गिरीश कुबेर यांचा ‘हर चुनाव कुछ कहता है’ (१४ सप्टेंबर) हा लेख नेहमीप्रमाणेच तर्कसुसंगत व मुद्देसूद होता. लोकसभेत मोदी लाट, महाराष्ट्रात खंबीर नेतृत्वाच्या ठोस पर्यायाचा अभाव आणि नवीन मतदारांची ‘भरती’ हे तीनही मुद्दे पटले. यातील एक महत्त्वाचा मुद्दा नेत्यांच्या आणि जनतेच्या उदासीनतेचाही आहे. काँग्रेसची निर्णयप्रक्रिया, भ्रष्टाचार, महागाई या भस्मासुरांना रोखण्याच्या प्रयत्नांच्या उदासीनतेमुळे मोदी लाटेला जनतेनं डोक्यावर घेतलं. मतदानप्रक्रियेत जनता उदासीन न राहता आक्रमक बनली म्हणून हे साध्य झालं. पण विधानसभेच्या निवडणुकीत सारेच उमेदवार कामाच्या बाबतीत उदासीन राहून एकमेकांचे पाय ओढण्याच्या पावित्र्यात जनतेच्या हिताचा विचार बाजूला ठेवत असल्याचं दिसल्यावर मतदार ‘आहे ते ठीक आहे’ असं म्हणून मतदानाच्या बाबतीत उदासीन राहिले तर राज्यात सत्ताबदलाचं चित्र लांबच राहण्याची शक्यता जास्त आहे. कारण सत्तेबाहेर असताना जनतेला हक्कांची जाणीव करून देणारे राज्यकत्रे तिला निर्णयप्रक्रियेत उदासीन कसं ठेवता येईल हेच बघू लागतात.
मोदीलाटही १०० दिवसांतच ओसरू लागली की काय, अशी शंका व्यक्त करणाऱ्यांना एकच विचारावंसं वाटतं की सरकार चालवणं हा भातुकलीचा खेळ आहे का? त्यामुळे थांबा, पहा, पुढे जा हाच संयम अंगीकारायला हवा. त्यादृष्टीनं झंझावात ओसरल्यावर थोडीशी मरगळ येणं साहजिक आहे. कदाचित त्या मरगळीतून ‘अब की बार, जैसा होता है हरबार’ असं म्हणून चाललंय ते चालू देत असंच मतदार मतदानातून दाखवतील. पण काही का असेना, मोदीलाटेनं उमेदवारांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अन् प्रसारमाध्यमांचा उपयोग करायला शिकवलं, चपळ आणि जनहिताच्या हालचाली करायला उत्तेजन दिलं, जनतेच्या डोळ्यात एक चमक आणली, हे काय कमी आहे? आशा करूया की विधानसभेतही ठोस नेतृत्व मिळेल.

घोडामैदान लांब नाही
गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचं सुंदर विश्लेषण केलं आहे. मला वाटतं, काँग्रेस पक्ष मजबूत असला असता तर ही निवडणूक त्यांना जिंकता आली असती. पण काँग्रेसकडे मनुष्यबळ आहे का आणि ते किती जागा मिळवू शकतील याचाही अंदाज घ्यायला हवा. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिमा तेवढी खराब नाही. अजूनही लोकांना त्यांच्याबद्दल थोडा तरी विश्वास वाटतो. ते मनमोहन सिंगांसारखे अजून निस्तेज वगैरे वाटत नाहीत. मुख्य म्हणजे, दोन्ही पवारांपेक्षा ते जास्त विश्वसनीय वाटतात. लोकसभेत मिळालेल्या पाच-सहा जागांवर पवार (दोन्ही) काँग्रेसला नडत आहेत. महाराष्ट्र हे सगळे बघत आहे. कदाचित जनता नाइलाजाने काँग्रेस आघाडीच्याच झुल्याला लोंबकळेल. बघूया, लोक कसे, कुणाच्या बाजूने मतदान करतात! घोडामैदान लांब नाही, पण मधल्या अवधीत काय काय घडते तेही पाहायला हवे.
– अनिल जांभेकर, मुंबई .

सर्वात पुढे महाराष्ट्र माझा?
संजय पवारांचा ‘सार्वजनिक शरमेची गोष्ट’ (१४ सप्टेंबर) हा लेख महाराष्ट्रातील सर्वच स्त्री-पुरुषांनी अगदी न लाजता वाचायला हवा. त्याहीपेक्षा आगामी निवडणुकांच्या आखाडय़ात उतरणाऱ्या तमाम मल्लांनीही आवर्जून त्याचे वाचन करायला हवे आणि महिलावर्गाची होणारी कुचंबणा समजून घ्यायला हवी. सत्ताधारी पक्षाच्या प्रगत महाराष्ट्राच्या जाहिरातींत दिसणारे बीकेसीमधील रस्ते, मेट्रो रेल्वे प्रवासी हे सर्व तोंडी लावण्यापुरतेच आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ मुंबई, पुणे नव्हे तर इतरही अनेक शहरे-गावे आहेत. तेथील राहणीमान, जेवण, वस्त्र, आरोग्य या मूलभूत सुविधा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, गावगुंडांकडून होणारी मुस्कटदाबी, पाण्यासाठी तहानलेली गावे, न्यायाच्या प्रतीक्षेत संपणाऱ्या पिढय़ा.. हा महाराष्ट्र  या पक्षाला माहीत आहे का? तो कोण बघणार? आजही प्राथमिक सोयी-सुविधांसाठी चाचपडण्याची लाज वाटते.
– अनिल पाठक, विरार, मुंबई.

 काव्यात्म अरण्यसंवेदन
विश्वास पाटील यांचा ‘गौताळ्याचा अरण्यानुभव’ (१४ सप्टेंबर) हा लेख एका विशाल मनाचे समृद्ध चिंतन होते. लेखकाचे मन दृश्यापलीकडे जाऊन उत्तुंग आभाळात विहरते. साऱ्या मानवजातीचे आणि अरण्याचे आदिम नाते प्रेमाने गोंजारते. अरण्यात राहणाऱ्या मानव समूहाचे भावजीवन, आभाळ-धरणीचे तरल संवाद छेडणारी ती अलौकिक संध्याकाळ, मानवाच्या शेतीसंस्कृतीला वस्तिस्थान देणारी अरण्ये, भयकारी पशूंची निरागसता जपणारी अरण्ये, मानवी मनाला सत्य-असत्यातल्या द्वैतात आंदोलित ठेवणारा अरण्यातला संधिप्रकाश आणि शेवटी पुन्हा निर्भय युवायुगुलांचा मदनोत्सव. लेखकाने खूप मोठय़ा कालपटलाचा प्रवास घडवला आणि पुन्हा आदिम प्रेरणांशी आणून सोडले. एका सिद्धहस्त लेखकाच्या आतला व्यासंगी वाचकही काजव्यासारखा अधूनमधून प्रकाशत होता. नयनाभिराम, विश्रब्ध, विकीर्ण, अरण्यानिधान अशी शब्दनक्षत्रे या कलात्मक अनुभवाच्या आभाळात चमकत होती.  
– सुनंदा पतकी