महाराष्ट्रातील अनेक नाटय़स्पर्धा ज्या नाटय़स्पर्धेने प्रेरित झाल्या, त्या भारतीय विद्याभवनच्या महाविद्यालयीन नाटय़स्पर्धेबद्दल न लिहिणं हे कृतघ्नपणाचं ठरेल. रंगभूमीला आलेली मरगळ दूर करायची असेल तर तरुणांना तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना रंगभूमीचा एक भाग करायला हवं, हे जाणून भारतीय विद्याभवनचे कुलगुरू
श्री. मुन्शी व लीलावती मुन्शी यांनी १९५१ साली आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धा सुरू केल्या. ही स्पर्धा अनेक भाषांतून घेतल्यास अन्यभाषिक रंगभूमीचे स्वरूप कळू शकेल आणि इतरांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, याचं भानही रंगकर्मीना येईल, हा विचार ही स्पर्धा बहुभाषी करण्यामागे होता.
काही घटना सातत्याने घडत राहिल्या की त्यांची सवय होते. कृती पुढे पुढे जात राहतात, विकास पावतात, स्वरूप बदलतात. आणि मग त्या घटनांचं मूळच विसरलं जातं. नवनव्या कृतींचा गुंतवळा एवढा वाढत जातो, की प्रारंभ कुठून झाला, ते आठवण्याची गरजच भासत नाही. ज्या पायावर डोलारा उभा राहिलाय त्याचीच विस्मृती होणं म्हणजे पूर्वजांचंच देणं विसरण्याजोगं आहे. त्याचं ऋण फेडता आलं नाही, तरी ते वारंवार जाणवणं आणि आपण त्याच्याप्रती कृतज्ञ असणं आवश्यक असतं.
या लेखमालेच्या पहिल्या काही लेखांनंतर राज्य नाटय़स्पर्धेच्या एकूण वातावरणाबद्दल आणि गुणविशेषांबद्दल मी स्मरणयात्रा अक्षरविली. पण नंतरच्या अनेक नाटय़स्पर्धा ज्या मूळ नाटय़स्पर्धेने प्रेरित झाल्या, त्या भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धेविषयी काही लिहिणं राहूनच गेलं. त्या स्पर्धेचा मी प्रेक्षक आणि स्पर्धक म्हणून अनेक वर्षांचा साक्षीदार असूनही माझ्या हातून मूळपुरुषाला विसरण्याचा प्रमाद घडला. त्याची भरपाई करून त्याचं ऋण अंशत: तरी फेडण्याचा प्रयत्न पुढील दोन लेखांमधून करणार आहे.
रंगभूमीला आलेली मरगळ दूर करायची असेल तर तरुणांना तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना रंगभूमीचा एक भाग करायला हवं, हे मनोमनी जाणून भारतीय विद्याभवनचे कुलगुरू श्री. मुन्शी व लीलावती मुन्शी यांनी १९५१ साली महाविद्यालयीन नाटय़स्पर्धा सुरू केल्या. प्रारंभी स्पर्धेची एकूण रूपरेखा ठरवताना अदि मर्झबान, प्रबोध जोशी, नवीन खांडवाला, शरयूबाला खांडवाला, आनंद पै या नाटय़जाणकारांची फार मोठी मदत झाली. विचारविनिमय करून त्यांनी स्पर्धेचा आराखडा, नियम वगैरे गोष्टी मुक्रर केल्या.
स्पर्धा सर्व भाषांतून घेतल्या म्हणजे अन्यभाषिक रंगभूमीचे स्वरूपही कळू शकेल आणि इतरांच्या तुलनेत आपण नक्की कुठे आहोत, याचं भान इतर- भाषिकांनाही येऊ शकेल, हा विचार ही स्पर्धा बहुभाषी करण्यामध्ये होता. एका दृष्टीने राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा हा सांस्कृतिक मार्ग होता. प्रारंभी इंग्रजी, हिंदी, मराठी व गुजराती अशा चार भाषांतून ही स्पर्धा घेतली गेली. १९५१ च्या पहिल्या वर्षी स्पर्धक महाविद्यालयांची एकूण संख्या २६ होती. ती वाढत वाढत १९५४ साली ६८ झाली. कानडी भाषेतील एकांकिका व्हायला लागल्या तेव्हा एकूण स्पर्धक महाविद्यालयांची संख्या ७० च्या पुढे गेली होती. ही स्पर्धा सतत कार्यरत ठेवणाऱ्या भारतीय विद्याभवनच्या कला केंद्राने स्पर्धकांच्या मार्गदर्शनासाठी ‘प्रीपेअर फॉर ड्रामा’- ‘नाटकाची तयारी’ नावाची पुस्तिकाही प्रसिद्ध केली. ही स्पर्धा म्हणजे एक नाटय़शिक्षण व्हावे, हाच ही पुस्तिका प्रसिद्ध करण्यामागचा संयोजकांचा हेतू होता. एकूण १२ भाषांत ही स्पर्धा होत होती आणि सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग होता. एका परीने दरवर्षी भरणारे युवकांचं हे नाटय़संमेलनच होतं.
संयोजकांमध्ये त्यावेळचे मान्यवर रंगकर्मी, नेपथ्यकार आनंद पै यांच्या तेथील अस्तित्वामुळे दामू केंकरे, विजय तेंडुलकर, नंदकुमार रावते, सुधा करमरकर, विजया जयवंत, अरविंद देशपांडे अशा रंगभूमीवर नवे काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांचा लाभ या स्पर्धेला झाला. आणि प्रगत मराठी रंगभूमीच्या दृष्टीने ते एक वरदानच ठरले. ‘रंगायन’ या प्रायोगिक नाटय़संस्थेचीच काय, त्यापुढील अनेक प्रायोगिक नाटय़संस्थांची, वेगळ्या नाटय़विचारांची बीजे या स्पर्धेत होती, हे विसरून चालणार नाही.
त्यानंतर आंतरबँक नाटय़स्पर्धा, आय. एन. टी.च्या नाटय़स्पर्धा, ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’ नाटय़स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक नाटय़स्पर्धा अशा अनेक मराठी एकांकिका स्पर्धा जन्माला आल्या आणि अजूनही येत आहेत. त्या सगळ्या भारतीय विद्याभवन कला केंद्राच्या नाटय़स्पर्धेनंतरच त्या मूळ भूमीतूनच जन्माला आल्या. ठोकळ भाषेत बोलायचं तर ‘विद्याभवनचा वेलू गगनावरी गेला’ असं आज म्हणायला हरकत नाही.
पण महाराष्ट्रभर मोहोळ उठविणाऱ्या एकांकिका स्पर्धाचेच कशाला, जी महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धा ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक अभिमानस्थान मानली जाते, त्याची प्रेरणाही विद्याभवनची ही नाटय़स्पर्धाच होती, हे कुणाला नाकबूल करता येणार नाही.
वेगळं, नवीन असं करून बघायला युवा रंगकर्मीना या स्पर्धेनं प्रथमच एक रंगमंच उपलब्ध करून दिला. फक्त महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातच नाटकाची भूक विद्यार्थ्यांना भागवावी लागत असे. गॅदरिंगच्या युवा प्रेक्षकाचा मूडही काही नवं, गंभीर स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नसायचा. या स्पर्धेने नाटकाकडे, रंगभूमीकडे गंभीरपणे पाहणाऱ्या युवकांना आवश्यक ती संधी तर मिळालीच; पण त्याचबरोबर उत्तम प्रेक्षकही मुबलक प्रमाणात मिळाला. अन्यथा इतका प्रेक्षक हौशी, अपरिचित विद्यार्थ्यांना कधीच मिळाला नसता. केवळ मोठा आस्वादक प्रेक्षकवर्गच नव्हे, तर त्याचबरोबर ज्या प्रचंड उत्साहाची आणि चैतन्याची देवाणघेवाण प्रेक्षक आणि कलावंतांमध्ये येथे व्हायची, तशी तर सर्वथैव दुर्मीळच असायची.
भारतीय विद्याभवनच्या सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित होणाऱ्या या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रारंभीच्या काही वर्षांत मान्यवर नाटककारांच्या गाजलेल्या नाटय़कृतींतील काही प्रवेश संपादित करून त्यांचे प्रयोग केले जायचे. अशा नाटककारांत राम गणेश गडकरी, गो. ब. देवल, कृ. प्र. खाडिलकर, आचार्य अत्रे, अनंत काणेकर, मामा वरेरकर, नागेश जोशी, पु. भा. भावे, डॉ. अ. वा. वर्टी, बाळ कोल्हटकर अशा मातब्बर नाटककारांच्या ‘एकच प्याला’, ‘राजसंन्यास’, ‘भाऊबंदकी’, ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘निशिकांताची नवरी’, ‘राणीचा बाग’, ‘देवमाणूस’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘अपूर्व बंगाल’ अशा नाटकांतील प्रवेश सादर केले गेले. महाविद्यालयीन प्रेक्षकांना मराठीतील जुन्या, अभिजात नाटकांचे दर्शन त्यामुळे घडले. पण त्यातूनच ‘एकांकिका’ हा पूर्ण नाटकापेक्षा अत्यंत वेगळा व स्वतंत्र प्रकार आहे, याची तीव्र जाणीवही निर्माण झाली. आणि मग सातत्याने स्वतंत्र एकांकिकांचेच प्रयोग या स्पर्धेत व्हायला लागले. तोपर्यंत फक्त रेडिओवरच रेंगाळणारी आणि मासिकांतच मुरणारी एकांकिका रंगमंचाच्या प्रकाशात अवतरली आणि प्रेक्षकांवर स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवू लागली. एकांकिका म्हणजे मिनी नाटक नव्हे, किंवा नाटकाचं संक्षिप्तीकरण नव्हे, याची जाण रंगकर्मीना या स्पर्धेने तीव्रतेने करून दिली. प्रयोगांची शक्यता बळावल्यामुळे एकांकिकांची पैदासही वाढली. नवनवे एकांकिकाकार निर्माण झालेच; पण फक्त नाटकंच लिहिणाऱ्यांनाही एकांकिका लिहिण्याची प्रेरणा मिळाली. या स्पर्धेमुळे छाप्यात अडकलेली एकांकिका जिवंत झाली.. चिरयौवना ठरली. १५ वर्षांच्या विद्याभवनच्या मराठी नाटय़स्पर्धेकडे नजर टाकली तर त्यातले नवे-जुने एकांकिकाकार पाहा- मो. ग. रांगणेकर, पु. ल. देशपांडे, अनंत काणेकर, मामा वरेरकर, वसंत माने, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, रामचंद्र वर्दे, पद्माकर डावरे, वसंत सबनीस, जयवंत दळवी, वसंत कामत, वि. वा. शिरवाडकर, सरिता पदकी, तारा वनारसे. फक्त या स्पर्धेसाठीच एक-दोन एकांकिका लिहून मोकळे झालेलेही काही एकांकिकाकार आहेत.
करंडक मिळविणाऱ्या १५ वर्षांतील काही स्वतंत्र एकांकिका- ‘रहस्य आणि तरुणी’, ‘पाहुणचार’, ‘घरजावई’, ‘सारं कसं शांत शांत’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘तिसरा बाजीराव’, ‘पांगुळगाडा’, ‘बायकांत पुरुष लांबोडा’, ‘सांगाती’, ‘जसा हुकूम’, ‘कावळे’, ‘ब्रह्मचारी यक्ष’, ‘आपण साऱ्या दुर्गाबाई’, ‘मोठे मासे, छोटे मासे’, ‘लाट फुटली’, ‘डॉ. तपस्वी’, ‘अधांतरातील अर्धा तास’, ‘जनावर’, ‘शहाणे गाढव’, ‘पूर्वज’, ‘नर्सेस क्वार्टर्स’, ‘व्यासाचा कायाकल्प’, ‘सतरा वर्षे’, ‘अणुयुगातून पलीकडे’, ‘एका ओल्या रात्री’..
भावी काळात मराठी रंगभूमी आपल्या कर्तृत्वानं ज्यांनी उज्ज्वल केली आणि रंगभूमीवर जे ख्यातकीर्त झाले, अशा काही कलावंतांची पहिली पावले याच स्पर्धेत उमटली. रंगभूमीचा विशिष्ट कालखंड ज्यांनी गाजवला व मराठी रंगभूमी अधिकाधिक प्रगत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला असे या स्पर्धेतील कलावंत- दामू केंकरे, सुधा आमोणकर (करमरकर), विजया जयवंत (मेहता), अरविंद देशपांडे, सुमन धर्माधिकारी, ललिता आमोणकर, विनायक पै, पुरुषोत्तम बाळ, शुभा खोटे, रमेश होनावर, राजा पटवर्धन, मीना पेठे, काशिनाथ घाणेकर, रमाकांत देशपांडे, श्रीकांत मोघे, रवींद्र दिवेकर, लालन पैंगणकर (सारंग), सुरेश भागवत, रेखा सबनीस, कमलाकर सारंग.
केशवराव दाते, मामा पेंडसे, मामा वरेरकर, मो. ग. रांगणेकर, गजानन जहागीरदार, पाश्र्वनाथ आळतेकर, लीला चिटणीस, दामू केंकरे, पु. ल. देशपांडे, राम गबाले, विजया जयवंत, आत्माराम भेंडे, मंगला संझगिरी, ज्ञानेश्वर नाडकर्णी, विद्याधर गोखले, दाजी भाटवडेकर, शांता आपटे, बबन प्रभू, सुहासिनी मुळगावकर, रत्नाकर मतकरी असे एकाहून एक दिग्गज परीक्षक या स्पर्धेला वेळोवेळी लाभले.
स्पर्धेच्या प्रत्येक विभागासाठी निष्णात व तज्ज्ञ व्यक्तींचे साहाय्य मिळविण्यात संयोजकांनी किंचितही कसूर ठेवली नव्हती. त्यामुळे या स्पर्धेच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल सर्वाचं एकमत होतं. ‘आमच्यावर अन्याय झाला,’ असं म्हणायला किंचितही जागा ठेवली नव्हती. परिणामी या स्पर्धाचा दर्जा अनन्यसाधारण राहिला. या स्पर्धेनंतर अशाच प्रकारच्या अनेक नाटय़स्पर्धा झाल्या; पण कुठचीच स्पर्धा भारतीय विद्याभवनच्या नाटय़स्पर्धेशी बरोबरी करू शकली नाही.
भारतीय विद्याभवनच्या नाटय़स्पर्धेचा प्रेक्षक मात्र स्पर्धकांच्या मनात धडकी भरवणारा असे. कुठल्या क्षणी तो कुठली एकांकिका पाडेल, याचा काही नेम नसे. प्रेक्षकांच्या या शेरेबाजीनं सारं नाटय़गृह हास्यकल्लोळात बुडून जायचं आणि प्रयोगकर्त्यांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडायचं. प्रेक्षकांचे शेरे मात्र बऱ्याच वेळा अत्यंत तल्लख आणि कौतुकास्पद असायचे. उत्स्फूर्तता हे त्यांचं वैशिष्टय़ असल्यामुळे ते तुफानच प्रतिसाद मिळवायचे. या शेरेबाजीच्या माऱ्यातून जी एकांकिका सुटेल ती सादर करणारी मंडळी स्वत:ला धन्य मानायची. चार-पाच विद्यार्थ्यांचा एक ठरावीक कंपू खास एवढय़ाच कारणांसाठी- म्हणजे एकांकिका पाडण्यासाठीच दरवर्षी स्पर्धेला नेमानं यायचा. त्यांना नेमकं हुडकून काढणंही कठीण जायचं. कारण दरवर्षी त्या कंपूची सभासद मंडळी बदलत असायची. तिकिटांच्या प्रचंड घालमेलीत या मंडळींना नेमकी तिकिटं कशी मिळायची, हादेखील एक संशोधनाचा विषय झाला होता.
एकांकिकेचा नायक नायिकेशी अधिकच सलगी करायला लागला की ‘बाबा बघताहेत..’ असा कुठूनतरी आवाज यायचा आणि मग पुढची दोन मिनिटं एकांकिकेतले पुढचे शब्दच ऐकू येत नसत. काही नायक तर अशा प्रतिक्रियेने घाबरायचे आणि नायिकेपासून दूर पळायचे. प्रेक्षक त्यामुळे अधिकच हसायचे.
एका एकांकिकेतली सुस्वरूप नायिका शेजारच्या पात्राला गंभीरपणे सांगत होती, ‘आता मला कोण आहे दुसरं?’ गॅलरीतून आवाज आला, ‘मी आहे ना!’ पुढची एकांकिका त्यापुढे ऐकूच आली नाही. त्याच अवस्थेत  पडदा पडला.
दामू केंकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या एकांकिकेचे दिग्दर्शक असायचे. त्यावेळी विल्सन कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज ही या स्पर्धेतील नावाजलेली महाविद्यालये होती. जे. जे. या प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्याची एका विद्यार्थ्यांने पैजच     घेतली होती. दिग्दर्शक दामू केंकरेंना भेटून ‘तुमची एकांकिका         कशी  होते तेच बघू या!’ असं सांगून तो गेला. एकांकिकेचा स्पर्धेतला प्रयोग संपल्यानंतर पुन्हा भेटला आणि म्हणाला,  ‘तुमची एकांकिका इतकी प्रभावी झाली, की ती कधी संपली, हे मला कळलंच नाही. कुठं गडबड करायला जागाच मिळाली नाही.’
कुठल्यातरी एका एकांकिकेत दामू केंकरे स्वत: काम करीत होते. त्यांनी प्रवेश केला आणि विद्याभवनच्या बाल्कनीतून आवाज आला- ‘या.’ प्रेक्षकांत हशा उसळला. केंकरे यांनी गॅलरीकडे बघत ‘नवीन घर पाहतोय-’ असा लूक दिला आणि क्षणार्धात त्या नजरेच्या उत्तराला तुफान दाद मिळाली. ‘या’ म्हणणारा खजील झाला.
या उत्स्फूर्त शेरेबाजीला मात्र स्पर्धेच्या कुठच्याच परीक्षकांनी कधीच महत्त्व दिलं नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर या शेरेबाजीचा काही परिणाम झाला नाही. कित्येक वेळा खूप हुल्लडबाजी झालेली एकांकिकाही अव्वल पारितोषिक मिळविणारी ठरली आहे.