lr08‘बखर गीतकारांची’ हे विजय पाडळकर यांचे पुस्तक आज, २१ डिसेंबर रोजी मैत्रेय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा अंश..
जा वेद अख्तर यांनी सलीमसोबत लिहिलेल्या अनेक पटकथा तुफान यशस्वी ठरल्या. इतके की, सिनेमाच्या पोस्टरवर त्यांचे नाव छापले जाऊ लागले. ‘‘या यशाचे रहस्य काय? उत्तम पटकथा लिहिण्याचा मंत्र कोणता?’’ असे विचारल्यावर जावेद हसून म्हणतात, ‘‘ते मला ठाऊक नाही..’’
पटकथाकार म्हणून नावलौकिक मिळाल्यावर जावेद अख्तर गीतलेखनाकडे वळले. ‘‘ज्या वयात लोक कवितालेखन बंद करतात त्या वयात मी कविता लिहावयास सुरुवात केली,’’ असे त्यांनी विनोदाने म्हटले आहे. ‘सिलसिला’ या चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ हे त्यांनी सिनेमासाठी लिहिलेले पहिले गाणे. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली याचे श्रेय शिव-हरी यांच्या नावीन्यपूर्ण संगीताला जसे जाते तसेच ते जावेद यांच्या अर्थपूर्ण रचनांनाही द्यावे लागते. ‘सिलसिला’ने सिद्ध केले की, जावेद जेवढे व्यावसायिक पटकथाकार आहेत तेवढेच संवेदनशील कवीही आहेत. ‘सिलसिला’मध्ये शिव-हरी यांनी चक्क अमिताभला गायला लावले होते व तेही लताबाईंबरोबर! ‘ये कहाँ आ गये हम, यूँही साथ साथ चलते’ या गाण्यात लताबाईंनी अमिताभला सांभाळून घेतले आहे हे स्पष्ट दिसते. ‘ये कहाँ आ गये हम’ या गाण्यात एक ओळ आहे- ‘हुई और भी मुलायम मेरी शाम ढम्लते ढम्लते..’.  जावेद अख्तर यांच्या मते ‘मुलायम’ या शब्दाचा उच्चार लताबाईंनी जसा केला आहे तसा कुणीही करू शकणार नाही.
यानंतर कुलदीप सिंग यांच्या संगीत नियोजनात जावेद यांनी ‘साथ साथ’ या चित्रपटासाठी गीते लिहिली. जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी या चित्रपटासाठी जावेद यांनी लिहिलेल्या अविस्मरणीय गजला गायिल्या –
‘तुमको देखा तो ये खयाल आया
जिंदगी धूप, तुम घना साया’
पण जावेद यांनी जे गीत गुणगुणले ते साऱ्या रसिकांनी आनंदाने गायिले. ‘क्यूं ज़िदगी की राह में, मजबूर हो गये’, ‘प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’ ही सारीच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. या गीतांनी त्यांना एक उत्तम गीतकार म्हणून सुस्थापित केले.
यानंतरची दोन दशके जावेद अख्तर आणि गुलजार या दोन कवींनी सिनेगीतांच्या प्रदेशावर राज्य केले. सिनेसंगीताच्या अवनतीच्या काळात फक्त या दोघांनीच गाण्यांचा दर्जा टिकवून धरला. उत्तमोत्तम गाणी लिहिण्यात आणि पुरस्कार मिळविण्यात जावेद व गुलजार यांची जणू शर्यत लागली आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे. जावेद यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे, तर गुलजार यांना दहा वेळा. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून जावेद यांना चार वेळा नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाले, तर गुलजार यांना दोन वेळा. याशिवाय जावेद यांना उत्तम पटकथेसाठीदेखील सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

सिनेगीतकार होण्यासाठी मोठा कवी असणे आवश्यक नाही, मात्र हरफनमौला (बहुढंगी) असणे आवश्यक आहे, असे जावेद यांचे मत आहे. शिवाय गीतकाराला संगीताचीही तोंडओळख असणे गरजेचे आहे. जावेद म्हणतात, ‘‘इथे तुम्हाला चमत्कारिक चालीवर गाणी लिहावी लागतात, त्याबरोबरच तुम्हाला प्रेमगीत, अंगाईगीत, भजन आणि कव्वालीही लिहिता आली पाहिजे. भिकाऱ्याचे गाणे लिहिता आले पाहिजे आणि शेतकऱ्याचेही. यासाठी फार मोठे शब्दभांडार जवळ असणे जरूर आहे.’’
आजच्या गीत-संगीताबद्दल जावेद अख्तर यांच्या मनात असमाधान आहे. त्यांच्या मते, ‘वापरा आणि फेका’ हा आजच्या जीवनाचा मंत्र बनला आहे. संगीतही त्याला अपवाद नाही. आजच्या गाण्यांचा टेम्पो इतका जलद आहे, की मनात उतरण्याची संधीच त्याला मिळत नाही. गाण्याच्या चालीने व संगीताने शब्दांना थोडी तरी जागा दिली पाहिजे. ऐकणाऱ्याला असे वाटले पाहिजे की, ‘अरे, हे गाणे हे सांगू इच्छित आहे!’ असे नाही वाटले तर गाणे जास्त काळ श्रोत्यांच्या मनात टिकून राहणार नाही. जावेद यांनी गाण्यातील अर्थाकडे जाणीवपूर्वक अधिक लक्ष दिले. त्यांची गाणी सिनेमाची गाणी न वाटता एका कवीने लिहिलेली, साहित्यिक मूल्ये असलेली गीते वाटतात.  

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध