सतत बदल हा अमेरिकन समाजाचा जणू स्थायिभावच आहे! व्यक्ती-स्वातंत्र्याचा, स्वतंत्र मतांचा हक्क अमेरिकन समाजाइतका फारच कमी ठिकाणी प्रदर्शित होत असेल. अमेरिकेत रोजच्या राहण्यात, बोलण्यात, शिक्षणात, पेहेरावात, सगळीकडे बदल हा कायम होतच असतो. अमेरिकेत बदल हा सर्वव्यापी आणि जलद होतो असं वाटतं. सणवारांपासून ते साजरे करण्याच्या पद्धतीही या बदलाला अपवाद नाहीत. नाताळ, थँक्सगिव्हिंग, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असे काही मोजके ‘डे’ सोडले, तर इतर सणांची लोकप्रियता नेहमीच कमी-जास्त होताना दिसते. ‘कोलंबस डे’च्या बाबतीत असंच काहीसं होतंय.

कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला असं आम्ही  शाळेत  शिकताना ऐकून होतो. अमेरिकेत मात्र, नंतरच्या पिढीने या  विधानावर आक्षेप घेण्यास सुरुवात केलेली आहे. कोलंबसच्या कितीतरी आधी (१० व्या शतकात) व्हायकिंग्जच्या वसाहती आइसलंड, ग्रीनलँड, न्यू-फाउंडलँड आणि अमेरिकेच्या काही भागांमधे होत्या. विषम हवामान, अन्नाची कमतरता यामुळे हे लोक फार काळ टिकाव धरू शकले नाहीत. त्या वेळच्या अमेरिकेत कितीतरी मूळ रहिवाशांच्या टोळ्या पसरलेल्या होत्या. कोलंबसला अर्थातच या टोळ्या ‘इंडियन’ लोकांच्या वाटल्या होत्या. नवीन शोधलेला प्रदेश ‘इंडिया’ नाही हे कळल्यावर त्या प्रदेशाचा उल्लेख बरीच वर्षे ‘न्यू वर्ल्ड’ असा केला जाई. कोलंबसनंतर काही वर्षांनी प्रसिद्धीस आलेल्या अमेरिगो वास्पूची या इटालियन दर्यावर्दीच्या नावावरून ‘न्यू वर्ल्ड’ चं नाव अमेरिका हे पडलं.

Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
student using mobile
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूला ब्लू व्हेल चॅलेंज कारणीभूत?
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?

कोलंबसने अमेरिका शोधली,  हे अनेकांना मान्य नाही. असं जरी असलं तरी युरोपियन लोकांच्या (मोठय़ा प्रमाणात)‘न्यू वर्ल्ड’मधल्या आगमनाची सुरुवात कोलंबसच्या आगमनानंतरच झाली.

१४४० ते १४६० च्या दरम्यान इटलीमधे जन्मलेल्या ख्रिस्तोफरला ‘इंडिया’त जाऊन तिथलं सोनं आणि मसाल्याचे पदार्थ लुटून आणायची तीव्र इच्छा होती. बोटीच्या सफरीला लागणाऱ्या द्रव्याच्या शोधात तो स्पेनला पोचला. (स्पेनमधे त्याचं नाव क्रिस्तोबाल झालं होतं). तिथल्या राजाने आणि राणीने त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून सोनं मिळण्याच्या आशेने त्याला पैशाची मदत केली. ३ ऑगस्ट १४९२ ला सांता मारिया, पिंटा आणि नीना या तीन बोटींमधून कोलंबसचा अटलांटिक महासागरातला आशिया खंडाचा प्रवास सुरू झाला. त्याला कल्पनाही नव्हती की, उत्तर अमेरिका त्याच्या प्रवासाच्या वाटेतच होती. ३ ऑगस्टला निघालेल्या बोटींना १२ ऑक्टोबरला जमीन दिसली. (त्यांना ती इंडिया वाटली. अर्थात पहिल्या दोन फेरींमधे कोलंबस अमेरिकेच्या आजूबाजूच्या बेटांवर होता. उत्तर अमेरिकेत येऊन पोचायला त्याला त्याच्या तिसऱ्या फेरीपर्यंत थांबावं लागलं. हे वर्ष होतं १४९८.) नवीन प्रदेशात

कोलंबस आला खरा, पण त्याला तिथे सोनं, मसाले वगैरे काही मिळालं नाही. तिथे स्थानिक वंशाचे लोक राहत असल्याचं त्याला आढळलं. (ज्यांना कोलंबसने इंडियन्स संबोधलं होतं).

कोलंबसच्या आगमनाचा दिवस अमेरिकन इंडियन्सना आपला विनाश सुरू होण्याचा दिवस वाटतो, तर बऱ्याच युरोपियन राष्ट्रांना- खास करून इटली, स्पेन यांना त्यांच्या पिढय़ांच्या अमेरिकेतल्या उत्कर्षांची सुरुवात वाटते. कोलंबसच्या सफरींमुळे दोन भिन्न घटना झाल्या. एकीकडे कोलंबसचं सोनं लुटून आणण्याचं भंगलेलं स्वप्न होतं, पण मोठय़ा प्रमाणात माणसं, जनावरं, झाडंझुडपं, रोगराई, संस्कृती यांची देवाण-घेवाण सुरू झाली. युरोपमधून आलेल्या घोडय़ांनी ‘नेटिव्ह अमेरिकन’ लोकांना भटकंती सोडून शिकारी केलं. अमेरिकेतल्या बटाटा, टोमॅटो, मका यांसारख्या भाज्या, धान्य युरोपमधे पोचले, तर कॉफी, ऊस ही लॅटिन अमेरिकेतली नगदी पिके झाली. ‘ओल्ड वर्ल्ड’मधून रोगराई, आजार हेही ‘न्यू वर्ल्ड’मधे जाऊन पोचले. अमेरिकन इंडियन्सची संख्या देवी आणि इन्फ्लूएन्झाच्या साथींनी इतकी कमी झाली, की युरोपियन लोकांना अमेरिका आपला प्रदेश म्हणून बळकवायला फारसा त्रास झाला नाही.

या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचा ‘कोलंबस डे’ साजरा व्हावा की नाही हा वाद उफाळून आला आहे. वॉशिंग्टन येथे १७९२ साली अमेरिकेत पहिल्यांदा ‘कोलंबस डे’चा ३००वा वाढदिवस साजरा केल्याची नोंद आहे. त्यानंतर लगेचच वॉशिंग्टन शहराचं नाव ‘डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया’ असं झालं आणि ते शहर अमेरिकेची राजधानी बनली. १९०५ साली कोलोरॅडो राज्याने पहिल्यांदा ‘कोलंबस डे’ साजरा केला. अमेरिकेत इतरत्र कुठेच या दिवसाला महत्व प्राप्त झाले नव्हते. १९१७ सालापासून लॅटिन अमेरिकेत हा दिवस ‘डे ऑफ द रेस’ म्हणून साजरा व्हायला सुरुवात झाली. कोलंबस जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत आला, तेव्हा कृष्णवर्णी, अमेरिकन इंडियन आणि त्याच्याबरोबर आलेले युरोपियन अशा तीन वेगवेगळ्या वंशांचं मीलन त्याला या ठिकाणी झालेलं दिसलं. या मीलनाचा दिवस म्हणून ‘डे ऑफ द रेस’ साजरा करतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी १९३७ साली ऑक्टोबरमधला दुसरा सोमवार ‘कोलम्बस डे’ म्हणून जाहीर केला. अलीकडे ज्या ज्या राज्यांमधे अधिक इटालियन लोक आहेत, तिथे ‘कोलंबस डे’ साजरा होतो. अमेरिकेतले कुठलेही सण परेडशिवाय साजरे होत नाहीत. न्यूयॉर्कमध्ये मोठय़ा संख्येने इटालियन लोक राहतात. तिथे पहिला ‘कोलंबस डे’ १८६६मध्ये साजरा करण्यात आला. १८९२ मध्ये कोलंबसचा पुतळा न्यूयॉर्कमधल्या कोलंबस अव्हेन्यूवर बसवला गेला.  तिथली ‘कोलंबस डे’ची परेड पाचव्या अव्हेन्यूवर- ४४व्या रस्त्यापासून ७९व्या रस्त्यापर्यंत जाते. परेड दुपारी पावणे बाराला सुरू होत असल्याने दुपारच्या जेवणाच्या वेळेत खूप लोक परेड बघायला आणि परेडमधल्या लोकांना उत्तेजन द्यायला येतात. सॅन फ्रान्सिस्कोमधे ‘कोलंबस डे’च्या दिवशी इटालियन रहिवासी अमेरिकी नौदलाचं आणि आपला लाडका दर्यावर्दी- कोलंबसचं कौतुक करायला जमतात.

सॅन फ्रान्सिस्कोमधल्या बर्कली या सुधारक शहराने मात्र १९९२ मध्ये ‘कोलंबस डे’ साजरा करण्याचं थांबवलं. या शहराने हा दिवस कोलंबस येण्यापूर्वी अमेरिकेत राहणाऱ्या मूळ लोकांच्या स्मरणार्थ पाळण्यात यावा असं ठरवलं. इथल्या सुजाण नागरिकांच्या मते, हा दिवस अमेरिकेच्या मूळ रहिवाशांच्या संहाराचा होता. बर्कलीचा आदर्श ठेवत सिएटल, मिनिएपोलीस अशा आणखी काही शहरात ‘कोलंबस डे’ मूळ अमेरिकी लोकांचं स्मरण करण्याकरता पाळला जातो. कोलंबसला ‘न्यू वल्र्ड’मध्ये सोनं मिळालं नाही, तेव्हा स्पेनच्या राजा-राणीला भेट द्यायला त्याने तिथल्या अनेक मूळ रहिवाशांना पकडून गुलाम म्हणून नेलं. त्यांचा बराच छळ झाला, अशाही नोंदी इतिहासात सापडतात.  सगळ्या युरोपियन देशांना ‘न्यू वर्ल्ड’चं मैदान खुलं करण्याचं श्रेय जसं कोलंबसला जातं, तसंच वंशवाद पसरवण्याचा, मूळ रहिवाशांना नेस्तनाबूत करण्याचा अपराधही त्याच्या नावावर रुजू होतो.

अमेरिकेतले काही लोक हा दिवस आनंदाचा तर काही लोक दु:खाचा मानतात. काही लोक याबाबत तटस्थ राहतात. बाजारपेठांना मात्र आपल्या व्यापाराशी मतलब असतो. सगळीकडे सवलतीने उत्पादनांची विक्री होत असते. ‘कोलंबस डे’च्या सेलमध्ये येऊ घातलेल्या हिवाळ्याकरता लागणारे गरम कपडे, ब्लँकेट, बूट तसेच फर्निचरच्या वस्तूंचा भरणा असतो. या दिवसाबद्दल तिथल्या लोकांच्या भावना जरी वेगवेगळ्या असल्या, तरी या सवलतींमध्ये मिळणाऱ्या वस्तूंचा लाभ घेण्यास सारे कमालीचे उत्सुक असतात!  ल्ल

naupada@yahoo.com