिंग यांनी बोलायला सुरुवात केली. चार दिवस रोज आठ तास हा वाक्यज्ञ चालणार होता. मंगळवार उजाडला. बुधवार पार पडला. गुरुवार लोटला.
चौथा दिवस.. शुक्रवार उजाडला. डॉ. डेमिंगने बोलायला सुरुवात केली. तीन दिवसांचा शीण त्यांच्या बोलण्यात स्पष्ट जाणवत होता. व्याख्यानांचा ताण शरीराला झेपत नव्हता. बोलताना प्रचंड धाप लागत होती. श्वास घेताना शरीराला खूप क्लेश व यातना होत होत्या हे सर्वानाच जाणवत होते. सकाळी साडेनऊ वाजता रोजच्या वेळापत्रकानुसार पंधरा मिनिटांचा ब्रेक घेण्यात आला. श्रोत्यांमध्ये अस्वस्थता होती. एकाने धाडस केले आणि तो डॉ. डेमिंग यांना जाऊन भेटला आणि म्हणाला, ‘‘डॉ. डेमिंग आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतंय की, आपण थांबावं. तुमची अवस्था बघता तुम्हाला अजून सहा तास बोलायला लावणं हे अमानुष आहे. आपण थांबू या. आपण घरी जा. विश्रांतीची गरज आहे तुम्हाला. कोणीच यात काही गैर मानणार नाही. मी परत परत विनवणी करतो. आपण आता थांबू या. आम्हालाच तुमची ही अवस्था आता बघवत नाहीए. कशाकरता हा अट्टहास?’’
डॉ. डेमिंगने त्या माणसाकडे पाहिले. डेमिंगच्या सुरकुतलेल्या, थकलेल्या चेहऱ्यावर एक मंद हास्य पसरले. तो म्हणाला, ‘‘मी हे सगळे करतो आहे कारण माझ्यावर परिवर्तनाची जबाबदारी आहे.’’
जेम्सने आपल्या भाषणात हा प्रसंग सांगितला. त्याचा कंठ दाटून आला होता. एक क्षणभर तो थबकला. त्याने आवंढा गिळला आणि पुढे म्हणाला, ‘‘आपल्या प्रत्येकावर हे परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी आहे.’’
आज या लेखमालेचा शेवट करताना आमचीही नेमकी हीच धारणा आहे. गेले वर्षभर या लेखमालेच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ परिवाराशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अनेकांनी आपले अनुकूल अभिप्राय ई-मेल, फेसबुकच्या माध्यमातून आवर्जून कळवले. सर्वाचेच आम्ही मनापासून आभारी आहोत. आपल्या प्रत्येक भाषणाच्या शेवटी डॉ. डेमिंग म्हणायचा- ‘आय हॅव ओन्ली डन माय बेस्ट!’ या लेखमालेचा शेवट करताना डॉ. डेमिंग यांच्या याच शब्दांचा आधार घेत आम्हीदेखील हेच म्हणतो-
‘वुई हॅव ओन्ली डन अवर बेस्ट!’     
(समाप्त)

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण