लहान मुलांचे निरागस बालपण जपण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी भारतात ‘बचपन बचाओ’ चळवळीद्वारे गेली अनेक वर्षे संघर्षरत असलेले सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी तसेच पाकिस्तानात स्त्रीशिक्षणाच्या हक्कासाठी प्राणांची पर्वा न करता लढा देणाऱ्या मलाला युसुफझाई यांना यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर झाला आहे. या पुरस्कारानिमित्ताने कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केलेले मनोगत..
नोबेल पुरस्काराची घोषणा हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे. माझ्या रूपाने एका भारतीयाला हा पुरस्कार मिळाल्याने समस्त भारतीयांची जबाबदारी आता वाढली आहे. मी खूप मोठे कार्य करतो आहे, अशी माझी धारणा नाही. बालमजुरी म्हणजे समाजाला मिळालेला शाप आहे. हा प्रकार निव्वळ शारीरिक श्रमांपुरताच सीमित नाही. कित्येक लहान मुलांना कामाला जुंपले जाते. त्यात त्यांचे कोवळे बालपण संपते. शारीरिक क्षमतेच्या कितीतरी पट जास्त श्रम त्यांना करावे लागतात. आरोग्य, स्वच्छता, खानपान कशाचीही काळजी घेतली जात नाही. मी याविरोधात लढा दिला. मी खूप मोठे काम उभे केले असे नाही, पण एका ध्येयाने मी प्रेरित झालो. आपल्या देशातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून बालमजुरीची प्रथा हद्दपार झाली पाहिजे, यासाठी मी जगभर फिरलो.  
कधीकाळी मी शेतकरी संघटनेशीदेखील संबंधित होतो. शरद जोशी, विनय हर्डीकर यांच्यासोबत मी काम केले आहे. पुण्यालाही त्यानिमित्ताने अधूनमधून जायचो. नंतर मात्र मला माझे जीवनध्येय सापडले. बालमजुरी प्रथेच्या निर्मूलनाकरता संस्थात्मक लढा उभारला. भारतात स्वयंसेवी संस्थांकडे संशयाने पाहिले जाते. उजव्या विचारसरणीची मंडळी स्वयंसेवी संस्थांवर सातत्याने टीका करतात. मला त्याविषयी काहीही म्हणायचे नाही. पण ‘सिव्हिल सोसायटी’ ही एक चळवळ आहे. ती वाढली पाहिजे. भारतासारख्या लोकशाहीने परिपूर्ण असलेल्या देशात याची गरज आहे. प्रत्येक समस्येवर काही सरकार उत्तर शोधू शकणार नाही. अनेक सामाजिक समस्यांवर ‘सिव्हिल सोसायटी’कडे नवप्रवर्तक कल्पना आहेत. सामाजिक विकासापासून वंचित असलेल्यांसाठी सिव्हिल सोसायटीचे बहुविध योगदान केले आहे. देशातील राजकीय यंत्रणेने सिव्हिल सोसायटीचा सन्मान केलाच पाहिजे. ‘सिव्हिल सोसायटी म्हणजे परदेशी निधीवर चालणाऱ्या संस्था’ हा अपप्रचार आहे. रंजल्यागांजलेल्यांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करण्याची धमक सिव्हिल सोसायटीमध्ये आहे. सरकारी यंत्रणा आणि सिव्हिल सोसायटी यांच्यामध्ये तारतम्य बाळगून सरकारला समन्वय साधावा लागेल. ‘बचपन बचाओ’सारखी चळवळ- आंदोलन उभारणाऱ्यांवर उजव्या विचारसरणीचे लोक नेहमीच टीका करतात. त्यावर टिप्पणी करणे मला योग्य वाटत नाही. हा देश.. हे जग बालमजुरीमुक्त झाले पाहिजे अशी माझी धारणा आहे. या धारणेतूनच मी काम करतो.
व्यसनाधीनता, मनुष्य-तस्करी, लहान मुलांचे लैंगिक शोषण, आरोग्याच्या समस्या हे सर्व बालमजुरीशी संबंधित आहे. त्याविषयी मात्र कुणीच बोलत नाही. आपल्या देशात धर्माधारित मांडणी केली जाते. मी व्यक्तिश: कोणताही धर्म मानत नाही. गेल्या चाळीसेक वर्षांपासून मी मंदिराची पायरी चढलेलो नाही. ऐन उमेदीच्या वयात मी नोकरी सोडली. त्यावेळी वडील हयात नव्हते. माझी आई अस्वस्थ झाली. आपल्या मुलाचे कसे होणार, या काळजीने ती चिंतित झाली होती. पण मी तिला सांगितले, ‘हेच माझ्या जीवनाचे भागध्येय आहे.’ आणि मी काम सुरू केले. भारताच्या कानाकोपऱ्यात गेलो. भारताच्या ईशान्य भागात परिस्थिती भीषण आहे. तिथे बालमजुरीचे रूपांतर मनुष्य-तस्करीत झाले आहे. शिवाय, त्यांच्यात व्यसनाधीनता आहे ती वेगळीच. म्हणूनच या भागाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजमितीस भारतात बालमजुरीविषयी जागृती होत आहे. स्वत:विषयी बोलायला मला आवडत नाही, पण बालमजुरीविरोधात मी जगभर प्रचार करीत सुटलो. कारण बालमजुरी हा मनुष्यजातीवरील कलंक आहे. मानवी हक्कांची ती पायमल्ली आहे. मानवता हेच खरे तर सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. त्याच्या प्रस्थापनेसाठी मी काम करतो आहे. या वाटचालीत पुरस्कार, सन्मान, मानाचे क्षणही अनेक आले. पण ते महत्त्वाचे नाहीत. मी काही संत नाही. देवधर्माविषयी मी बोललो आहे. कोणताही राजकीय विचार मला मान्य नाही. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व विश्वव्यापी आहे. माझ्या माध्यमातून लोक मी करीत असलेल्या कामाशी, ध्येयाशी परिचित झाले आहेत. बालमजुरीच्या उच्चाटनासाठी लोकांनीच मला आवाज दिला.
आज जग ग्लोबल झाले आहे. पण ग्लोबलायझेशनमध्ये मानवी हक्कांची किंमत कमी झाली. अनेक छोटय़ा कारखान्यांमध्ये लहान मुलांना कामाला जुंपले जाते. या मुलांच्या भवितव्याचे काय? शेळी-मेंढीची किंमतही आज दहा हजारांपर्यंत असते. मात्र, भारतात बालमजूर यापेक्षाही कमी किमतीत मिळतात. हे वास्तव भयाण नाही का? हा प्रकार मला रोखायचा आहे. ‘बचपन बचाओ’ आंदोलन त्यासाठीच आहे. व्यापाराचे जागतिकीकरण होऊ शकते; पण जागतिकीकरणातून मानवी हक्कांचे बाजारीकरण कसे बरे होऊ शकते? मला माझ्या कळत्या वयात एक लहान मुलगा भेटला. तो मजुरी करीत होता. त्याच्या पालकांना विचारले तर ते म्हणाले, ‘‘याचा जन्मच काम करण्यासाठी झालेला आहे.’’ तेवढय़ावरच तेव्हा हा संवाद संपला होता. परंतु त्याने माझ्या मनाला अनेक प्रश्नांनी वेढले होते. त्या मुलाचं बालपण कुठे हरवलं? उन्मुक्तपणे बालपण अनुभवण्याचा त्याचा अधिकार कुणी हिरावून घेतला? त्याला तो अधिकार कसा परत मिळवून देता येईल? अशा असंख्य प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो होतो. तेव्हापासून मनात चळवळ आकार घेत गेली. साधारण ८० चे दशक असेल ते. शिक्षणाने इंजिनीअर असलेला मी एका खासगी कंपनीत नोकरीला होतो. कार्यालयात जात असताना कित्येक लहान मुले रस्त्यावर दिसत. परिस्थितीवश का असेना, परंतु बालमजुरीची ही प्रथा समाजस्वास्थ्यासाठी चांगले लक्षण खचितच नाही. याच दशकात मग ‘बचपन बचाओ’ आंदोलनाचा प्रारंभ झाला. दिल्लीत सुरू झालेल्या या आंदोलनाचा विस्तार आज १४४ देशांमध्ये झालेला आहे. आतापर्यंत आम्ही ८० हजार बालमजुरांना मुक्त केले आहे. भारतातल्या अनेक जिल्ह्य़ांमध्ये ‘बचपन बचाओ’चे काम सुरू आहे. या कार्यातून ७० हजार स्वयंसेवक जोडले गेले आहेत. जगभरात १७ कोटी बालमजूर आहेत. त्यापैकी भारतात साधारण एक कोटी बालमजूर आहेत. सरकारी आकडा पन्नासेक लाखांचा आहे. देशभरात सुमारे साडेसातशे संस्था ‘बचपन बचाओ’ आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. लोकांच्या या सहभागामुळे भारतात मोठय़ा प्रमाणावर याविषयी जागृती झाली. भारतात या विषयावर किमान जागरूकता तरी झाली आहे, परंतु इतर देशांमध्ये मात्र याहून भयावह परिस्थिती आहे. २००१ मध्ये आम्ही ‘बालमित्र ग्राम’ कार्यक्रम सुरू केला- ज्यामध्ये एकही बालमजूर नसलेल्या गावांचा शोध घेण्यात आला. १४ वर्षांखालील कुणाही बालकाला मजुरी करावी लागू नये; मग त्यामागे कोणतेही कारण का असेना. बालमजुरी प्रथेचे समर्थन कदापिही करता येणार नाही.      
दोन वर्षांपूर्वी आम्ही आसाममध्ये यात्रा काढली. आसामच्या गावागावांतून गेलो. तिथे जे चित्र दिसले ते अतिशय खेदजनक होते. आसाम, मेघालय, ईशान्य भारतातील अनेक शहरे लहान मुलांच्या तस्करीचे अड्डे बनले आहेत. यापूर्वी बिहार, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये हे अड्डे होते. आजही शेकडो आई-बाप ईशान्य भारतातून आमच्याकडे येतात. लहान मुले, विशेषत: मुलींच्या तस्करीचे प्रमाण मोठे आहे. ‘प्लेसमेंट एजन्सीज्’ या जणू बालतस्करीचे सर्वात मोठे अड्डे बनल्या आहेत. त्याविरोधात आम्ही आवाज उठवला. अगदी आठेक दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने यावर कायदा बनविण्याची सूचना राज्य सरकारला केली. गरिबी व बालमजुरी हे बालतस्करीचे प्रमुख कारण आहे. अनेक पालकांना आपला मुलगा-मुलगी कुठे आहे याचा पत्ता लागत नाही. त्यांच्यावर काय संकट कोसळले असेल, याचाही त्यांना अंदाज नसतो. आपल्या हरवलेल्या अपत्याचा शोध ते पोलिसांच्या भरवशावर घेत राहतात. पण कालपर्यंत आपल्या डोळ्यांसमोर दिसणारा मुलगा/ मुलगी एकदम अचानक नाहीशी झाली, ही जाणीवच मुळी अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. केवळ पोलिसांच्या भरवशावर ही समस्या सुटणार नाही. सामान्य माणसाला याचे भान यावे लागेल. कोणतीही वस्तू घेताना त्या वस्तूच्या निर्मितीत बालमजुरांचा सहभाग नसल्याची खात्री आपण करायला हवी.
भारतात आता बालमजुरांची संख्या हळूहळू कमी होत आहे. सरकार आणि संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी कदाचित प्रत्यक्ष वस्तुस्थितीपेक्षा कमी असेलही; परंतु लोकांमध्ये यासंबंधात जागृती होते आहे. त्यात न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. मला नव्या सरकारविषयी काही म्हणायचं नाही. कारण ते नुकतंच सत्तेवर आलेलं आहे. पण एक मात्र नक्की, की आम्ही आमच्या मुलांना गमावलं म्हणजे आपलं भविष्यच गमावण्यासारखं आहे, याची जाणीव प्रत्येकानं ठेवायला हवी.
माझा आतापर्यंतचा प्रवास संघर्षांचा आहे. माझ्या व माझ्यासारख्या अनेक सेवाभावी संस्थांवर परदेशातून मिळणाऱ्या निधीवरून टीका होते. भारतीय लोकशाहीने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. या स्वातंत्र्याने भारतीय लोकशाहीत प्रत्येकाला आपापले अवकाश जपण्याचा अधिकार दिला आहे. तेच मी केले. मला या देशाचा अभिमान वाटतो, कारण इथे लोकशाही नांदते. भलेही इथे भ्रष्टाचार का असेना, परंतु भारतीय समाजमन संवेदनशील आहे. भारत म्हणजे ‘मदर ऑफ हंड्रेड प्रॉब्लेम्स, बट आल्सो मदर ऑफ मिलिअन्स सोल्यूशन्स’ आहे. कारण आपल्याकडे नवप्रवर्तक कल्पना आहेत. त्याद्वारे या समस्यांवरील उपाय शोधण्याची वृत्ती आपल्याकडे आहे. केवळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील समस्यांवरचे उपाय आपण शोधू शकतो. आपल्यापाशी महात्मा गांधींची मोठी प्रेरणा आहे. सत्य-अहिंसा ही आधुनिक जगाला बदलू पाहणारी सर्वश्रेष्ठ मानवी मूल्ये आहेत. करुणा हे मानवी मूल्य आपल्याकडे महत्त्वाचे मानले जाते. सत्य, अहिंसा, करुणा या मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी मी सामाजिक चळवळ आरंभिली. त्या चळवळीचा हा सन्मान आहे. मला सन्मान मिळाल्याने समस्या सुटणार नाही. पण बालमजुरी, बालविवाह, बालतस्करीमुळे ज्यांचं बालपण होरपळून निघालं आहे अशांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या पुरस्कारामुळे सन्मान झाला आहे. त्यांच्या संघर्षांला नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या ध्येयवादी चळवळीला आवाज मिळाला आहे. माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे.                
शब्दांकन- टेकचंद सोनवणे