माझा परमोच्च मित्र एकदा टेबलावर ग्लास आदळून करवादला, ‘‘माझी मुलगी सदान्कदा घुश्शात असते. जरा काही मनाविरुद्ध झालं की थयथयाट करते.’’
ग्लास ताब्यात घेऊन मी म्हटलं, ‘‘तूही तसाच आहेस की! आडात नाही तर पोहऱ्यात कसं येणार? पोरगी बापासारखी तर्कटी स्वभावाची झालीय.’’
‘‘मुळीच नाही. माझी बायको एक नंबरची कजाग आहे. तिचेच गुण उतरले आहेत पोरीत. खाण तशी माती.’’
‘‘ती भांडकुदळ आणि तू भांडखोर. पोरीनं नक्की कोणाचे जीन्स घेतले आहेत ते कसं कळणार?’’   
‘‘नक्की बायकोचेच! तिची आईसुद्धा सतत भुंकत असते.’’
नेहमीप्रमाणे कोणताही ठोस निष्कर्ष न काढता आम्ही आपापल्या घरटय़ात परतलो.
हल्लीच एका विश्वविख्यात संशोधन केंद्रात तनमनानं अभ्यास करत धन कमावणाऱ्या एका संशोधकाशी तिथल्या कॅन्टीनमध्ये गप्पा मारताना हा विषय निघाला. तो म्हणाला, ‘‘संतापी स्वभाव आनुवंशिक नसतो.’’
‘‘असं कसं? आई-वडील चिडखोर स्वभावाचे असले तर त्यांची मुलंही सतत ठणाणा करत राहातात. स्वभावाला औषध नसतं.’’
‘‘अजिबात चूक आहे. आई-वडील शांत स्वभावाचे असले तरीही लाडावलेलं मूल चिडखोर होतं. कारण माणसाची जडणघडण त्याच्या आसपासचं वातावरण कसं आहे त्यानुसार होत असते. तुमच्या मित्राच्या घरातली भांडणं लहानपणापासून बघत आल्यामुळे त्याच्या मुलीला तसंच वागण्याचं बाळकडू मिळालं आहे. पुढे शांत स्वभावाच्या मित्र-मत्रिणी, नवरा आणि सहकारी मिळाले आणि तिला उत्कटतेनं वाटलं तर तिचाही स्वभाव हळूहळू बदलू शकेल. तुमच्याही पाहण्यात अशी बरीचशी उदाहरणं असतील.’’
‘‘हो. याच्या उलट उदाहरणंही माहीत आहेत. कित्येक सालस मुली लग्न झाल्यानंतर आक्रस्ताळेपणा करायला लागतात.’’
‘‘थोडक्यात, माणूस आयुष्यात जे काही करतो आणि जो कोणी बनतो त्याला त्याचा वंश नव्हे तर त्याच्या भोवतालची परिस्थिती आणि खुद्द त्याची स्वत:ची आकांक्षा जबाबदार असते.’’ त्यानं ठामपणे सांगितलं.
‘‘असं कसं?’’ मी गोंधळून गेलो. माझी नजर सभोवार फिरली. जगभरातून वेचून आणलेली बुद्धिमान मांदियाळी एकाग्र चित्तानं पिझ्झा चघळताना पाहून मन प्रसन्न झालं. पण आपले डोळे आणि मेंदू नको त्या गोष्टीत पहिल्यांदा नाक खुपसतात. तिथं काही माझ्यासारखे गहूवर्णीय लोक होते. शुद्ध मद्याच्या रंगाचे फिरंगी तर विपुल प्रमाणात होते. अर्धनाकीडोळेश्वर बेसनवर्णीय चिनीसुद्धा बरेच दिसत होते. पण आफ्रिकन वंशाचे म्हणजे कृष्णवर्णीय तुरळकच दिसले. मी माझं नूतन निरीक्षण नोंदवलं.
यजमान म्हणाला, ‘‘आहेत की काही.’’
‘‘तसं नव्हे. किती आहेत हे महत्त्वाचं. हे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. जगातले वीस टक्के लोक कृष्णवर्णीय आहेत. अमेरिकेतले चौदा टक्के आहेत. मग तितक्याच प्रमाणात ते इथं का नाहीत? कारण मुळातच ही मंडळी ‘ढ’ असतात असं म्हटलं जातं. त्यांच्या घराण्यात कोणी फारसं शिकत नाही. कारण बुद्धिमत्ता हासुद्धा आनुवंशिक गुण असतो.’’
‘‘हे चूक आहे. शारीरिक घटक आनुवंशिक असतात. त्वचेचा रंग, अवयवांचे आकार आणि काही व्याधी पिढीजात असतात. शिक्षणाचा आणि आनुवंशिकतेचा घनिष्ठ संबंध नाही.’’
‘‘पण या लोकांचा बुद्धय़ांक म्हणजे इंटेलिजन्स कोशंट कमी असतो, असं म्हणतात.’’
‘‘आय क्यू चाचण्या बुद्धिमत्तेच्या सर्व पलूंचं अचूकपणे मोजमाप करू शकत नाहीत.’’
आमचं संभाषण ऐकलं न ऐकल्यासारखं दाखवत शेजारच्या टेबलावर पिझ्झा खरवडत बसलेली एक तरतरीत महिला चटकन वळून म्हणाली, ‘‘मुळात बुद्धिमत्तेचा आणि शिक्षणाचा संबंध काय? जो माणूस उच्च शिक्षण घेत नाही तो बुद्धू असतो असं तुमचं मत आहे का? आणि आफ्रिकन वंशाच्या लोकांना अक्कल नसते हे कोणी सांगितलं? तसं असतं तर ते संगीत आणि क्रीडा क्षेत्रात इतके पुढे आलेच नसते.’’
मी विचारात पडलो. आमच्या स्वदेशी विचारधारणेनुसार विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये ज्यांना शंभराच्या आसपास गुण मिळतात ते हुशार, बाकीचे गचाळ. बुद्धिमत्ता आणि शिक्षण यांचं समीकरण आम्ही इतक्या सोप्या पद्धतीनं झटपट सोडवून टाकतो.
यजमान म्हणाला, ‘‘आमच्यासारख्या संशोधकांमध्ये आणि क्रीडाक्षेत्रात नाव कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं साम्य असतं. ते म्हणजे निर्धार! दोघेही स्वत:ला आपापल्या कार्यात झोकून देतात. अपयश पचवायची तयारी असते. खचून न जाता पुढे पुढे रेटत नेण्याची जिद्द असते. अंतिम यश मिळणारच असा आत्मविश्वास असतो. हे गुण जो माणूस नेटानं आत्मसात करतो तो त्याच्या आवडत्या क्षेत्रात प्रावीण्य कमावतो. मग त्याचे पूर्वज कोण होते आणि ते काय करायचे हे बिनमहत्त्वाचं असतं.’’
‘‘तरीही इथं कृष्णवर्णीय संशोधक फारसे नाहीत हे सत्य नाकारता येत नाही.’’
‘‘उलट जे कोणी आहेत ते इथं कसे आले हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. इथल्या कृष्णवर्णीयांपकी प्रत्येकजण शास्त्रीय संशोधनकार्यासाठीच आपला जन्म झालाय, या उत्कट भावनेनं इथं आलाय. प्राथमिक शाळेत असताना त्यांची विज्ञानाबद्दलची आवड शिक्षकांच्या नजरेला पडली. त्यांनी पालकांना सांगितलं आणि दोघांनी मिळून या मुलांना प्रोत्साहन दिलं. गल्लीतली इतर मुलं उनाडक्या करत असताना या मुलांना तिथं जाण्यापासून परावृत्त केलं. पुस्तकं आणून दिली. घरात अभ्यासाला पोषक वातावरण निर्माण केलं आणि वर्षांनुर्वष ते कटाक्षानं जोपासलं. एकदा या मुलांची दिशा ठरून गेल्यावर त्यांनी स्वत:हूनच आपापले अभ्यासगट तयार केले आणि मग मागे वळून पाहिलंच नाही. यांचे पालक सामान्यच आहेत. तेव्हा तुम्ही म्हणता तसा आनुवंशिकतेचा मुद्दा गरलागू झाला.’’  
मॅडम म्हणाल्या, ‘‘काही संशोधकांचं तर असं गृहीतक आहे की जनुकीय विकारांची शिकार झालेली मुलं वगळता जन्मजात सगळे हुशारच असतात. फक्त त्यांच्या बुद्धिमत्तेचा कल नक्की कोणत्या क्षेत्राकडे आहे हे समजलं पाहिजे. ते लहान वयातच अचूकपणे शोधून काढण्याची शास्त्रोक्त पण सोपी कार्यप्रणाली विकसित व्हायला हवी.’’  
तज्ज्ञद्वयांसोबतच्या या बातचीतीचा मथितार्थ आणि अन्वयार्थ केंद्राबाहेर पडल्यावर माझ्या ध्यानात आला. एक : अशी कार्यप्रणाली उपलब्ध झाली की मग तरी पोरांच्या अकलेबद्दलच्या भारतीय पालकमंडळींच्या गरसमजुती आणि भविष्याबद्दलच्या चिंता दूर होतील.  
आणि दोन : मित्रकन्येनं मनात आणलं तर आणि तरच, ती निर्धार करून आपला रागीट स्वभाव प्रयत्नपूर्वक बदलून मनमिळाऊ होऊ शकेल.
हे ऐकल्यावर बायको फिसकारली, ‘‘यासाठी तज्ज्ञांपर्यंत जाण्याची गरज काय? माझी आजी आमच्या टाळूवर तेल थापून हेच तर नेहमी सांगायची.’’