नांदेडमध्ये जुनी भाषा सांभाळून असणारी, बोलणारी ज्येष्ठ माणसं पाहिली की वाटतं, जिल्ह्य़ांतर्गत जसे तालुके, खेडी तशीच ही माणसं. आपलं जुनेपण सांभाळणारी. जुनी भाषा घेऊन व्यवहार करणारी. चोपडय़ा भाषेनं आलेला ओशटपणा घालवायला यांचेच शब्द आपल्याला घासूनपुसून काढतात. ही माणसं पोरासोरांची विचारपूस करताना सहजच विचारतात- ‘बरं वाटायलंय की, का इजा व्हायलीय?’ अभ्यासात रमलेल्या पोराला त्याचा चुलता, आजोबा डोळे मोठे करून आश्चर्य दाखवून विचारणार- ‘बापा! आसं करून पास होतूस की काय!’

नांदेड जिल्ह्य़ाची गंमत अशी, की या जिल्ह्य़ाला एकीकडून बिदरचा (कर्नाटक) शेजार, दुसरीकडून निझामाबाद-अदिलाबाद हा आंध्र प्रदेशचा शेजार, तर तिसरीकडे यवतमाळ हा विदर्भाचा शेजार. एकेकाळी निझामी अंमल असल्याने वडीलधारी पिढी उर्दूतून शिकलेली. त्यामुळे व्यवहारात हिंदी-उर्दूचे अजोड मिश्रण झालेले. शिवाय तेलुगू व कन्नड भाषेतले शब्दही नातेवाईकाकडे शिकायला येऊन राहिलेल्या अन् तिथेच नोकरी करून स्थायिक झालेल्या मुलांसारखे इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अशा तऱ्हेने त्या- त्या भाषेचे शब्द घेऊन त्या- त्या तऱ्हेने बोलताना नांदेड जिल्ह्य़ातली माणसं वरवर पाहता विचित्रच वाटणार! समोरचा माणूस मजाक करतो आहे की गंभीरपणे बोलतो आहे, याची खबरच लागत नाही. पण त्याच्याशी लगेचच दोस्ती होणार!
‘कोस कोस पर बदले पानी, सवा कोस पर बानी’ या म्हणीचा दणका नांदेड जिल्ह्य़ात नवीन रुळणाऱ्या माणसाला बसतो, तो इथल्या भाषेच्या तऱ्हेने! विपरीत शब्दांनी भावना व्यक्त करण्याची तऱ्हा. माणसाच्या भाषेवरून आणि त्याच्या शब्दोच्चारांवरून त्याची वृत्ती ठरवणं, हे त्या माणसावर अन्याय करणारं असतं, हे मग इथं रुळणाऱ्या माणसाच्या ध्यानात येतं. विपरीत शब्दांत विपरीत तऱ्हेनं कौतुक करण्याच्या या पद्धतीतूनच त्या शब्दांआड उभ्या असणाऱ्या माणसाची आस्था जाणवू लागते. आणि हेही लक्षात येऊ लागतं, की माणसाला मनातलं कौतुक सांगायसाठी निसरडे, गुळगुळीत शब्द नको असतात. तिखट जेवणानं तृप्त व्हावं, तसं विपरीत भाषेतून समाधान लाभतं, हे खरं. एक खेडवळ तरुण- बहुधा पहिल्यांदाच मतदान करायला आला होता. बोटाला शाईचा ठिपका पडला अन् चटकन् त्याने बोट मागे घेतले. चटका बसल्यासारखे. मग मतदान करून, मतपत्रिकेची घडी घाईघाईत करून ती मतपेटीत सारू लागला, तर ती आत व्यवस्थित जाईना गेली, तेव्हा पटकन् म्हणून गेला, ‘‘अं! आरं हे इगिन जाईना झालं की!’’ हा ‘इगिन’ (विघ्न) शब्द कुठेही वापरला जातो. रडणारं पोर आटोपना झालं की बाप म्हणणार, ‘‘अं! आरं हे इगिन सांभाळा बरं!’’  
नांदेडच्या भाषेत सांगायचं म्हणजे असे अनेक शब्द इथल्या भाषेत ‘सपादून’ गेले आहेत. सुख, दु:ख, आनंद व्यक्त करताना एखादा शब्द अप्रचलित असतो- वाहत्या पाण्यातल्या दगडासारखा. आणि मग तोच आधार वाटत असतो नंतर. ‘पांदण’, ‘कुटाना’, ‘डोलची’ (पोहरा), आयुष्यभराच्या मिळकतीसाठी वापरला जाणारा ‘जिनगानी’ हे शब्द हदगाव तालुक्याकडे रुळले आहेत. ‘का म्हणून’ऐवजी ‘काहून’, ‘कामून’, ‘काऊन’ अशी रूपांतरंही अशाच सरमिसळीची उदाहरणं आहेत.
गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्य़ाची माय. हा ‘माय’ शब्द इथला वडीलधारा माणूस सहज वापरतो. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्याला ‘ये माय’, ‘जा माय’ असं म्हणतो. शिवाय नदीचा संदर्भ देऊन ठिकाण सांगायची एक खासियत आहे- ‘गंगंकडं’ आणि ‘बेदराकडं’ (बिदरकडे).            
उर्दू शब्द हे तर नांदेडच्या मराठी भाषेत सफाईने विरघळले आहेत. शिवाय प्लंबर, गवंडी अशी कामं करणारी मुस्लीम मंडळी ‘वो परवडता नहीं साब’, ‘ये पडतल खाता नहीं..’ असं सहजच म्हणून जातात. कंधारला परीक्षेच्या निकालाला ‘नतीजा’ म्हणत. आजही अधूनमधून हा शब्द भेटतो. ‘निकाल’ या शब्दातली स्फोटाची (!)  भावना या ‘नतीजा’मध्ये नसते. शिवाय- फिकीर, फुर्सत, पेशकार, बयनामा. (बयनामा म्हणजे स्थावर मालमत्तेची रजिस्ट्री. त्यातून काही रक्कम अग्रिम देऊन- म्हणजे अनामत देऊन करारपत्र केलं तर त्याला ‘इस्वास बय’ असा शब्द (कसा कोण जाणे!) आहे!) प्रचलित उर्दू शब्दांचा माग काढत जाण्याचा छंद मोठा आनंद देऊन जातो. इथं ‘खेडय़ात राहून हा ‘गावदी’ व्हायलाय’, (गावदी म्हणजे गाव-आदी : गावंढळ!) असं म्हटलं जातं. तसंच ‘फराकत झोपलाय’ या शब्दांत ‘फराह’ म्हणजे ऐसपस. मात्र, ‘लंबेलाट झालाय’ या शब्दांतल्या अर्थाचा पत्ता लागत नाही.
म्हणी- वाक्प्रचार तर आणखीनच मजेदार. ‘नाकापेक्षा मोती जड’ या म्हणीपेक्षा ‘मालकाचं नाव गन्या, तर चाकराचं? रुद्राजी आप्पा!’ हे जास्त रास्त वाटणारं. घरातली आजी सहजच म्हणून जाते- ‘मंत्र थोडा, थुंका फार!’, ‘घरच्याचा वीट अन् बाहेरच्याचा भांग नीट!’ (मूळ म्हण- ‘घरचीचा वीट अन् बाहेरचीचा -वाकडा असलेला- भांग नीट!’ अशी आहे!) ‘कुठल्या कुठं अन् उठू उठू भेटं!’, ‘तोंडात तीळ भिजत नाही’.. उर्दू भाषेतली म्हण अशीच मशहूर आहे- ‘बकरी ईद को बचेंगे, तो मोहरम में देखेंगे!’  
‘संग नको म्हणजे येतो सलगऱ्यापत्तर!’ ही म्हण समजणं अवघडच आहे. ‘घरचं झालं थोडं अन् इवायानं धाडलं घोडं’ ही म्हण नांदेडची आहे असं नाही म्हणता येणार; पण तिचा वापर सर्रास होतो. मित्राची सत्तर वर्षांची आई कधी चिडून म्हणते, ‘मी काही म्हणायला गेलं की माझा आस्कराच करता!’ आता ‘आस्करा’ हा शब्द कसा आला? तर आई-आजीला सारखं ‘आसं कर, तसं कर’ असं म्हटलं जातं, त्यामुळे हा शब्द वापरला जात असावा. भिन्न स्वभावांच्या पोरांसाठी त्यांची आई ‘एक इर, तर एक पीर!’ असं म्हणते. त्याचा खुलासा असा- पीर म्हणजे नवसाला पावणारा आणि इर म्हणजे वीर- हा इरोबा म्हणून वेशीबाहेर असतो, त्याला नैवेद्य दाखवावा लागतो. दगडाचा हा इरोबा- त्याला चेहरामोहरा नसतो. का, तर गावाच्या रक्षणार्थ कुण्याकाळी आपले बलिदान केलेला हा वीर असतो!
ऑडिटची नोकरी केल्याने कर्नाटकाला लागून असलेलं मुक्रामाबाद, देगलूर, आंध्र प्रदेशला लागून असलेले बिलोली, किनवट, धर्माबाद अन् यवतमाळ जिल्ह्य़ाला लागून असलेल्या हदगावला मी फिरलोय. त्या- त्या तालुक्यातली भाषा नकळत जाणवली. ओळखीचाच शब्द असतो, पण बोलणारं माणूस कधी त्या शब्दाची लवचिक डहाळी करतो, तर कधी डोंबऱ्याच्या लोखंडी िरगातून जावं तसं वजनं (सावकाश) बोलतो. एका तालुक्यातला माणूस विचारतो, ‘काय करायलास?’ तर तेलुगू भाषेच्या वातावरणातला एकजण विचारतो, ‘काय करू लालास?’ (त्याला उत्तर मिळतं- ‘कोन्टय़ात बसू आडकूल-पोहे खायलालो.’) पदार्थाची चव कळण्यासाठी त्यातले घटक माहीत असले, त्याची कृती माहीत असली तरी पदार्थाचे सेवन जसे आवश्यक, तसेच हे भाषेचे श्रवण अनुभवण्यासारखे असते. ‘आयनक’ (चष्मा), दस्ती (रुमाल), तकलीफ (त्रास), लहान गावासाठी ‘खुर्द’ अन् मोठय़ा गावासाठी ‘बुद्रुक’ (बुजुर्ग), शिशी, खबर, वजिफा, खुर्दा.. असे अनेक शब्द उर्दूतून मराठीत सुखेनैव नांदत आले आहेत. खेडय़ात आजही जनगणनेला आलेल्या माणसाकडे पाहून एखादा वडीलधारा सहजच म्हणून जातो-  ‘मर्दूमशुमारीला आलेत ही माणसं.’
तेलुगू भाषाही अशीच रुळलेली. कैऱ्यांचे दोन पदार्थ मोठे लोकप्रिय आहेत. ते म्हणजे- सकुबद्दा आणि तक्कु. रायतं म्हणजे लोणचं. कल्यापाक म्हणजे कढीपत्ता. कोिशबीर म्हणजे आवकोरा. बोंडं (भजे), कद्दू (भोपळा), तुळई- नाट, कडची असे शब्द नेहमीच्या बोलण्यात आढळतात. ‘करतूस की’, ‘बसतुस की’, ‘जातूस की’ असे तेलुगू वळण. चिंच-गूळ घातलेलं वरण ही तर खास तेलंगणातली चीज इथे रूढ झालेली. गव्हाचे पीठ, गूळ अन् तूप या तीन चीजा घेऊन बनवलेल्याला ‘फक्की’ म्हटलं, की फाका (उपवास), फकिरी (दारिद्रय़) आणि फक्क (जबडा- तोंड) या तीन शब्दांची आठवण होते. फक्कीचा घास घेतला की बोलू नये. ठसका लागतो. नांदेड जिल्ह्य़ातल्या लोकांची एका बाबतीत मोठी तारांबळ होते.
इकडे ‘उसळ’ म्हटलं की ती उपवासासाठीची साबुदाण्याचीच असते. मटकीची उसळ असेल तर ती ‘मटकीची उसळ’ असं म्हटलं जातं. या पाश्र्वभूमीवर पुण्या-मुंबईला ‘साबुदाण्याची खिचडी’ असं नुसतं वाचलं तरी उपवास मोडल्यासारखं
तोंड होतं.
लेप (रजई), भरत्या (पितळेचं गोलाकार भांडं- ज्यात वरण शिजवलं जायचं.), वत्तल (न्हाणीत पाणी तापवायची जागा अन् भांडे) असे कानडी शब्दही आनंदानं नांदताहेत. विस्तारत जाणाऱ्या नांदेड शहरात जुनी भाषा सांभाळून असणारी, बोलणारी ज्येष्ठ माणसं पाहिली की वाटतं, जिल्ह्य़ांतर्गत जसे तालुके, खेडी तशीच ही माणसं. आपलं जुनेपण सांभाळणारी. जुनी भाषा घेऊन व्यवहार करणारी. चोपडय़ा भाषेनं आलेला ओशटपणा घालवायला यांचेच शब्द आपल्याला घासूनपुसून काढतात. ही माणसं पोरासोरांची विचारपूस करताना सहजच विचारतात-‘बरं वाटायलंय की, का इजा व्हायलीय?’ अभ्यासात रमलेल्या पोराला त्याचा चुलता, आजोबा डोळे मोठे करून आश्चर्य दाखवून विचारणार- ‘बापा! आसं करून पास होतूस की काय!’   
आता तर प्रचंड वेगाच्या या दिवसांत अनेक इंग्रजी शब्द वावटळीत पाचोळा चिकटावा तसे चिकटून बसलेत. हे शब्द खेडय़ातली माणसं सुगडी रंगवावीत तशी उच्चारतात. उदा. ‘तुला मिस कॉल हाणला होता की तीनदा!’, ‘मला उगी टेंशन दिऊ नको.’ समजणारे समजून घेतात.
आता कुतूहल वाटतं ते भाषेच्या नव्या रूपाचे. बाइट द्यावी तसे बोलताना माणसाची तऱ्हा, मोबाइल, लक्झरी बस, मोटारसायकली, एमपी थ्री गाणी, सीरियल्सचा गराडा या सगळ्यात एखादं माणूस जेव्हा व्याकूळ होतं, उत्कट अशी त्याची मन:स्थिती होते, तेव्हा ते कसं वागतं, बोलतं, कोणत्या शब्दांचा आधार घेतं, हे लक्षपूर्वक बघायला पाहिजे.