‘आरटीओ’समोरील इमारतीत वीज मीटर जळाले

नाशिक : टाळेबंदीच्या काळात उद्योग, व्यवसाय आदी वर्गवारीतील ग्राहकांचा वीज वापर कमी झाला असताना वाढत्या तापमानामुळे घरगुती वीज वापर वाढला आहे. त्यामुळे अतिरिक्त दाब वाढून विद्युत यंत्रणा अथवा रोहित्रात बिघाड होऊन ते नादुरुस्त होऊ शकतात. सोमवारी रात्री काहीशी अशीच घटना आरटीओ रस्त्यावरील गोविंदा अपार्टमेंटमध्ये घडली. इमारतीतील ३२ सदनिकाधारकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. यासारखे प्रकार रोखण्यासाठी ग्राहकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर तसेच अनावश्यक वीज वापर करण्याचे टाळावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज वितरण प्रणालीतील दोषामुळे आरटीओ कार्यालयासमोर गोविंदा अपार्टमेंटमध्ये काही मीटर आणि अंतर्गत वीज वायर जळण्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जाते. वीज कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन तपासणी केली. इमारतीच्या अंतर्गत यंत्रणेत दोष असल्याचे सांगितले. इमारतीतील रहिवाशांना रात्र अंधारात काढावी लागली. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, टाळेबंदीच्या  काळात महावितरण अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी सज्ज आहे. जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय बंद असल्याने वीज वापर कमी झाला आहे. परंतु, तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला आहे. प्रचंड उकाडय़ामुळे घरगुती वापर वाढला आहे.

टाळेबंदीमुळे सर्व जण घरी असल्याने आणि तापमान वाढल्याने सर्वाची भिस्त वीज उपकरणांवर आहे. गरजेनुसार वीज वापरण्यास हरकत नाही. मात्र, अनावश्यक वापर टाळला पाहिजे. मुख्यत्वे ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इलेक्टिक शेगडीचा वापर केला जातो. हीटर, वातानुकूलित यंत्रणा यासारखी अतिदाबाची विद्युत उपकरणे वापरू नये. त्यामुळे अतिरिक्त दाब वाढून आपल्या भागातील रोहित्रात बिघाड होऊन ते नादुरुस्त होऊ शकतात. एकाच वेळी सर्वत्र वापर वाढल्यास रोहित्र नादुस्त होण्याची संख्यासुद्धा  वाढू शकते. टाळेबंदीमुळे रोहित्र दुरुस्तीच्या कामास मर्यादा आहे. खासगी युनिटमध्ये कर्मचारी, साहित्याची वानवा भासू शकते. रोहित्र, ऑइल मिळण्यास विलंब होऊ शकतो. कृषी पंप ग्राहकांनी मंजूर क्षमतेच्या मोटारी वापराव्या, तसेच कृषी वा गावठाण वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकडे अथवा हुक कोणी टाकणार नाही याची दक्षता घ्यावी. जेणे करून दाब वाढून रोहित्रात बिघाड वा नादुरुस्त होणार नाही. असे झाल्यास दुरुस्तीला वा वाहतुकीला या काळात विलंब लागू शकतो. सर्व वीजग्राहकांनी आपला वीज वापर गरजेनुसार, रोहित्राच्या क्षमतेनुसार करावा जेणेकरून सुरळीत वीजपुरवठा राहण्यास मदत होईल, असे महावितरणने म्हटले आहे.