‘पानशेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शाळेत नाटय़महोत्सव होणार..’ ही बातमी शहरभर झाली.  रमणबागेच्या मैदानातला चिखल आता पूर्ण वाळला होता. आता नक्की आठवत नाही, पण महोत्सव १९६१ च्या अखेरीस किंवा १९६२ च्या सुरुवातीस ठरला. सगळे कामाला लागले होते. तिकीट विक्री काऊंटर सुरू झाले. मैदानावर lok02दातेंचा मांडव पडायला लागला. बघता बघता भव्य खुला रंगमंच आकार घ्यायला लागला. अप्पा बळवंत चौकातल्या पेंटर फडकेंनी बोर्ड रंगवून दिले. महोत्सवात जुन्यापैकी ‘सं. सौभद्र’, ‘सं. स्वामिनी’ हे पु. भा. भाव्यांचं नाटक आणि गडकऱ्यांचं ‘सं. भावबंधन’, जरा नवी नाटकं म्हणजे १९५७ पासून लोकप्रिय असलेलं बाळ कोल्हटकरांचं ‘दुरिताचे तिमिर जावो’ आणि १९६० मध्ये आलेलं विद्याधर गोखल्यांचं ‘सं. पंडितराज जगन्नाथ.’ शेवटची दोन खूपच लोकप्रिय. त्यामुळे त्या नाटकांचे प्रत्येकी दोन प्रयोग.. अशी नाटके होती.
मैदानावर अशी मांडवासाठी खणाखणी सुरू झाल्यावर एक सर मात्र नाराज होते. ते म्हणजे शाळेच्या खेळांचे राजे रामभाऊ  लेलेसर. शाळेच्या आणि एकूणच त्यावेळच्या सर्वच खेळांमध्ये त्यांचा कोच म्हणून दबदबा! क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी या खेळांच्या त्यांनी प्रशिक्षित केलेल्या शाळेच्या टीम्स जबरदस्त होत्या. आमच्या शाळेचे टेस्ट मॅच खेळलेले मधु गुप्ते, ज्ञानेश्वर आगाशे हे लेलेसरांचे विद्यार्थी. रणजी खेळलेले तर अनेक विद्यार्थी. यावरून त्यांची महती लक्षात येईल. रामभाऊ  दिसायला गोरेपान. उत्तम बांधा. निळसर डोळे. कायम घोटय़ापर्यंत दुमडलेली काळी वुलनची फ्ल्यॅनेलची पॅन्ट. वर गडद रंगाचा खोचलेला शर्ट. त्याची गळ्याची बटणे कायम उघडी. पायात रंगीत मोजे आणि सँडल्स. गळ्यात शर्टाच्या कॉलरच्या आत रुमाल. डोक्यावर फ्ल्यॅनेलच्याच कापडाची टोपी. तिरक्या कोनात.. त्यांच्या विरळ केसांवर बसवलेली. सलूनमध्ये दाढी केल्यावर बाटलीतून पाण्याचा फवारा मारावा तशी सरांच्या व्यक्तिमत्त्वावर राज कपूरची छाया हलकेच शिंपडलेली. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे चेहऱ्यावर भाव असा असे की, ‘‘मी आत्ता वर्गावर आलोय. नाही असं नाही. पण खरं तर मी क्रिकेटच्या पिचवरच आहे. तुम्ही विद्यार्थी चुकून वर्गात आहात. पास कुणीही होईल; पण गुगली टाकता येईल का?’’ वर्गात ते नुसतेच यायचे नाहीत तर एका जबरदस्त आत्मविश्वासाच्या धुंदीतच प्रवेश करायचे. येताना कायम दोन्ही हात खिशात. हलकेच शीळ वाजवत प्रवेश करायचे आणि शिळेवर राज कपूरचे ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार..’ जर वर्गात क्रिकेटचा विद्यार्थी असेल आणि त्याची कालच्या मॅचमध्ये दांडी उडाली असेल तर मग तास संपलाच. हजेरी घेताना त्या मुलाचा नंबर आला की त्यांचे निळसर डोळे त्या मुलावर रोखलेले. ‘‘इकडे ये. लवकर ये.  इथे उभा राहा. काय झालं काल खेळताना? बॉल कसा होता? आं? सांग.. बॉल कसा आला? असा आऊट होतोसच कसा? चल, श्ॉडो क्रिकेट खेळ.’’
मग त्या मुलाने हातात बॅट असल्याचा आविर्भाव करून मनाच्या एकाग्रतेने कालच्या मॅचमध्ये जायचं आणि आऊट झाल्याचा बॉल आठवून त्याप्रमाणे पाय हलवायचे. लेलेसर फक्त त्याच्या पायांची हालचाल बघून सूचना द्यायचे. त्यांच्या अंगात देवी यावी तसे क्रिकेट येई. सर कालच्या मॅचमध्ये काय झालं याची मोठय़ाने नाटय़पूर्ण रनिंग कॉमेन्टरी करायचे आणि त्यानुसार वर्गात तो मुलगा आणि सरांचा लोकविलक्षण, चित्तथरारक क्रिकेट मुकाभिनय चालत असे. सर फडर्य़ा इंग्लिशमध्ये कॉमेन्टरी करत बॉल टाकतायत आणि आम्ही वर्गात चाललेला हा लोकविलक्षण, चित्तथरारक प्रयोग प्रेक्षक म्हणून एकाग्रतेनं पाहतोय. सरांचा तास असायचा इतिहासाचा. पण कालची मॅच झाल्याच्या इतिहासाला अठ्ठेचाळीस तासदेखील झालेले नसायचे. लेलेसरांनी आम्हाला नाटक न करताच ‘नाटक’ दाखवलं.
वरील तपशिलानंतर लेलेसर नाटय़महोत्सवाबद्दल नाराज का झाले असतील याचा अंदाज आपल्याला आला असेलच. कारण त्यांचे हक्काचे मैदान आधीच पाण्याखाली जाऊन सगळ्या पिचची वाट लागलेली. आता चिखल वाळल्यावर पुन्हा मांडवासाठी खणाखणी. शाळेच्या सगळ्या खेळांचे सराव त्यांना फग्र्युसन कॉलेजच्या मैदानात न्यावे लागले होते. आता महोत्सव होईपर्यंत तरी त्यांना परत मैदानात खेळता येणार नव्हतं. पण लवळेकर, पाटणकर, अभ्यंकर सर या त्रयींनी त्यांना समजावले आणि नाटय़महोत्सव मार्गी लागला. तशी लेलेसरांनाही नाटय़संगीताची आवड होतीच.
महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिन्ही सरांनी व्यवस्था चोख ठेवली होती. स्वयंसेवक म्हणून माझी नेमणूक झाली ती नेमकी रंगमंचामागे-बॅकस्टेजला. कलाकारांच्या मदतीला. आत्ता जे आठवतात त्यापैकी प्रमुख म्हणजे भालचंद्र पेंढारकर, मामा पेंडसे, मा. दत्ताराम, प्रसाद सावकार आणि चित्तरंजन कोल्हटकर. हे सगळे कलाकार मी प्रत्यक्ष मेकअपशिवाय नाटक कंपनीच्या बसमधून उतरताना आणि रंगमंचावर वेशभूषा- मेकअपसह असे दोन्हीकडून सलग आठ दिवस बघितले. मुख्य म्हणजे महोत्सवाची सगळी नाटके मी स्टेजच्या मागून विंगेतून मान वळवून वळवून बघितली. फ्लॅटसीनचे नेपथ्य असले तरी फ्लॅटच्या कापडाला भोक पडलेले असायचेच. कंपनीची बस संध्याकाळी कलाकार, तंत्रज्ञ, नेपथ्य घेऊन आली की मज्जाच मज्जा. रिकाम्या असलेल्या स्टेजवर बघता बघता कधी देऊळ, नदीच्या पाण्याचा आभास होईल असा तीर, जुना वाडा, रस्ता, मागे निळे आकाश, त्यावर कधी कधी फिरते ढग दिसायचे. बरणीसारख्या दिसणाऱ्या डीमरवर आपोआप लहान-मोठे होणारे रंगीत दिवे, टेपरेकॉर्डरवर वाजणारं पाश्र्वसंगीत आणि पावसाचा आवाज वगैरे भन्नाटच. वाटायचं, की दिवाळीत मुलांचा असतो तसा हा मोठय़ा माणसांचा किल्लाच हे बांधतायत. शाडूमातीच्या मावळ्यांच्या ऐवजी किल्ल्यावर प्रत्यक्षातली माणसं. नेपथ्याचं दिसणारं कोंदण सगळं खोटं; पण त्यातली माणसं मात्र खरी. माणसं खरी आहेत, पण ती मनाचं न बोलता पाठ केलेलं, कुणीतरी लिहून दिलेलं बोलतायत, गातायत, रडतायत. सगळं अद्भुत विश्व आहे.
सगळ्यात फॅन्टॅस्टिक म्हणजे नटात मेकअपनंतर पडणारा फरक. भालचंद्र पेंढारकर दुटांगी धोतर, वर सुती शर्ट, त्यावर कोट घालून यायचे. त्यांच्या डोक्यावर भरपूर केस. मेकअप केल्यावर डोक्याचा चमनगोटा झालेला. वर शेंडी आलेली. चेहरा बावळट झालेला. त्यात मळखाऊ  कपडे. त्यामुळे ते एक अजागळ, वेडसर व्यक्ती वाटायचे. हे मेकअप केलेले पेंढारकर ‘दुरिताचे तिमिर जावो’मधल्या वेडय़ा दिनूच्या भूमिकेत स्टेजवर यायचे. गाणी म्हणायचे. स्टेजवर मध्यभागी वेडा दिनू दोन्ही हात अस्वस्थपणे हलवत गाणं सुरू करायचा.. ‘आई तुझी आठवण येते, सुखद स्मृतींच्या कल्लोळाने काळीज कां जळते. माझेऽऽऽ काळीज कां जळते..’ मधूनच गाताना थांबून ‘आई..आई.. कळत नाही, दिसत नाही’ असे म्हणून परत गाणे सुरू.. ‘आई तुझी आठवण येते..’  मला विंगेत गलबलून यायचं. बाहेर प्रेक्षकांत लोकही रडवेले. सगळं वातावरणाच गलबलून गेलेलं. हे बसमधून उतरलेले पेंढारकर? नाटक संपल्यावर आरशासमोर बसून ते स्किन कलर जॉर्जेटच्या कापडाचा डोक्याला घट्ट लावलेला गोटा स्पिरिट लावून काढतायत. तो काढल्यावर त्यांचे केस पूर्ववत होऊन पेंढारकर ते कंगव्याने विंचरतायत. नुसता मेकअप केल्यावर माणूस इतका कसा बदलतो?
तसेच दुसरे जास्त लक्षात राहिलेले म्हणजे मा. दत्ताराम (१९१३- १९८४). महोत्सवातल्या जवळजवळ सगळ्या नाटकांमध्ये ते होतेच. पण प्रत्येक नाटकात त्यांना शोधावे लागे. ते ओळखूच येत नसत. जेमतेम पाच फूट उंची, बसके नाक, साधारण बांधा, सावळा रंग.. म्हणजे नटाचे व्यक्तिमत्त्व कसे असू नये याचेच दर्शन. पण स्टेजवर खणखणीत आवाज, स्पष्ट शब्दोच्चार, चोख पाठांतर. एखादा नट भूमिकेत शिरल्यावर बदलतो म्हणजे किती, याचा जणू वस्तुपाठच ते होते. स्वत: मेकअप करीत. प्रयोग झाल्यावर मात्र ते शांतपणे चुरगळलेल्या नेहरू शर्ट- पायजम्यात खांद्यावरच्या पिशवीमधून चंची काढून बसलेले दिसत. १९६२ मध्ये आलेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मध्ये तर ते चक्क शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होते. त्यांची कारकीर्द ही जणू व्यावसायिक अभिनेत्याचा आदर्श अभ्यासक्रमच होऊन गेलीय.  
१९६१-६२ साली आठवीमध्ये असताना या महोत्सवाने नाटकाच्या अंतरंगाची करून दिलेली ही पहिली तोंडओळख. नाटकं बघितली. महोत्सवाचं आमच्या तीन गुरुजींनी केलेलं चोख संयोजन, भरभरून प्रेक्षक प्रतिसाद.. सगळं अनुभवलं खरं; पण महोत्सवात बघितलेल्या प्रकारांच्या नाटकांमध्ये पुढे मन मात्र काही रमलं नाही. त्यातली गाणी मात्र मनात बरोबर राहिली. पण राजाभाऊ  लवळेकर सरांनी रंगवून सांगितलेल्या ‘पाथेर पांचाली’ या सिनेमाची गोष्ट मात्र मनावर कायमची कोरली गेली.
(उत्तरार्ध)  
– सतीश आळेकर

तळटीप : आमचे गोव्याचे डॉक्टर मित्र अजय वैद्य यांनी मा. दत्ताराम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त  (२०१३) ‘नाटय़वीर’ हा ग्रंथ उत्तमरीत्या संपादित केलाय. गोवा शासन प्रकाशित हा ग्रंथ नाटय़तरुणांना उद्बोधक वाटावा.