कोकण किनारपट्टीवरील जैतापूर अणुवीज प्रकल्प आणि त्यासंबंधाने मतमतांतरे मराठी वाङ्मयविश्वासाठी बऱ्यापैकी दखलपात्र ठरली आहेत. या संबंधाने अलीकडच्या काळातील प्रकाशने पाहता याचा प्रत्यय यावा. प्रकल्पाचे बाजूचे आणि विरोधक अशी ही सरळसोट विभागणी मात्र नाही. एक मतप्रवाह हा अणुविजेच्या रोकडय़ा विरोधाचा आणि स्वच्छ-स्वस्त असा तिचा उगीच बागुलबुवा म्हणणारा आहे; कोकणची निसर्गसंपन्नता, स्थानिकांची पारंपरिक उपजीविका आणि अस्तित्वच देशोधडीला लावून, त्यांच्या जिवावर आधीच संपन्न असलेल्यांच्या आर्थिक भरभराटीच्या ‘जीडीपी’वादाला तो स्पष्ट नाकारणारा आहे. दुसरा मतप्रवाह हा कोकणाच्या विकासाबाबत अनुशेष भरून काढण्यासाठी प्रकल्पाच्या बाजूचा पण या प्रांताच्या विनाशाच्या किमतीवर तो होता कामा नये अशा समन्वयाचा आहे. ‘जैतापूर प्रकल्पाचे गौडबंगाल’ हे पत्रकार-लेखक रजनीश जोशी यांचे ताजे पुस्तक हे शीर्षकातून होणारी फसगत सोडली तर बहुतांश दुसऱ्या मतप्रवाहाला उचलून धरणारा आहे.
रजनीश जोशी यांना कोकण आणि तेथील निसर्ग विविधता याबद्दल कणव आहे. यापूर्वी त्यांनी पाठय़वृत्ती निमित्ताने कोकण प्रदेशातील अलीकडच्या नैसर्गिक ऱ्हासाचा जिव्हाळ्याने अभ्यासही केला आहे. त्रयस्थ दृष्टीने या प्रदेशात फिरताना, तेथे येऊ  घातलेल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची वावटळ आणि त्याचे पर्यावरणीय दुष्परिणाम पाहता गावागावांत विरोधाची जनभावना त्यांनी अनुभवली आहे. निष्कर्षांदाखल ते या भरमसाट ऊर्जा प्रकल्पांना प्राणपणाने विरोध केलाच पाहिजे असेही म्हणतात. पण त्याच वेळी जैतापूर प्रकल्पाला होत असलेला जनविरोध मात्र सजग नाही, तर गैरसमजापोटी असल्याचे ते सांगतात.
त्यातच लोकांना विश्वासात न घेता, दडपणूक आणि दंडुकेशाहीच्या बळावर प्रकल्प रेटण्याच्या प्रशासनाच्या प्रक्रियेने हे आंदोलन चिघळण्यास हातभार लावल्याचे जोशी म्हणतात. विजेची गरज देशाच्या विकासासाठी आवश्यकच आहे आणि त्या संदर्भात अणुऊर्जेशिवाय दुसरा चांगला पर्याय नसल्याचे जोशी सांगतात. ते म्हणतात, ‘अणुशक्ती हवी की नको, या विषयावर चर्चा अनावश्यक आहे. फक्त ही शक्ती माणसाच्या कल्याणासाठी वापरली जाणार की नाही, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.’ हीच भूमिका मर्मस्थानी ठेवून हा लेखनप्रपंच असल्याचे मग स्पष्ट दिसून येते. पण विशेष म्हणजे सध्याची राज्याची विजेविषयक स्थिती, वीज उपलब्धतेचे अन्य पर्याय आणि त्यांची व्यवहार्यता यांचा आढावा घेताना, अणुऊर्जेचे समर्थन ते त्यातील वैज्ञानिक व तांत्रिक बारकावे आणि गुंतागुंत मांडून करतात, परंतु आर्थिक विकास आणि पर्यावरण हे द्वैत नाही, तर या दोहोंमध्ये समतोलाचा आग्रह आणि विज्ञान साक्षरता हेच आपले उद्दिष्ट असल्याचा लेखकांचा दावा, जैतापूर प्रकल्पाला विरोध हा अवैज्ञानिक आहे, या पूर्वग्रहावर बेतलेला आणि सरकारी प्रचाराचा दुर्दैवाने बळी ठरलेला आहे.
तरी विरोधी विचार समजून घ्यावा आणि त्यातून पुढे आलेल्या नव्या माहितीच्या आधारे आपले ज्ञान व भूमिका तपासून घ्यावी, या अंगाने सामान्य वाचक, प्रकल्प विरोधक सर्वानीच या पुस्तकाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.
‘जैतापूर प्रकल्पाचे गौडबंगाल’  – रजनीश जोशी, सुविद्या प्रकाशन, सोलापूर,
पृष्ठे -९०, मूल्य- १०० रुपये.