आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे ‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतरच्या अत्र्यांच्या विविधांगी कर्तृत्वाचा वेध घेताना १९६० नंतरचे अत्रे लोकांसमोर यावेत, या हेतूने त्यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी ‘कऱ्हेचे पाणी’च्या पुढील खंडांची आखणी केली आहे.  
तीन जानेवारीपासून अत्र्यांच्या जन्मगावी- सासवड येथे ८७ वे मराठी साहित्य संमेलन भरत आहे. त्यानिमित्ताने परचुरे प्रकाशनातर्फे ‘कऱ्हेचे पाणी’चा ६ वा खंड प्रकाशित होत आहे. त्यातील महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या पहिल्याच साहित्य संमेलनाला अत्र्यांनी केलेले मार्गदर्शन, साहित्यिकांना दिलेल्या कानपिचक्या इत्यादीचा ऊहापोह करणारा संपादित लेख..  
आजचे साहित्यिक आणि साहित्यालाही अत्र्यांचे हे चिंतन लागू पडते.
मराठी साहित्य संमेलनाचे बेचाळिसावे आणि संयुक्त महाराष्ट्रातले पहिलेच अधिवेशन ठाणे येथे मे १९६० च्या ७, ८ व ९ तारखेला भरवण्याचे ठरले. संमेलनाचे निमंत्रण ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेने दिले होते. संमेलनाध्यक्षपदी चिं. वि. जोशी आणि प्रा रा. श्री. जोग या नामवंत साहित्यिकांची नावे सुचविली गेली होती. आदल्याच वर्षी मिरज येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत हिणकस प्रवृत्तीचे प्रदर्शन झाले होते. तसला काही गोंधळ ठाण्याच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून आचार्य अत्रे यांनी साहित्यिकांपुढील कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी ६ मार्च १९६० च्या ‘मराठा’तील अग्रलेखात लिहिले, ‘महाराष्ट्र राज्याच्या मंगल निर्मितीच्या समुहूर्तावरच महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या बेचाळिसाव्या अधिवेशनाच्या रूपाने महाराष्ट्र सरस्वती मानकऱ्यांचा दरबार ठाण्याला भरणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चिं. वि. जोशी आणि प्रा. रा. श्री. जोग यांची नावे महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुचवली असून संमेलनाच्या स्वागत मंडळाच्या सभासदांनी त्यातून एकाची निवड करायची आहे. हे दोघेही साहित्यिक आपापल्या वाङ्मयीन क्षेत्रातले नामवंत महारथी आहेत. म्हणून या अध्यक्षीय निवडणुकीबद्दल इथे आम्ही एवढेच म्हणू की, गेल्या वर्षी मिरज येथील साहित्य संमेलनाच्या वेळी अध्यक्षीय निवडणुकीला जे गावगन्ना हेव्यादाव्यांचे आणि हिणकस डावपेचांचे गालबोट लागले, त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी खबरदारी स्वागत मंडळाचे सभासद, दोघेही उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे घेतील आणि २० मार्च रोजी होणारी ही निवड मराठी साहित्याच्या श्रेष्ठ कुळाला साजेशा प्रतिष्ठेने होईल अशी आम्हाला आशा आहे. बाकी, अध्यक्ष कोण असावा, हा वाद आम्हाला इथे घालायचा नाही. आम्हाला इथे जे सांगायचे आहे, ते हे संमेलन कसे असावे, याबद्दलचे आहे. भाषा हेच साहित्यिकाचे अस्त्र आहे आणि संस्कृती हेच त्याच्या कार्याचे मैदान आहे. त्यामुळे मराठी मायबोलीची नि संस्कृतीची कुचंबणा नि अवहेलना दूर करून तिचा उत्कर्ष करण्यासाठी महाराष्ट्राचे भाषावार राज्य झाले पाहिजे अशी उत्कट जाणीव सर्वात प्रथम मराठी साहित्यिकांनाच स्वाभाविकपणे झाली. मायबोलीच्या राज्याची अजिंक्य आकांक्षा साडेतीन कोटी मराठी जनतेच्या हृदयात प्रथम जागवण्याचे आणि त्यासाठी आंदोलने करण्याची जाणीव महाराष्ट्रातील राजकीय शक्तींना देण्याचे श्रेय १९४६ मधील बेळगावच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनालाच आहे. केवळ मराठी साहित्याच्याच नव्हे, तर सबंध महाराष्ट्राच्या इतिहासात ही घटना सुवर्णाक्षरांनी नमूद होईल. आज ते महाराष्ट्र राज्याचे भव्य स्वप्न अंशत: तरी साकार होत आहे. अशा स्थितीत मराठी भाषेचे नि संस्कृतीचे अग्रणी व शिल्पकार असलेल्या साहित्यिकांपुढे कोणती कर्तव्ये आहेत नि ती ते कशी व कितपत पार पाडणार, हाच मराठी साहित्यापुढील आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
‘‘आज महाराष्ट्र स्थापनेला नाइलाजाने मान्यता देतानाही काँग्रेसच्या केंद्रीय राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सीमांचे लचके तोडले आहेत. महाराष्ट्रावर पन्नास कोटी रुपयांच्या खंडणीचा असह्य बोजा लादला आहे व महाराष्ट्राला ‘महाराष्ट्र’ म्हणायलाच विरोध चालवला आहे. ज्या बेळगावच्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठराव प्रथम संमत झाला, ते बेळगावच आज महाराष्ट्रात नसावे, ही घटना अंत:करणाला घरे पाडणारी आहे. या अन्यायाविरुद्ध ठाण्याच्या संमेलनात ठराव संमत झाला पाहिजे व तो होईलही. पण केवळ ठराव करूनच साहित्यिक स्वस्थ बसणार काय? हा खडा अन् बोचक प्रश्न विचारण्याचे कारण हे, की साहित्यिकांनी आजवर संयुक्त महाराष्ट्राची मागणी सतत नि खंबीरपणे केली असली, तरी त्या मागणीसाठी तळहातावर शीर घेऊन प्रत्यक्ष लढा देण्यात, जिला असंस्कृत नि अडाणी म्हणून हिणवले जाते, ती चाळी- गिरण्यांतील नि खोपटा-शेतातील सामान्य जनताच सर्वात हिरीरीने आणि शौर्याने पुढे सरसावली. पण जिच्यातून नंतर लढय़ाची ज्वाला भडकली, ती संयुक्त महाराष्ट्राची ज्योत पेटवणारे साहित्यिक मात्र त्या ध्येयासाठी झालेल्या प्रत्यक्ष लढय़ापासून मोठय़ा प्रमाणात अलिप्तच राहिले. एवढेच नव्हे, तर या लढय़ाचे साद-पडसादही प्रतिष्ठित मराठी साहित्यात अत्यंत अस्पष्टपणेच उमटले. म्हणजे काय चमत्कार आहे पाहा! लढा मराठी मायबोलीचा आणि संस्कृतीचा! पण त्या मायबोलीचे नि संस्कृतीचे मानकरी असलेले बहुसंख्य साहित्यिकच त्या लढय़ात बेपत्ता!
‘‘इकडे १६ ते २० जानेवारी १९५६ रोजी मुंबईत मोरारजींच्या राक्षसशाहीविरुद्ध मराठी जनता रुद्र तांडव करीत होती, तर तिकडे महाराष्ट्राचे खरेखुरे श्रेष्ठ कवी कविता लिहीत होते की, ‘जेव्हा आत्मा फोडासम दुखतो..’! अशा निर्वाणीच्या प्रसंगी ज्वालामुखीप्रमाणे उफाळण्याऐवजी फोडासारखा दुखणारा तो आत्मा मराठीच का, असा कडवा सवाल त्या लढय़ातील घाव झेलणाऱ्या एखाद्या अशिक्षिताने विचारल्यास त्याला काय उत्तर आहे? साहित्यिकांच्या प्याऱ्या मराठी भाषेसाठी नि संस्कृतीसाठी एकशे पाच जिवांनी प्राणांचे बलिदान केले. पण त्यांचे अमर पोवाडे गाणारी एकशे पाच काव्ये तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रतिष्ठित कवींनी लिहिली का? आम्ही रक्ताने महाराष्ट्राचा इतिहास लिहीत असताना या महाराष्ट्रीय साहित्यिकांना शाईनेदेखील आमच्या लढय़ाचा गौरव करण्याचे का जमेना, असा सवाल त्या हुतात्म्यांच्या आत्म्यांनी विचारल्यास साहित्यिक काय सांगणार? ‘धंद्यासाठी कला’ घोटणारे काही नामवंत साहित्यिक तर महाराष्ट्राच्या जीवनमरणाच्या त्या लढय़ाविरुद्ध ‘नासीकेला फडके’ लावून सडके फूत्कार सोडीत होते.
‘आम्ही राजकीय प्रचारक नाही,’ असे सांगून आपल्या अलिप्ततेचे समर्थन करणाऱ्या साहित्यिकांना आम्ही विचारतो, की तुम्हाला राजकीय मते असोत-नसोत; पण तुम्ही माणसे तर आहात ना? साहित्यिकाची माणुसकी तर सर्वात संवेदनक्षम असली पाहिजे. असे असता साडेतीन कोटी मानवांच्या सागराचे मंथन होत असताना तुमच्या लेखणीचा मेरूमंदार बनवून त्यातून मराठी जनतेला स्फूर्तीचे अमृत व महाराष्ट्र-शत्रूंविरुद्ध संतापाचे हलाहल मराठी प्रतिष्ठित साहित्यात का निर्माण झाले नाही? आम्ही ‘प्रतिष्ठित साहित्य’ मुद्दामच म्हणतो! कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रुजलेल्या लोकसंस्कृतीचा शाहीर त्या लढय़ामध्ये अमर कवने करीत पुढे सरसावला. कामगारांच्या चाळीतील नि खेडोपाडीच्या तथाकथित अडाणी ‘कुणबटांतील’ अनेक जन्मजात कलाकारांनी कंठाचे रणशिंग बनविले नि डफाची रणभेरी बनविली.
‘‘हेच याआधीच्या लढय़ातही झाले. १९४६ च्या फेब्रुवारीमध्ये केलेल्या उठावामुळे मुंबईमधील एका कामगार नाटककाराच्या हृदयातला ‘समुद्र जागा झाला.’ गोव्याच्या मुक्तिसंग्रामाची ‘ज्वाला’ लालबागच्या कामगार नाटककाराच्या अंत:करणात भडकली. साहित्यिकांनी केवळ रुद्ररसच रंगवावा, अगर केवळ लढय़ाची चित्रेच रेखाटावी असे म्हणण्याइतके आम्ही ठोकळेबाज व आडमुठे नाही. पण सबंध मराठी भाषेचे नि संस्कृतीचे भवितव्य पणाला लागले असतानाही मराठी साहित्य त्यामुळे तळापासून हेलावून निघू नये, याचे आम्हाला नवल वाटते. म्हणून आता तरी साहित्यिकांनी महाराष्ट्राला खंडित, विद्रूप व कंगाल करण्याच्या अन्यायाविरुद्ध लेखण्यांची भालाईती फळी उभारावी अशी आमची तळमळीची हाक आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेबरोबरच महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे जे प्रश्न पुढे येणार आहेत, त्यात मराठी संस्कृतीला व भाषेला नवजीवन देण्याचा प्रश्न प्रामुख्याने आहे. आधुनिक ज्ञानाची नि शास्त्राची भांडारे सामान्य मराठी जनतेपासून दडवून ठेवणारी परभाषेची कुलपे आपल्याला तोडायची आहेत. नव्या राज्याचा कारभार मराठमोळ्या जनतेच्या मायबोलीत आणायचा आहे. ‘माझा मराठीचा बोल कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे आव्हान देऊन ज्ञानेश्वरांनी केलेले कार्य नव्या परिस्थितीला अनुसरून पुन्हा करायचे आहे.
‘‘मराठीमध्ये ‘राज्यभाषाकोश’ लिहवून घेणाऱ्या शिवछत्रपतींचे कार्य ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ असलेल्या साहित्यिकांखेरीज कोण करणार? सत्तालोभाने महाराष्ट्राशी बेइमान होणाऱ्या राज्यकर्त्यांकडून याबद्दलच्या उमाळ्याची अपेक्षा करता येत नाही. सरकार यासाठी मानधन, पारितोषिके अगर पगार देऊन बोलावील म्हणून वाट पाहणे खऱ्या मराठी साहित्यिकाला लांच्छनास्पद आहे. यासाठी साहित्यिकांनी व त्यांच्या संघटनांनी स्वत: होऊन संघटित प्रयत्न केले पाहिजेत. तसा संमेलनाने त्यांना आदेश दिला पाहिजे. सर्व क्षेत्रांत आमूलाग्र मराठी भाषेची द्वाही फिरावी असे सामथ्र्य तिच्यात आणण्याची प्रचंड मोहीम महाराष्ट्रभर उभी राहिली पाहिजे. स्वत:च्या दुबळ्या, वैफल्ययुक्त नि थिटय़ा भावना व्यक्त करायलादेखील मराठी भाषा अपुरी पडते, असे रडगाणे गाऊन इंग्रजी व मराठी शब्दांची हास्यास्पद व खवट भेळ नवसाहित्य म्हणून खपवण्याची वृत्ती कायम राहिली तर ते होणार नाही. जी परब्रह्माची कोडी समजावून सांगणे वेद-उपनिषदांच्या संस्कृत भाषेतही बिकट ठरली, ती कोडी रांगडय़ा मराठी माणसालाही उलगडतील असे सामथ्र्य मराठी भाषेत निर्माण करणाऱ्या संतांची परंपरा मराठी साहित्यात आहे. असे असता ‘आमची भाषा लोकांना दुबरेध वाटते त्याला आम्ही काय करावे?’ असा अहंगंड मिरवून हे कार्य होणार नाही. अखेर म्हणजे नवमहाराष्ट्रात आपल्याला समता निर्माण करावयाची आहे. त्यासाठी मराठी संस्कृतीला एकसंध बनवण्याचा प्रचंड कार्यभाग साधायचा आहे. आज पाश्चिमात्त्यांच्या पुढारलेल्या साहित्यापासून जिने शिकवण घेतलेली आहे, ती सुशिक्षितांची संस्कृती नि वाङ्मये वेगळी आणि महाराष्ट्राच्या रोमारोमांत मुरलेल्या उज्ज्वल परंपरांचा वारसा जिला आहे ती ग्रामीण जनतेची संस्कृती व वाङ्मये वेगळी- अशी फाळणी मराठी संस्कृतीची झाली आहे.
‘‘आता सुशिक्षित मध्यमवर्गाने आपल्या श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवण्याचा जमाना बदलला आहे. साडेतीन कोटींचा महाराष्ट्र मुख्यत: ग्रामीण महाराष्ट्रच आहे. सुशिक्षित मध्यमवर्ग हा महाराष्ट्र भूमीवरचा एक पातळ थर आहे. त्याची व प्रतिष्ठित साहित्यिकांच्या वाङ्मयाची मुळे खालच्या भूमीत खोल रुजली पाहिजेत व दलित व शोषित समाजाच्या संस्कृतीची व वाङ्मयाची आजवर दडपली गेलेली बीजे उसळून वर आली पाहिजेत. यासाठी महाराष्ट्रातील लक्षावधी लोकांच्या सांस्कृतिक जीवनातून उमललेल्या ग्रामीण वाङ्मयकारांना नवे वैभव प्राप्त करून देणे, हे दुहेरी कार्य प्रतिष्ठित मराठी साहित्यिकांना आज करायचे आहे. या कसोटीला ते उतरतात की नाही, यावर त्यांचे नि त्यांच्या साहित्याचे भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या मुहूर्तावर भरणाऱ्या आगामी साहित्य संमेलनात याचा विचार झाला पाहिजे.’’
बेचाळिसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक २० एप्रिल १९६० रोजी ठाणे येथे राजकवी यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली सुखरूप पार पडली. सुप्रसिद्ध मराठी टीकाकार प्रा. रा. श्री. जोग यांची प्रचंड बहुमताने स्वागत सभासदांनी निवड केली. बेचाळिसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रा. श्री. जोग यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना २७ मार्चच्या ‘मराठा’च्या अंकातील अग्रलेखात प्रा. रा. श्री. जोग यांच्या साहित्यसेवेचा आढावा घेताना आचार्य अत्रे यांनी त्यांच्या एका वेगळ्याच महत्त्वाच्या कार्याचा उल्लेख केला.. ‘‘ ‘डांगी’ भाषेसंबंधीचा प्रश्न ज्या वेळी अगदी ज्वलंत होता, त्या वेळी प्रा. जोग यांनी ‘डांगी’ भाषेचा भाषाशास्त्राच्या दृष्टीने सूक्ष्म अभ्यास करून ‘केसरी’मध्ये एक लेखमाला लिहिली अन् ‘डांगी’ ही मराठीचीच पोटभाषा कशी आहे, हे निर्विवाद सिद्ध करून दाखवले. भारतातील प्रांतपुनर्रचनेच्या काळात या त्यांच्या कार्याचे विशेष महत्त्व आहे. प्रा. जोग हे अशा काळात मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत हे अत्यंत उचित आहे. याबाबतचे त्यांचे मार्गदर्शन संमेलनास फार उपयुक्त होईल.’’
आचार्य अत्रे बेळगावला गेलेले असल्यामुळे या संमेलनाच्या उद्घाटनाला हजर राहू शकले नाहीत. पण त्यांनी संमेलनाला पाठविलेल्या शुभेच्छापर संदेशात म्हटले होते की, ‘‘मराठी साहित्यिकांनी सीमाभाग महाराष्ट्राला जोडण्याची मागणी करावी. महाराष्ट्रात आता निकोप वाङ्मयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’’
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रा. श्री. जोग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ‘संयुक्त महाराष्ट्र’ झाला, आता ‘अखिल महाराष्ट्रा’साठी झटले पाहिजे, असे आवाहन करताना याविषयीचे विचार अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडले, ‘‘प्रस्तुत संमेलनास संयुक्त महाराष्ट्राचे पहिले संमेलन म्हणण्यात येत आहे. महाराष्ट्राचा जेवढा भूभाग संयुक्त होऊन महाराष्ट्र म्हणून स्वतंत्रपणे मिरवू लागला आहे, त्याचे आपण सर्वानी मन:पूर्वक स्वागत करायला हवे. आज संयुक्त महाराष्ट्र झाला खरा; परंतु तो अखिल महाराष्ट्र नाही याची बोच शिल्लक उरलेली आहेच. नियतीचा दैवदुर्विलास असा, की चौदा वर्षांपूर्वी ज्या बेळगावामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या कल्पनेची घोषणा साहित्य संमेलनात केली गेली, ते बेळगावच ‘खिल’ राहिलेले आहे. न्याय, तत्त्व, लोकमत इत्यादी सर्व दृष्टींनी ते महाराष्ट्रात येणे व राहणे योग्य असतानाही केवळ राजकारणातील डावपेचांमुळे ते महाराष्ट्रास दुरावले आहे.’’
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची पाश्र्वभूमी असलेल्या या संमेलनात अखिल महाराष्ट्रनिर्मितीच्या अपुऱ्या राहिलेल्या कार्याचा ऊहापोह प्रा. जोग यांनी अत्यंत निर्भीडपणे केला. त्याचबरोबर सरकार व साहित्य संस्था, सरकारी पारितोषिके, सरकारी नाटय़स्पर्धा यांविषयी परखडपणे आपले विचार व्यक्त करताना प्रा. जोग यांनी सांगितले की, नाटय़स्पर्धा घडवून, पर्यायाने नाटय़वाङ्मयालाही उत्तेजन दिले जात आहे. तथापि, गुणपरामर्शाचे हे काम कोणत्या पद्धतीने चालते, हे एक गूढच राहते. हे काम एखाद्या अधिकृत अशा वाङ्मय संस्थेकडे सोपवल्यास कदाचित हा संदेह निराकरण होईल. वाङ्मयाच्या गुणपरामर्शाचे कार्य आणि कर्तव्य हे रसिक वाचकवर्गाचे आहे व ते त्याने स्वत: वाङ्मयाला उदार आश्रय देऊन करावयास हवे. पारितोषिके ही पारितोषिकेच राहतील व ती लेखकाजवळ राहतील. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयाचा प्रसार व्हावा तसा होईल असे नाही. शिवाय राजाश्रय हा आश्रयाच्या स्वरूपाचाच राहतो. आणि आश्रयाश्रित भाव हा विशेष स्वाभिमानपोषक असत नाही.
नवीन महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव संमेलनात मांडला गेला. याशिवाय लोकप्रियतेच्या मोहाने उत्तानता व अश्लीलता यांद्वारे मराठी वाङ्मयाला मिळणाऱ्या वैकारिक स्वरूपावर टीका करणारा एक ठरावही मंजूर झाला. सरकार लेखकांना जी पारितोषिके देते त्यामुळे लेखकांवर मर्यादा पडू नयेत व ही बक्षिसे वाटताना लेखकाच्या राजकीय, सामाजिक मतांचा सरकारने विचार करू नये, असा ठराव वसंत वैद्य यांनी मांडला. या साहित्य संमेलनात ग्रामीण वाङ्मयावर परिसंवाद र. वा. दिघे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या परिसंवादात भाग घेताना शाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या तडफदार भाषणात म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांतून जनतेला समाजसत्तावादाची आस लागून राहिली आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडले पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे. ती जर पुरी केली नाही तर जनता त्याच्याकडे पाठ फिरविल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक दहा कोसावर भाषा बदलते. ग्रामीण साहित्याचे चित्रण करायला नुसती अनुमती चालणार नाही, तर त्याबरोबर सहानुभूती हवी. ‘गोऱ्या मांडीवरील निळी खूण’ साहित्यात आणण्यापेक्षा ५६ साली गोळ्यांमुळे अमर झालेल्यांच्या खुणा वाङ्मयात आणल्या पाहिजेत. ग्रामीण जीवनाच्या जगात सोंग नसते आणि मरणात ढोंग नसते. खेडय़ातील या शेतकऱ्यांची रग आणि धग केवळ भाषेच्या उसनवारीने चितारता येणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवच हवा.’’
समारोप करताना डॉ. शं. दा. पेंडसे म्हणाले की, ‘‘आज्ञा करून प्रतिभा जागृत होत नसेल, तर जे कार्य राजयंत्रणा करू शकत नाही, ते भावनात्मक ऐक्याचे व लोकजागृतीचे कार्य करण्याची आपली सर्वाची व राजसत्तेची अपेक्षा आपण अव्हेरून चालणार नाही. साहित्य हे अमोघ अस्त्र असून राजदंड हलविण्याची ताकद त्यात असते. ते केवळ करमणूकप्रधान असावे असे नाही, तर त्यापासून वैचारिक पातळीही वाढावी.’’
आचार्य अत्रे यांचे प्रचारात्मक साहित्य, साहित्य नव्हे व फडके यांचे करमणुकीचे साहित्य हे मात्र साहित्य- याची फोलता पेंडसे यांनी स्पष्ट करून मराठवाडय़ातील एका खेडय़ातील महाराष्ट्र उत्सवाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, फक्त दैनिक ‘मराठा’ वाचला जाणाऱ्या त्या खेडय़ात महाराष्ट्र उत्सवदेखील ‘मराठा’कारांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच साजरा झाला. अशी लोकजागृती करणाऱ्या वाङ्मयाने आजचे आव्हान स्वीकारलेच पाहिजे. चिरंजीव प्रतिभा जागृत करणारे अक्षरवाङ्मय तर आपल्याला नित्य आव्हान देतच असते.’’    

                   

lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Aditya Thackeray Yavatmal
‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका