lok01डांबरी रस्ते तापू लागलेत. राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे चुकवताना ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागलंय. टोलवाले इमानेइतबारे पैसे घेऊन पावती देतायत. रस्त्याशेजारचं गवत वाळून गेलंय. दुतर्फा शेतीत दुष्काळाचं सावट दिसतंय. या वर्षीही पुरेसा पाऊस पडला नसल्याच्या खाणाखुणा भोवताली भरून आहेत. रस्त्याच्या बाजूला चरणाऱ्या गुरांच्या फासळ्या स्पष्ट दिसतायत. रसवंतीच्या आडोशाला थकलीभागली माणसं जमू लागलीत. लाकडी चरकाचा बैल गोल गोल फिरतोय. उसामध्ये लपवून लिंबू चिरडलं जातंय. दूरच्या प्रदेशातून आणलेल्या टरबुजांची आरास रचलेली रस्त्याच्या कडेला. नमुना म्हणून लालबुंद टरबूज कापून ठेवलंय दर्शनी भागात. टरबूज हे मूळ चिनी फळ. माणसाच्या रक्तासारखा टरबुजाचा रंग पाहून आरंभी माणूस घाबरला होता म्हणे. आता मात्र या रक्तवर्णी रंगाकडे तो आकर्षित होतो. अचानक एक काळीपिवळी विचित्र कट मारून पुढं निघून जाते. प्रचंड माणसं कोंबलेल्या काळीपिवळीवाल्या ड्रायव्हरला आमचा ड्रायव्हर उत्स्फूर्त शिवी देतो. त्याला दिलेली शिवी बऱ्याचदा आपल्यालाच ऐकू येते. पण स्वत:च्या समाधानाकरिता शिवी मात्र दिली जातेच.
रस्त्याच्या मधेच एखादं गाव लागतं. गाव म्हटलं की कौलारू घरं, पाणवठा, चावडी, देऊळ, शाळा, हिरवेगार शेतमळे असं जलरंगातलं चित्र आता शक्य नसलं तरी किमान गाव म्हटल्यावर घरं दिसायला काय हरकत आहे? पण खरं गाव असतं रस्त्यापासून दूर कुठंतरी. रस्त्यावर पाच-सहा हॉटेल्स, झाडाला लटकवलेल्या टय़ूब-टायरमुळं लक्षात येणारं पंक्चरचं दुकान, मोकाट फिरणारे कुत्रे-जनावरं, पानपट्टय़ा, चहाच्या टपऱ्या. एखादा तेलकट-मळकट भिकारी आणि भोवताली उडणारे प्लॅस्टिकचे तुकडे, तर कधी कोंबडीची पिसं.. या नेपथ्यासोबत हमखास ठळकपणे उभे असतात ते होर्डिग्ज. कुणाचा वाढदिवस, कुणाचं गोडजेवण, कुणाची निवड, तर कुणाची निवडणूक अशा अनेक कारणांनी होर्डिग्जवरचे पांढऱ्याशुभ्र कपडय़ातील सुवर्णालंकारांनी मढलेले महामानव छद्मीपणानं हसत असतात. अनधिकृत होर्डिगवरचे हे महामानव राजकारणात कधी अधिकृत होऊन जातात, ते कळतच नाही.
ड्रायव्हर मामांनी स्पीड वाढवलेला होता. अंधारून यायच्या आधी आम्हाला समोरचं गाव गाठायचं होतं. ड्रायव्हर मामांनी त्यांच्या आवडत्या इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाची सीडी लावलेली. या प्रबोधनी कीर्तनातील रोखठोक विचार आणि गावरान भाषा ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचायला पूरक. या कीर्तनकाराची शैलीही खिळवून ठेवणारी. असं नामी बोलणाऱ्याला खेडय़ात मोठा मान असतो. त्यामुळं या महाराजांचा भारी दरारा. कीर्तन सुरू आहे. कीर्तनात मधेच उठलेल्या एका गावकऱ्याला महाराज चालू कीर्तनात हटकतात.. ‘येऽऽ मधीच कामुन उठला रं..? तुला लघी नाही आली.. एक तर तुला शायनिंग मारायची असल, नाहीतर चपल्या चोरायच्या असतील.. (लोकांचा खळखळून हसण्याचा आवाज) कीर्तनकार महाराजांनाही हसू आवरेना. टाळ-पखवाज वाजायला लागतात.. विठ्ठाला. विठ्ठाला. विठ्ठाला.. सुरू होतं. हा डायलॉग डोक्यात असतानाच पुढं एक गाव लागतं. होर्डिगवरचे पांढऱ्याशुभ्र कपडय़ात उभे सुवर्णजडित महामानव दिसतात आणि कीर्तनकाराचा डायलॉग मला आठवतो.. ‘‘येऽऽ मधी कामुन उठला रं..? तुला शायनिंग मारायची असल, नाहीतर चपल्या चोरायच्या असतील.’’ विठ्ठाला.. विठ्ठाला.. विठ्ठाला..
आता आम्हाला पोहोचायचंय ते गाव अवघं पंधरा कि. मी. अंतरावर आहे. दुतर्फा शेतमळ्यांतील घरांवर झेंडे दिसायला लागतात. तुरळक असणारे झेंडे आता दाट व्हायला लागतात. झाडावरही झेंडे फडकतायत. गाव जवळ येतंय आणि झेंडे वाढतच जातायत. गावात प्रवेश करतो तर झेंडेच झेंडे! दुकानावर झेंडे, इमारतींवर झेंडे, झाडांवर झेंडे! लाइटच्या खांबावर झेंडे, एसटीवर झेंडे, रिक्षावर झेंडे, जीपवर झेंडा, कारवर झेंडा, मोटारसायकलवर झेंडे, हातगाडय़ांवर झेंडे, पानटपरीवर झेंडा, पाणपोईवर झेंडा, टी-स्टॉलवर झेंडा, पुतळ्याच्या हातात झेंडा, दुभाजकावर झेंडे.. चौकात पताकाही झेंडय़ांच्याच. मोहरानं आंब्याचं झाड भरून जावं तसे गावात झेंडे लखाटलेले. पुराचं पाणी वाढत जाताना भीती वाटावी तशी आता या झेंडय़ांची दहशत वाटतेय. माणसं राहणाऱ्या या गावाचं ‘झेंडेपूर’ झालेलं.
स्थानिक मित्राला सोबत घेऊन बाहेर पडलो. रस्त्याने जाताना एक गोष्ट लक्षात आली. रस्त्यातल्या दुभाजकावर ओळीने झेंडे लावलेले. पण हे झेंडे रोवण्यासाठी दुभाजकातील हिरवीगार झाडं चक्क उपटून टाकण्यात आली होती. हिरवं झाड उपटून तिथं झेंडा रोवावा असा जगात कुठला झेंडा असेल असं मला वाटत नाही.
खरं तर हे वळवळणाऱ्या झेंडय़ांचं एक स्वप्न होतं असं म्हणायला मला आवडलं असतं. म्हणजे गार वारं लागलं.. डोळा लागला आणि झेंडय़ांनी लखाटलेल्या गावाचं स्वप्न पडलं.. असं काहीसं. पण हे मात्र वास्तवातलं गाव होतं.. ज्या गावात असंख्य झेंडे नुसते वळवळत होते. माणसापेक्षा झेंडेच ठळक झाले होते. हे झेंडे एका विशिष्ट आविर्भावात फडकत होते. त्या फडकण्यात एक ईष्र्या जाणवत होती. मधेच एक मोटारसायकलचा ताफा हातातले झेंडे नाचवीत एका दिशेला गेला. कुठं जायचंय त्यांना? त्यांच्या घोषणा भीतीदायक का वाटतायत?
गल्लीबोळ ओलांडत, झेंडय़ांतून रस्ता काढत एका जुनाट वाडय़ासमोर येऊन आम्ही थांबलो. हे घर होतं समाजवादी विचारांच्या जुन्या कार्यकर्त्यांचं. उजव्या सोंडेचा गणपती दुर्मीळ म्हणून लोक मुद्दाम दर्शनाला जातात, तसा या भेटीमागचा उद्देश. हा समाजवादी विचारांचा पन्नासेक वर्षांपासून निष्ठावान सक्रिय समर्थक. वातावरण बदलत गेलं तसं सोबतचे लोक पक्ष सोडून गेले. म्हणजे लोकांनी हातातला आणि घरावरचा झेंडा सोयीप्रमाणे बदलला. कुणी नगरसेवक, कुणी जि. प. सदस्य, कुणी नगराध्यक्ष, तर कुणी आमदार झाला. पण या निष्ठावान माणसाने समाजवादी डावा विचार सोडला नाही. ‘निष्ठावान’, ‘तत्त्वनिष्ठ’ म्हणायला आपल्याला बरं वाटतं; पण तालुक्याच्या या गावात ही निष्ठा टिंगलेचा विषय होती. या सत्शील कार्यकर्त्यांनं उदरनिर्वाहासाठी पंक्चरचं दुकान चालवलं. त्यात आता प्रगती म्हणजे एका जिल्हा दैनिकात पत्रकार म्हणून काम करतायत. सोबतचे मोठे झाले, पैसेवाले झाले म्हणून ना खेद, ना खंत. अजूनही त्यांच्या पक्षाला चांगले दिवस येतील असा त्यांना विश्वास आहे. म्हणूनच राजकारणात राहूनही चेहऱ्यावर निर्मळपणा शाबूत आहे. त्यांच्या पत्र्याच्या खोलीत बसून प्यालेल्या चहामध्ये आत्मीयता होती. निघताना अंगणात उभं राहून बोलत होतो. त्यांच्या घरावरही गावभर फडकणाऱ्या झेंडय़ांसारखा एक झेंडा फडकत होता. त्या झेंडय़ाचा रंग यांच्या समाजवादाशी जुळणारा नव्हता, म्हणून सहजच झेंडय़ाबद्दल विचारलं. तर त्यांचं सोपं-साधं उत्तर तयार होतं.. ‘‘पोरं बळंच घरावर झेंडे आणून लावितेत. पोरायला कशाला नाराज करायचं? म्हणलं लावू द्या. आपला विचार थोडाच बदलणाराय?’’ या काळातल्या अशा दुर्मीळ प्राण्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
जबरदस्ती घरावर झेंडा लावण्याचा अनुभव मीही या निवडणुकीत घेतलेला होता. दहावी-अकरावीतील सहा-सात मुलं भर दुपारी बेल वाजवतात. दार उघडलं तर हातात एक झेंडा देतात. दारावर स्टिकर तर लावूनही झालंय. एका राजकीय पक्षाचा झेंडा घरावर लावण्यासाठी दिलेला. ‘हा झेंडा घरावर का लावायचा? या पक्षाने आमचे काही प्रश्न सोडवलेत का?’ अशा कुठल्याच प्रश्नांची त्या मुलांजवळ उत्तरं नव्हती. त्यांच्या मते, ‘बाकी काही असू द्या; घरावर झेंडा मात्र आमचा लावा.’ तो झेंडा मी मुलांच्या समाधानाकरिता ठेवून घेतला. त्यांना बोलू लागलो, ‘हा झेंडा ज्या घरावर लावलाय, त्या घरात नियमित नळाला स्वच्छ पाणी येत नसेल, लोड शेडिंगमुळे वीज उपलब्ध नसेल, समोरची गटारं साफ केली जात नसतील, तर तुमच्या झेंडय़ाचा अपमान नाही का होणार?’ पण त्यांना फार चर्चा नको होती. त्यांचा झेंडा घरावर फडकणं महत्त्वाचं होतं. मुलंच ती; धाडधाड आली तशी निघूनही गेली. तो झेंडा (किं वा कुठलाही) लावण्याचा प्रश्नच नव्हता. आपण चांगला युक्तिवाद केला, या समाधानात दोन दिवस उलटून गेले. तिसऱ्या दिवशी कॉलनीत सगळ्या घरांवर डौलात झेंडे फडकत होते. आम्ही पाहतच राहिलो.
काही वर्षांपूर्वी असेच त्रासदायक ठरतील असे झेंडे एकदा फडकले होते. एका मुख्य चौकातील विजेचा खांब. या खांबाला मोजून सोळा-सतरा झेंडे लावलेले. अनेक रंगांचे, अनेक पक्षांचे झेंडे मालकी ऐटीत फडकत होते. हा केविलवाणा खांब डोक्यातून जाईचना. महाविद्यालयीन दिवस होते ते. शेवटी एक ‘स्ट्रीट पोल’ नावाची कविता लिहून झाली..
‘ऐन रस्त्यातला खांब
मला म्हणाला थांब
मी थबकलो
तारांनी जखडलेला
आणि झेंडय़ांनी लखाटलेला
देह सावरीत खांब बोलू लागला,
‘अरे, तुमच्या जयंत्या होतात
नेते येतात, मिरवणुका- जलसे निघतात
प्रत्येकाचे झेंडे मात्र आम्हाला लागतात
भगवा, हिरवा, निळा, तर कधी काळाही
प्रत्येक झेंडा फडकत असतो मालकी ऐटीत
बाबांनो, एक तर आम्ही दिव्याचे खांब राहू
नाही तर चक्क ध्वजदंड होऊ
या झेंडय़ांच्या ओझ्यानं
आमचे देह खालावतील
मग कुणाच्या भावना दुखावतील
नंतरचा रक्तपात पाहता पाहता
आमचे दिवेच मंदावतील,
म्हणून आता ठरवूनच टाका
हवेत दिवे का झेंडेच हवे
ऐन रस्त्यातला खांब
मला म्हणाला थांब.’
पंचेवीस वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता. या कवितेने स्पर्धेतून अनेक पारितोषिकं मिळवून दिली. तेव्हा आर्थिक पाठबळही दिलं. वाटलं, संपलं तिचं काम. जुन्याकाळचं नाणं ठेवून द्यावं तशी ही कविता ठेवून दिली. म्हणजे तिला संग्रहातही समाविष्ट केलं नाही. पण आता प्रासंगिक प्रतिक्रिया म्हणून बाजूला ठेवलेली ही कविता पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर फडकू लागलीय.                                                
 दासू वैद्य – dasoovaidya@gmail.com

Mumbai Pune Expressway The area near Khalapur toll plaza will be free of traffic congestion Mumbai news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग: खालापूर पथकर नाक्याजवळील परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार
3 year old girl fall to death into a pothole on highway near titwala
टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू
Selection of two players from the police disha program for the national football tournament Pune news
गुन्हेगारी मार्गावर भरकटलेल्या मुलांना मिळाली ‘दिशा’; पोलिसांच्या दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
Two new birds recorded in Sanjay Gandhi National Park mumbai
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन नवीन पक्ष्यांची नोंद; पांढरा गाल असलेला तांबट,पिवळा बल्गुलीचे दर्शन