हेमंतकुमारजींनी त्यांना लाभलेल्या श्रीमंत बंगाली संगीत परंपरेचा सुरेख उपयोग करत रवीन्द्र संगीताशी नातं राखत चाली दिल्या. खास बंगाली मींड, शब्दांना दिलेली गोलाई (आठवा.. न येऽऽ चाँऽऽद होगा. किंवा या दिऽल की सुनो दुनियाऽवालो) त्यांचं बंगालीपण सांगून जातं. मुळात lok04संगीतकार म्हणून अतिशय सौम्य टेम्परामेंट असल्यामुळे भरपूर वाद्यमेळाचा, चमत्कृतीचा त्यांना सोस नव्हता. हेमंतदांनी जिथे आवश्यक वाटला तिथे शास्त्रीय संगीताचा वापरही केला. पाश्चात्त्य संगीतासाठीही त्यांच्या संगीतात आवश्यक तिथे स्थान होतं. त्यामुळे तिलंग (सखी री सुन बोले), पहाडी (वृंदावन का कृष्ण कन्हैया), पिलू (न जाओ सैंया), किरवाणी (मेरा दिल ये पुकारे), शिवरंजनी (कहीं दीप जले), तोडी (सुन रसिया मन बसिया) असे काही राग त्यांच्या संगीतात डोकावले, तर ‘ये हवा ये फिजा’ (एक झलक) सारख्या गाण्यांमध्ये वेस्टर्न हार्मनी, कॉर्डस्, पियानोचा समजून केलेला वापर दिसतो.
‘संगीतकार’ असण्याचा ‘गायक’ हेमंतकुमारना थोडा तोटाच झाला असं म्हणावं लागेल. कारण स्पर्धा वाढली, तशी अनेक संगीतकारांनी त्यांच्याकडे प्रतिस्पर्धी म्हणूनच बघायला सुरुवात केली. त्यांनी इतर संगीतकारांकडे गायलेली गाणी त्या-त्या संगीतकारांच्या कारकीर्दीची खूप महत्त्वाची आहेत. ‘ये रात ये चाँदनी फिर कहाँ’ (एस. डी. बर्मन, जाल)च्या ‘दास्ताँ’चा बेस, त्याची खोली पुन्हा पुन्हा ऐकावी अशी. अगदी खोल तळापासून आलेली ‘दिल की दास्ताँ’ कानांना आणि मनालाही सुखावते. सलीलदांची त्यांच्या आवाजावरची प्रतिक्रिया ऐकण्यासारखी आहे. ते म्हणत, ‘अगर भगवान कभी गाता, तो इसी आवाज में.’
या आवाजाला जो घनगंभीरपणा, भारदस्तपणा आहे, त्यामुळे त्या गाण्यांना एक वेगळीच उंची मिळाली. म्हणजे दखल घ्यायला लावणारा, लक्ष खेचून घेणारा हा आवाज. त्याला टाळून तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही असा. ँ४्रेल्लॠ करावं तर ते हेमंतदांनीच. त्या गुणगुणण्याचं vibration एक हवीहवीशी बेचैनी निर्माण करतं. काळजावर अनेक फुलपाखरं येऊन त्यांनी गुदगुल्या कराव्यात असं काहीसं ते ँ४्रेल्लॠ ऐकताना होतं. पुरुषाच्या आवाजातला सगळा रोमान्स हेमंतदांच्या humming मध्ये साकार होतो. विलक्षण रोमँटिक, पण हा रोमान्स कसा? तर संयमी, अबोल, खूप मनापासून, खूप सुसंस्कृत. हेमंतदांनी अन्य संगीतकारांकडे गायलेली ही गाणी पाहा. ‘याद किया दिलने..’ (शंकर-जय.), ‘जाग दर्दे इश्क’ (सी. रामचंद्र), ‘जाने वो कैसे’ (एस. डी.), ‘गंगा आए कहाँसे’ (सलील दा), ‘चंदन का पलना’ (नौशाद), ‘मुझको तुम जो मिले’ (मुकुल रॉय, हे एक अत्यंत सुंदर डय़ुएट आहे), ‘तुम्हे याद होगा’, ‘नींद न मुझको आए’ (कल्याणजी आनंदजी) अशी अनेक गाणी. बर्मनदांकडची ‘चुप है धरती’ आणि ‘तेरी दुनिया में जीने से तो बेहतर है’ (घर नं. ४४) ही अत्यंत सुरेख गाणी ऐकताना, या गाण्यांना आपण दुसऱ्या आवाजाची कल्पनाच करू शकत नाही. ही यादी खूप मोठी आहे. ‘तेरी दुनिया में’मध्ये ‘अरे ओ आसमाँवाले’ ही ओळ हेमंतदा ज्या पद्धतीने वर नेतात, त्या आवाजाची ती गोलाई, खिचाव, क्या बात है! सी. रामचंद्रांचं सुंदर डय़ुएट ‘उम्र हुई तुमसे मिले..’ (बहुरानी) गाणं म्हणून अत्यंत गोड आहेच, पण यात जो आवाज हेमंतदांचा लागलाय, केवळ अप्रतिम! ‘संग तुम्हारा मेरी जिंदगी को रास आ गया’ हा अंतरा मी अगणित वेळा ऐकते. ‘ऐसा लगे जैसे पहली बार मिले है’ ही ओळ इतकी उत्कटतेने येते. या प्लेनवरचा आवाज ऐकताना, लता-हेमंत हेच best combination आहे असं वाटून जातं. (‘छुपालो यूं दिल में’ला विसरून कसं चालेल?)
‘बेकरार करके हमें’ किंवा ‘जरा नजरोंसे कह दो जी’सारख्या स्वत:च्याच चाली गातानाही एक मिश्कील आवाज लावलेला जाणवतो. म्हणजे हा आवाज, ‘या दिलकी सुनो’ किंवा ‘जाने वो कैसे’मध्ये व्यथित होता तर, ‘जरा नजरोंसे’ मध्ये आणि ‘है अपना दिल तो आवारा’ मध्ये खटय़ाळही होता, ‘ऐ दिल अब कहीं न जा’ म्हणताना स्वत:ची समजूत घालणारा होता (कहींऽऽ शब्द खास ऐकण्यासारखा.) आणि हाच आवाज ‘छुपालो..’मध्ये दैवी प्रेम घेऊन आला..
आपल्या मराठीत ‘वल्हव रे नाखवा’, ‘दरिया वरी रं’सारख्या कोळीगीतांमध्ये सागराची गाज आणि हेमंतदांचा आवाज एकरूप झाल्याचा भास निर्माण झाला. दरियाचा मोठा ‘दरारा’ त्या आवाजानेच तर जिवंत केला. मनाच्या अत्यंत तरल पडद्यापर्यंत पोहोचणाऱ्या संगीतकारांपकी अत्यंत महत्त्वाचं नाव होतं हेमंतदा.. त्यांच्या काही हळुवार, रोमँटिक गाण्यांचा आज आस्वाद घेऊ.

तुम पुकार लो (गुलजार, खामोशी)
चांदण्यात न्हालेली ही शांत रात्र. पण मनात मात्र तुझीच आठवण. आता मात्र तू यावंस. तुझी साथ हवी आहे, तुझी साद हवी आहे. तुझी माझी एकच अवस्था आहे, हा विचार मनाची समजूत घालायला पुरेसा नाही ना. कैक रात्री ओठात सांभाळलेलं हे गूज हळूच तुला सांगायचंय..
‘होठों पे लिये हुए दिल की बात हम
जागते रहेंगे और कितनी रात हम
मुख्तसर सी बात है.. तुमसे प्यार है..’
प्रेमात पडावं तर असं, कुणासाठी झुरावं तर जसं.. आणि ती सुगंधी जखम अनुभवावी.. तो सल गोंजारावा.. चांदणं झिरपावं तशी तिची आठवण अंगांगावर झिरपू द्यावी.. तर ती याच गाण्यातून. ‘मुख्तसर सी (छोटीशी..) गोष्ट.. ‘तुमसे प्यार है..’ म्हणताना, ऐकताना नखशिखांत थरारली नाही, अशा व्यक्तींनी कधी प्रेमच केलं नसावं कुणावर.. इतकं नाजूक हळुवार प्रेम. या प्रेमाला वासनेचा, वखवखलेपणाचा स्पर्श नाही. ‘रात ये करार की, बेकरार हैे, तुम्हारा इंतजार है..’ ही अनावर ओढ, बेचनी, एखाद्या तलम धुक्याच्या ओढणीसारखी पांघरून घ्यावी.. ती whistle तर कुठल्या कुठे क्षितिजाच्या पार घेऊन जाते.. वा गुलजार! वा हेमंतदा!

धीरे धीरे मचल.. (कैफी आझमी, अनुपमा)
पियानोच्या साथीने सजलेलं प्रत्येक वाक्य.. ए ‘दिले’ बेकरार, मुझे ‘बार बार’ या शब्दांना दिलेली सुंदर ‘मींड’ अप्रतिम. मुळात हे शब्दच इतके मिश्कील! ‘मचलना’ म्हणजेच जर अस्वस्थता, तगमग.. तर ती ‘हळूहळू’ कशी होईल? म्हणजे तिला हे माहीत आहे की जिवाची घालमेल, हृदयाचे तेज ठोके.. हे सगळं होणारच, कारण ‘तो’ येतोय.. पण ते ही ‘धीरे धीरे’ व्हावं.. क्या बात है.. पुन्हा तोची’ीॠंल्लूी पडद्यावर. सुंदर वेणी, साधीशी साडी नेसलेली, पिआनो वाजवणारी. त्याच्या ओठातली सिगरेट लटक्या रागाने काढून टाकणारी ती आणि सूट घातलेला, हळूच मागे येऊन खांद्यावर हात ठेवणारा तो. सगळं कसं.. संयत, हळुवार.
‘मुझको करने दे, करने दे सोला सिंगार’ ही ओळ इतक्या सुंदर तऱ्हेने खालच्या ‘सा’पासून निघून वरच्या ‘सा’पर्यंत जाऊन ‘कोई आता है’ला बिलगते.. आणि लताबाईंच्या ‘बेकरार’, ‘इख्तियार’ या शब्दोच्चारांबद्दल काय सांगावं! त्यांचा तो अगदी खास ‘कोई आता है’ मधला ‘है’ ऐकण्यासाठी अगणित वेळा गाणं ऐकावं. कुठून येतात हे उच्चार? ‘तो’ येतोय, त्याची चाहूल, त्याचा गंध ही हवा सांगतेय मला.. हीी७्रू३ीेील्ल३, ही अधीरता त्या ‘है’मध्ये एकवटलीय. त्यानं मनवावं म्हणून तर रुसणार मी.. क्या बात है कैफी साहब.. जाईच्या पाकळ्यांहून नाजूक आहे हे गाणं..

हमने देखी है.. (गुलजार, खामोशी)
‘नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही. साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही..’ असं वाटायला लावणारी गुलजारी कविता. या कवितेला लावायचीच झाली तर हीच चाल. ‘रिश्तों का इल्जाम ना दो’ काय नितांतसुंदर कल्पना. कशासाठी लादायचं ते नात्याचं नाव. राहू दे की, ही भावना अशीच. निर्गुण.. अमूर्त.. प्रत्येक गोष्ट कप्प्यात घालायचा अट्टहास कशासाठी? मुळात प्रेम ही ‘नूर की बूंद’.. एक प्रकाशाचा सुंदर थेंब.. वर्षांनुर्वष अस्तित्वात राहणारा.. आणि ही तर शांतता.. तीच बोलते.. तीच ऐकते.. मनाच्या कुठल्या प्रतलावर हे असं सुचत असावं. हे गाणं नाही, ही मूर्तिमंत प्रकाशमान अशी शलाका.. एखाद्या वेळेसच घडून जाणारा चमत्कार!
‘सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो..’
आत्म्याने अनुभवायची गोष्ट आहे ही.. इतक्या खोलवर उमलणारी.. क्या बात है! ‘रहने दो’ म्हणताना लताबाई पुन्हा तोच चमत्कार करतात. ‘रहने’ च्या उच्चारात सगळा अर्थ एकवटतो, ‘सिर्फ एहसास’ म्हणताना तो कुजबुजलेपणा.. कापऱ्या ओठातले ते कैक अफसाने.. डोळ्यातली निराळीच चमक.. हे सगळं अनुभवायचं.. त्याला नाव कशाला? ही चाल, गुलजार-हेमंतदा हेसुद्धा गुलजार-पंचमसारखंच अप्रतिम ूे्रुल्लं३्रल्ल होतं, हे सांगणारी..
या सगळ्याहून वेगळं असणारं ‘वंदे मातरम्’सारखं राष्ट्रप्रेमानं भारलेलं गाणंही अत्यंत प्रभावीपणे साकारताना हेमंतदांमधला कुशल संगीतकार एका वेगळ्या प्रतिभेचा आविष्कार घडवतो.

वंदे मातरम् (बंकिमचंद्र चॅटर्जी, आनंदमठ)
‘वंदेऽऽऽमातरम्’ ही आसमंत भेदून जाणारी पुकार आणि विजेसारखी तळपणारी ती तान! प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीचं स्फुिल्लग चेतवणारं हे देशप्रेमाचं संगीतमय उत्कट प्रतीक.. लताबाईंचा आवाज इतका प्रेरणादायी आणि चांगल्या अर्थाने आक्रमक लागलाय, ज्याची या गाण्याला नितांत गरज होती. सा सा रे रे रे सा सा आणि सा सा ग ग ग सा सा, या दोन स्वरांवरचा वंदे मातरम् हा कोरस आणि त्या कोरसच्या पाश्र्वभूमीवर झळाळून उठणारी गगनाला भिडणारी ती वंदे मातरम् ही ललकारी. वंदे मातरम्ला अनेक चाली लागल्या, पण आजही अन्य कुठल्याही चालीपेक्षा ‘हे’ वंदे मातरम् मला उजवं वाटतं. राष्ट्रप्रेमाने भारलेली ‘आओ बच्चों’, ‘देदी हमे आजादी’, ‘हम लाए हैं तूफानसे कश्ती..’ इत्यादी गाणीही हेमंतदांनी दिली. याच चित्रपटातलं (जागृती) ‘चलो चले माँ’.. हे खूप आशावादी गाणं.
‘वो शाम कुछ अजीब थी’सारख्या गाण्यात ‘वो शाम’ आणि ‘ये शाम’मधला फरक किशोर आपल्या आवाजातून कसा दाखवतो ते ऐकण्यासारखं.. ‘वो’ म्हणताना जो आवाज भूतकाळात जाऊन कातर होतो.. पाश्चात्त्य कॉयरमुळे हे गाणं मनाच्या हळव्या कोपऱ्यात जाऊन बसतं. ‘सपनें सुहाने लडकपन के’चा अवखळपणा, ‘भवराँ बडा नादान’चा खटय़ाळपणा असाच चिरतरुण. ‘सपनें’नंतरचा तो न लिहिलेला, पण गाण्यात असणारा स्वल्पविराम खूप काही सांगणारा. ‘तुम और हम भूलके गम’, ‘सारा मोरा कजरा’, ‘इतना तो कह दो’, ‘गुमसुमसा ये जहाँ’सारखी अनेक सुरेख डय़ुएट हेमंतदांच्या स्पर्शानं फुलली, गाजली.. पण िहदीपेक्षा हेमंतदांचं जास्तच सर्जन बंगाली संगीतात आहे. ‘रवींद्र संगीत’ या प्रांतात हेमंत कुमार यांचं नाव कानाची पाळी हातात धरूनच घ्यावं लागतं. इतकं मोठं स्थान बंगाली माणसाच्या मनात त्यांनी मिळवलं.
हेमंतदांचं सर्जन अनुभवायचं तर मनाच्या एका तरल अवस्थेत जायला हवं. ती संवेदनशीलता जपायला हवी. स्वत: हेमंतदांच्या सरळ, शांत स्वभावामुळे त्यांनाही राजकारणाचा खूप त्रास झालाच, पण त्यांचा मोठेपणा असा की, पुढे नावारूपाला आलेले संगीतकार रवी हे त्यांच्याकडे साहाय्यक म्हणून असताना, आपणहून त्यांना स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. स्वत: रवींनी ही गोष्ट अत्यंत आदरपूर्वक मला बोलून दाखवली. कृतज्ञतेने बंगाली चित्रपटांसाठी हेमंतदांनी केलेलं कामसुद्धा प्रचंड आहे. एके काळी मुंबई-कलकत्ता विमान फेऱ्या एवढय़ा वाढल्या की इंडियन एअरलाइन्सने त्यांना अॅवॉर्ड जाहीर केलं.
७० च्या दशकाअखेर हेमंतदांसारख्या तरल चाली देणाऱ्या संगीतकारांचं सर्जन विझत चाललं होतं. कारण चित्रपटाचा पोतच बदलला. हेमंतदांनी कोलकात्याला प्रयाण केलं. अनेक व्याधींनी त्रस्त झालेल्या हेमंतदांनी २७ सप्टेंबर १९८९ रोजी शेवटचा श्वास घेतला.
पण.. एखाद्या सन्नाटलेल्या रात्री ती गूढता अनुभवायची असेल तर.. हेमंतदांना पर्याय नाही.. कधी कुणावर झपाटून प्रेम करायचं तर.. हेमंतदांना पर्याय नाही.
हाल है ये मस्ती का सांस लगी थमने..
उतने रहे प्यासे हम जितनी भी पी हमने..
गम को बढा गई गमकी रात..
ही प्यास न बुझणारी.. ही ओढ न थांबणारी.. या गाण्यांनी झपाटलेलं राहण्यातच एक और ‘मजा’ आहे. सो, हॅट्स ऑफ टू हेमंतदा..