गोष्ट आहे एका रेस्टॉरंटमधली. दुपारची वेळ होती. पाच मैत्रिणींचा एक समूह दुपारच्या भोजनासाठी एकत्र जमला होता. जेवण मांडले जात होते, हास्यविनोदाला ऊत आला होता आणि तेवढय़ात आक्रित घडले. तपकिरी रंगाचे, बटबटीत डोळ्यांचे, फेंदारलेल्या मिशांचे एक सशक्त झुरळ एकीच्या पदरावर येऊन अलगद विसावले. ती किंचाळली. पांढरीफटक पडली. झुरळाच्याही मनावर याचा विपरीत परिणाम झाला असावा. ते उडून दुसरीच्या ड्रेसवर बसले. तिची किंकाळी अस्फुटच राहिली. तिने हात झटकले. झुरळ तिथून उडाले आणि हातात पाण्याचे ग्लास घेऊन येत असलेल्या वेटरच्या पांढऱ्याशुभ्र युनिफॉर्मवर जाऊन विसावले. तो जागच्या जागी पुतळ्यासारखा स्तब्ध झाला. त्याने हूं का चू केले नाही. अलगद वाकून हातातील पाण्याचे ग्लासेस बाजूच्या टेबलावर ठेवले अन् नाजूकपणे आपल्या बोटांच्या चिमटीत झुरळ महाराजांची मिशी पकडून त्याने त्यांना खिडकीच्या बाहेरचा रस्ता दाखविला. उडणारे झुरळ एकच होते; फक्त त्याच्या बसायच्या जागा वेगवेगळ्या होत्या आणि त्या जागांच्या मालकांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया वेगवेगळी होती. स्त्रिया प्रतिक्षिप्त क्रियेच्या मानकरी ठरल्या, तर वेटर प्रतिसादात्मक परिणामाचा वारकरी. 

प्रतिक्षिप्त क्रिया आणि प्रतिसाद यात नेमका फरक काय? खरं तर दोन्ही प्रत्युत्तरे.. एखाद्या घटनेची, एखाद्या कारणाची. पण एक क्षणक कृती आणि दुसरी कालांतराने दर्शवलेली वृत्ती. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे Reflex..  तेथे विचाराला संधी नाही. आधी करून मोकळे व्हायचे, मग मागचा-पुढचा विचार. अनेकदा ती स्वसंरक्षणार्थ घडते.. कधी बचावात्मक पवित्रा, तर कधी आक्रमणात्मक हल्ला. पण क्षणाचीही उसंत न दवडता घडते. ती प्रतिक्षिप्त क्रिया. ‘अरे’ ला ‘का रे’ म्हणणे म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया. गुडघ्याच्या स्नायूबंधावर हॅमर मारून उडणाऱ्या पायाला Knee Reflex म्हणणे हे वैद्यकीय क्षेत्र आम्हाला पहिल्या वर्षांत शिकविते.. flight, fright, fight अशा तीनही जीवाला धोका निर्माण करणाऱ्या क्षणांमध्ये मानवी शरीरात घडतात, त्या प्रतिक्षिप्त क्रिया. सिंहाची चाहूल लागताच काळवीटाने चौखूर उधळावे, कान टवकारावेत तशा घडणाऱ्या या क्रिया. 

प्रतिसादाचे तसे नाही. तेथे वेळ आणि विचार महत्त्वाचा. समोरच्याच्या विधान आणि कृतीचा पूर्ण परामर्श घेऊन, त्यातील गर्भितार्थ जाणून घेऊन, योजना आखून, ठरवून केलेली क्रिया म्हणजे प्रतिसाद. प्रतिसाद म्हणजे बुद्धिबळाचा डाव. राजेमहाराजांच्या काळापासून आजपर्यंत पदरी बाळगले गेले ते Strategy planners (योजक) हे उत्तम प्रतिसादक होते, हे आपण ध्यानात ठेवावयास हवे. माणसाला जगायचे तर प्रतिसाद सक्षम आणि सविचारी हवा. आणि मरण टाळायचे असेल तर प्रतिक्षिप्त क्रिया तीक्ष्ण हव्यात. गरज दोहोंमध्ये समन्वय साधण्याची आणि कुठे काय वापरायचे याचे तारतम्य ठेवण्याची आहे.

तारतम्य आणि ताळतंत्र सुटते तेव्हा भान हरपते. शब्द चुकीचे वापरले जातात, प्रसंगी हात उचलला जातो आणि मस्करीचीही कुस्करी होते. क्षुल्लकचुकीच्या घटनांमुळे घरात तेढ वाढते तशीच राष्ट्रांमध्येही युद्धे झाल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्षणार्धात द्यावयाची प्रत्युत्तरे आणि क्रिया जितक्या टाळता येतील तितक्या टाळाव्यात. कारण हल्ला ज्याच्यावर होतो तो बावचळलेला असतोच, पण जो हल्ला करतो तोही गोंधळातच असतो. ज्याच्या अंगावर झुरळ पडते तो जितका थरारतो तितकेच कुठे भलतीकडेच येऊन पडलो आपण या विचाराने झुरळही थरथरतच असते. गरज असते ती अशा वेळी शांत राहण्याची आणि त्याची मिशी पकडून त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्याची. प्रतिसाद ही अभ्यासाने साध्य करावयाची गोष्ट आहे. तर प्रतिक्षिप्त क्रिया ही उपजत नसíगक बाब आहे. माणसाच्या बुद्धिमत्तेचा जसजसा विकास होत गेला आणि तो जसजसा वानराचा नर होत गेला तसतसा त्याच्या प्रतिसादामध्ये उत्क्रांती होत गेली.  प्रतिक्षिप्त क्रिया या मात्र त्याच्या उगमाच्या वेळी जशा होत्या तशाच राहिल्या आणि पुढची ही अनेक शतके त्या तशाच राहणे अपेक्षित आहे. पण मग मानवाने प्रगती कशी साधावयाची? वानराचा नर झाला हे जसे योग्य आहे, तसेच नराचा नारायण होण्यासाठी प्रतिसादामध्ये सकारात्मक गुणवत्ता वाढीस लागली पाहिजे हेही आवश्यक आहे. त्यासाठी फार काही करावयास लागणार नाही, तर प्रत्येकाने अंतर्भूत होऊन कोणतीही क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करताना थोडासा विचार करण्याची गरज आहे आणि सरतेशेवटी विचाराने केलेली कृती ही क्षणिक प्रत्युत्तरापेक्षा अधिक लाभदायी ठरते हे सुज्ञास सांगणे न लगे.