परराष्ट्रनीती नावाची गोष्ट अनेकांना समजायला जड वाटते. पण एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये शेजाऱ्या-शेजाऱ्यांचं जे काही चालू असतं, त्याचीच ती पुष्कळ विस्तारलेली आवृत्ती असते. फरक फक्त प्रतलाचा असतो. जगातला एखादा देश नदीचं पात्र अडवून खाली वसलेल्या देशाला उजाड करू शकतो. एखादी ठिणगीही र्सवकष संहाराचा पर्याय हाताळणाऱ्या आण्विक शक्तीला चेतवू शकते. आणि दोन शेजारी राष्ट्रांचे बरे संबंध राहिले तर दोन्ही देशांच्या अर्थकारणाची गती वाढून सामान्य माणसांचं जीवनमान उंचावू शकतं. म्हणूनच जगभरची परराष्ट्रनीती ही सतत संवादी राहते. दौरे, विभागीय चर्चासत्रं, शिखर परिषदांना काही lr16पर्याय नसतो. आणि अमेरिकेचा ‘दादा’ परराष्ट्रमंत्री जातीनं या सगळ्यांवर लक्ष ठेवून असतो.
हिलरी रोढॅम क्लिंटनचं ‘हार्ड चॉइसेस’ हे तिच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या चार वर्षांच्या आठवणी सांगणारं पुस्तक म्हणूनच अमेरिकन मंडळींइतकंच आपल्या लेखीही महत्त्वाचं आहे. या पुस्तकाची शैली गद्य आहे. हिलरीनं अर्थातच त्याचा मसुदा दोन-चारजणांकडून पक्का करून घेतलेला आहे. खेरीज या आठवणींना मर्यादाही पडल्याच असणार. बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांच्याशी तिचे मतभेद झालेले असले तरी ते या पुस्तकात दिसणार नव्हते. कित्येक गोष्टी गोपनीयतेच्या शपथेमुळेही वगळलेल्या असणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे २०१६ साली हिलरी क्लिंटन अध्यक्षपदाची निवडणूक लढवेल असं अमेरिकेतलं चित्र आहे. तेव्हा त्या हेतूनं जाहीरनाम्यासारखं हे पुस्तक तिनं लिहिलं असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
आणि असं सारं असूनही हे पुस्तक माझ्या मते अत्यंत मोलाचा असा दस्तावेज आहे. एकतर खरंच हिलरी २०१६ साली राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाली तर तिची जगाकडे बघण्याची नजर काय असेल, हे या पुस्तकातून कळतं. आणि तसं काही झालं नाही तरी एकंदर अमेरिकेची परराष्ट्रनीती कशी पावलं टाकते याचा अंदाज यात लागतो. मुख्य सूत्र लक्षात येतं ते अमेरिकेच्या ‘स्मार्ट पॉवर’ या संकल्पनेचं. हिलरीनं स्वच्छ शब्दांत लिहिलं आहे त्याविषयी. परराष्ट्रनीतीची पारंपरिक शस्त्रे म्हणजे राष्ट्रांचा परस्परसंवाद, विकसनशील देशांना आर्थिक मदत आणि सैनिकी बळ. हे तिन्ही एकवटण्याची गरज तिला वाटतेच; शिवाय काही अपारंपरिक शस्त्रंही ती शोधते. आयोजक, संस्थाचालक, प्रायव्हेट सेक्टर्स यांच्या कल्पना आणि शक्तिस्रोत परराष्ट्रनीतीमध्ये वापरायला हवेत असं तिचं प्रतिपादन आहे. तसा प्रयत्नही चार वर्षांमध्ये तिनं केला.
पुस्तकाचं दुसरं सूत्र आहे ‘हार्ड चॉईस’चं. निर्णयस्वातंत्र्य व जबाबदारी ही परराष्ट्रसंबंधांमध्ये विशेष मोलाची असते. हिलरीनं पुस्तकभर कळकळीनं एक मुद्दा उपस्थित केला आहे. वास्तव व वर्तमानाकडे नजर ठेवायची की आदर्श तत्त्वं सांभाळायची, हा तिचा आंतरिक संघर्ष वाटावा इतकं ते निवेदन सच्चं आहे. एखादा देश अमेरिकेला फायद्याचा व्यवहार करू देत असेल, पण त्याचवेळी त्या देशाचा हुकूमशहा पैसे खाऊन जनतेला नाडत असेल तर काय करायचं? पाकिस्तानमधले काही घटक (‘few sectors’ हे हिलरीचे काळजीपूर्वक योजलेले शब्द!) अमेरिकेकडून येणारा पैसा तालिबानी प्रवृत्तींकडे वळवत आहेत; पण त्याचवेळी अफगाणिस्तान आणि चीन या दोन्ही देशांवर वचक राखण्यासाठी पाकिस्तानशी मैत्री अमेरिकेला गरजेची आहे. तर मग कुठे तडजोड करायची? आणि किती? त्या तडजोडीचीच परिसीमा गाठून अमेरिकेनं ओसामा बिन लादेनचा सफाया पाकिस्तानी सरकारला सुगावा लागू न देता केला. अमेरिकेची हेलिकॉप्टर्स अबोटाबादमध्ये ओसामाच्या घरात शिरताहेत आणि तेव्हा छोटय़ाशा कंट्रोल रूममध्ये हिलरी, ओबामा, सैन्याधिकारी आदी मंडळी छोटय़ा पडद्याकडे टक लावून बघतानाचा फोटो माझ्यासमोर आहे. हिलरीचा हात तोंडावर गेला आहे. ओबामाही ‘टेन्स’ असला तरी त्याची देहबोली संयत, धीरोदात्त आहे. मध्येच एक हेलिकॉप्टर भिंतीला आदळतं आणि सगळेजण चिंताग्रस्त होतात. इराणमध्ये अमेरिकेनं स्वत:चं हसं करून घेतलेलं. त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? पण सैनिक मार्ग काढतात. ओबामा जिंकतो. ओसामा मरतो. तो नाटय़पूर्ण प्रसंग जितका महत्त्वाचा आहे, तितक्याच महत्त्वाच्या आहेत तिथवर पोचण्याच्या पायऱ्या! हिलरी प्रथम ओसामा बिन लादेन तिथेच आहे हे पुन:पुन्हा तपासून घेते. मग असा हल्ला पाकिस्तानच्या सरकारला सांगून करायचा की न सांगता, यावर खल होतो. अखेर थेट हल्ला करायचं ठरतं. राष्ट्राध्यक्षांना ही काळजी असते, की पाकिस्तान हे कसं खपवून घेईल? अमेरिका-पाकिस्तानचे संबंध कितपत बिघडतील? हिलरी पुन्हा विचार करते आणि तिला जाणवतं की, हल्ल्यानंतरही संबंध बिघडणार नाहीत. ‘‘As I had experienced it first hand our relationship with pakistan was strictly transactions, based on mutual interest, not trust. It would survive. I thought we should go for it (attack).’’ हे तिचे शब्द अजिबात अमेरिकन नाहीत. तिनं थेट सांगूनच टाकलं आहे जगाला, की या दोन देशांतले संबंध विश्वासावर आधारित नसून देणीघेणी सांभाळण्यापुरते आहेत.
या एका घटनेमधूनही अमेरिकन परराष्ट्रनीतीची काही वैशिष्टय़ं सांगता येतील. काही ठाम धोरणं आणि त्याची तत्पर अंमलबजावणी, मोजक्या विश्वासू मंडळींची टीम, विचारपूर्वक घेतलेली ‘रिस्क’ आणि नेहमीच्या गोड बोलून काम करून घेण्याच्या शैलीला क्वचित अशा तऱ्हेनं दिलेला फाटा. साम-दाम-दंड-भेद हे सारेच देश वापरतात, पण केव्हा आणि कुठे कुठलं नाणं वापरायचं, हे अमेरिकेला पटकन् समजत असावं. अर्थात, याचा अर्थ अमेरिकेची सारी धोरणं बरोबरच असतात, यशस्वी ठरतात असं नव्हे. अरब क्रांतीच्या (Arab Spring) सुमारास अमेरिकेला तो क्रांतीचा वणवा पेटवत न्यायचा होता आणि अमेरिकाधार्जिणी सरकारं मध्य-पूर्वेमध्ये वसवायची होती. अर्थात, हिलरी तसं लिहीत नाही; पण तिनं जे लिहिलं आहे त्या मधल्या जागा तेच सुचवत राहतात. पण शेवटी ते काही साध्य होत नाही. ‘It turned out to be half success’ असं तिनंच लिहून ठेवलं आहे.
आणि हा दुसरा फोटो मी पाहतो आहे. २०-२५ अरबांच्या मधोमध बिन-हिजाबाची आणि बिन-बुरख्याची हिलरी बसलेली आहे. तिचा चेहरा कठोर आणि निश्चयी आहे. आजही भारतात, जगात एकटी स्त्री-अधिकारी पन्नास पुरुषांसोबत एकटी मीटिंगमध्ये असेल- अगदी ‘सेफ’ असेल, तरीही तिला दडपण जाणवत राहू शकतं. आणि ते पुरुषही निम्माअधिक काळ ती स्त्री जाण्याची वाट पाहत असतात. कुठल्याही स्त्रीवादी परिमाणातून हिलरी क्लिंटनचं जगभर फिरणं हे मला धाडसी वाटतं. मुलींना आत्मविश्वास देणारं ते आहेच! खुद्द ओबामाही पाकिस्तानवरच्या हल्ल्याआधी बिल क्लिंटनला फोन करतो आणि म्हणतो, ‘बिल, तुला हिलरीनं सांगितलं असेलच..’ बिल गोंधळतो. हिलरीनं गोपनीयता सांभाळलेली असते. हे छोटंसं उदाहरणही पुष्कळ बोलकं आहे.
बिल क्लिंटन आणि तिच्या नात्यासंदर्भात जगभर हिलरीला प्रश्न विचारले गेले. मागास देशांच्या नेत्यांना तर सुरुवातीला हिलरी ही नावापुरतीच असेल, बिल क्लिंटनच सारे निर्णय घेत असेल असं वाटत होतं. तुर्कस्तानमध्ये हिलरी गेली तेव्हा तिनं वेगळा निर्णय घेतला : काहीशा प्रतिकूल अशा सरकारशी संवाद न साधता थेट तुर्की लोकांना भेटायचं. ती तिथल्या टीव्हीवरच्या प्रख्यात टॉक शोमध्ये सामील झाली. प्रेक्षकांमधल्या बायकांनी तिला प्रश्न विचारला, ‘तुम्ही प्रेमात कधी पडलात? कसे?’ हिलरीनं लिहिलं आहे, ‘परराष्ट्रमंत्र्यासाठी तो अनपेक्षित प्रश्न होता.’ अर्थात तिनं दिलखुलासपणे तिच्या आणि बिलच्या लॉ कॉलेजच्या दिवसांविषयी सांगितलं. ते उत्तर देताना तिच्या आतला मुत्सद्दी जागा होता. ‘अनेक तुर्की लोकांचा अविश्वास (अमेरिकेप्रती) मावळला नाही. पण ही बाई आपल्यासारखीच आहे हे बघून त्यांना सुखद धक्का बसला.’ हिलरी तुर्कस्तानमध्ये बिल आणि तिच्या नात्याला मोनिका लेवन्स्कीमुळे जो मोठा तडा बसला त्याविषयी बोलली नाही. तिच्या आधीच्या पुस्तकात तिनं ते लिहिलं आहे, हे एक; पण मुख्य म्हणजे इथे ती परराष्ट्रमंत्र्याच्या भूमिकेतूनच लिहिते आहे.
केवढं अफाट फिरली आहे ती! चार वर्षांत ११२ देश आणि एक दशलक्ष मैल एवढा प्रचंड प्रवास तिनं केला. तो तिचा प्रवास वाचता वाचता अमेरिकेची नजरही वाचकांना कळत जाते. चीन हा अमेरिकेला किती त्रासदायक स्पर्धक ठरतो आहे हे पदोपदी कळतं. रशियाचा पुतिन हिलरीला मुळीच आवडत नाही. ब्रह्मदेशामध्ये ती आन सान स्यू कीची भेट घेते, त्याचं अंमळ रोमँटिक वर्णन पुस्तकात आहे. करझाई तिला रुचत नाहीत; पण अनेक नेते तिचे उत्तम मित्र होतात. आफ्रिका दौऱ्याच्या प्रकरणाचं शीर्षक अन्वर्थक आहे- ‘गन्स ऑफ ग्रोथ.’ अर्थात आफ्रिकेवर ही वेळ यायला अमेरिकेची धोरणंही काही प्रमाणात कारणीभूत नाहीयेत का? अशावेळी खास अमेरिकन चातुर्य दाखवत हिलरी अमेरिकेची चूक एक-दोन ओळींत मांडते, खंत करते आणि पुढे जाते. काँगोमध्ये ती जाते तेव्हा लोक असहाय झालेले असतात. रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही. ती लिहिते, ‘वर्षांनुवर्षे इथली खनिजसंपत्ती लुटली जाते आहे. पहिल्यांदा बेल्जियमनं आणि मग मोबूतू या त्रासदायक हुकूमशहानं. (मला वाईट वाटतं आहे, की त्याला यू. एस.कडून मिळणाऱ्या पैशांमधून त्यानं स्वत:चा नफा केला!)’ हिलरी लिहिते ते एवढंच! पण वाचक इतके दुधखुळे थोडेच असतात? ती यू. एस. एड देताना त्यांनी काय विचार केला होता? तो हुकूमशहा पैसे खाताना अमेरिकेला कळलं नाही? आणि कळूनही अमेरिका का दुर्लक्ष करत असेल? हे सारे प्रश्न हिलरीला पडले नाहीत, तरी आपल्याला पडतात! इस्राइल हा तर अमेरिकेचा खास मित्र. अमेरिकेतली ज्यू लॉबी आणि इस्राइल-अमेरिकेचे मधुर संबंध जगजाहीर आहेत. या पुस्तकात मात्र हिलरीनं इस्राइलविषयी जी निरीक्षणं मांडली आहेत, ती (लपूनछपून, आडून, पण) ते संबंध बदलतील असं सूचित करणारी आहेत. विशेषत: नेत्यानाहू या इस्राइली प्रधानमंत्र्यांची आडमुठी, दुराग्रही भूमिका तिनं उत्तम टिपली आहे. इराण हा तर अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू. तिथे तिने कधीच दौरा केला नाही. पण चार वर्षे तिच्या दैनंदिनीत इराणसंबंधी काम असतंच. एकदा इराणला एकटं पाडताना अचानक तुर्कस्तान आणि ब्राझील इराणच्या मदतीला कसे धावून जातात, हे वाचताना हिलरीचा त्रागा जाणवून गंमत वाटते. जणू चातुर्य हे फक्त अमेरिकेकडेच आहे! बदलत्या जगात अनेक देश भरभराटीला येत आहेत आणि आपापल्या भूमिका ठामपणे मांडत आहेत. अमेरिकेइतकंच चातुर्य परराष्ट्रनीतीमध्ये वापरत आहेत. अशावेळी अमेरिका भविष्यात कशी दादागिरी करेल, ते हवामानबदलाच्या प्रकरणामध्ये ध्यानात येतं. ते प्रकरण वाचलं तेव्हा अमेरिका आपला गोंडस चेहरा क्षणात टाकून निखळ दादागिरी कशी करते, हे नीटच कळतं. ‘क्लायमेट चेंज’ हा सध्या परराष्ट्रनीतीमधील जिव्हाळ्याचा विषय. सर्वच देशांनी पर्यावरण सांभाळण्यासाठी आपापल्या उद्योगांना चाप लावावेत अशी अमेरिकेची धारणा आहे. वरकरणी ती न्याय्य आहे. पण त्याची दुसरी बाजूही आहे. आणि आश्चर्यजनकरीत्या हिलरी स्वत: ती वाचकांपुढे मांडते. प्रश्नाच्या दोन्ही बाजू मांडण्याचं, समजून घेण्याचं कसब हिलरीकडे असल्याची ग्वाही तिथे मिळते. क्योतो करारामुळे युरोपियन राष्ट्रे वैतागली असल्याचं तिला जाणवतं. सगळा बोजा विकसित राष्ट्रांवर पडून भारत आणि चीन मोकळे सुटताहेत असं युरोपियन राष्ट्रे तिला बजावतात. दुसरीकडे तिला ठाऊक आहे की, पर्यावरणाचं सर्वाधिक नुकसान अमेरिकेसह विकसित देशांनी मुदलात केलेलं आहे! चीनला औद्योगिक प्रगती हवामानाच्या कारणासाठी आवरता येणं किती अवघड आहे, हे तीच सांगते. ‘Could China afford to takle climate change while so many millions were still so poor?’ असं ती स्वत:च म्हणते. पण प्रत्यक्षात ओबामा मात्र तितकासा उदार नसतो. आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेमध्ये सर्व देशांचे प्रतिनिधी येतात. तेवढय़ात ओबामा व हिलरीला गुप्त खबर मिळते की, चीनचे पंतप्रधान भारत, ब्राझील आदी देशांच्या प्रमुखांशी गुप्त सल्लामसलत करून अमेरिकेला एकटं पाडू बघताहेत. तत्क्षणी हिलरी व ओबामा उठतात, लांब पॅसेजमध्ये जोरकस पावलं टाकत ही मीटिंग जिथे चाललेली असते तिथे जातात. त्यांना दाराशी चिनी रक्षक अडवतात. तेव्हा ओबामा त्यांना दूर सारतो. हिलरी त्या रक्षकांच्या हाताखालून सुळकन् निसटते आणि दोघे एकदम त्या बैठकीत घुसतात. चीनचे प्रीमियर वेन, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग, दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष झुमा या साऱ्यांचे चेहरे पडतात. ओबामा विचारतो, ‘आर यू रेडी?’
अर्थात अमेरिकेची ही विशुद्ध दादागिरीच आहे. हेच जर उलट झालं असतं- समजा, मनमोहन सिंग तडातडा पावलं टाकत ओबामा आणि पुतिन यांच्या गुप्त बैठकीत शिरले असते (हे प्रत्यक्षात अशक्यच आहे आणि होतं.), तर ते अमेरिकेला खपलं असतं? लोकशाहीतल्या चर्चास्वातंत्र्यावर मग हिलरीनं चार पानं तावातावानं खरडली असती. अर्थात अशी दादागिरी सारेच खपवून घेत नाहीत, हे हिलरीला मेक्सिकोमध्ये कळून चुकतं. मेक्सिको आणि अमेरिकेची सरहद्द सुमारे २००० किलोमीटर आहे. ड्रग्जच्या स्मगलिंगचा मुद्दा हिलरी जेव्हा मेक्सिकोच्या अध्यक्षांपाशी उपस्थित करते, तेव्हा ते शांतपणे सांगतात की, ड्रग्जच्या टोळ्यांपाशी असणारी नव्वद टक्के शस्त्रे ही अमेरिकेतूनच येतात. आणि अमली पदार्थही अमेरिकेलाच हवे असतात! कॅलिफोर्नियासारखी काही राज्यं मारीजुआनाला वैधता देण्याकडे झुकत असताना अमेरिकेची ही तक्रार किती अप्रस्तुत आहे, हे ते हिलरीला बजावतात.
हिलरीचे जगभरचे दौरे वाचताना काही खास अमेरिकन वैशिष्टय़े जाणवतात. आणि ती आपण शिकण्यासारखी आहेत. पुस्तकभर हिलरीनं तिच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांचा नावांनिशी उल्लेख करून ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला दिलेलं आहे. सगळं श्रेय स्वत:कडे घेतलेलं नाहीए. दुसरं म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये अफाट भांडणं असली तरी परराष्ट्रनीती ही ‘रिले’सारखी असते याचं त्यांना पक्कं भान आहे. सत्ताग्रहणाच्या आधी हिलरीला काँडालिझा राइस ही तत्कालीन परराष्ट्रमंत्री घरी जेवायला बोलावते. सध्या हयात असलेले माजी परराष्ट्रमंत्री तिला मदत करतात. तीही मदतीला अधेमधे त्यांच्याकडे वळते. हे सुजाण लोकशाहीचं लक्षण आहे. हेन्री किसिंजर तिला जुन्या नेत्यांचे ‘इनपुट्स’ देतात. कॉलिन पॉवेल आणि जेम्स बेकर हे माजी मंत्री तिला ‘म्युझियम ऑफ अमेरिकन् डिप्लोमसी’च्या उभारणीस मदत करतात. पहिल्या दिवशी ती आपल्या कार्यालयात अधिकारग्रहणासाठी येते तेव्हा तिच्या टेबलावर काँडोलिसानं तिला लिहिलेलं पत्र असतं. त्यात लिहिलेलं असतं, ‘हिलरी, या पदासाठीची सर्वात मोठी अर्हता तुझ्याकडे आहे.. तू मनापासून आपल्या या देशावर प्रेम करतेस.’
पुस्तकातील एक फोटो बघताना लक्षात आलं की, ओबामानं मैत्रीपूर्ण तऱ्हेनं हिलरीच्या खांद्यावर हात टाकला आहे. बाकी मंत्रीही व्यासपीठावर आहेत. मला वाटतं, हा फोटो अमेरिकेविषयी सारं काही सांगतो. सहजता, मैत्री, मागचं मागे टाकून व्यवहार करणं (हिलरी व ओबामा प्रीलिमिनरीज एकमेकांविरुद्ध लढले होते.), हे सारे सुंदर विशेष लोकशाहीचं निर्मळ रूप दाखवतात. एका फोटोमध्ये हिलरी तिच्या खात्याच्या कॅन्टीनमध्ये बसून तिथलं खाते आहे. अमेरिका आदर्श नाही, हे उघडच आहे. पण त्या देशाचे हे सहजभावाचे गुण मात्र अन्य देशांनी शिकण्यासारखे आहेत. आपल्याकडे मुख्यमंत्र्यांनी (स्त्री जाऊच द्या, पण) पुरुष गृहमंत्र्यांच्या खांद्यावरही हात टाकून काढलेला फोटो मी तरी पाहिलेला नाही! खांद्यावर हात टाकून सारं साधतंच असं नाही. राजकारण असतंच. आणि स्पर्धा- असूयाही! पण त्यापलीकडे जाऊन स्पर्धेचे अन्वयार्थ शोधणारी अमेरिका हिलरीच्या पुस्तकात अनेकदा भेटते आणि भावतेही.
परराष्ट्रमंत्र्याच्या नशिबी मात्र ही सहजता नसते. तो काय कपडे घालतो, काय हातात धरतो, हे सारं दुसरा देश अभ्यासतो. हिलरीलाही अनेकदा अशा ‘टिप्स’ मिळत. ब्रह्मदेशात पांढरा पोशाख घालू नये असं तिला सांगण्यात येतं. ते तिथं अशुभ मानलं जातं. प्रत्यक्षात विमानतळावर सारे लोक पांढऱ्या वेशात स्वागताला येतात आणि त्यात निषेध नसतो! एकदा एका उगवत्या देशाचे पंतप्रधान चाचरत विचारतात, ‘मॅडमचा मूड ठीक आहे ना? त्यांनी केस मागे बांधलेले असताना त्यांचा मूड ठीक नसतो हे आम्ही जाणतो.’ हिलरी त्यांच्या टकलाकडे बघत हसत म्हणते, ‘तसं काही नाही. पण मला आपल्यापेक्षा केस सांभाळायला थोडे जास्त श्रम पडतात.’
मला एक खूप पूर्वीची हिलरीही माहिती आहे. तेव्हा ती तडफदार तरुण वकील होती. ती बंडखोर होती आणि बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष झाल्यावरही स्वत:चे केस फॅशनेबल करायला तिनं ठाम नकार दिला होता. आज ती हिलरी दिसत नाही. राजकारणानं तिला सावध केलं आहे. केसांच्या बटा ती यथायोग्य राखते. जपानला जाताना किमोनोसदृश गाऊन मुद्दाम घालते. पण आजही ती बालकांच्याच नव्हे, तर महिला व समलैंगिकांच्या हक्कांविषयी तितकीच आतून बोलते. तिच्यामधली चतुर राजकारणी तेवढय़ापुरती लोप पावते. राष्ट्राध्यक्षपदासाठी लढायचं की नाही, हा ‘हार्ड चॉइस’ आता हिलरीपुढे आहे. पण देश, समाज व महिलांसाठी काम करायचा निर्णय मात्र तिनं आधीच घेतला होता. त्या निर्णयाची स्वाभाविकता या पुस्तकात आहे व ती पुरेशी बोलकी आहे.