परंपरागत शेती कधीच कालबाह्य झाली आहे. आजचा शेतकरी अपवाद सोडता आंधळ्या-पांगळ्यांची माळ धरल्यागत ऊस, द्राक्षे, कापूसादी नगदी पिकांच्या मागे जिवाचे रान करत धावतो आहे. परंतु बी-बेवळ्यातील भेसळ, रासायनिक खते, कीटकनाशके, डिझेल-पेट्रोलसाठी लागणारा पैसा, टँकरने द्यावे लागणारे पाणी आणि यावर वरताण म्हणजे हटकून पडणारे अवर्षण. एखाद्या चरकात गेलेल्या उसासारखी शेतकऱ्याची गत झाली आहे. याचे मोठे विलोभनीय दर्शन ‘खरडछाटणी’त घडते. नामदेव माळी यांची दोनेकशे पानांची ही कादंबरी. माळी यांनी आजवर कथाकार, कवी आणि कादंबरीकार म्हणून मोजकेच, पण लक्षणीय लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखक गंभीर नि कष्टाळू प्रकृतीचा आहे.
आवडाक्का आणि थोरला सुदामा, मधला संपत व धाकला तानाजी ही तिची तीन तऱ्हांची तीन मुले. मुलगी सुगंधा. सुदामाची पत्नी पारू, किसन व बकुळा ही त्यांची शाळकरी मुलं. संपत हा मास्तर. त्याची आपमतलबी बायको. अशा या शेतकरी कुटुंबाची ही कहाणी. चुलतेमालते, शेजारीपाजारी, दोस्त वगैरे अशी अनेक पात्रे कादंबरीत आहेत. परंतु द्राक्ष-शेती करणारा तानाजी हे मुख्य- मध्यवर्ती पात्र. कुटुंबाचा नि शेतीचा गाडा खस्ता खात ओढणारा तानाजी नात्यातील मंडळींनी हात आखडता घेतल्यामुळे उत्तरोत्तर कसकसा होलपटत जातो, याचे विदारक चित्रण चटका लावणारे आहे. विविध सणवार, अंधश्रद्धा, रीतीभाती अशा गावगाडय़ातील अनेक गोष्टींच्या पाश्र्वभूमीवर संवाद, घटना, प्रसंगादींची बहुपेडी गुंफण  झकास साधली आहे. मरगुबाई, खंडय़ा कुत्रा, चिमण्या, पोपट, द्राक्षाची खोडे यांचे मानवीकरण कलात्मक नि भावपूर्ण आहे. तानाजीच्या मनाची घालमेल, शेंबडात माशी अडकल्यागत झालेली त्याची घुसमट याचे संवेदनशील चित्रण लेखकाने संज्ञाप्रवाही पद्धतीने मोठय़ा ताकदीने केले आहे.
ग्रामीण बोलीतील कित्येक अर्थपूर्ण शब्द, बोलक्या म्हणी व वाक् प्रचारांचा केलेला चपखल वापर यामुळे भाषाशैली  रसरशीत व जिवंत झाली आहे. उदाहरणार्थ- ‘सरळावरळा’, ‘खोडील’, ‘येटवान’, ‘मुडापा’, ‘हरणकाळजी’, ‘घणघणीत’, ‘तापद्रा’,  ‘शिरवाळ’, ‘घायटा’, ‘कणकण’, ‘गुळमाट,’ ‘उसंपायसं’, ‘काळय़ामाळय़ा’ यांसारखे शब्द आणि ‘सुखाच्या गांडीला दु:खाचा बिबा’, ‘हुलग्याच्या वाफेचा’, ‘नादाला पाद लावणे’, ‘नरडय़ाला येणे’, ‘वैशी फिरणे’ यांसारख्या म्हणी, वाक्प्रचार पानापानावर भेटतात.
संवाद आणि प्रसंगोपात निवेदनात योजलेली काव्यात्म भाषा ही या कादंबरीची उल्लेखनीय बलस्थाने आहेत. उदाहरणार्थ-‘‘आरं, जगाला गांड देशील, भावकी भावकी म्हणून आम्हाला धत्तुरा दावशील.’’, ‘‘ ..आरं बाबा, माझी जागा तू मला कशाला दावतोस? या जगात राबणाराची जागा तळाला. फुकटखाऊ चोरांची चलती चाललीय जगात. असला त्यो बळिराजा, त्याला त्ये पाताळात घातला.. आन् माझा त्यो काय पाड लागाय रं!’’, ‘‘सगळ्या गावाचं रगात पेणाऱ्या नानाला पुरस्कार.. जिवाचा रान करणाऱ्याला द्या. त्या नानाला शेताचं वाडं का गाडं म्हाईत न्हाई.. ऱ्हावू दे तुझी राधा आन् नाचू दे माझं रेडकू..’’ आणि हा कादंबरीच्या शेवटी असलेला संवाद- ‘‘असं अंग गाळून कसं चालंल लेकरा. आपुन कुनबी. आशेन जगायचं. आजचा न्हाई उद्याचा दिस तरी सोन्याचा उगवल. जलम-मरण फेरा कुणाला चुकलाय? उठ, बागंची खरडछाटणी करायची हाय. खरडछाटणी झाली की बागंला नवी पालवी फुटती. नवा जलम असतोय बागंचा आन् आपलाबी!’’
अलीकडे गावशिवारातील समाजकारण, अर्थकारण शेतीच्या भोवती फिरत असते, या समर्थ सूत्राचा लेखकाने अत्यंत सूचकतेने वापर केला आहे. मातीमोल किंमत देऊन शेतमाल उचलणारे लबाड दलाल, भोळ्याभाबडय़ा, अडाणी शेतकऱ्यांवर गुरकणारे लाचखाऊ पोलीस, गावगुंडी करणारे गावठी सावकार, शिकलेला आणि म्हणूनच आत्मकेंद्री झालेला मास्तर भाऊ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदर्श शेतकरी पुरस्कारातील भ्रष्ट राजकारण, नात्यागोत्यातील दुखऱ्याखुपऱ्या गाठी असा हा वास्तवदर्शी पट लेखकाने कलात्मकतेने उलगडला आहे.
खरं तर, ‘खरडछाटणी’त खोड काढण्यासारखे काही नाही. तरी पण एक-दोन गोष्टींचा उल्लेख करायला हवा. एक म्हणजे मुद्रणदोष फार नाहीत, पण आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे संवाद आणि निवेदनातही बऱ्याच ठिकाणी लेखकाच्या शब्दांच्या रूपांविषयी संभ्रम झाला आहे. उदाहरणार्थ- बघतो (बगतो), असेल (आसेल) इत्यादी. बाकी मुद्रण बांधणी, कागद, मांडणी वगैरे ठीक आहे.
‘खरडछाटणी’ – नामदेव माळी, मनोविकास प्रकाशन, पुणे,  पृष्ठे – १९०, मूल्ये – १९० रुपये.