उलथापालथ- मग ती कुणाचीही असो, त्यात जीवघेणी वेदना असतेच. पण त्यात जी हुरहुर असते ती पाण्यावरच्या तवंगासारखी असते. ती पकडण्याचा प्रयत्न ल. म. कडू यांच्या ‘खारीच्या वाटा’ या काव्यात्म कादंबरीने केलेला आहे.
पन्नासेक वर्षांपूर्वी निसर्गाचे जे अनाघ्रात प्रदेश होते त्यात सगळ्या ऋतूंचे पारदर्शी प्रतिबिंब पडलेले असायचे. lr12कादंबरीचा हळव्या मनाचा नायक, त्याचा जिवलग मित्र दिनू आणि या कादंबरीची नायिका ‘लुकी’ नावाची खार यांची भावकथा कादंबरीकाराने अतिशय हळुवारपणे यात उलगडली आहे.
शाळकरी वयाचे हे दोघे मित्र आणि देवळामागे असलेल्या नांदुरकीच्या झाडावरून खाली पडलेल्या खारीच्या पिलाचा लालसर गोळा कादंबरीतला निवेदक घरी आणतो. त्याच्या प्रेमळ आईच्या निगराणीखाली या पिलाचा नामकरण विधी होतो.. ‘लुकी’या नावाने. हीच लुकी कादंबरीभर दिनू आणि निवेदकाची मैत्रीण होते.
सहसा एक क्षणभरही एका जागी न थांबणाऱ्या लुकीच्या अनेक करामती पाहून वाचक सुखावून जातो. आधी घर, मग अंगणातील चिंच, मग गावाभोवतीची झाडेझुडपे, करवंदांच्या जाळ्या सहजपणे ओलांडणारी लुकी निवेदकाच्या हातावर, डोक्या-खांद्यावर, दारातल्या बैलांच्या वशिंडावरही मस्ती करते. त्याच्या कुटुंबाचा एक भाग बनते. भांब्या बोका, गुंडी म्हैस, बारशा बैल, हौशा कुत्रा आणि कोंबडय़ांचाही ‘लळालोंबा’ तिला आवडतो.
लेखकाने त्याची निसर्गात रमलेली, देवळात भरणारी, चार वर्गासाठी एकच शिक्षक असणारी शाळा तसंच तिथल्या वनजीवनाचेही दर्शन तपशिलात घडविले आहे. हिरव्यागार फोकाची छडी आणि गुरुजी यांचे एकरूपत्व म्हणजेच शिक्षण अशा काळातली ही कथा चटका लावून जाते.
गाव म्हणजे नुसती घरे नाहीत, तर तिथली माणसे, दारिद्रय़, अज्ञान, देवभोळेपणा, भैरोबा, मूळपुरुष, मारुती यांची मंदिरे, उत्सव, दंतकथेचा वावर, कोणे एकेकाळी इथे होऊन गेलेला राजा, त्याचे न्हाणीघर, दीपमाळ.. म्हणजेच हे एकसंध जग आहे. यातले काहीच उणे करता येत नाही. जगण्याची कल्पना इतकी ‘सार्वजनिक’, की लपून राहणे किंवा लपविणे कुणासच ठाऊक नाही. आपलं जग आपल्या एकटय़ाचं कधीच असत नाही. ते या साऱ्यांचं, गोळ्यामेळ्यानं राहण्यासाठीच जन्माला आलेलं आहे. एकमेकांशिवाय जगणे शक्य नाही हेच सांगण्याचे काम लेखक करतो.
उन्हाळा, पावसाळा, थंडी या प्रत्येक ऋतूचे अतिशय लोभस वर्णन वाचत वाचत वाचक धरणाच्या नियोजित आराखडय़ापर्यंत येतो. आता इथे धरण होणार आणि ‘गाव उठणार’ अशी बातमी येताच गाव हादरते. ‘गाव उठणार’ हे शब्द ग्रामसंस्कृती नष्ट करणारेच आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय ही कादंबरी देते. आजवर पिढय़ान् पिढय़ा जिथे नांदल्या ती माती दुरावणार, झाडेझुडपे दृष्टीआड होणार.. ज्या देवांचे उत्सव करून त्यांना प्रसन्न करून घेतले ते देवही वनवासी होणार.. घरं मोडणार.. या विचारांनी माणसं मोडून पडली. सरकारी यंत्रणा, अधिकारी, यंत्रे यांनी गावाचा ताबा घेतला. आवरणे सुरू झाले. माणसं असहाय झाली. त्यांची अन्नावरची वासना उडाली. माणसांच्या मनाचा दगड झाला. सुताराची म्हातारी भानातून गेली. ती गाव सोडायला तयार नसते. टारगट पोरं म्हातारी दिसताच ‘गाडी आली, गाडी आली पाचाची, आता नाय म्हातारी वाचायची’ असे म्हणून चिडवू लागली. बघता बघता गाव ओस पडते. यंत्राच्या क्रूर आवाजाने गावाचे काळीज फाटून जाते. घरं पडण्याआधी माणसांची मने ढासळली. भिंती पडून नांदतं गाव बघता बघता भकास झालं.
काहीतरी अनिष्ट होते आहे म्हणून लुकी अस्वस्थ होते. निवेदकाच्या घरचे बैल विकण्याऐवजी परिचिताला सांभाळायला दिले जातात. एकेकाची बजाबाकी सुरूच असते. बैलांच्या डोळ्यांतही पाणी तरळते. लुकी बारशाच्या पाठीवर शेवटचं बसून घेते. या निरोपाला शब्दांची गरजच भासत नाही. शेवटी गावातले शेवटचे घर पडते. हलते. पडते. उठते. दिन्या व निवेदक आगळ्याच्या डोहाजवळच्या मोठय़ा दगडावर काढलेल्या लुकीच्या चित्रावरून शेवटचा हात फिरवतात. इथून पुढे साऱ्याच वाटा मुक्या होतात. आता लुकीचे काय, हे प्रश्नचिन्ह उरते. पण लुकी मागेच राहते. एकटीच. जणू काही तिला राहणे भागच आहे. ती रडते.. मूकपणे.
आई शेवटी चूल शांत करते आणि कादंबरी टोक गाठते. नुसते विस्थापन हा या कादंबरीचा लेखनहेतू नाहीच. पण आपण काय काय हरवत चाललो आहोत, याचे भानच आपल्याला नाही. अलीकडे आपल्या सर्वाच्याच जगण्याला धावपळीचा, कर्कश्शपणाचा, क्रूरतेचा घट्ट विळखा पडलेला आहे तो सैल करण्याचे काम ही कादंबरी करते.
ल. म. कडू यांची बोलकी रेखाचित्रे आशयाला घनता मिळवून देतात. अगदी शहरी वाचकांसाठी लेखकाने ‘शब्दार्थ’ जोडून सोय केली आहे. आपल्या मातीवर, माणसांवर, झाडापेडावर, पशुपक्ष्यांवर आपण कधी प्रेम करणार, हा प्रश्न ही कादंबरी उपस्थित करते. ही हवीहवीशी वाटणारी निरागसता फार मोलाची आहे, हेच ती अधोरेखित करते.
‘खारीच्या वाटा’-  ल. म. कडू, राजहंस प्रकाशन, पुणे. मूल्य- १४० रु.