भारतात कॉपरेरेट लोकशाही मूळ धरू लागली आहे. संसदीय पद्धतीच्या लोकशाहीला कॉपरेरेट राजकारणाची लागण झाल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. ही निवडणूक राजकीय पक्षांनी कॉपरेरेट पद्धतीने हाताळली. १९९१ पासून देशाचे राजकारण बदलतेय. राजकारणाला कॉपरेरेट टच देण्यापासून झालेली सुरुवात आता पूर्णपणे कॉपरेरेट रंगात रंगलेली आहे. पत्रकार मिलिंद कीर्ती यांनी या बदलत्या राजकारणाचा अभ्यासू पद्धतीने वेध घेत समाजकारण, अर्थकारण व राजकारणाचे नवे गतिशास्त्र ‘नवयान : विषमता अंताचा लढा’ या ग्रंथातून वाचकांसमोर आणले आहे. या ग्रंथामध्ये वैदिक काळापासून आलेली सामाजिक, वैचारिक, धार्मिक स्थित्यंतरे आणि त्यावर अधारित राजकारणांची कारणमीमांसा करण्यात आली आहे.
२००४ची लोकसभा निवडणूक ‘शायनिंग इंडिया’च्या जाहिरातीत रंगविण्यात आली. २००९मध्ये काँग्रेसने ‘जय हो’चा नारा दिला. या सर्व आधुनिक संदर्भाचा ‘नवयान’मध्ये स्थान देत वर्तमान काळाचा इतिहास रेखाटण्यात आला आहे. आधी कॉपरेरेट कंपन्या राजकीय पक्षांना निवडणूक फंड उपलब्ध करीत असत. आता कॉपरेरेट कंपन्यांचे मालक-संचालक थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरले आहेत. हे कंपन्यांचे मालक-संचालक संसदेमध्ये जनतेच्या प्रश्नांना किती न्याय देत असतील, असा प्रश्न उपस्थित करून ग्रंथलेखकाने राजकीय पक्षांचे रूपांतर प्रायव्हेट लिमेटेड कंपन्यांमध्ये करण्यात आल्याचे सविस्तर विवेचन करतात.
समता, सामाजिक न्याय या शब्दांना आता भाषणापुरती किंमत उरलेली आहे. सामान्य माणसांचे नाव घेत त्यांचेच प्रश्न गुंडाळून ठेवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. समाजजीवनात जी सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे किंवा परिवर्तने होत असतात, ती सहजभावाने कधीच घडून येत नसतात. जेव्हा एक व्यक्ती किंवा एक समूह दुसऱ्या व्यक्ती किंवा दुसऱ्या समूहाशी त्याच्या ध्येयधोरणांबाबत कोणतीही तडजोडीची भूमिका स्वीकारत नाही, तेव्हा त्यात संघर्ष मूळ धरू लागतो. आधुनिक राजकारण हा संघर्ष टाळून पुढे जाण्याचा देखावा उभा करीत आहे. शोषण प्रक्रियेतील दोन घटक – एक – शोषक आणि दुसरा शोषित, यांच्या परस्पर विरोधाची दर्शने आकार घेत असतात. म्हणूनच विषमता अंताच्या लढय़ात समतेच्या बाजूने असणाऱ्या दर्शनाचे मोल, व्यवस्था परिवर्तनाचा विचार पुढे नेणाऱ्या माणसाला किंवा चळवळीला अधिक गांभीर्याने समजून घ्यावे लागते. या आजच्या बदलत्या समाजवास्तवाच्या परिप्रेक्ष्यात ही गरज ‘नवयान’ने पूर्ण केली आहे.
या ग्रंथात मांडलेले विषय हे पुरोगामी चळवळीतील विशेषत: आंबेडकरवादी, समाजवादी आणि मार्क्‍सवादी चळवळीतील विचारवंतांना-कार्यकर्त्यांना त्यांच्या चळवळीची नवी बांधणी करायला भाग पाडणारे आहेत. एकूणच पुस्तकाच्या मांडणीतून आंबेडकरवादी, पुरोगामी आणि परिवर्तनवादी प्रवाहांनी आजच्या घटकेला आपापल्या चळवळीतील तात्त्विक व आचारात्मक ‘कर्मठपणा’ दूर सारून विषमता अंताच्या र्सवकष लढय़ासाठी परस्पर आंतरसंबंधांची फेरतपासणी व त्याची पुनर्माडणी करून आपल्या लढय़ाचे नवे गतिशास्त्र निर्माण करण्याची व त्याचे कार्यान्वयन होण्याची अपरिहार्यता ‘नवयान’ या ग्रंथाने सिद्ध केली आहे.
विषमता अंताच्या लढय़ाचा विचार करताना धर्मसत्ताक, अर्थसत्ताक आणि पुरुषसत्ताक या तिन्ही सत्ता केंद्राच्या किंवा व्यवस्थेच्या चिकित्सेचा मुद्दा आपल्याला अपरिहार्यपणे आपल्या चळवळीच्या पटलावर घ्यावा लागतो. प्रस्तुत ग्रंथामध्ये या तिन्ही सत्ता केंद्रांच्या आंतरसंबंधांची आणि त्यातून उद्भुत झालेल्या समाज व्यवहाराची एक समंजस चिकित्सा लेखकाने केलेली आहे.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून बदलत्या समाज व्यवस्थेत आपले स्थान निश्चित करीत असताना शोषितांविरुद्ध शोषक असा संघर्ष तीव्र होत जाणार आहे. तंत्रज्ञानाधारित क्रांतीमध्ये दलित, आदिवासी, ओबीसी या घटकांना अधिक ‘स्पेस’ उपलब्ध होऊन त्यांचा ‘राईज ऑफ रेस्ट’ सुरू झाला आहे. पण हीच तंत्रज्ञानाधारित क्रांती एकीकडे सत्ताधारी लोकांकरिता संपत्ती मिळविण्याची शर्यत लावते, तर दुसरीकडे सहन करा किंवा आत्महत्या करा असा पर्याय दलित, आदिवासी, ओबीसी वंचित घटकांपुढे ठेवते. अशा आजच्या विषम पर्यावरणात ‘नवयान’ने चळवळीचे नवे हत्यार निर्माण करण्याची गरज प्रतिपादन केली आहे. सत्ताधारी जात-वर्ग (कास्ट) आणि भांडवल (कॉस्ट) यांचा मेळ घालून आपले नवे साम्राज्य अबाधित ठेवत आहेत. १९३७च्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी पक्षाशी युती केल्यावर शेतकऱ्यांना आपली मते विकू नका, असे आवाहन केले होते. आता ‘काही’ मिळणार असेल त्याला मत देऊ, इथपर्यंत ‘कास्ट’ आणि ‘कॉस्ट’ची मजल गेली आहे. त्यातून विविधतेचा स्वीकार करणारी संसदीय लोकशाहीच धोक्यात आली आहे.
आज जागतिक पातळीवर विषमतेचा विचार करताना जे चित्र पुढे येते, ते अत्यंत विदारक आहे. १४ टक्के लोकांजवळ ७८ टक्के संपत्ती, ७५ टक्के लोकांजवळ २० टक्के संपत्ती आणि उर्वरित ११ टक्क्यांकडे केवळ २ टक्के संपत्तीचे वितरण झाले आहे. भारतासंदर्भात यात फार बदल नाही. याचा अर्थ असा की, आजच्या घडीला समाजात १४:८६ अशी लोकांमध्ये टोकाची विषमता आहे. या विषमतेच्याविरोधात ८६ टक्के लोकांचा हुंकार भरण्यासाठी समाज व्यवस्थेत सामाजिक-आर्थिक समतेची व न्यायाची मागणी करण्याची ऊर्जा आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवाद निर्माण करतात. या ऊर्जेचा समन्वय झाल्यास प्रस्थापित ‘कास्ट’ व ‘कॉस्ट’ केंद्रित शोषक व्यवस्थेविरोधातील चळवळीचा होत असलेला ऱ्हास थांबविणे शक्य असल्याचे आश्वासक उत्तर ‘नवयान’ देते. त्याशिवाय सामाजिक चौकटीतील सामाजिक विकासाच्या वितरणाचे नवे गतिशास्त्रही मांडता येणार नाही!
सामाजिक-राजकीय परितर्वनवादी चळवळीतील मुखंडांची, कार्यकर्त्यांची आणि जनसमूहांची या दिशेने समज वाढविण्यासंदर्भात प्रस्तुत ग्रंथाची उपलब्धता निश्चितच मोलाची आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेली प्रस्तावना या ग्रंथातील विचार मांडणीच्या अभ्यासाची दिशा स्पष्ट करणारी आहे. शोषणमुक्तीचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने व अभ्यासकांनी हा ग्रंथ अभ्यासावा, अशी या ग्रंथाची मौलिकता आहे.
‘नवयान : विषमता अंताचा लढा’ – मिलिंद कीर्ती, लोकवाङ्मयगृह, मुंबई, पृष्ठे- ३७६, किंमत- ४००रुपये.