गिर्यारोहणासारखा अनगड वाटेवरचा छंद, खेळ, आवड सध्या समाजात चांगलीच रुजू लागली आहे. सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांपासून ते हिमालयातील मोठय़ा मोहिमांपर्यंत अनेक अवघड वाटांवर आता अनेकांची पावले पडू लागली आहेत. अशा या भटकंतीच्या विश्वात रमू पाहणाऱ्या सर्वासाठीच एक उपयुक्त पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे- ‘गोष्ट एका ध्यासाची – एव्हरेस्ट’.
पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ या गिर्यारोहण संस्थेतर्फे सन २०१२ आणि १३ अशी सलग दोन वर्षे जगातील सर्वोच्च lr23अशा ‘एव्हरेस्ट’ शिखरावर नागरी मोहिमा काढल्या होत्या. या दोन्ही मोहिमांच्या यशाने केवळ गिर्यारोहण जगातच नाहीतर एकूण सर्वसामान्य समाजामध्येही गिर्यारोहण या खेळाविषयी सर्वदूर चर्चा झाली. सर्वामध्येच कुतूहल, आकर्षण आणि ओढ निर्माण झाली. तरुणाई मोठय़ा प्रमाणात या छंदाकडे वळू लागली. या छंदातून शरीर-मनाबरोबरच आपापल्या आयुष्यालाही आकार देऊ लागली. एकूणच मराठी गिर्यारोहण जगताला एक नवे वळण, दिशा देणाऱ्या अशा या दोन्ही मोहिमा. या दोन्ही मोहिमांचे नेते होते प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे. या मोहिमेच्या कल्पनेपासून ते यशाचे शिखर सर करेपर्यंत साऱ्या गोष्टी त्यांच्या साक्षीने, प्रयत्नाने घडल्या. त्यांच्या याच अनुभव विश्वाचे शब्दकथन म्हणजे ‘गोष्ट एका ध्यासाची – एव्हरेस्ट’ हे पुस्तक आहे.
पुस्तकाच्या मनोगतापासूनच वाचकांचे गिर्यारोहण, हिमालय आणि एव्हरेस्टबरोबरचे नाते तयार होत जाते. ‘एव्हरेस्ट’ म्हटले की, जगातील एक सर्वोच्च जागा हा भाव जसा मनात येतो, तसेच त्याच्या भोवतीचा मृत्यूचा वावरही मनात धडकी भरवतो. आकर्षण, कुतूहल, दुर्दम्य साहस, चिकाटी, भीती आणि या साऱ्यांवर मात करत मिळवले जाणारे यश-अपयश या टप्प्यांवरचे मानवी शरीर आणि मनाचे खेळ इथे सतत सुरू असतात. झिरपे यांच्या स्वानुभवाच्या याच भाव-भावनांचे खेळ या पुस्तकात आपल्याला जागोजागी भेटतात.
एव्हरेस्ट शिखर, त्याची सामान्य माहिती, मोहिमेची कल्पना, संघ बांधणी, शारीरिक-मानसिक तयारी, सहभागी सदस्यांच्या कुटुंबांची मानसिक तयारी, खर्चाची उभारणी, प्रत्यक्ष मोहीम, त्यातील विविध अडथळे-कसोटय़ा, मानवी मर्यादा आणि क्षमता, निसर्गाचे अडथळे आणि या साऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर प्रखर इच्छाशक्ती आणि शारीरिक चिकाटीवर मिळवलेले यश.. या अशा विविध टप्प्यांमधून ‘एव्हरेस्ट’च्या ध्यासाची ही गोष्ट उलगडत जाते. कोण कुठली अगदी मध्यमवर्गीय घरातील ही मुले, जगातील सर्वोच्च शिखराच्या माथ्याला स्पर्श करण्याचे स्वप्न बांधतात. त्यासाठी वाटेल ते कष्ट घेतात, अपार मेहनत करतात. व्यायामापासून ब्रह्मविद्या आणि योगाचे धडे गिरवतात. खर्चाच्या निधीसाठी वणवण फिरतात. कुणाला यासाठी चालू शिक्षण बाजूला ठेवावे लागते. कुणाला व्यवसायाचे दार बंद करावे लागते, तर कुणाला असलेल्या नोकरीवरही पाणी सोडावे लागते. ..दुसरीकडे हे २१ गिर्यारोहक आणि त्यांच्या पाठिराख्या संस्थेचे स्वप्न सत्यात उतरावे म्हणून उर्वरित समाजही या लढाईत उतरलेला असतो. अगदी लाखाचे धनादेश देणाऱ्या उद्योगपतींपासून ते अकरा रुपयांचे पाकीट देणाऱ्या झोपडपट्टीतील प्रेमळ आजीपर्यंत!
 ..हे सारेच अद्भुत, अतक्र्य, अशक्य कोटीतले! पुस्तक वाचता-वाचता, त्यातले अनुभव जगताना हे अविश्वसनीय सत्यच मनात सारखे घर करून राहते. या साऱ्यांमुळेच हे पुस्तक केवळ एक २९०३५ फुटांवरची चढाई न राहता तुमच्या-आमच्या मानवी जीवनाचाच एक भाग बनते. पुस्तकामधून गिर्यारोहणासारखा खेळ तर प्रकट होतोच, पण त्या जोडीनेच नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, सांघिक भावना, धाडस, चिकाटी, जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती, निसर्गाप्रती आदर अशी जीवनविषयक मूल्यही सहज पुढे येतात.

गोष्ट एका ध्यासाची – एव्हरेस्ट, लेखक : उमेश झिरपे,
समकालीन प्रकाशन,  
पृष्ठे -१९२,
किंमत – २०० रुपये

Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी