एका आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन केंद्राचे संचालक म्हणजे एक बडं प्रस्थ आहे. खूप बिझी असतात. तरीही दर तिमाहीला प्रत्येक संशोधकाच्या कामाचा सखोल आढावा ते स्वत:च घेतात. एका भारतीय रिसर्च असिस्टंटच्या टेबलाजवळ सोमवारी सकाळी समक्ष जाऊन त्यांनी तिला शुक्रवारी दुपारी दोन वाजता परफॉर्मन्स रिव्ह्यू मीटिंगसाठी येण्याचं निमंत्रण दिलं;  तर ही कार्टी खुर्चीवरचं बस्तान न हलवता बिनदिक्कतपणे म्हणाली, ‘‘हॅरी, आय अ‍ॅम सॉरी!’’
‘‘व्हॉट?’’ हॅरीसाहेब चमकले.
तिनं थंडपणे सांगितलं, ‘‘कारण मी त्यावेळी बिझी असणार आहे. त्याऐवजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मीटिंग ठेवू या.’’
डायरी बघून कन्फर्म करतो, असं पुटपुटत हॅरीसाहेब पुढे गेले. तिच्या शेजारी बसून हा संवाद ऐकणाऱ्या माझ्या भाच्यानं तिला फटकारलं, ‘‘डोकं फिरलंय का तुझं? हैदराबादमध्ये बॉसला असं उत्तर देण्याची िहमत झाली असती का तुझी?’’
ती खिदळत उत्तरली, ‘‘नाही. पण इथं चालून जातं. म्हणून तर िहदुस्थानात परत जाणार नाही.’’
‘‘शुक्रवारी का बिझी असणार आहेस? त्या दिवशी तर एकही मीटिंग ठेवलेली नाही.’’
जमेल तितकं लाजत ती म्हणाली, ‘‘शुक्रवारी माझ्या बॉयफ्रेंडचा हॅपी बर्थडे आहे.’’  
‘‘परत? दोन महिन्यांपूर्वीच साजरा केला होतास ना त्याचा वाढदिवस?’’
‘‘त्याच्याशी ब्रेकअप झालं. हा नवीन बीएफ.’’
हे ऐकल्यावर रासायनिक उत्पादन कंपनीत काम करणारा त्याचा तंत्रज्ञ स्नेही म्हणाला, ‘‘आमच्याकडे नव्यानं लागलेली एक बंगाली बर्फी दररोज मायक्रो-मिनी साइझची हॉट पँट घालून यायची. मायदेशी ममतादीदींच्या राज्यात हे शक्य झालंच नसतं. घराबाहेर पाऊल टाकण्यापूर्वीच आई-वडिलांनी कान उपटले असते. मग दोन दिवसांनी मीच तिला ठणकावून सांगितलं की ‘‘बये, तुझं अंग न्याहाळण्यात इथं कोणालाही रस नाही. नजर मेलीय सगळ्यांची! पण येता-जाता एखादं रसायन तुझ्या उघडय़ा मांडीवर सांडलं तर तुला इजा होईल ती होईलच, पण मॅनेजर म्हणून मी आणि संस्थाप्रमुख म्हणून माझा बॉस गोत्यात येऊ. तेव्हा उद्यापासून व्यवस्थित कपडे करून ये.’’
परदेशात स्थिरावलेल्या भारतीय उगमाच्या बुजुर्गाशी अशा दिलखुलास गप्पा चालू असताना एका गृहिणीनं स्पष्टीकरण दिलं, ‘‘भारतात मुलं शिक्षक-प्राध्यापकांना ‘सर’ अशी हाक मारतात. पण इथं सासू-सासऱ्यांपासून राष्ट्रप्रमुखांपर्यंत सर्वाना सर्रास पाळण्यातल्या नावानंच अरे तुरे करण्याची प्रथा आहे. त्यामुळे नुकतीच मिसरूड फुटलेली पोरं टेबलावर पसरलेले पाय खाली न सोडता डॉ. थॉमस गोल्डमन या डबल पीएच.डी. विश्वविख्यात प्राध्यापकांना ‘टॉम’ या नावानं पुकारतात. तरुण मन बंडखोर असतं. त्याला ही उच्च-नीच भेद झुगारून देणारी संस्कृती पटकन भावते.’’
भारताबाहेर शिक्षण-व्यवसायाच्या निमित्तानं दहा र्वष राहिलेला एकजण म्हणाला, ‘‘चार वर्षांच्या गॅपनंतर िहदुस्थानात गेलो होतो. इंटरनेटवरचं काम आटोपून रात्री दीड वाजता झोपलं तरी सकाळी सहा वाजता अंघोळीसाठी उठावं लागायचं. कारण काय? तर, नळाला सकाळी चार ते सात या वेळातच पाणी येतं. माझी दिनचर्या जर कॉर्पोरेशन ठरवणार असेल तर ते मला अजिबात मान्य होणार नाही.’’
तरुण मुला-मुलींना युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगरे परमुलुखांची भूल नेमक्या कोणत्या कारणामुळे पडते? ही मुलं आपले कुटुंबीय, मित्र-मत्रिणी आणि आप्तेष्टांकडे निमिषार्धात पाठ फिरवून सातासमुद्रापलीकडच्या नवख्या प्रदेशात जाण्यासाठी का उत्सुक असतात? परत येऊन भारतात स्थायिक होण्याचं का टाळतात? प्रत्येक परदेशवारीत मी भारतीय वंशाच्या तरुण-तरुणींना तीन प्रश्न विचारतो-
एक : ‘‘इथं का आलात?’’
उत्तर : ‘‘उच्च शिक्षणासाठी.’’
दोन : ‘‘इथंच स्थायिक होणार आहात का?’’ सेमीगुळमुळीत उत्तर : ‘‘तसंच काही नाही. पण काही र्वष इथला प्रॅक्टिकल अनुभव घेणार.’’
तीन : ‘‘म्हणजे भारतात परत जाणार हे नक्की ना?’’
सडेतोड उत्तर : ‘‘पण तिथं जाऊन करणार काय? तिथल्या भ्रष्टाचार, बेशिस्त, वशिलेबाजी, जातीपाती, गुन्हेगारी, लबाडी, अरेरावी, लोडशेिडग, पाणीटंचाई, महागाई, प्रदूषण, गर्दी, रोगराई वगरे अडचणींशी जमवून घेणं आता कठीण आहे. शिवाय, लवकरच इथं कायम राहण्याचा परवानाही मिळून जाईल.’’  
पण नीट विचार केल्यानंतर हा युक्तिवाद उथळ असल्याचं लक्षात येतं. पाश्चात्य देशांमध्ये तरी असं कोणतं रामराज्य चालू आहे? उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार आहे. वर्णद्वेश, बेकारी, गुन्हेगारी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. बंदुका सर्रास मिळतात. माथेफिरू राक्षस दिवसाढवळ्या चौफेर गोळीबार करून निरागस लोकांचे मुडदे पाडतात. वादळ झालं की महानगरात चारचार दिवस वीज आणि पाणी मिळत नाही.
मग आमच्या तरुणांना या परमुलुखांमध्ये नक्की काय मिळतं जे मायदेशी मिळत नाही?
समाजशास्त्राच्या प्राध्यापकमत्रिणीनं उत्तर दिलं, ‘‘वैयक्तिक स्वातंत्र्य! भारतात स्नेहसंबंध दृढ असले तरी ते खाजगी आयुष्यात सतत नाक खुपसत असतात. महत्त्वाचे निर्णय घेताना जवळच्या लोकांना काय वाटेल याचा विचार करावा लागतो. समाजाची आणि समाजरक्षकांची बंधनं असतात, पण परदेशात त्यांच्यावर बंधनं कोण घालणार? याचा अर्थ ही मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात असं अजिबात नाही. भारतीय विद्यार्थी उत्तम ग्रेड्स मिळवतात. पण अभ्यासाव्यतिरिक्त मिळणाऱ्या मोकळ्या वेळात स्वत:ला रुचेल त्या प्रकारे वागण्याचं स्वातंत्र्य त्यांना लाभतं. आणि हेच त्यांना आत्यंतिक महत्वाचं वाटतं.’’
या विकसित देशांमध्ये स्थायिक झालेल्या मुलांकडे भारतातले त्यांचे जन्मदाते सुरुवातीला मोठय़ा उत्साहात जातात. पण हळूहळू त्यांच्या परदेशवाऱ्या कमीकमी होत जातात. त्यापकी बरेचसे लोक तिथं कायमचं राहायला जाण्याचं टाळतात. त्यांना मी तीन प्रश्न विचारतो –
एक : ‘‘या वयात घरामध्ये मुलं-नातवंडं असावीत असं वाटत नाही का?’’
ठाम उत्तर : ‘‘अर्थातच वाटतं.’’
दोन : ‘‘मुलांचं काय मत?’’
डळमळीत उत्तर : ‘‘तुम्हीच भारत सोडून कायमचं राहायला या म्हणतात.’’
तीन : ‘‘मग? प्रॉब्लेम काय आहे?’’
सडेतोड उत्तर : ‘‘दिवसभर करायचं काय? जीव उबगतो. तिथं जवळपास ओळखीचं कोणी नाही. वीकएंडलाच काय ते घराबाहेर पडायचं. तेसुद्धा मुलांचा मूड असला तर आणि त्यांना जिकडे जायचं असेल तिकडे. इथं आम्ही   कधीही आमच्या मर्जीनुसार घराबाहेर पडू    शकतो. मित्रांसोबत गप्पा मारतो. पत्ते खेळतो. नाटक-सिनेमा पाहतो. फोनवरून जेवणबिवण मागवतो. आमचे आम्ही मुखत्यार असतो.’’
अरेच्चा! म्हणजे या बुजुर्गानाही स्वत:ला रुचेल त्या प्रकारे वागण्याचं स्वातंत्र्य आत्यंतिक महत्त्वाचं वाटतंय. मग तरुण पिढीविरुद्ध तक्रार तरी काय आहे? स्वातंत्र्याविना सगळ्यांचाच जीव घुसमटतोय.   
बोला, महात्मा गांधी की जय!
५ं१ीि२ष्टिद्धr(६४)ॠें्र’.ूे