ज्या दिवशी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तो दिवस- २५ जून १९७५. तो स्मरणात राहण्याचे कारण म्हणजे- त्या दिवशी मी आमच्या डॉक्टर मित्रांबरोबर ओतूरला सहलीला गेलो होतो. ओतूरच्या प्राथमिक lok02आरोग्य केंद्रात आमचा मित्र डॉ. श्याम दामले अनुभवासाठी मेडिकल ऑफिसर म्हणून वर्षभर कामाला होता. त्याने आम्हाला आग्रह करून बोलावले होते. सोबत राजेंद्र देव, विजय ऊर्फ छब्या अभ्यंकर, मूळचा ओतूरचाच असणारा आणि आता पुण्यातला प्रख्यात सर्जन रमेश डुंबरे असे डॉक्टर मित्र. आमची ओळख फग्र्युसन कॉलेजमधली- १९६५ पासूनची. दिवसभर आणे-माळशेज घाट, कपर्दीकेश्वर मंदिर हिंडून झाल्यावर संध्याकाळी सामिष आहार तयार होण्याच्या प्रतीक्षेत असताना, त्या वेळचा विरंगुळा म्हणजे ट्रान्झिस्टर रेडिओवर विविध भारतीची गाणी ऐकणे चालू होते. आमच्या बरोबरचे सगळे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले, मध्यमवर्गातून आलेले, करिअर सुरू करण्याच्या बेतात. बरेच इंजिनीअरिंग, मेडिकल करून परदेशांत पुढच्या शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत. मी ७२ पासून बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे सरकारी नोकरीत रुजू. ‘घाशीराम’चा १००वा प्रयोग नुकताच मुंबईत झालेला. मी लिहिलेल्या ‘महानिर्वाण’चे प्रयोगही चालू होते. ७५ च्या राज्य नाटय़ स्पर्धेत मोहन गोखले माझे ‘महापूर’ नाटक बसवणार होता त्याची चर्चा चालू होती. अद्याप कोणाची लग्ने झालेली नव्हती. प्रथेप्रमाणे रीतसर बघणे किंवा प्रेमात पडणे, त्या बेतात असणे किंवा एकतर्फी लढत राहणे अशा कॉम्बिनेशन्सची उपकथानके जागोजागी
चालू असत.
गाणं मधेच थांबून अनाउन्समेंट चालू झाली की देशात घटनेच्या कलम ३५२ अन्वये इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी लागू केली आहे. सर्व प्रमुख विरोधी पक्षनेते जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नाडिसपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंत, अटकेत किंवा स्थानबद्ध केले आहेत. आमची लगेचची  प्रतिक्रिया सुन्नतेची होती. काहीतरी गंभीर आहे एवढंच जाणवलं. पण ३५२ कलमाखाली नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यसारख्या मूलभूत हक्कांवर गदा आलेली आहे हे जाणवायला वेळ लागला. १९७१च्या बांगलादेश युद्धामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता वादातीत असताना त्यांनी निवडणुकीमध्ये यशपाल कपूर या सरकारी अधिकाऱ्याची मदत घेतली. म्हणून चालू असलेल्या खटल्याचा अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधी गेला आणि त्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली. या हायकोर्टाच्या निर्णयाचे वर्णन काही प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांनी ‘‘अशा क्षुल्लक कारणानी इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याचा खटला भरणे म्हणजे त्यांनी ट्रॅफिक लाइट तोडला म्हणून केस चालवल्याप्रमाणे आहे.’’ असे केले होते. म्हणून त्यांनी ही एकाधिकारशाही लादावी हे पटत नव्हते. त्यांना अपील करता आले असते. त्यांनी राजीनामा देऊन काही काळ बाजूला व्हायला पाहिजे होते. तरी त्यांचे महत्त्व कमी न होता वाढलेच असते. पण ते होणे नव्हते. या सगळ्यात आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांची पत कमी झाली. भारतीय लोकशाहीच्या वाटचालीवर आणीबाणीचा काळ हा कायमचा ठळक ओरखडा उमटला गेला. पण आचार्य विनोबा भावे यांनी आणीबाणी म्हणजे ‘अनुशासनपर्व’ असे वर्णन करून पाठिंबा दर्शविला होता. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादली गेली. सरकारमान्य बातम्याच देण्याने त्यांची घुसमट होऊन त्यांच्या विचारस्वातंत्र्यावरच गदा आलेली होती. नुकतेच सुरू झालेले हे दूरदर्शन तर पूर्णपणे सरकारी माध्यमच होते. मग आठवत गेलो की आपली अशी घुसमट कधी झाली होती? lr04पुन्हा थोडं मागे जायला पाहिजे. नाटकांत आणलं ते भालबा केळकरांनी. ६५-६९ दरम्यान फग्र्युसन कॉलेजमध्ये सायन्सला असताना ते केमिस्ट्री शिकवायचे. त्यांनी १९५२ मध्ये श्रीराम लागू, जयंत धर्माधिकारी, ताराबाई घारपुरे, वसंत नूलकर यांच्याबरोबर स्थापन केलेली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) ही हौशी नाटय़ संस्था त्या वेळचा मध्यमवर्गीय सांस्कृतिक मानदंडच झालेली होती. पुण्यात पीडीए आणि महाराष्ट्रीय कलोपासक, मुंबईला विजया मेहतांचे रंगायन आणि नागपूरला पुरुषोत्तम दारव्हेकरांचे रंजन कला मंदिर या चौकोनात मराठी हौशी, प्रायोगिक रंगभूमी नांदत होती. वसंत कानेटकरांना नाटककार म्हणून प्रथम भालबांनीच पुढे आणले होते. त्यांची ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘देवांचे मनोराज्य’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ ही नाटके संस्थेनी केलेली. अभ्यासू दिग्दर्शक म्हणून अत्यंत सालस, शांत, प्रेमळ व्यक्तिमत्त्वाच्या भालबांचा हौशी रंगभूमीवर मोठा दबदबा होता.
१९६७ मध्ये फग्र्युसनच्या गणेशोत्सवासाठी भालबा, बबन प्रभू लिखित, त्या वेळी गाजत असलेला, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हा फार्स बसवत होते. माझी मेडिकलची अ‍ॅडमिशन गेल्यामुळे मी विमनस्क मन:स्थितीत होतो. बरोबरचे सगळे मेडिकल, इंजिनीअरिंग, आयआयटीमध्ये निघून गेलेले. काही वेळ व्यायाम आणि बराच वेळ ‘वेळ’ घालवण्यासाठी मी रोज फग्र्युसनच्या टेकडीजवळच्या जिमवर जायचो. जाताना वाटेत अ‍ॅम्फी थिएटर लागायचे, तिथे या नाटकाची तालीम चालू असायची. गंमत म्हणून तालीम बघत बसत असे. कर्मधर्मसंयोगाने दिनूचे काम करणारा मुख्य नट फग्र्युसनच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन झाल्याने अचानक काम सोडून गेला. त्याच्या जागी मी केवळ रोज नाटकाची तालीम बघायला येतो, म्हणून भालबांनी दिनूच्या कामासाठी मला घेतले. नव्याची नवलाई होती. कॉलेज पातळीवरचा प्रयोग मात्र खूप रंगत असे. निदानlr06 आम्हाला तरी तसे वाटत असे. या प्रयोगाने एक झाले की माझी मेडिकलची अ‍ॅडमिशन गेल्याने आलेली विमनस्कता मात्र कमी झाली. नाटकाचा थोडा थेरपी म्हणून उपयोग झाला. काहीसा आत्मविश्वास आला आणि वाटायला लागलं की नाटक हेच आपलं माध्यम आहे की काय? नाटकामुळे भालबांशी जास्त ओळख वाढली. नवे मित्र मिळाले. त्यात नाटकवाले समर नखाते, अनंत कान्हो (कुलकर्णी) आणि इतर म्हणजे विनय हर्डीकर, पुढे अर्थतज्ज्ञ झालेला संतोष दास्ताने, नंतर प्रसिद्ध उद्य्ोजक झालेला प्रमोद चौधरी हे दोघे तर शाळेपासून बरोबर. तो आर्टस्ला गेला. नंतर आयएएस झालेला बारामतीचा प्रभाकर ऊर्फ बापू करंदीकरने पहिली दोन वर्षे सायन्सची करून मग तो आर्टस्ला गेला. बापू मसुरी इथे आयएएसच्या ट्रेनिंगला असताना त्याने, मी लिहिलेली ‘एक झुलता पूल’ ही एकांकिका हिंदीमध्ये सादर केली होती. अजित पारसनीस नंतर lr05आयपीएस झाला. देव आनंदची नक्कल तो उत्तम करीत असे. दिलीप कर्णिक नंतर उत्तम वकील होऊन हायकोर्टचा जज्ज झाला. घटनातज्ज्ञ झालेला उल्हास बापट, राजकारणात गेलेले राम निंबाळकर, श्रीकांत शिरोळे असे बरेच नंतर आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध झाले. नाटकातले काही सिनियर्स ओळखीचे झाले, त्यात सुभाष जोशी, दिलीप जगताप.
गणेशोत्सवाचे नाटक झाल्यावर भालबांनी मला आणि समरला पीडीएमध्ये आणले. आम्हाला रंगमंचामागच्या कामात मदत, कपडय़ांना इस्त्री करून आणणे वगैरेला जुंपले. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘तू वेडा कुंभार’ नाटकाचे प्रयोग तेव्हा जोरात चालू होते. हे नाटक राज्य नाटय़ स्पर्धेत गाजले होते. भरपूर गर्दी होत असे. त्या नाटकाच्या मॉब सीनमध्ये आम्हाला ग्रामीण कपडय़ात उभे करीत असत. नाटकाचे दिग्दर्शन भालबांचे होते. आम्हाला ते अत्यंत प्रेमाने वागवायचे. कायम हॉटेलमध्ये खायला घेऊन जायचे. या नाटकामुळे एक झाले की जब्बार पटेलशी ओळख झाली, कारण तो त्या नाटकात मुख्य भूमिका करीत असे. अन्य भूमिकांमध्ये श्रीराम खरे, सेवा चौहान आणि जयंत धर्माधिकारी हे होते.
६४ मध्ये सुरू झालेल्या ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेचा जब्बार हा सलग दोन वर्षे विजेता हिरो होता. त्याच्या भोवती नेहमी तरुण होतकरू नटवर्ग असायचा. त्यात मोहन आगाशे, विद्याधर वाटवे, श्रीनिवास पानवलकर हे तिघे आतल्या गोटातले, कारण ते सगळे बी. जे. मेडिकलचे. त्यांना जब्बारचे प्रमुख झांजकरी म्हणत. याशिवाय साहित्यिक ना. सी. फडके यांची मुलगी अंजली फडके (आता जोशी), रमेश मेढेकर, सुरेश बसाळे, रमेश टिळेकर, कल्पना भालेराव (देवळणकर), मीनल चव्हाण (गोखले), सुनील कुलकर्णी अशा गँगमध्ये समर आणि माझा शिरकाव झाला. काही दिवस सुहास काळे म्हणजे आताची प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशीपण होती. ती नंतर दिल्लीला एन. एस. डी. मध्ये गेली. यांच्या गँगचे रूपांतर हळूहळू ‘स्टडी सर्कल’मध्ये होत गेले. त्यात ७०-७१ नंतर मोहन गोखले, चंद्रकांत काळे, नंदू पोळ, दीपक ओक, आनंद मोडक अशी भर पडत गेली. हे ‘स्टडी सर्कल’ प्रकरण पीडीएमधल्या वरिष्ठांना फारसे रुचले नव्हते. कारण नव्या पिढीचे उगवलेले हे उपकथानक संस्थेत असणे त्यांना मान्य नसावे. पण भालबा हा मात्र दोन्ही पिढय़ांना जोडणारा दुवा होता. त्यांच्याशी मतभेद होतील, पण भांडण कधी होणार नाही असा अत्यंत सभ्य माणूस.  
६८-६९ दरम्यान मी एक एकांकिका लिहिली होती ‘भजन. ‘सत्यकथा’च्या अंकात ती तेव्हा छापून आली. त्याचे वाचन स्टडी सर्कलमध्ये झाले. त्या वेळी औद्य्ोगिक क्षेत्रात मंदी होती. नोकऱ्या फक्त सरकारी क्षेत्रातच होत्या. त्यामुळे तरुणांत भरपूर बेकारी आणि त्यातून येणारी अस्वस्थता, निराशा, घरच्यांशी विसंवाद, व्यक्तिगत तसेच सार्वजनिक मूल्यांची घसरण असा काहीसा विषय ‘भजन’मध्ये होता. भाषा त्या वेळच्या तरुणाईची होती, भडक होती. सुरेश बसाळे म्हणाला, मी ती पीडीएमध्ये बसवतो, म्हणून त्यांनी भालबांना विचारून तालमी सुरू केल्या. काही दिवस तालमी झाल्या. एक दिवस ‘तू वेडा कुंभार’चा  प्रयोग भरत नाटय़ मंदिरात चालू होता. त्या वेळी मला जरा वेगळेच वातावरण जाणवले. सगळे गंभीर. मग भालबा मला बाजूला घेऊन म्हणाले की, ‘भजन’ एकांकिका करता येणार नाही. कारण त्यातील संवाद, भाषा शिवराळ आहे. सभ्य नाही. आपल्या संस्थेत ही एकांकिका नको. मी म्हटलं की, सर, तुम्ही एकांकिका वाचलीत का? ते म्हणाले की, मला त्याची गरज वाटत नाही. माझे जुने सहकारी म्हणताहेत त्याच्यावर माझा विश्वास आहे. आपल्या संस्थेच्या परंपरेत बसणारी ही कलाकृती नाही. माझा निर्णय झाला आहे वगैरे. सगळ्यांनी माझी समजूत घातली की आपण एकांकिका नंतर करू. दुसऱ्या संस्थेतर्फे करू. भालबा तर माझे गुरू. त्यांनी मला नाटकात आणलं. पण मग ते माझी एकांकिका न वाचताच मला असं कसं म्हणतात? मला वाटलं, ते मला समजून सांगतील की एकांकिकेमधल्या त्रुटी काय आहेत. पण नाही, त्यांनी निर्णय दिला आणि तो अंतिम ठरून आमच्या तालमी बंद झाल्या. एका नाटकाच्या संस्थेतले ज्येष्ठ कलाकार असे का वागले? एक नाटक बंद करावे असे त्यांना का वाटले? मुख्य म्हणजे हे मी का सहन करायचं? नाटक आवडलं नाही, म्हणून केलं नाही हे ठीक. पण तालमी सुरू असलेली एकांकिका, भाषा सभ्य नाही, म्हणून थांबवायची? ही सभ्यता ठरवायची कोणी? समजूत घालून मला गप्प केलं. मीही धुमसत गप्प राहिलो. विचार दाबल्याची घुसमट प्रथम वाटय़ाला आली ती अशी. ते असेल ६९-७० साल. तेव्हा काही आणीबाणी नव्हती.
रेडिओवर आणीबाणीची घोषणा संपून परत गाणी सुरू झाली. ही घोषणा आम्ही ओतूरच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम ऐकली आणि ऐकणारा हा आमचा ग्रुप मात्र अजून टिकून आहे. मी सोडून अन्य सगळे डॉक्टर्स. त्यात विनय ढवळे, अरुण किनरे, सुरेश खरे, प्रमोद होनशेट्टी, शाम कागल अशा डॉक्टर मित्रांची भर पडत गेली. पैकी विश्वनाथ चितळे नुकताच गेला. इतकी वर्षे झाली तरी अजून दररोज सकाळी सात वाजता हा आमचा ६५ पासूनचा असलेला ‘आणीबाणी’ ग्रुप टेकडीवर फिरणे झाल्यावर कॉफीसाठी फग्र्युसन रस्त्यावरच्या ‘रूपाली’ हॉटेलवर जमत असतो.
पण खऱ्या अर्थाने देशात सर्वसामान्य लोकांना आणीबाणी जाणवली ती भारतभरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या पुरुष नसबंदी (५ं२ीू३े८) शस्त्रक्रियांच्या अतिरेकाने आणि बऱ्याच ठिकाणी झालेल्या त्यासाठीच्या बळजबरीने. अशा रीतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम ऐकलेल्या ‘आणीबाणी’च्या मुळावर, प्राथमिक आरोग्य केंद्रातच झालेल्या नसबंदी शस्त्रक्रिया आल्या. १९७७ साली इंदिरा गांधींच्या पराभवाचे ते एक मोठे कारण ठरले. कारण आकडेवारी सांगते की १९७६-७७ दरम्यान भारतात ८२ लाख अशा शस्त्रक्रिया झाल्या, ज्या नेहमी प्रतिवर्षी २७ लाख होत असत.
अशी ही पहिली घुसमट. दुसऱ्या घुसमटीबद्दल पुढच्या गगनिकेत.   
(पूर्वार्ध)
    

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”